कवितेचं नामशेष होत जाणं

0
47

कवितेचं नामशेष होत जाणं – काही ‘फ्रॅगमेंटेड’ कॉमेंटस्

 

  • ज्ञानदा देशपांडेचं ‘थिंकिंग’ आवडलं, बरंचसं पटलंही.
  • त्यांचं एक विधान – ‘अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून तो माणूस खरी कविता लिहू शकला की काय?’ ह्यावरून सुचलेली गंमत – ‘अरुण कोलटकरांना, मॉडर्निटीला दूर ठेवणारे ‘मॉडर्न पोएट’ म्हणायचं की काय?’ – आणि आम्ही मॉडर्निटीला दूर ठेवलं असतं तर ज्ञानदांचं हे ‘थिंकिंग’ आमच्यापर्यंत ‘पोचलं’ असतं काय?
     
  • ‘सरत्या दशका’चा विचार – त्याचं ‘ऍनॅलिसिस’ ठीकच आहे. पण गेल्या पन्नास वर्षांचा विचार केला तर काय दिसतं? जनमानसात कुठले कवी शिल्लक आहेत? काही नावं – बहिणाबाई चौधरी, ग. दि. माडगूळकर, सुरेश भट. ही यादी लांबवायची म्हटलं तर शांता शेळके, पाडगावकर, मोघे… इत्यादी. इथं ‘जनमानस’ महत्त्वाचं आहे. कवितेच्या ‘अभ्यासकां’त म्हटलं तर, केशवसुत, मर्ढेकर, बालकवी, कुसुमाग्रज… इत्यादी नावं येतील.
     
  • आता गोची अशी, की ग.दि.मा., सुरेश भट इत्यादी मंडळींना ‘कवी’च न समजण्याची आपली ‘रीत’ ‘परंपरा’ आहे! त्यामुळे ज्ञानदांचं हे थिंकिंग ‘वेबसाइट रुदन’ ठरण्याची शक्यता आहे!
     
  • जे कमी गायले गेल्यामुळे जनमानसात जिवंत राहिले, त्यावर ते ‘माध्यमांतर’ होतं (संगीत हे अतिरिक्त माध्यम) असा प्रतिज्ञााद केला जाईल (जातो) – पण मुळात त्यांच्या शब्दांत कवितेची ताकद होतीच! अन्यथा अनेक सुमार ‘गीतकार’ कधीच नामशेष झाले आहेत.
     
  • ‘लाभले आम्हास भाग्य – बोलतो मराठी’ ही सुरेश भटांची कविता, त्यांच्या पहिल्या ‘रूपगंधा’ संग्रहातली आहे. कौशल इनामदारांनी त्याचं ‘स्वाभिमान गीत’ केल्यावर ती पुढे अजून पन्नास वर्षं (कदाचित शंभरही!) जिवंत राहील व त्यामुळे सुरेश भटही राहतील असं वाटतं. (त्यात त्यांच्या शब्दांचा वाटा नाही काय?) – आणि हे ‘विशफुल थिंकिंग’ नाही, तर  आजवरचा इतिहास बघता केलेलं तर्काधारित विधान आहे!
     
  • ‘लोकप्रिय होणं – म्हणजे ‘कवींचा आणि कवितेचा मृत्यू’ अशी भंपक विधानं केली गेली आहेत. पण ‘जनाधार’ लाभल्याशिवाय कुठल्याही कवीची ‘चिरंतना’कडे वाटचाल होत नाही.  हे सत्य तथाकथित विद्वान मंडळी समजून घ्यायलाच तयार नाहीत!
     
  • कविताच काय कथा / कादंबरी / ललित… सारेच प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मराठी नाटकांची अवस्थाही घरघर लागण्यासारखी झाली आहे. त्याची कारणं, ज्ञानदांनी म्हटल्याप्रमाणे ‘फ्रॅगमेंटेड’ होण्यात आहेत, हे खरं आहे. अन्य काही कारणं अशी असू शकतात ः
     
  • इंग्रजी भाषेनं शालेय / महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रावर आक्रमण केलं आहे. (उध्दव ठाकरेंचे चिरंजीव इंग्रजी कविता / गाणी लिहितात – असं वाचल्याचं स्मरतं.) – आणि हा प्रश्न साऱ्या भारतीय भाषांना सतावत आहे.
     
  • ‘डी.टी.पी.’ने छपाईतंत्रात क्रांती झाली. परिणामी आपला कवितासंग्रह दहा-पंधरा हजार रुपयांत कवीच काढू लागले. त्यामुळे ‘सुमार’ संग्रह ‘बेसुमार’ संख्येने आले… व वाचकांना कविताच नकोशी झाली.
  • समाजातला तरुण बुध्दिमान (स्कॉलर) वर्ग मोठया प्रमाणात तंत्रज्ञान / आय. टी. / मेडिकल इत्यादी ‘नगदी पिकांकडे’ वळला. जो पूर्वी लेखन / संपादन / तत्त्वज्ञान इत्यादींकडे लक्ष ठेवून असायचा. पैसा / श्रीमंती हीच महत्त्वाकांक्षा झाली.

      सदानंद डबीर 

Updated on 4th april 2019

 

About Post Author

Previous article‘लालबाग-परळ’ संस्कृतीचा प्रभाव
Next articleविंगेतल्या चळवळीची वाट पाहताना…
मराठी गजलकारांच्या दुसर्‍या पिढीतील महत्वपूर्ण गजलकार म्हणजे कवी व गजलकार सदानंद डबीर. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील पण अस्सल मुंबईकर. सदानंद डबीर यांनी ए एम आय इंजिनीअरींग ही पदवी प्राप्त केल्यानंतर पश्चिम रेल्वेत वरिष्ठ विद्युत अभियंता म्हणून पस्तीस वर्षे काम केले. त्यांनी महाविद्यालयात असताना कथा-कविता लिहिल्या. गीतलेखन करणारे सदानंद डबीर गजलकडे वळले ते कवि सुरेश भट यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेने. त्यांनी सुरेश भट यांनाच त्यांची पहिली गजल पाठवली व ती भट यांना खूपच आवडली व ती प्रकाशित झाली. सदानंद डबीर हे आकाशवाणी मुंबईचे मान्यताप्राप्त कवि आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम आकाशवाणीवर सादर केले आहेत. त्यांनी नवीन संगीत नाटकांसाठी गीत लेखन केले आहे. त्यांचे गजलेवरचे उत्तम लेख सामना, महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता या दैनिकांत प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे ‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘सावलीतील उन्हे’, ‘खयाल’, ‘गारुड गजलचे’, ‘आनंद भैरवी’, ‘साकिया’, ‘छांदस’ आणि ‘अलूफ’ हे गजल, गीत आणि कवितासंग्रह प्रकाशित आहेत.