प्रितालीची दौ़ड सायकलवर!


निडी हे रोह्याजवळचे खेडेगाव, पण त्या गावाचे नाव देशपातळीवर गाजत आहे, ते प्रिताली शिंदेमुळे. मुलगी शिकली प्रगती झाली हे इथे खरे ठरले! ती रविकांत व रंजिता शिंदे यांची कन्या. तिने प्रगतीची पावले टाकण्यास आठवीपासूनच सुरुवात केली व ती सायकलमुळे-वेगवान गतीमुळे ध्येयमंदिराकडे जात राहिली. प्रिताली सध्या बालेवाडी(पुणे) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, येथे फर्स्ट इयर बी.कॉम. करत आहे. तिचे पहिले ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण निडी येथे झाले. ती पाचवीपासून मेढे या गावी शाळेत येत असे. निडीपासून मेढे गाव दोन किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून वडिलांनी तिला सायकल घेऊन दिली. तिचे सायकलने येणे-जाणे रोज सुरू झाले. ती नववीपर्यंत हायस्कूलमध्ये होती. चार वर्षांत सायकलची गरज हा तिचा हळुहळू छंद व मग ध्येय बनले.

मेढा हायस्कूलच्या शिक्षकांनी तसेच प्रकाश पानसरे या तिच्या मार्गदर्शकांनी तिच्यातले गुण ओळखून तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. शाळेत जाताना उशीर होऊ नये यासाठी प्रिताली वेगाने सायकल चालवत असे. ते पाहून ही मुलगी सायकलिंगमध्‍ये प्राविण्‍य मिळवू शकेल असा विश्‍वास पानसरेसरांना वाटला. त्‍यांनी त्याबाबत तिच्‍या आईवडिलांशी चर्चा केली आणि पानसरेसरांकडे प्रितालीचे प्रशिक्षण सुरू झाले. ध्येय ही जीवनाची गरज आहे हे आकलन झाल्यावर तिने ध्येयाची अर्धी मजल मारली असे पानसरे म्हणतात.

आशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती!


सायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू!

 जुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री सायकलपटू!

 मुंबई-पुणे रस्ता न थांबता पाच तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पार करणारी एकमेव स्त्री खेळाडू!

 पाच फूट दोन इंच उंची, नीटनेटके बसावेत असे, कोणतीही फॅशनेबल स्टाईल न करता कापलेले करड्या रंगाचे केस, समोरच्याला दरारा वाटावा असे चेहर्‍यावरचे भाव, स्कर्ट व वर कॉलरचा शर्ट असा वेश आणि तिच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असावा अशी ‘हिरो’ची जुन्या स्टाईलची लेडीज सायकल सतत तिच्या बरोबर!

 शिरपेचामध्ये अनेक उपाधी धारण केलेली, तळेगाव-दाभाडे येथील आशा पाटील!