मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद


मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद हे देशातील उत्कृष्ट बारा उद्योजकांत नाव असलेले व्यापारी सोलापूरात होऊन गेले. व्यापार, उद्योग, दानधर्म व धार्मिक अधिष्ठान या क्षेत्रांत चतुरस्र कामगिरी करणारे आप्पासाहेब 1851 साली जन्मले. तरुणपणी, ते पुण्याला वास्तव्यास असताना त्यांचा परिचय वैद्य मेहेंदळे, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, नामजोशी, चिपळूणकर या अग्रणींशी झाला. त्यांनी त्यांच्या पिढीजात व्यापारात लक्ष घालून दोन पेढ्या असलेला उद्योग भारतभर चाळीस पेढ्यांपर्यंत वाढवला. त्या पेढ्यांमधील हिशोब लिहिण्याची पद्धत ब्रिटिशांनीही अंगिकारली.

पुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान


पुलगम, अर्थात सोलापुरी चादरींचे नाव भारतभर आहे. सोलापूरची चादर म्हटले, की पुलगम ब्रँडचे नाव येतेच. फक्त चादरच नव्हे तर टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये पुलगम यांचे नाव दुमदुमत आहे.

पुलगम कुटुंब हे मूळचे आंध्रप्रदेशातील वरंगल जिल्‍ह्यातील मेदक या खेड्यातील साळी समाजाचे. ते 1940 च्या दशकात सोलापूरला आले. ते कुटुंब सोलापूरमध्ये हातमाग चालवू लागले. कुटुंबापैकी यंबय्या माल्ल्या पुलगम यांचा पुलगम टेक्स्टाइलच्या यशात मोठा वाटा आहे. त्यांनी स्वत:चे चार हातमाग 1949 साली सुरू केले व त्यावर साड्या (फरास पेठी, जपानी किना-यांच्‍या साड्या, इरकल) तयार करून प्रसिद्धी मिळवली. त्यानंतरच्या दोनच वर्षांत चाराचे आठ हातमाग तयार करून जोरात उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पहिले दुकान 1959 साली सोलापूरच्या साखरपेठेत उघडले व त्यांच्या साड्या ‘लक्ष्मीनारायण छाप लुगडी’ या नावाने विकण्यास आरंभ केला. साड्यांमध्ये चांगलीच गुणवत्ता असल्याने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला व बाजारपेठेत त्यांचे नाव झाले.

देवानंद लोंढे - शून्यातून कोटी, कोटींची उड्डाणे


हिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे.

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताना त्याला मिलिंद सगरे हा मित्र मिळाला. त्यानंतर गावातीलच ‘नारायण तातोबा सगरे हायस्कूल’ येथे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरमधील गारगोटी येथील ‘आय.सी.आय.’ (इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीयरिंग) मध्ये प्रवेश मिळाला. तेथील वसतिगृहात राहण्या-जेवणाचीही सोय झाली. देवानंद नाशिक येथे नोकरी करत असताना त्याची तेथे स्नेहल या मराठा समाजातील तरुणीची भेट झाली आणि त्यांचा आंतरधर्मीय मंगलपरिणय झाला.

हिंगणगाव येथील माळरानावर ‘लक्ष्मी जिनींग अँड प्रोसेसिंग’ नावाची संस्था कापडमिल चालवत होती. ती शासकीय अनुदानातून चालणारी मिल काही काळाने बंद झाली. बँकेच्या कर्जात बुडालेली मिल बँकेने ताब्यात घेतली. संस्थेवर कर्ज व व्याज मिळून वीस लाख रुपये झाले होते. ती मिल लिलावात निघाली. देवानंद यांनी मिल विकत घेतली. त्यांनी अनुप जेटिया या मित्राच्या सहकार्याने (हँड ग्लोव्हज् ) लोकरी हातमोजे निर्माण करण्याचा कारखाना काढला.

पाश्चात्य व पौर्वात्य प्रगत देशांत हातमोज्यांना खूप मागणी आहे एवढ्या माहितीच्या आधारे त्यांनी ही झेप घेतली व नंतर कष्ट अपार घेतले. अनुप जेटिया व देवानंद त्यासाठी चीन देशातील शांघाय येथे पोचले. त्यांनी तेथील अनेक कंपन्या फिरून पाहिल्या. त्यांना एका कंपनीने हातमोजे कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. तेथूनच त्यांनी एक मशीन खरेदी केले आणि त्यांच्या हिंगणगाव मुक्कामी आले.

सौरऊर्जेसाठी प्रयत्‍नशील - दोन चक्रम!


अलिकडच्‍या काळात ऊर्जा हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज झालेली आहे. ऊर्जेला सर्व स्‍तरांवर अनन्‍यसाधारण महत्त्व प्राप्‍त झालेले असून तिच्‍या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. मागणी आणि उत्‍पादन यांच्‍यामध्‍ये मोठी तफावत निर्माण झालेली असल्‍याने, महाराष्‍ट्र गेली काही वर्षे भारनियमनाचा सामना करत आहे. अशी पार्श्वभूमी असताना पुण्‍याचे दोन तरूण सर्वसामान्‍य जनतेच्‍या आयुष्‍यात ‘प्रखर’ प्रकाश पसरवण्‍याच्‍या ध्‍येयाने वेडे झाले आहेत. आमूलाग्र सुधारणा घडवायच्‍या, पण त्‍या केवळ माफक खर्चात. कारण विकासाचा केंद्रबिंदू हा गोरगरीब जनता असल्‍यामुळे, तिच्‍या खिशाला परवडेल, उपयुक्‍त ठरेल आणि जे दीर्घायुषी असेल असे तंत्रज्ञान विकसित करण्‍याच्‍या उद्देशाने, हे दोन तरुण ‘चक्र’म म्‍हणजे आशीष गावडे आणि अनिरुध्‍द अत्रे झपाटले गेले आहेत. ते दोघे उच्‍चविद्याविभूषित असूनही त्‍यांची नाळ जोडलेली आहे ती गोरगरीब जनतेशी!

आशीष गावडेअनिरुद्ध अत्रेआशीष आणि अनिरुध्‍द इयत्ता पाचवीपासून एकत्र शिकले. दोघेही जिवलग मित्र. आशीष सुरुवातीपासून लोणावळयाच्‍या ‘मनशक्ती प्रयोग केंद्र’ या संस्‍थेत जायचा. दोघांवर बिझनेस मॅनेजमेंट गुरू सी.के. प्रल्‍हाद ह्यांच्‍या विचारांचा प्रभाव आहे. सर्वसामान्‍यांच्‍या समस्‍या दूर करण्‍यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्‍न व्‍हायला हवेत, ही गुरुदीक्षा त्यांच्या मनावर व ज्रलेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्‍याचाच परिपाक म्हणून दोघांची ‘बॉटम ऑफ पिरॅमिड एनर्जी अॅण्ड एनव्‍हायरोमेंटल प्रा.लि.’ ही संस्‍था सामाजिक-ग्रामीण क्षेत्रात कार्यरत झाली. ती सर्वसामान्‍य माणसाच्‍या घरात स्‍वस्‍तात ‘प्रखर’ प्रकाश पसरवण्‍याचे काम करत आहे.

उद्योगातील अभिनवतेची कास

अज्ञात 30/11/2011

 मनीषा राजन आठवलेरोह्याच्या मनीषा राजन आठवले यांचे जीवन म्हणजे कर्तबगारी आणि ‘इनोव्हेशन्स’ची आच या, प्रचलित शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी स्वत: मायक्रोबायॉलॉजी मध्ये पदवीशिक्षण घेतले, पुण्यात पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काही महिने काम केले. त्या ‘डी.एम.एल.टी’ हा त्याच क्षेत्रातला अभ्यासक्रम करणार; त्याआधीच त्या रोह्याच्या डॉ.राजन मनोहर आठवले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. कोणत्याही मुलीची लग्नानंतरची दहा वर्षे जशी जातात, तशीच मनीषा यांचीही गेली. त्या काळात अनिष व अनुज यांचा जन्म झाला. कोणीही गृहिणी करील त्याप्रमाणे त्या ‘बर्थ डे केक’ वगैरे बनवत व घरच्या, कुटुंबाच्या आनंदात भर घालत, पण त्यांची दृष्टी असे ती पती -राजनच्या दवाखान्यात. राजन आयुर्वेदिक डॉक्टर. ते स्वत: औषधे बनवून रुग्णांना देतात. मनीषा यांनी त्यांना मदत करणे आरंभले आणि त्यातून त्यांची स्वत:ची औषधनिर्मिती सुरू झाली.

‘शतावरी कल्प’ हे त्यांचे पहिले उत्पादन. त्यानंतर त्यांनी च्यवनप्राश, तेले, चूर्णे असेही प्रयोग केले. मायक्रोबायॉलॉजीच्या अभ्यासामुळे निर्जुंतुकीकरण किती महत्त्वाचे आहे हे त्यांना ठाऊक होतेच. त्यामुळे त्या सर्व कामगिरी कटाक्षाने पार पाडत. तशात त्यांना अभिनव, प्रभावी, आयुर्वेदाचा आधार असलेल्या ‘आयड्रॉप्स’चा शोध लागला. संगणकामुळे डोळ्यांना जो ताण जाणवतो त्यावरचा तो उतारा होता. चाचण्यांमध्ये तो प्रभावीदेखील वाटला. परंतु अन्न आणि औषध पुरवठा विभागाकडून त्यांना त्याच्या उत्पादनासाठी परवाना मात्र मिळू शकला नाही. योग असा, की त्याच बेताला चेहर्‍यावरील मुरूमांसाठी त्यांनी एक क्रीम बनवले. त्याकरता मात्र त्यांना परवाना मिळू शकला.

भवरलाल जैन - उद्योगपती व जैन उद्योगसमूहाचे प्रवर्तक


उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना जाते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा आवाका जेव्हा मुंबई-पुण्यापलीकडे कल्पिला जात नव्हता तेव्हा भवरलालजींनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात घातला. शेती, शेतकरी आणि शेतीसंबधी उद्योगात हाडाची काडे करण्याची बांधिलकी मानली. पाश्चिमात्य देशांतले तंत्रज्ञान डोळसपणाने भारतीय मुशीत घालून शेतक-यांना उपलब्ध करुन दिले. स्वत: शेतकरी असल्याने, पिढ्यांन् पिढ्या शेती करणा-या घरात जन्म घेतल्याने त्या व्यवसायाशी त्यांची नाळ उत्तमरित्या जुळली होती.