मांगरुळ गावची श्रीचिंचेश्वराची यात्रा


सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हा तालुका नागपंचमीच्या उत्सवासाठी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील मांगरूळ गावात पर्वतरांगांच्या कुशीत, अगदी उंच डोंगरावर श्रीचिंचेश्वर देवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ तर मागील बाजूस वठलेला वटवृक्ष आहे. शिवाय बाजूला दाट वनराईही आहे. मंदिरापासून काही अंतरावर बारमाही वाहणारी वारणा नदी आहे. ग्रामस्थ आणि चिंचेश्वराच्या भक्तांनी मिळून उंच टेकडीवर असलेल्या त्‍या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या गाभा-यात चिंचेश्वराची मूर्ती आहे. आजही त्‍या देवाची आख्यायिका लोक मोठ्या भक्तिभावाने सांगतात.

अकलुजमधील कुस्ती स्पर्धा


सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव माने-पाटील या तीन बंधूंच्या स्मरणार्थ आहे.

वडशिंगेची दुर्गा – काजल अशोक जाधव


गायनात घराणी जशी असतात, तशी काही कुस्ती घराणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा छंद घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत येतो.

कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) पासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील वडशिंगे गावातही बबन गणपत जाधव हे पैलवान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांचा मुलगा अशोक बबन जाधव यानेही इयत्ता दहावीपर्यंत आजुबाजूच्या गावांतील, जत्रांतील फडांत कुस्तीगीर म्हणून भाग घेतला होता. अशोकला त्याचा स्वत:चा कुस्तीतील सक्रिय भाग शेतीच्या व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे कमी करावा लागला. मात्र अशोकने वडिलांचा वारसा त्यांच्या मुलामार्फत पुढे चालवायचा अशी जिद्द बाळगली.

पण अशोक-सुरेखा यांना लागोपाठ दुसरी मुलगी झाली! तिचा जन्म 15 ऑगस्ट 2001 चा. तिचे नाव, राशीप्रमाणे ‘द’ हे अक्षर आल्यामुळे ‘दुर्गा’ असे ठेवले, पण नेहमीसाठी ‘काजल’ हे आधुनिक नावही ठेवले. पहिलीचे नाव तेजस्वी. अशोकला कुस्ती खेळायला मुलगा हवा होता. त्यामुळे अशोकला त्याच्या या मुलीला जवळ घ्यावे, तिचे लाड करावेत असे वाटेना. लहानग्या काजलला त्यातील काहीच समजत नव्हते. तीच जरा चालू-बोलू लागल्यावर ‘बापू बापू’ करून हट्टाने बाबाच्या मांडीवर बसू लागली; त्याच्या गळ्यात हात घालून अशोकला प्रेम देत राहिली.

अशोकचा कुस्ती हाच ध्यास असल्यामुळे तो गावच्या तालमीत जायचा; कुस्ती शिकू इच्छिणाऱ्या मुलांना कुस्तीचे काही डाव शिकवायचा. तो त्याचे कुस्तीशी, लाल मातीशी असलेले नाते  अशा रीतीने जपत होता. लहानगी काजल ‘बापू’बरोबर बाहेर जाण्याचा हट्ट धरे. ‘बापू’ तिला ‘तू पोरगी, तू काय तालमीत येऊन करणार? कंटाळशील बघ’ असे सांगून तिला न्यायचे टाळायचा, पण एके दिवशी, त्याला काजलला नाही म्हणवेना आणि अशोक लहानग्या काजलला उचलून वडशिंगे गावच्या तालमीत गेला!