पद्मा क-हाडे


संपर्क : padmakarhade@rediffmail.com9223262029

पद्मा क-हाडे यांचे इराणमधील वास्‍तव्‍यात आलेल्‍या अनुभवांचे लिखाण 'इराण' या पुस्‍तकाद्वारे प्रसिद्ध झाले आणि त्‍या लेखिका म्‍हणून प्रकाशात आल्‍या. त्‍या मूळच्‍या पुण्‍याच्‍या. त्‍यांनी लग्‍नाआधी पुण्‍यात अहिल्‍यादेवी हायस्‍कूलमध्‍ये तर लग्‍नानंतर मुंबईत परांजपे विद्यालय, अंधेरी येथे शिक्षिका म्‍हणून काम केले. त्‍यांचा विषय होता विज्ञान. त्‍या, त्‍यांचे पती पुरूषोत्‍तम क-हाडे यांच्‍या नोकरीच्‍या निमित्‍ताने इराण आणि सौदी अरेबिया इथे वास्‍तव्‍यास होत्या. त्‍यांनी देशविदेशातील भ्रमंतीमध्‍ये आलेले अनुभव पुस्‍तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत. आतापर्यंत त्‍यांची इराण, सौदीच्‍या अंतरंगात, हॉंगकॉंग सफारी, स्‍वान्‍तसुखाय आणि भटकंतीची साद अशी पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.


किरण कापसे - समाजसेवेसाठी स्थानिक राजकारणात!

(8 प्रतिक्रीया) किरण कापसे मूळचे नाशिकचे – निफाडच्या ‘वैनतेय विद्यालया’चे विद्यार्थी. ते आता ‘वैनतेय विद्यालया’चे विश्वस्त आहेत. त्‍यांची सामाजिक कार्यकर्ता, नगरसेवक अशीही त्यांची ओळख आहे. किरण यांचे आजोबा ‘वैनतेय विद्यालया’चे सुरुवातीपासून विश्वस्त होते. किरण म्हणाले, की “मी तसा जरा गुंड प्रवृत्तीचा आहे. म्हणजे मी चुकीचा मार्ग अवलंबतच नाही. त्यामुळे तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. माझा स्वभाव थोडा अॅग्रेसिव्ह आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळावर माझी नियुक्ती करण्याला काहीजणांचा विरोध होता. परंतु ते लोक माझे काम पाहून खूष आहेत. शाळेचा विश्वस्त असल्यामुळे शाळेत सतत येणे होते.”

सोनाली नवांगुळच्या जिद्दीची कहाणी

(7 प्रतिक्रीया) सोनाली नवांगुळचे आयुष्य सांगली जिल्ह्याच्या बत्तीस शिराळा या छोट्याशा गावात अगदी मजेत चालू होते. सोनालीचे आईबाबा शिक्षक, लहान बहीण संपदा, असे चौकोनी कुटुंब! सोनाली नऊ वर्षांची असताना, तिच्या पाठीवर बैलगाडी पडली आणि त्यामुळे तिच्या कंबरेतील व पायातील बळ गमावले गेले! ‘पॅराप्लेजिक’ झाल्यामुळे ना कमरेखाली संवेदना, ना नैसर्गिक विधींवर नियंत्रण! - पूर्ण परावलंबी झाली ती. तिच्या आयुष्याला विचित्र कलाटणी मिळाली ती उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमधे दीड वर्षें गेली तेव्हा. तेथे सोनाली एकटीच असे. सोनाली म्हणते, “वय वर्षे अवघे नऊ. पायाबरोबर घरही सोडावे लागण्याचा तो अनुभव.... न कळत्या वयातला. सर्वांची ओळख व स्वभाव (माझ्या त्या वेळच्या वयाचा विचार करता) जुळण्याआधीच, आपल्याला ‘असे काही’ झाल्याने सर्वांनी सोडून दिलंय, नि आता, मला घर नाही किंवा असेल तर हेच (डिस्चार्ज मिळेपर्यंत - हे कळत नव्हतं तेव्हा) असं मनाला फार दुखावून गेलं. यथावकाश रडारड संपून, एकट्यानं, हॉस्पिटलमधील सर्वांसोबत राहण्याची सवय लागली.”

ज्योती आव्हाड यांचे सेन्सरी गार्डन

(1 प्रतिक्रीया) नाशिकच्या ज्योती आव्हाड यांनी शारीरिक व मानसिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी तयार केलेले ‘सेन्सरी गार्डन’ ही महाराष्ट्रातील पहिलीच, अगदी आगळीवेगळी अशी बाग आहे. ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) युनिट, महाराष्ट्र (नाशिक)ट ही संस्था १९८४ सालापासून अंधांच्या पुनर्वसनाचे कार्य करत आहे. ज्योती आव्हाड संस्थेच्या नाशिकमधील अंधांसाठी असलेल्या शाळेच्या प्राचार्य आहेत. संस्थेने (नॅब) त्यांच्या कामाची कक्षा वाढवली व २००० साली मूकबधिर, मल्टिपल डिसॅबिलिटी, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद अशा मुलांचे पुनर्वसन करण्याचे ‘प्रोजेक्ट’ही हाती घेतले. त्यांना त्या कामासाठी ‘Sense International (India)’ या संस्थेने आर्थिक व तांत्रिक मदत केली. पुढे, ‘नॅब’ने नवीन तंत्रांचा, अॅक्टिव्हिटीजचा वापर करण्याचे ठरवत ‘सेन्सरी गार्डन’ हा प्रोजेक्ट हाती घेतला.

राहुल अल्वारिस - शाळेपासून मुक्ती : वर्षापुरती

(1 प्रतिक्रीया) गोव्यात राहणाऱ्या राहुलने दहावी पास झाल्यानंतर, एक वर्षभर कॉलेजमध्ये प्रवेश न घेता, त्याला जे काही करावेसे वाटते ते केले. त्याच्या त्या वर्षभराच्या शाळाबाह्य शिक्षणाचे अनुभव म्हणजे ‘शाळेपासून मुक्ती- वर्षापुरती’ हे पुस्तक. त्याचा कालावधी जून १९९५ ते जून १९९६ असा आहे. ती कल्पनाच भन्नाट आहे. राहुलच्या आई-बाबांनी त्याला तसे करण्यासाठी परवानगी दिली; नव्हे, प्रोत्साहनच दिले!

अनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘लक्ष्य’

(4 प्रतिक्रीया) अनुराधा प्रभुदेसाई. मध्यम वयाच्या. चुणचुणीत. स्मार्ट. चेहऱ्यावर व एकंदर देहबोलीत आत्मविश्वास. त्या जे बोलल्या त्यात उत्कटता होती, कारण त्या जे सांगत होत्या, ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते! अनुराधा यांच्या आयुष्याला २००४ साली कलाटणी मिळाली. अनुराधा, त्यांचे यजमान गुरुनाथ, त्यांचे मित्र विक्रम व त्यांची पत्नी अपर्णा असे चौघेजण लडाखला सहलीला गेले होते. अनुराधा सांगतात, “आम्ही लडाखला पोचल्यावर जेव्हा आपापले सामान उचलून चालू लागलो, तेव्हा भराभर चालवेना. धाप लागल्यासारखे जाणवू लागले. त्या क्षणीच त्या वातावरणातील वेगळेपणा जाणवला. मला त्या भागाविषयी काहीच माहिती नव्हती. आम्ही तो भाग आजुबाजूला दिसणा-या  जवानांशी बोलत, गप्पा मारत असे करत बघत फिरत होतो. कारगिलहून द्रासकडे जात असताना, रस्त्यात पाटी दिसली. ती वाचली आणि मी आतून पूर्णपणे हादरून गेले.” ती पाटी होती – ‘I only regret that I have but one life to lay down for my country.’

प्रल्हाद पाटील-कराड - प्रगतशील शेतकरी

(2 प्रतिक्रीया) प्रल्हाददादांची ओळख ही ‘एक प्रगतशील शेतकरी’ म्हणून आहे. प्रल्हाददादांचा (प्रल्हाद नामदेव पाटील) जन्म २७ फेब्रुवारी १९३० रोजी जळगाव, तालुका निफाड येथे शेतकरी कुटुंबात झाला. स्वातंत्र्यलढ्याला उठाव आला होता. प्रल्हाददादा लहान वयात १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीकडे आकृष्ट झाले, ते ‘राष्ट्र सेवा दला’चे सैनिक म्हणून समतेचे पोवाडे गाऊ लागले. त्यांनी प्रभातफेऱ्या, सेवादलाची शिबिरे यांत सहभागी होऊन नवनिर्माणाची आस, अन्यायाविरूद्ध उभे राहण्याची उर्मी व्यक्त केली. त्यांच्या त्या सहभागाचा परिणाम शालेय शिक्षणावर झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी चौथीपर्यंत झाले. ते तेथेच थांबले.

दृष्टिवंत योगिता

(2 प्रतिक्रीया) योगिता तांबे ही अंध आहे. मात्र तिच्‍या आंतरिक गुणांनी शारिरीक उणेपणावर मात केली आहे. योगिता जोगेश्वरीतील ‘अस्मिता विद्यालया’त संगीतशिक्षक म्हणून काम करते. ती तेथे 2012 पासून कार्यरत आहे. तिने शाळेत बालवाद्यवृंद बसवला आहे. योगिताला संगीत व गाणी ऐकण्याचा छंद आहे. तिला तीन हजार गाणी तोंडपाठ आहेत. ती एकंदर पंचवीस तालवाद्ये वाजवते. तबला, मृदुंग, ढोलकी, ढोलक, धनगरी ढोल, ताशा, दिमडी, हलगी, नगारा... इत्यादी. तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. त्‍याचा आश्चर्य वाटावा असा नमुना म्हणजे तिला तब्बल पंधराशे जणांचे मोबाईल नंबर पाठ आहेत.

हेमंत सावंतची ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षासेवा हेल्पलाईन

(4 प्रतिक्रीया) रिक्षावाल्यांचा अॅटिट्युड, त्यांची लोकांशी बोलण्याची पद्धत याविषयी सामान्यत: नाराजी व्यक्त केली जाते. फार कमी लोक रिक्षावाल्यांविषयी चांगले मत व्यक्त करतात! रिक्षावाले मीटर आडवा टाकून, ढुंकूनही न बघता समोरून जाणार किंवा हात दाखवला, की थांबणार पण अमूक ठिकाणी येणार नाही असे निर्ढावलेपणाने सांगणार, हा सहसा अनुभव. पण रिक्षाचालकांत अपवाद असतोच.

म्हैसगावचा रामहरी फ्रान्समध्ये!

(22 प्रतिक्रीया) म्हैसगाव कुर्डुवाडीपासून दहा किलोमीटर दूर आहे. म्हैसगावसारख्या सात-आठ हजार लोकवस्तीच्या गावातील दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत! ही कहाणी आहे गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झालेल्या शैक्षणिक प्रगतीची. म्हैसगावात चंद्रकांत कुंभार नावाचे गृहस्थ राहतात. कुंभारकाम हा त्यांचा व्यवसाय. कुंभार यांचा थोरला मुलगा रामहरी फ्रान्समध्ये पीएच.डी. करत आहे व दुसरा मुलगा, नामदेव मुंबई विद्यापीठात पत्रकारितेतील पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. रामहरी सांगतो, तो लहान असताना, म्हैसगावातील एकंदर वातावरण चांगले नव्हते. राजकारण बरेच होते व त्याचे पडसाद घराघरात जाणवत. घरांमध्ये भांडणे होत असत. शिवीगाळ चालू असे. गावातील मुलांच्या शिक्षणाकडे कोणी लक्ष देत नसे.

बहुढंगी राजाराम बोराडे

(2 प्रतिक्रीया) राजाराम दत्तात्रय बोराडे यांच्या बंगल्याच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला वाढलेली तुळशीची उंच रोपटी लक्ष वेधून घेतात. बंगल्यात जावे तर हॉलमध्ये मात्र भिंतीवर लाल रंगाने लिहिलेल्या ज्योतिषविषयक लिखाणावर नजर खिळून राहते. एका कपाटाच्या दारावर भविष्यविषयक जो सल्ला हवा असेल त्याचे दरपत्रकही चिकटवलेले दिसले. दुसऱ्या भिंतीला शेल्फ आहे. त्यात अनेक बरण्या आणि त्यात औषधे. बाजूला कॉम्प्युटरही आहे. शिवाय एक लहानसे रायटिंग टेबल व खुर्ची.

दारफळची धान्याची बँक

(11 प्रतिक्रीया) जेथे पैशाचे सर्व व्यवहार होतात, ती बँक असे प्रत्येकाच्या मनात असते. पण सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ या गावी ‘धान्याची बँक’ आहे.

सौदागर शिंदे

सौदागर शिंदे हे मूळचे माढ्याचे. ते माढ्यापासून जवळ असणाऱ्या घाटणे गावातील शाळेचे (सातवीपर्यंत) मुख्याध्यापक आहेत. त्यांनी कोल्हापूर विद्यापीठातून एम.ए. केले आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून बी.एड. केले आहे. त्यांचे आईवडील हलाखीच्या परिस्थितीत जगले आहेत. इतके की, सौदागर यांचा जन्म होईपर्यंत त्यांची आई गर्भार अवस्थेत शेतात काम करत असे. ती शेतात काम करत असतानाच सौदागर यांचा जन्म झाला!

म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर

(1 प्रतिक्रीया) सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील म्‍हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे पूर्ण अंधार आहे - टॉर्च घेतल्याशिवाय जाता येत नाही, गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे.

म्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे

(10 प्रतिक्रीया) कालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी म्हैसगावचा बँड होता आणि कालिदासचे वडील शिवाजी कांबळे हे त्या बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत. ते गावातील बँडव्यतिरिक्त कुर्डुवाडीजवळील आरपीएफ येथेही ट्रम्पेट वाजवायला जात. शिवाय, त्यांची घरची शेती होती. घरची शेती कालिदासच्या बालपणापासूनच, त्याच्या कानावर हे संगीत/वाद्यसंगीत पडत होते. म्हैसगावातील सूर्यभान खारे काका पेटी वाजवतात, ते पेटीवादनाच्या कार्यक्रमाला जाताना, लहान कालिदासला, त्यांच्या बरोबर नेऊ लागले. लहानग्या कालिदासची बोटे की बोर्डवर फिरू लागली. तो वडिलांकडून ट्रम्पेटही वाजवण्यास शिकला.

माढ्याचे ग्रामदैवत - माढेश्‍वरी देवी

(12 प्रतिक्रीया) माढा हे सोलापूरच्‍या माढा येथील तालुक्‍याचे गाव. तेथील ग्रामदैवत माढेश्‍वरी हीच्‍या नावावर त्या गावाचे माढा असे पडले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळून येतात. त्‍यांमध्‍ये प्रसिद्ध असलेली ठिकाणे तीन - सोलापूरची रूपाभवानी, करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माढेश्वरी.

सूर्यकुंभ

(3 प्रतिक्रीया) सौर ऊर्जेचा वापर केवळ वीजनिर्मिती करण्यासाठी नसून, इतरही अनेक जीवनावश्यक गरजांसाठी करता येतो, या विचाराने प्रेरित होऊन एक अनोखा प्रयोग, मुंबईनजीकच्या भाईंदरजवळ उत्तन येथील ‘केशवसृष्टी’त ४ जानेवारी २०१४ या दिवशी पार पडला. ‘सूर्यकुंभ’ हे त्या प्रयोगाचे नाव.

मराठी मित्र मंडळ – विलेपार्ले

(1 प्रतिक्रीया) विलेपार्ल्यातील सुजाण, समविचारी मंडळींनी सुरू केलेल्या मराठी मित्र मंडळाचे लोकोपयोगी उपक्रम

एको देव केशव: - गुरुपाडवा

(2 प्रतिक्रीया) ही कहाणी आहे एका दत्तमूर्तीची आणि तिच्या पूजेची. ही मूर्ती अंबेजोबाईचे सोळाव्या शतकातील संतकवी दासोपंत यांनी निर्माण केली. या दत्ताचे नवरात्र आणि गुरुपाडवाही साजरा केला जातो.

वीणा गोखले - देणे समाजाचे

(2 प्रतिक्रीया) सामाजिक संस्‍थांची माहिती लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने पुण्‍याच्‍या वीणा आणि दिलीप गोखले या दांपत्‍याने दरवर्षी सामाजिक संस्‍थांचे प्रदर्शन भरवण्‍यास सुरूवात केली. ‘देणे समाजाचे’ या नावाने पितृपंधरवड्यात हे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्‍यात विविध संस्‍थांच्‍या कामांची ओळख करून देत त्‍या संस्‍थांनामदत करण्‍याचे आवाहन लोकांना केले जाते. लोकांचा या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदा सहा हजार व्‍यक्‍तींनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. समाजऋण फेडण्याचा हा अनोखा उपक्रम आहे.

नाट्यसंगीताचा वारसा जपणारी तरुण पिढी

रुपारेल कॉलेजमधून पदवीशिक्षण पूर्ण करून, बाहेर पडलेली दहा-बारा मुले. त्यांना असलेल्या नाटकाच्‍या आवडीतून त्यांनी २००६ साली ‘मिथक’ची स्थापना केली. ‘स्वत:ला पटेल व आवडेल असे नाटक करणे’ हा त्यांचा उद्देश. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये ब-याच वेळा प्रथम क्रमांक मिळवला. 'मिथक'तर्फे सादर करण्‍यात आलेले ‘संगीत, कोणे एके काळी’ हे नाटक पद्मा क-हाडे यांनी पाहिले आणि ते त्‍यांना अप्रतिम वाटले. यानंतर क-हाडे यांनी या नाट्यवेड्या ग्रुपशी मारलेल्‍या या गप्‍पा...

निवांत अंधमुक्त विकासालय

अंध मुला-मुलींच्या दहावीनंतरच्या उच्च शिक्षणाला मदत करणे हा ध्यास घेऊन पुण्याच्या मीरा बडवे यांनी त्यांचा बंगला म्हणजे अंध मुलामुलींचे आश्रयस्थान करून टाकले. गेल्या दहा वर्षांत त्या बंगल्यातून एक हजार अंध व्यक्ती उच्च शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण झाल्या. ज्या अंध व्यक्तींना नोकरी-व्यवसाय मिळत नाही त्यांच्यासाठी मीरा बडवे तो निर्माण करतात. अशा तर्‍हेने त्या बंगल्यात एक सॉप्टवेअर कंपनी व एक चॉकलेट कंपनी स्थापन झाली!

पुसेगावचा रथोत्सव

(1 प्रतिक्रीया)    सातारा-पंढरपूर मार्गावरील पुसेगाव दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला भरणा-या रथोत्‍सवामुळे महाराष्‍ट्रात प्रसिद्ध आहे. या रथयात्रेत गुलाल-भंडार्‍याप्रमाणे रथावर नोटा उधळल्‍या जातात. भक्तांकडून उधळण्‍यात आलेले लक्षावधी रूपये शैक्षणिक व लोकोपयोगी विकासकार्यासाठी वापरले जातात. महाराष्‍ट्रातून व राज्‍याबाहेरून आलेले लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात.

विठोबाचे नवरात्र

नवरात्र म्‍हटले, की डोळ्यांसमोर आई जगदंबेची मूर्ती उभी राहते. मात्र जगदंबेसोबत विठोबाचीही नवरात्र साजरी केली जाते, हे ब-याच जणांना ठावूक नसेल. ती देखील वर्षातून दोन वेळा. पद्मा क-हाडे यांनी या नवरात्रींची आणि त्‍यांच्‍या विधींची ओळख करून देताना महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचा एक अपरिचीत पैलू येथे मांडला आहे. सोबत द. ता. भोसले यांनी पंढरपूर येथील रुक्मिणीमाता मंदिरात केल्‍या जाणा-या धार्मिक विधींची माहिती दिली आहे.

अनाथांचा नाथ

(1 प्रतिक्रीया) नितेश बनसोडे हा मूळचा राजूरचा (ता. अकोले.) त्याच्या लहानपणी त्याच्या आईचं निधन झालं. वडिलांनी आणि काकांनी त्याला वाढवलं पण आई नाही म्हणून नितेशकडे कायम दयेच्या भावनेतून बघितलं गेलं; हे नेमकं नितेशला खटकत होते. मुलाला आई नसणे किंवा आई-वडील दोघेही नसणे ही काही त्याचा गुन्हा नाही. पण समान सतत, पदोपदीच्या लेकरांना ती आठवण करुन देतो. याला आई नाही, त्याला बाप नाही अशी त्या लेकराची ओळखही करुन दिली जाते. त्यातून लेकरांना कमजोर बनवले जाते.  

हिवरेबाजार आणि पोपट पवार

(36 प्रतिक्रीया) हिवरेबाजार हे नगर जिल्ह्यातील गाव आणि पोपटराव पवार यांनी घडवलेला त्या गावाचा विकास ही महाराष्ट्राची अभिमानास्पद कहाणी आहे. ‘थिंक महाराष्ट्र’च्या प्रतिनिधी पद्मा कर्‍हाडे यांनी त्या गावास भेट देऊन पोपटरावांशी बोलून सादर केलेला वृत्तांत.

यंग इंडियन - इर्फाना मुजावर

सर्वसामान्य मुस्लिम मुलीला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी, कित्येकदा घरातल्या माणसांशी, समाजातील माणसांशी, कडवी झुंज द्यावी लागते. तशीच झुंज मुंबईला जोगेश्वरीत राहणा-या इर्फानालाही द्यावी लागली. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर, पुढील बीएपर्यंतचे शिक्षण कॉरस्पॉडन्स कोर्सने पूर्ण केले. त्यानंतर तिने क्राफ्ट व ड्रॉईंगचा कोर्स पूर्ण केला. ही गोष्ट 1995 सालची. त्यानंतर तिने दोन शाळांत शिक्षिकेची नोकरी तीन वर्षे केली. त्यांपैकी हैद्री शाळेत केवळ शियापंथीय विद्यार्थ्यांना सवलती व शिष्यवृत्त्यांचा लाभ मिळतो हे पाहून इर्फाना अस्वस्थ होत असे. मात्र इर्फानाने तिथेच ठरवले, की आपण स्वत: एक शाळा काढायची, जिथे कोणत्याही विद्यार्थ्याला तो अमुक जाती-धर्माचा आहेस म्हणून सोयीसुविधा नाकारल्या जाणार नाहीत! वडिलांनी तिच्या लग्नासाठी जी रक्कम बाजूला ठेवली होती तीच, इर्फानाने आपल्या वडिलांकडून तिच्या या शाळेसाठी मिळवली. त्या छोटयाशा पुंजीतून जोगेश्वरी पूर्वेकडील हरीनगर या झोपडपट्टीमध्ये इर्फानाची 'यंग इंडियन्स स्कूल' ही इंग्रजी माध्यमाची शाळा उभी राहिली. इर्फान या शब्दाचा अर्थ ज्ञान असाच आहे.