Member for

3 years 2 months

मालती बेडेकर या मराठी साहित्यातील प्रतिष्ठित लघुकथालेखिका आणि कादंबरीकार. त्यांनी त्यांचे लेखन ‘विभावरी शिरूरकर’ या नावाने केले. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1905 रोजी अलिबाग येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील घोडनदी (शिरूर) येथे सातवीपर्यंत झाले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे कन्याशाळेत शिक्षकाची नोकरी केली. बेडेकर त्यांचे वडिल, तसेच, महर्षी अण्णासाहेब कर्वे, वामन मल्हार जोशी आणि मा. माटे यांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित झाल्या. त्यांचा हिंगणे संस्थेत काम करत असताना अनाथ, विधवा आणि नव-यांनी छळलेल्या स्त्रीयांशी संपर्क आला. त्या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या मालती बेडेकरांनी प्राचीन भारतीय समाजातील समकालीन स्त्रीयांचे अधिकार आणि स्थिती जाणण्यासाठी मनुस्मृतीचे शिक्षण घेतले. मालती बेडेकर आणि नरसिंह केळकर यांनी मिळून स्त्रीयांच्या विकासावर आणि व्यावहारिक हिंदू धर्मशास्त्रावर पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांच्या लेखनाने महिलांच्या पीडा व वेदनांना वाचा फोडली. त्यांच्या लेखनावर टीकास्त्रदेखील उगारले गेले. मालती बेडेकर यांनी मुंबईमध्ये 1981 साली भरलेल्या ‘समांतर साहित्य परिषदेचे’ अध्यक्षपद भूषवले होते. त्या परिषदेतील त्यांचे अध्यक्षीय भाषण फार गाजले. त्यांचे वयाच्या शहाण्णवव्या वर्षी पुणे येथे निधन झाले.