महाराष्ट्राचे व्हेनिस... नगर, सोळाव्या शतकातील
अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि, सोळावे शतक हे निजामशाहीचे मानले जाते. मैलाचे दगड ठरलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना त्या शतकात अहमदनगरमध्ये घडल्या. नगरच्या खापरी नळ असलेल्या पाणी योजना वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्यांचे अवशेष अभ्यासकांना आकर्षित करत असतात...
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, पण त्यासाठीची पार्श्वभूमी त्यांचे पिता शहाजीराजे यांनी निजामशाहीत असताना तयार केली. इतिहासकारांनी शहाजीराजे यांचा गौरव ‘स्वराज्य संकल्पक’ म्हणून केला आहे. मराठेशाहीची मुहूर्तमेढ जेथे रोवली गेली आणि मोगलांच्या पतनालाही जेथून सुरूवात झाली, ती आहे अहमदनगरची भूमी!
दक्षिण भारतातील बलाढ्य बहामनी साम्राज्याची पाच शकले उडाली आणि त्यांपैकी एक निजामशाही पंधराव्या शतकाच्या अखेरीस अस्तित्वात आली. अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी बनली. जवळजवळ सगळा महाराष्ट्र तेव्हा निजामशाहीकडे, म्हणजे अहमदनगरच्या अखत्यारीत होता. सोळाव्या शतकात अहमदनगर हीच जणू काही महाराष्ट्राची निजामशाही राजधानी होती.