संत सावता माळी आणि त्यांची समाधी


संत सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच विठ्ठलाला पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला.

संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला.

सावता माळी यांनी त्यांचा ‘माळ्या’चा धर्म आचरत, शेती करत करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत, लोकांना खरा मानवता धर्म समाजावून सांगावा. त्यांच्या मनातील अंधश्रद्धांचे तण उपटून काढून समाजमनाची मशागत करावी, समाजात जागृती करावी या हेतूने सावता माळी अभंग लिहीत, कीर्तन करत. सावता माळी हे बंडखोर, कर्ते सुधारकच होते असे म्हणावे लागेल.

सावता माळी यांच्या गावाजवळ पंढरपूर आहे, परंतु ते कधीही पंढरपूरला जात नसत. सावता यांना तेथील संतांच्या मांदियाळीत सामील होण्याची इच्छा झाली नाही. त्यांना वाटे, की ते जातीचे माळी आहेत. त्यामुळे त्यांनी मनापासून शेतीत-मातीत राबावे, पिकांची मशागत करावी, गाईगुरांना प्रेमाने सांभाळावे. शेतीला पाणी द्यावे, चांगले भरघोस पीक काढावे, अडल्यानडल्यांना मदत करावी हीच खरी पांडुरंग भक्ती आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते शेतीत रमत. ते शेती सोडून कुठेच कधी गेले नाहीत.

धामणगावचे माणकोजी महाराज बोधले


बालेघाटाच्या पायथ्याला नागझरी नदीतीरावर वसलेले छोटेसे गाव म्हणजे धामणगाव. धर्मेश्वराच्या प्राचीन मंदिरावरून त्या गावास धार्मण्यपूर असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश झाला धामणगाव. त्याच गावात श्री संत माणकोजी बोधले महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भानजी आणि आईचे नाव पार्वतीबाई. त्यांना बंधू होते - त्यांचे नाव शिवाजी. शिवाजी हे पंढरीचे वारकरी तर माणकोजी युद्धकलेतील तरबेज धारकरी. माणकोजी यांनी काही रांगडे तरुण जमा केले. त्यांना युद्धाचे शिक्षण दिले आणि तत्कालिन मुस्लिम राजवटीच्या अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला, अत्याचार करणाऱ्या यवनाला पंचक्रोशीतून हुसकावून लावले आणि पंचक्रोशीत त्यांची स्वत:ची सत्ता स्थापन केली.

एकदा माणकोजी त्यांच्या दादाबरोबर पंढरीला गेले. त्यांनी पंढरी पाहिली, विठोबाचे दर्शन घेतले. तेथील सुखसोहळा पाहिला अन् ते त्या सुखसागरात पूर्ण बुडून गेले. त्यांना जगाचा विसर पडला; ‘देहीच विदेही’ अवस्था प्राप्त झाली. ते विठुरायाच्या भेटीचा दृढ निश्चय करून, अहोरात्र विठ्ठलनामाचा जप करत मंदिराच्या ईशान्य ओवरीत ठाण मांडून बसले. माणकोजी अन्नपाण्याविना तीन दिवस निग्रहाने जप करत होते. त्यांचा जप चौदा दिवस चालला आणि शेवटी, त्यांना पांडुरंगाने साजिऱ्या गोजिऱ्या रूपात ‘दर्शन’ दिले! त्या अवस्थेत त्यांनी नमूद केले :

बोधला म्हणे देवा तू मज बोधीले
आवडीने ठेवीले नाम माझे

विठ्ठलाने बोध केला म्हणून माणकोजी महाराजांचे आडनाव बोधले असे पडले!

त्यांना असाही बोध झाला, की त्यांनी आता पंढरीला येण्याची गरज नाही. पांडुरंग धामणगावात आहे की! बोधले महाराज विठ्ठलमूर्ती घेऊन धामणगावी आले. संत वारकरी जमा झाले. त्यात संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांचाही समावेश होता असे सांगतात. त्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. बोधले महाराजांचे एकशेदहा अभंग सरकारी सकलसंत गाथेत आहेत. त्या काळापासून आषाढी-कार्तिकीस धामणगावात मोठा उत्सव साजरा होतो. देव एकादशीच्या रात्री पंढरीहून धामणगावी येतात असा भाविकांचा समज आहे.

सोलापूरचा आजोबा गणपती


बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक मंडळाचा हा गणपती खऱ्या अर्थाने आजोबा गणपती आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आधीपासूनच आजोबा गणपती सार्वजनिक स्वरुपात साजरा होतो आहे.

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली की एक उत्साहाची अनुभूती मिळते. गणेशोत्सव हा अधिकाधिक ‘कमर्शियल’ होत चालल्याचा व उत्सवापेक्षा ‘फेस्टिव्हल’च्या स्वरूपात दिसत असल्याचा टीकात्मक सूर ऐकायला मिळत आहे. हे काही प्रमाणात खरे असेलही, पण त्याचे लोण सोलापूपर्यंत पोहोचले हे मात्र नक्की; परंतु त्याला बरीच मंडळे अपवाद आहेत. सोलापूरच्या गणेशोत्सवात आजही उत्साहाबरोबर भक्ती आणि सेवा पाहावयास मिळते. त्याचे उत्कट उदाहरण म्हणजे येथील आजोबा गणपती. तब्बल १२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा आजोबा गणपती सोलापूरच्या धार्मिक, आध्यात्मिक तथा सांस्कृतिक पातळीवरचा मानबिंदू ठरला आहे. लोकमान्य टिळकांनी सन १८९३ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली खरी; परंतु त्याअगोदरपासून सोलापूरच्या आजोबा गणपतीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची परंपरा होती आणि ती आजही सुरू आहे. किंबहुना लोकमान्य टिळकांना सोलापूरच्या या आजोबा गणपतीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली असावी. लोकमान्यांचे सोलापूरकरांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अधूनमधून सोलापूरला येत असत. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करण्यापूर्वी लोकमान्यांची स्वारी सोलापूरला आली होती. इतिहासात त्याचा संदर्भ सापडतो. असो, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याअगोदरपासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा उज्ज्वल असूनदेखील त्याची दखल इतिहासकार घेत नाहीत, हे दुर्दैव आहे.

धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची


श्री लक्ष्‍मीपल्लिनाथ देवस्‍थानभर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं देखील घामाघूम व्हायला होते. पण तरीही उन्हाळ्यामध्ये आमची कोकणात वारी ठरलेली असते. मला जायला नाही मिळाले, तरी आमच्या घरची मंडळी हमखास कोकण गाठतात. निमित्त असते, हनुमान जयंतीला होणाऱ्या आमच्या गावच्या उत्सवाचे! म्हणजेच पालीच्या लक्ष्मी पल्लीनाथाच्या उत्सवाचे.

लक्ष्मी पल्लीनाथ हे रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावचे दैवत. मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूरकडे जाणारा फाटा जिथे फुटतो, तिथे पाली हे गाव आहे. पुण्यापासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीपासून बावीस किलोमीटरवर. दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत ‘श्री लक्ष्मी पल्लीनाथा’चा उत्सव मोठ्या उत्साहात पण साधेपणाने साजरा होतो. भपका कमी असल्यामुळेच तो अधिक भावतो!

हेमाडपंती स्थापत्यशैली


त्र्यंबकेश्वर येथील मंदिरही हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे चुन्याच्या किंवा कसल्याही पदार्थाच्या साहाय्यावाचून केवळ एका ठरावीक पद्धतीने दगडावर दगड ठेवून किंवा दगडांना खाचा पाडून हे बांधकाम केले जात असे. मंदिरांच्या शिखरांची घडण हे ह्यांचे मुख्य वैशिष्ट्य. देवालयाच्या पायाची आखणी ज्या आकाराची असेल, नेमकी त्याच प्रकारची लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक बनते. (आमलक: आवळा). प्रमुख दिशांना कोन येतील असा चौरस कल्पून एका कोनासमोर प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेल्या ह्या इमारतींच्या पायांची आखणी अनेक कोनबद्ध असते. शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर बसवल्यावर ही सर्व लहान लहान शिखरे रचूनच मोठे शिखर तयार झाल्यासारखे वाटते तळापासून कळसापर्यंत केलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे भासणारा बांधणीचा उभटपणा वेगवेगळ्या थरांच्या अडवटींनी कमी झाल्यासारखा वाटतो.

कोणतीही इमारत बांधायची तर तिचे दगड किंवा विटा एकमेकांस घट्ट चिकटून राहाव्यात म्हणून माती, चुना, सिमेंट इत्यादींपैकी काही वापरावे लागते. पण हेमाडपंती देवळे ह्याला अपवाद आहेत. ह्या देवालयांचे चिरे त्रिकोण, चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत इतक्या कुशलतेने बसवलेले असतात की त्यामुळे इमारतीच्या प्रत्येक अवयवाला दुस-याचा आधार मिळून छत बिनधोक राहू शकते. अशी मंदिरे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात व चौदाव्या शतकात बांधली गेली. हेमाद्री किंवा हेमाडपंत ह्याने ह्या पद्धतीचा पुरस्कार केला, म्हणून त्याच्या नावाने ही बांधकाम शैली ओळखली जाते.

अमृतेश्वर मंदिराची भिंत आणि अलंकृत खांब हेमाडपंती देवालयांची रचना सामान्यत: अशी असते :

गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब. खांबांवर व छत्तावर पौराणिक प्रसंगांची चित्रे कोरलेली असतात. काही ठिकाणी कमानी काढून सभामंडपाला आधार दिलेला असतो. दर्शनी भाग भोजमंडप असतो. भिंती कोनयुक्त असतात. सर्व बांधकाम काळ्या दगडात असते. देवालये पूर्वाभिमुख असतात. अशा देवालयांवर प्राचीन शिलालेख आढळतात.

मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा


श्रीगणेशाची सध्या पूजली जाणारी मूर्तीतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला सरदार मुजुमदारांचा गणपती उत्सव म्हणजे अवघ्या पुण्याचे भूषण!
 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे व सुपे या दोन परगण्यांची जहागिरी आदिलशाहीकडून मिळाली. त्यानंतर शहाजीराजांनी मुजुमदारांच्या पूर्वजांना, नारो गंगाधर ऊर्फ अयाबा यांना सुपे प्रांताच्या मजमूचा अधिकार दिला. मजमू हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ राज्याच्या महसूल वसुलीचा हिशेब असा आहे. तेव्हापासूनच हे प्रभुणे घराणे मुजुमदार नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे, शाहू महाराज दक्षिणेत आल्यावर, नारो गंगाधर यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे त्यांना सर्व राज्याच्या मजमूचा अधिकार मिळाला. नारो गंगाधर यांची समाधी मुजुमदार वाड्याशेजारी कसबा पेठ येथे सुस्थितीत आहे.
 

श्री क्षेत्र मोरगाव हे पुण्याच्या नजीक. तेथे सरदार मुजुमदारांचा वाडा होता, तो पुढे मोरया गोसावींना अर्पण करण्यात आला. नारो नीळकंठ मुजुमदार यांना मोरगाव येथे क-हा नदीत स्नान करत असताना ‘डोक्‍यावर हिरा असलेला‘ नर्मदेय गणपती मिळाला. तो प्रसाद मानून त्यांनी घरी आणला. तेव्हापासून मुजुमदारांनी दरसाल भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणपतीचा उत्सव साजरा करण्‍यास सुरूवात केली. त्यानंतर 1708 मध्ये नारो गंगाधर प्रभुणे - मुजुमदार यांना शाहू महाराजांनी संपूर्ण मराठी राज्याचा मजमू (वसुली)चा अधिकार बहाल केला. केवळ गजाननकृपेमुळेच संपूर्ण मराठी राज्याच्या ‘मजमू’चा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे असे मानून गंगाधरपंतांनी घराण्याची परंपरा असलेला हा उत्सव दर वर्षी तेवढ्याच भव्यतेने करण्याची प्रथा अखंड चालू ठेवली. त्याची समाप्‍ती पंचमीला होते. संगीताचे रसिक जाणकार आणि इतिहास संशोधक सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी हा उत्सव लोकाभिमुख केला.ती प्रथा मुजुमदारांच्या वंशजांनी चालू ठेवली आहे.
 

क-हाड नगरीचे ग्रामदैवत: श्री कृष्णाबाई


कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाने पुनित झालेल्या कराड नगरीचे नाव भारतात अनेक दृष्टींनी प्रसिद्ध आहे. नगरीला तिन्ही बाजूंनी कृष्णा व कोयना या नद्यांनी वेढलेले आहे. या नद्यांच्यामुळे कराड नगरी व तिच्या सभोवतालचा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. कराड परिसरात तीन बलाढ्य सहकारी व एक खाजगी साखर कारखाना डौलाने उभे आहेत. कराड नगरी उद्योग, व्यवसाय, शिक्षण, संस्कृती, सहकार इत्यादी सर्व गोष्टींत आघाडीवर आहे.
 

कराड नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील ग्रामदैवत श्री कृष्णाबाई. तिच्या प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजर्‍या होणार्‍या उत्सवाबाबत आख्यायिका अशी आहे, की शिवाजी महाराज यांच्यावर अफजलखानाने स्वारी योजली होती. अफजलखान त्याच्या बलाढ्य सैन्यासह चालून आला होता. परिसरातील लोक-माणसांमध्ये काळजी होती. तेव्हा वाईच्या ब्राह्मण समाजाने कृष्णाबाईला साकडे घातले, की ‘महाराजांवरील संकट टळू दे, आम्ही तुझा उत्सव चालू करू!’  
 

अफजलखान जावळीत आला आणि तो ऐतिहासिक मुकाबला झाला. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला व महाराजांवरचे संकट टळले. त्या वेळेपासून वाईमध्ये कृष्णाबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. नंतर तो कराड नगरीमध्ये सुद्धा साजरा होऊ लागला. उत्सवाला तीनशेहून अधिक वर्षांची ऐतिहासिक परंपरा तयार झाली आहे.