महाराष्ट्राचा महावृक्ष

अज्ञात 07/06/2017

_Maharashtracha_Mahavruksha_1.jpgसंगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगडच्या (ऊर्फ शहागड) दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा भागात विशाल वटवृक्ष आहे. तो तेथे वादळवाऱ्याला तोंड देत अनेक वर्षांपासून उभा आहे. महाकाय वटवृक्ष दोन एकरांवर पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर साठ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या शंभराच्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास तीनशे फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास दोनशेऐंशी फूट इतका मोठा आहे. वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोश्यांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत.

दैवतांची दंतकथाही मोठी रंजक आहे. गुरे-शेळ्यांची राखण करणाऱ्या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. ते रक्तबंबाळ झाले, पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत! त्या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही अखेरचा श्वास तेथेच घेतला!

भावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले आणि तिनेही भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करत तेथेच प्राण सोडला. रामोश्यांनी त्यांच्या मूर्तीची त्या जागेवर स्थापना केली.

मूर्तीची स्थापना झाल्यानंतर त्या वडाच्या झाडाचेही 'दैवतीकरण' झाले. कोणी झाडाच्या फांद्या जाणीवपूर्वक तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा वगैरे बसली! त्यामुळे झाडाचा विध्वंस कोणी करत नाही. परिणामी झाडाचे रूपांतर विशाल वटवृक्षात होत गेले.

झाडाच्या वरच्या बाजूला मोरदऱ्याचा मोठा तलाव आहे. झाडाच्या परिसरातील शेती काही वर्षांपूर्वी जिरायत होती. तेथे तलाव झाल्यावर मात्र विहिरी खणल्या गेल्या. शेती ओलिताखाली आली. झाडाच्या चहुबाजूंनी बारमाही शेती सुरू झाली आणि कदाचित, त्यामुळे झाडाच्या पारंब्यांचा विस्तार आखडला गेलाय! मध्ये काही वृक्षप्रेमींनी तेथील शेतकऱ्यांनी पारंब्यांचे शेंडे छाटल्याची तक्रार केली होती. २००६ च्या पावसाळ्यात तुफान पाऊस झाला. झाडाच्या बगलेतून वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आला होता. त्यात पारंब्यांची मुळे उघडी पडली होती. त्यानंतर तेथे सिमेंट-काँक्रिट ओतून ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला वाट करून देण्यात आली आहे.

आघाडा - औषधी वनस्पती


गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।

आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला ‘अपामार्गक्षार’ म्हणतात. आघाड्याला वेगवेगळ्या भाषांत अपांग, चिरचिरा, चिचरा, लत्‌जिरा, उत्तरेणी, कंटरिका, खारमंजिरी, मरकटी, वासिरा, काटेरी फुलोरा अशी नावे आहेत. वनस्पतिशास्त्रज्ञांनी त्याचे ‘अचिरॅन्थस अस्परा’ असे नामकरण केले आहे.

भाद्रपदात आघाडा या छोट्याशा वनस्पतीलासुद्धा पूर्वसुरींनी विशेष प्राधान्य दिले आहे. हरतालिका, गणेशचतुर्थी, ऋषिपंचमी आणि ज्येष्ठागौरीच्या पूजेत आघाड्याचा आवर्जून समावेश केलेला आहे. आषाढ-श्रावणात आघाडा वाढायला सुरुवात होते. श्रावणात जिवतीला आघाडा-दूर्वांची माळ वाहतात. भाद्रपदात आघाड्याची वाढ पूर्ण होते. त्यात जास्तीत जास्त औषधी गुणधर्मही एकवटतात. पूर्वी दिवाळीतील अभ्‍यंगस्‍नानात अंगाला उटणे लावून शरिरावरून दोन-तीन तांबे उष्‍ण पाणी घेतल्‍यानंतर तिच्‍यावरून आघाड्याची फांदी तीन वेळा मंत्र म्‍हणत फिरवण्‍याची प्रथा अस्तित्‍वात होती. आघाड्याच्या गुणधर्मांचा लाभ माणसाला व्हावा म्हणून त्याच्या पूर्वसुरींनी आघाड्याला व्रतवैकल्ये आणि धार्मिक कार्यात स्थान दिले, त्याच्याशी नातेसंबंध जोडून दिले.

कारिट - नरकासूराचे प्रतिक


कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला चिभडं, शेरनी किंवा कर्टुलं या नावाने ओळखतात. कारिटाची चव कडवट असते. दिवाळीत नरक चतुर्दशीच्‍या पहाटे अभ्‍यंगस्‍नानापूर्वी ते फळ फोडण्‍याची परंपरा आहे. ते फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. नरक चतुर्दशीच्‍या दिवशी भगवान कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचले जाते. त्यातून बाहेर पडणारा रस हे नरकासुराच्‍या रक्‍ताचे रुपक आहे. कारिट फोडल्‍यानंतर त्याचा रस जिभेला तर त्‍याची बी कपाळाला लावण्‍याची पद्धत आहे. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्‍या रुपात असलेली सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी आणि त्‍यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन दिवाळीचा सण साजरा करावा अशी कारिट फोडण्‍यामागची कल्‍पना आहे. काही ठिकाणी कारिट अभ्‍यंगस्‍नानानंतर फोडले जाते.

कोकणामध्‍ये नरक चतुर्दशीच्‍या पहाटे कारिट फोडताना 'गोविंदाऽऽऽ गोविंदा' अशी आरोळी दिली जाते. तेथे पूर्वी अभ्‍यंगस्‍नानासाठी पाणी तापवण्‍याच्‍या हंड्याला कारिटाच्‍या माळा घातल्या जात. पाडव्याच्‍या दिवशी शेणाचा गौळवाडा करून त्‍यात लहान मोठी कारिटे गाई-वासरे म्‍हणून ठेवली जात. त्‍यावेळी एखादे कारिटे मधोमध कापून त्यातील गर काढून टाकला जाई. त्याचा हाती आलेला अर्धा भाग दही घुसळण्‍याचा डेरा म्‍हणून गौळवाड्यात ठेवला जात असे.

स्मृती जपणारे सोलापूरचे उद्यान!


प्रसन्न वातावरण... चारही बाजूंनी हिरवळ... तीनशेवीसहून अधिक प्रजातींच्या वनस्पती... सत्तराहून अधिक प्रकारचे पक्षी... सचित्र माहिती देण्यासाठी निसर्ग परिचय केंद्र... पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह आणि टॉवर... अभ्यासासाठी तारांगण आणि दिशादर्शक यंत्रही... हे सगळे एकाच ठिकाणी... असा परिसर सोलापुरात आहे. ते स्मृती उद्यान. कुटुंबीय आणि मित्र यांच्यासमवेत छानशी सहल करण्यासाठी जैवविविधतेने नटलेले स्मृती उद्यान! तेथे बाराशेहून अधिक वृक्षप्रेमींनी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय यांची स्मृती जपण्यासाठी झाडे लावली आहेत.

सोलापुरात अशा प्रकारचा वेगळा उपक्रम शासनाच्या मदतीने 1996 साली सुरू झाला. विजापूर रस्त्यावर असलेल्या संभाजी तलावाच्या शेजारी वन जमिनीवर स्मृती उद्यानाची स्थापना करण्यात आली. पर्यावरणप्रेमी बी. एस. कुलकर्णी, वासुदेव रायते, निनाद शहा, भरत छेडा यांच्या पाठपुराव्यातून स्मृती उद्यान फुलले. स्मृती उद्यानाच्या विकासासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. शासनानेच तशा प्रकारचा वेगळा उपक्रम हाती घेतल्याने सर्व स्तरांतून सहकार्य मिळत गेले. वन जमिनीवर हिरवळ दिसू लागली. एक ना अनेक प्रकारची झाडी तेथे लावण्यात आली. लोक कोणाची कोणाची स्मृती जपण्यासाठी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करू लागले. अनेकांनी त्यांची ओळख म्हणून स्मृती जपण्यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडाजवळ त्यांच्या नावाचे फलकही लावले आहेत. सोलापूरकरांमध्ये देणगी शुल्क भरून त्या ठिकाणी झाड लावून कोणाची स्मृती जपू शकतो ही भावना रुजवण्याचे काम पर्यावरणप्रेमी आणि माध्यमे यांनी केले. सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी झाडांची देखभाल करतात. झाडे मोठी झाली असून, झाडांच्या रूपाने जपलेल्या स्मृती पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात.

ताम्हण - महाराष्ट्राचे राज्यपुष्प


ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचे शास्त्रीय नाव लॅजिस्ट्रोमिया (Lagerstroemia) असे आहे. लिथ्रेसी किंवा मेंदी कूळातील हा सपुष्प वृक्ष. त्याला तामण, बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशी इतर नावेही आहेत.

मला जंगलातून हिंडताना ताम्हणाचे फूल अनेकदा दिसे. मात्र त्या फुलाला ताम्हण म्हणतात, याबाबत माहिती नव्हती. एकदा आम्ही उन्हातान्हात जंगल तुडवड चाललो होतो. गर्द सावली असलेल्या एका झाडाखाली आम्ही विश्रांती घ्यायला थांबलो. सहज वर लक्ष गेले. पाहतो तर अख्खे झाड फुलांनी नटलेले!

ते झाड साधारण गोलसर, डेरेदार होते. खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत. पेरूच्या सालीसारखी! सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघालेले होते. फिकट रंगाचे डाग पडलेले. पाने लांबट आणि टोकदार होती. पानांच्या अग्रभागाला रंग गडद हिरवा होता. तर पानाच्या उलट्या, अर्थात खालील बाजूचा रंग फिकट हिरवा होता. अगदी परफेक्ट कलर कॉम्बिनेशन! ते वेगळे फुलझाड बघायला मिळाल्याच्या आनंदात थकवा पळून गेला. मी गुराख्यांना त्या झाडाची ओळख विचारली. "याझलं 'नाण्याचं झाड' सांगत्या', बाकी नाय ठाऊक!" एकाने जुजबी माहिती दिली. ''याला 'बोंडारा' म्हणत्यात भाऊ.'' सरपणाची मोळी घेऊन निघालेली बाई म्हणाली. मला बोंडारा म्हणजेच ताम्हण हे माहिती होते. जारूळ, बोंडारा ही त्या झाडाची टोपण नावं आहेत. राज्यपुष्पाचे दर्शन झाले तेव्हा माझे पाय जमिनीवर नव्हतेच माझे! It was very very special moment of my life!

ताम्हणाचे फूल पूर्ण उमलल्यानंतर सहा ते सात सेंटीमीटर व्यासाचे होते. त्या फुलाला झालरीसारखी दुमड असणा-या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या असतात.

सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य


सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार परिसर, पक्ष्यांचे कुजन, डोंगरांमधून वाहणारे लहानमोठे झरे असे निसर्गरम्य वातावरण सागरेश्वर परिसरात अनुभवता येते. तेथे सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह आहे. त्यात सुमारे एकावन्न मंदिरे असून त्यापैकी सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे. तेथे समुद्राच्या कृपेने गंगा वास्‍तव्‍य करते अशी धारणा आहे. त्यावरूनच त्या परिसरास सागरेश्व‍र असे नाव पडले. सागरेश्वर मंदिराचे पुराणात उल्लेख आढळतात.

सागरेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर यशवंत घाट लागतो. तो एक ते दीड किलोमीटरचा घाट ओलांडल्या‍नंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणा-या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. घाटापुढे गेल्यानंतर देवराष्ट्रे गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो. देवराष्ट्रे हे गाव यशवंतराव चव्हाण आणि रमाबई रानडे यांचे जन्मस्थान आहे.

हळदीचा सांस्कृतिक आणि औषधी प्रवास


हळदीची आणि भारतीय लोकांची ओळख आर्युवेदाच्या माध्यमातून पाच हजार वर्षांपूर्वीं झाली असली तरी तिचा स्वयंपाकघरातील वापर मात्र अडीच हजार वर्षांनंतर झाला. आता तर या वनस्पतीने स्वयंपाकघराचा पूर्ण ताबा घेतला आहे. दक्षिण भारतामध्ये वाण्याच्या दुकानात सामानाची यादी देताना प्रथम क्रमांकावर हळद असते. एवढ्या प्रमाणात हळद आपल्यात जीवनात रूळलेली आहे.

पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळते. त्या  काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली जात असे. नंतर तिचा उपयोग रंगकामासाठी होऊ लागला आणि यानंतर मात्र तिने मसाल्याच्या डब्यात हळद पावडरच्या रुपाने उडी घेतली. हळदीची औषध, रंग आणि मसाल्याच्या पदार्थांतील वापरामुळे मागणी वाढली आणि शेतीक्षेत्रात तिचा प्रवेश झाला. पिवळ्या रंगामुळे हळद काश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरसाठी पर्याय ठरली. केशराची जशी शेती तशी हळदीची का नको? म्हणून भारतीय जंगलात आढळणारी हळद आणि श्रीलंकेच्या जंगलातील हळद यांचा संकर झाला आणि शेतीसाठी हळदीचे पहिले वाण तयार झाले.

भारतामध्ये ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये हळदीचे पीक शेतीचे मुख्य उत्पादन म्हणून घेतले जाते. सर्वात जास्त हळदीची लागवड तमिळनाडूमध्ये होते. भारताबाहेर ती बांग्लादेश, श्रीलंका आणि चीनच्या मध्य भागात जास्त पिकते. केरळ हे राज्य आर्युवेदशास्त्र आणि प्रचारात कायम आघाडीवर राहिले आहे आणि म्हणूनच हळदीस या राज्यात सर्वात जास्त सन्मान प्राप्त झाला. हळदीचे वाण विकसित करताना त्याच्यामध्ये असलेले करक्युमिन या औषध द्रव्यांचे प्रमाण तपासले जाते. प्रामुख्याने हळदीचे दोन वाण शेतीसाठी वापरतात. एक आहे अलप्पी वाण ज्यामध्ये करक्युमिनचे प्रमाण साडेसहा टक्के असते व दुसरे मद्रास वाण. यामध्ये हेच प्रमाण साडेतीन टक्के असते. अलप्पी हे औषधासाठी तर मद्रास वाण खाण्यासाठी जास्त वापरतात.

पांढरीचे झाड अर्थात कांडोळ


पांढरीचे झाड किंवा कांडोळइंग्रजीत त्या झाडाला ‘घोस्ट ट्री’ असे म्हणतात. मराठीत त्याचे नाव ‘कांडोळ’ किंवा ‘पांढरीचे झाड’ असे आहे. कांडोळ वृक्षाचे खोड अंधाऱ्या रात्री पांढरे, चंदेरी चमकल्यासारखे दिसते. ते पाहून मनात काहीसे भय तयार होते. झाडाच्या पांढऱ्याशुभ्र आणि काहीशा चंदेरी तुळतुळीत खोडावर, त्वचेवर भाजून काळे डाग पडावेत तसे व्रण असतात. झाडाचा बुंधा आखीवरेखीव असून त्याला छत्रीसारखा पसारा असतो. पांढरीच्‍या झाडावर डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास एकही पान नसते आणि फांदीच्या टोकाला मॉस (शेवाळे) गुंडाळल्यासारखा फुलोरा असतो. त्याला फुलोरा किंवा फुले का म्हणतात हा प्रश्नच आहे, कारण लांबून ना त्यांचा आकार दिसतो ना त्याचे अस्तित्व जाणवते. जवळून निरीक्षण केल्यावर लक्षात येते, की ती फुले चांदणीच्या आकाराची, अतिशय छोटी असतात. प्रत्येक फूल पाच पाकळ्यांचे असते. फुले हिरवट रंगाची असतात आणि त्यांवर थोडीफार लालसर रंगाची नक्षी असते. ती दिसायला अनाकर्षक आणि नगण्य असतात. त्यांचा वासही घाण असतो. स्टर्कुलिया कुटुंबातील वृक्षांना दुर्गंध असतोच!

त्याची फुले जेवढी अस्ताव्यस्त असतात तेवढी त्याची फळे व्यवस्थित, नीटनेटकी आणि आकर्षक. झाडाला फळे लागतात तेव्हा त्याचे रूपच बदलून जाते. ती स्टारफिशसारखी किंवा पंचपाळ्यासारखी दिसतात. ती फळे उठावदार किरमिजी रंगाची असतात आणि त्यावर मखमली लव असते. काही जातींत फळांचा रंग गुलाबी असतो. फळे दिसतात अतिशय साजरी आणि ती मखमली भासत असली तरी त्यांची लव काट्यासारखी रूपते. फळे थोडी मोठी होत असतानाच फांद्यांच्या टोकावर पालवी फुटू लागते. पांढऱ्याशुभ्र झाडावर पोपटी-हिरवीगार पालवी शोभून दिसते. पानांचा आकारही पाच कोन असलेल्या द्राक्षासारखा, पण थोडा विस्तारित असतो. उन्हाळा वाढत जातो तसतशी पालवी मोठी होऊन झाड हिरवेगार दिसू लागते. फळांवर लव असते तशीच लव झाडांच्या पानांवरसुद्धा असते. लवेमुळे ती स्पर्शाला मऊसूत लागतात.

अक्षयवट अर्थात वडाचे झाड


वडाचे झाडवटपोर्णिमा हा सण सवाष्णीसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पोर्णिमेनंतरचे दोन/तीन दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहवे लागते.

भारत हा जीवन जगण्याचाच उत्सव करणाऱ्या व गीतेत शिकवल्याप्रमाणे चराचरामध्ये ईश्वरी रूप शोधणाऱ्या भाविकांचा देश. वर्षातील तीनशेपासष्ट दिवस निसर्गानंद साजरा करणाऱ्या सण-उत्सवांचा देश. तेथे सृष्टीतील प्रत्येक सजीव-निर्जीव रूप पूजनीय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा समतोल जितका राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कुठेही सांभाळला गेला नसेल.

पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. त्यांमागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा. पतिव्रता सावित्रीचे देणे असलेले ते व्रत हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे.

कल्पतरू ताडवृक्ष

अज्ञात 17/02/2014

ताडाचे झाडताडाच्या (borassus flabellifer) जगाच्या पाठीवर शंभर जाती आहेत. हा वृक्ष आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी), श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आहे. भारतात त्यापैकी महत्त्वाचे चार प्रकारचे नीरा देणारे वृक्ष आढळतात. त्यांना ताड, शिंदी, भैरली, माड किंवा नारळी नावाने ओळखले जाते. विशेषत:, या झाडाचा गोड स्वादिष्ट रस आंबवून ताडीच्या स्वरूपात विकला जातो. म्हणून त्यांना ताडीची झाडे म्हणूनसुद्धा ओळखतात. ताड हा नारळीसारखा उंच वाढतो.

ताडाच्‍या वृक्षाच्या खोडाचा व्यास तळाशी सामान्‍यतः १–१.५ मीटर असतो. ते काळे, उंच व दंडगोलाकृती असते. खोडाला फांद्या नसतात; ते मध्यावर किंचित फुगीर असते. पाने मोठी, साधी, पंख्यासारखी, एकाआड एक उगवलेली परंतु खोडाच्या टोकावर झुबक्यात वाढलेली दिसतात. पानाचे पाते चकचकीत, हस्ताकृती, थोडेफार विभागलेले असून त्‍यास ६० ते ८० खंड असतात. पानांची कळी उमलण्यापूर्वी पात्यास चुण्या पडून ते कळीत सामावलेले असते. फुलांच्या लिंगभेद प्रकाराप्रमाणे दोन प्रकारचे फुलोरे दोन स्वतंत्र झाडांवर मार्च-एप्रिलमध्ये येतात.

ताडगोळेताड वृक्षाचे दोन प्रकार असतात. नर व मादी, नराला फक्त शेंगांसारख्या पोयी येतात तर मादीला फळे येतात. झाडाचे फळ मेमध्ये तयार होते. कोवळी फळे ‘ताड गोळे’ म्हणून विकली जातात. त्यांची चव खोबऱ्यासारखी परंतु अधिक मधुर असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडपणा मिळतो. भारतात अंदाजे ११.१२ कोटी छेदनयोग्य ताडाची झाडे असून त्यांपैकी सध्या फक्त २.२० कोटी नीरा-ताडगुळासाठी उपयोगात आणली जातात. यावरून त्या उद्योगाच्या वाढीस किती वाव आहे ते लक्षात येईल.