मधु मंगेश कर्णिक : रिता न होणारा मधुघट
कोकणातील 'करुळ' या खेड्यात जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत फडकावणा-या मधु मंगेश यांची जीवनकहाणी रोचक, रंजक आणि स्नेहाची आहे. 'ममक', 'मधुभाई' ही कोकणवासियांनी ठेवलेली त्यांची लाडकी नावे. मधुभाईदेखील ते लाडलेपण आवडीने जपतात व अंगावर शाल पांघरून सर्वत्र आपुलकीने वावरतात. मधु मंगेश यांचा जन्म 28 एप्रिल 1931 चा. ते 80 वर्षांचे होऊन गेले, त्यानंतर त्यांनी काही सार्वजनिक जबाबदा-या सोडल्या, पण त्यांचा कार्योत्साह अदम्य आहे.
मधु मंगेश यांनी शिक्षण आणि नोकरी यांच्या निमित्ताने गाव सोडले, पण गावाशी संबंध मात्र कायम ठेवला. त्यांच्या नोकरीचा प्रवास 1952 साली एस्.टी.तून सुरू झाला. तेथपासून ते गोवा शासनाचे प्रकाशन अधिकारी, महाराष्ट्राचे साहाय्यक प्रसिद्धी संचालक, मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी, महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळाचे महाव्यवस्थापक अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, 1983 साली नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्य यासाठी स्वतःला समर्पित केले.