साहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरण
फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर लेदर्ले यांच्यापासून सुरू झालेली ख्रिस्ती साहित्य परंपरा मराठीच्या मुख्य प्रवाहात अग्रस्थानी येऊन विराजमान झाली. ते गरजेचे होते व आहेही. एका बाजूला मराठी साहित्याची निर्मिती अधिकाधिक विकेंद्रित होत जाणे महत्त्वाचे आहे. मुंबई-पुण्याची मिरास गेल्या दोन-तीन दशकांत नष्ट होऊन गेली आहे. परंतु त्याबरोबर ख्रिस्ती, मुस्लिम, दलित, बौद्ध असा साहित्यविचार दृढावणे गैर आहे. साहित्य हे सर्वसमावेशक असायला हवे. दिब्रिटो यांच्या निवडीने ते सिद्ध झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण वातावरण गेल्या काही महिन्यांत गढुळले गेले आहे. विधानसभेच्या निवडणुका-त्याआधीच्या प्रचारमोहिमा व नंतरचे सत्ताकारणाचे, नाट्य. सर्व समंजस, सुसंस्कृत मने विषण्ण होऊन गेली आहेत. अशा वेळी समाजातील साहित्यसंस्कृतीचे वातावरण जर चैतन्यमय होऊ शकले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे समाजजीवन निकोप विचारांनी भरले जाईल.