वैराग-मंदिरांचे गाव


वैराग हे त्या गावाचे नाव, गावाची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये जपणारे आहे. ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात येते. फार पूर्वीपासून तेथे वैरागी लोकांची गर्दी होती, म्हणून ते वैराग. श्रीसंतनाथ महाराज ही वैरागची ग्रामदेवता मानली जाते. त्याचबरोबर, ती नगरी श्री व्यंकोबाबा, श्री दयानंदबाबा वगैरे काही सिद्धपुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली मानली जाते.

वैराग हे मोगलशाही हद्दीतील, निजामशाहीच्या सीमेलगतचे पहिले गाव. निजामाच्या राज्यातून मोगल सीमेत येण्यासाठी भरावा लागणारा जकात गोळा करण्यासाठीचा दगडी रांजण खुंटेवाडीनजीक शिवारात आढळतो.

वैरागमध्ये अडतबाजार, तेलगिरण्या, कापड व्यवसाय तेजीत चालत. त्यामुळे व्यापारी थेट उत्तरेतून वैरागग्रामी कस्तुरी, केशर यांसारख्या किंमती वस्तू विकण्यासाठी येत असत. तेथील अडत बाजार मोठा आहे व खुले सौदे प्रसिद्ध आहेत. ते शेतक-यांना लाभदायी ठरतात असा पूर्वापार समज.

श्रीसंतनाथ महाराजांचे मंदिर दगडी बांधकामात आहे. त्यासमोर लाकडी मंडप आहे. तेथे अखंड धुनी चालते. मंदिर समोर श्रीटेकनाथबाबा मंदिर, बाजूस श्रीकल्लोळ अशा परिसरात विसावले आहे. गुरव, पारंपरिक मानकरी व ग्रामस्थ ही मंडळी मार्गशीर्ष महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह, श्रावण शुद्ध एकादशीपासून नारळी पौर्णिमेपर्यंत ग्रामदेवतांची यात्रा असे वार्षिक कार्यक्रम व रोजची नित्यकर्मे आणि सोमवारी श्रीसंतनाथांची आरती आनंदाने पार पाडतात.

सांगोला तालुक्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये


सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात तीन महत्त्वाची मंदिरे आहेत :

1. अंजनाळेचे महादेव मंदिर (हरि-हर मंदिर) - जुन्या काळात माण परगण्यात शैव व वैष्णव पंथीयांचा प्रभाव होता. त्यांनी हरि-हर नावाची मंदिरे निर्माण केली. त्यांतील महादेव मंदिर वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आहे. मंदिर अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावे. तो काळ चालुक्यांचा होता. तेथे कलाकुसरीच्या मूर्ती एकूण अकरा आहेत. त्या म्हणजे द्वारपाल, महिषासूरमर्दिनी, सप्तमातृका, चामुंडा देवी, सूर्यमूर्ती, शंकरपार्वती, गणेश मंदिराचे पाच सभामंडप - नंदीमंडप, मुखमंडप, अंतराळ, सभामंडप, गर्भगृह.

2. चिणके - महादेव मंदिर (त्रिकूट मंदिर). त्रिकूट मंदिर म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे मंदिर असावे. गजगौरीचे शिल्प आहे. मंदिरातील मूर्ती - महिषासूर मर्दिनी, शिवपार्वती, कोष्टकात (कोनाडे) शिल्पे ठेवलेली आहेत. गणेशशिल्प, चंद्रशिळा, दोन गर्भगृहे, महादेवाची वैशिष्ट्यपूर्ण पिंड.

3. जवळा - नारायण देव (हरि-हर) मंदिर - कोरडा नदीच्या उत्तर किना-यायावर तीस फूट उंचीच्या खडकावर चिरेबंदी मंदिर आहे. मंदिराजवळ भव्य उंच प्रवेशद्वार (वेस) उत्तराभिमुख आहे. मंदिरातील मुख्य मूर्ती विष्णूची (हरी) दगडी प्रभावळीत चार फूट उंचीची उभी आहे. ती मूर्ती चतुर्भूज आहे. पायाशी मानवी स्वरूपाचे दोन गरूड आहेत. ग्रेनाइटमधील उत्कृष्ट नक्षीदार मूर्ती आहे. मंदिर उत्तर चालुक्यकालीन असावे. वेळापूरच्या हरनारी मूर्तीशी साम्य आहे. जवळच दुसरे हर (शिव) मंदिर आहे. मंदिराचा काळ सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतचा असावा.

सोलापूरचे रूपाभवानी मंदिर


सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्‍या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त मंडळ’ व ‘श्री वल्लभदास अग्रवाल’ यांच्या सहकार्याने झाले.

रुपाभवानी देवीला सुंदर पितळी मुखवटाही आहे. देवीच्‍या मंदिरात नवस फेडले जातात. विशेष म्हणजे मुस्लिम स्त्रीपुरुषही नवस फेडण्यासाठी आलेली दिसतात. सोलापूरात दुर्गामातेची तीन रुपे विशेष प्रसिद्ध आहेत. एक सोलापूर शहरातील रुपाभवानी, दुसरी माढ्याची माढेश्‍वरी देवी आणि तिसरी करमाळ्याची श्री कमला देवी.

- प्रमोद शेंडे

सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर मंदिर


श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत! महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भक्तांचे ते आराध्य दैवत! सिद्धेश्वर मंदिराचा परिसर छत्तीस एकरांचा आहे. तिन्ही बाजूंला सरोवर आहे व ते स्वच्छ ठेवले आहे. मंदिराआधी डाव्या बाजूस ग्रंथालय व पुढे हनुमान मंदिर आहे. मुख्य मंदिर भव्य आहे. मंदिरावर व कळसावर कलाकुसर आहे. रोज अन्नछत्र असते व मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ घेता येतो. मंदिरात स्वच्छता आढळते. गाभाऱ्यात शंकराची पिंडी असून त्यावर मुखवटा बसवला आहे.

मंदिराच्या पंचकमिटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात बारा विद्यालये व दोन महाविद्यालये चालवली जातात. विद्यार्थी वसतिगृहही आहे. तेथे कोणतीही देणगी न घेता प्रवेश दिला जातो. राहणे व जेवण मोफत आहे. मंदिरात लायब्ररीही आहे.

वेळापूरचा अर्धनारी नटेश्वर


श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्‍वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या अवस्थेत आहे. मंदिर भारतीय पुरातन वास्तू संरक्षण खात्याच्या देखरेखीत आहे. मंदिराची पूजाअर्चा व्यवस्थाही पुजारी गुरव महादेव व गौरीहर विश्वनाथ हे परंपरेने करत आहेत.

अर्धनारी नटेश्वर वेळापूरचे ग्रामदैवत. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूस छोट्या बांधकामामध्ये सुंदर ऐटीत बसलेली गणेशमूर्ती दिसते. डाव्या बाजूस उंच दीपमाळ आहे. तेथे मोठी बारव आहे. बारवेमध्ये पाण्याला सर्व बाजूंनी झरे असल्याने बारव उन्हाळ्यात कधीही कोरडी पडली नाही. मुख्य मंदिरासमोर बारवेत नैऋत्य कोप-यामध्ये लहान मंदिर आहे. त्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांना काशीविश्वनाथ व रामेश्वर स्थान असे म्हणतात. ही दोन्ही शिवलिंगे पावसाळ्यात पाणी पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जातात, म्हणून बारवेतील जलाला सर्व तीर्थांचे महत्त्व लाभते अशी भाविकांची धारणा आहे. त्यांच्या शेजारी वायव्य बाजूला बळीश्वर मंदिर आहे. बळीश्वर मंदिराचे बांधकाम दगडी पाषाणामधील खांब व शिळा यांमध्ये बांधलेले आहे. ते मंदिर मुख्य मंदिराच्या समोर बारवेशेजारी थोडे खाली, जमिनीमध्ये असलेले दिसते. मंदिराच्या गाभा-यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. मुख्य शिवलिंग सुंदर आहे. छोटा नंदी आहे. बाहेरील बाजूस उंच आसनावर गणेशमूर्ती आहे. दुस-या दोन आसनांवरील दोन मूर्ती पुरातन वास्तू खात्याकडे आहेत. त्याच्यासमोर नागदेवता. त्या प्रत्यक्षात दक्षिणेकडे मुखाकडून एकमेकाला वेटोळे घातलेल्या स्वरूपात दोन नाग मूर्ती आहेत.

अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी


अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या नावाने ओळखले जाई. गावामध्ये तेराव्या शतकातील यादवकालीन भुईकोट किल्ला आहे. दिलेरखान आणि संभाजी महाराज त्या किल्ल्यामध्ये १६७९ मध्ये चार महिन्यांसाठी वास्तव्यास होते असे सांगितले जाते. दुसरे बाजीराव पेशवे त्यांचे पेशवेपद बरखास्त झाल्यानंतर तीन त्या ठिकाणी वास्तव्यास होते.

सुरुवातीला गावक-यांनी नीरा नदीच्या काठावर मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर कै. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, कै. बाबासाहेब माने-पाटील, कै. सदाशिवराव माने पाटील या तीन बंधूंनी आणि गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून देवीचे लहानसे मंदिर बांधले.

माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद


पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील? या डॉ.रा.चिं. ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला, पण खऱ्या विठ्ठलभक्ताला त्या वादात रस नाही. त्याच्यासाठी तो विठुराया फक्त देव नाही, तर मित्रही आहे. तो 'प्रथम भेटी आलिंगन, मग वंदावे चरण' या अभंगाप्रमाणे कायमच त्या मित्राची मनोमन गळाभेट घेत आला आहे. आणि ही गळाभेट जरी पंढरीला प्रत्यक्षात घेता येत नसली तरी माढ्याला मनसोक्त घेता येते, हे मात्र नक्की!

माढ्यातील विठ्ठलमंदिर फारसे गजबजलेले नाही; अगदी ऐंशीमधील 'त्या' वादानंतरही नाही. अगदी ते मंदिर त्याला मंदिर म्हणावे असेही नाही. धड घुमट नाही, की कळस नाही. त्याच्या चार बाजूंना मशिदीच्या मिनारासारखे बांधकाम आहे. पण मंदिरातील विठ्ठलमूर्ती प्राचीन, थेट पंढरपूरच्या विठ्ठलाशी नाते सांगणारी भासते -एकाकी, रेखीव, गूढ आणि तरीही रम्य...

सकाळचे सहा-साडेसहा वाजलेले असतात. माढ्यातील त्या विठ्ठल मंदिरात एकट्या पुजाऱ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. हळू आवाजात सुरू असलेला मंत्रोच्चारही आसपासच्या नीरव शांततेमुळे देऊळभर भरून राहिलेला. नुकत्याच संपलेल्या अभिषेकामुळे विठ्ठलाचे सावळेपण अधिकच उजळलेले. तेवढ्यात एक वयोवृद्ध बाई देवळात येते. थेट गाभाऱ्यात शिरते. विठ्ठलाच्या तोंडाला साखरेची वाटी लावते. लहान मुलाची दृष्ट काढावी तशी ती विठ्ठलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोटे उलटी करून स्वत:च्या कानशीलाजवळ कडकन मोडते... तिला त्या सावळ्या ध्यानात काय दिसले ठाऊक नाही, पण तो देव तिला सोवळ्याओवळ्याच्या पलीकडला वाटतो. आपल्या पोटच्या मुलासारखा. आईच्या मायेला मुलाहून अधिक जवळ ते काय. विठ्ठलाला पाहून त्या माऊलीला वात्सल्याचा पान्हा फुटावा यातच त्या देवाचे मोठेपण सामावलेले आहे.

कंठात गहिवर दाटून यावा असा तो प्रसंग समोर घडत असताना, ती बाई जे बोलली ते भल्याभल्या विचारवंतांनाही तोंडात बोटे घालायला लावेल असं. देवाची दृष्ट काढून ती माऊली आकाशाकडे हात करत बोलती झाली. ''हे ईठ्ठला, काय बी नको बघ तुज्याकडून, आता जसा भेटतोस तसाच रोज भेट म्हणजे झालं''. 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा' म्हणणारे तुकोबा याहून वेगळे काय म्हणत होते.

लऊळचे संत कुर्मदास


संत कुर्मदास हे पैठणचे. त्यांना हाताचे पंजे आणि पायाला पावले नव्हती, तरी त्यांनी पंढरीच्या वारीचे वेड घेतले. त्यामागे एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांची प्रेरणा होती. कुर्मदास पैठणहून लोटांगण घालत वारीस निघाले. एकादशीला तीन दिवस उरलेले असताना त्यांच्या लक्षात आले, की त्यापुढे त्यांना आयुष्य नाही. त्यांनी जेथे देह ठेवला तेच लऊळ गाव. ते गाव सोलापूरच्या माढा तालुक्यात आहे. संत कुर्मदास जेथे पडले, तेथे विठ्ठल-रुखमाईचे मंदिर असून त्यासमोर कबरीसदृश स्मारक आहे. मात्र महाराजांच्या समाधीचे स्थान स्वतंत्र आहे. ते देऊळ औरंगजेबाने बांधले असे म्हणतात. अर्थात हा चमत्कारच! मात्र त्या समाधी स्थळी सेवेकरी मुस्लिम आहेत. ब्राम्हणांतर्फे पूजा केली जाते आणि मराठ्यांकडे वात लावायची प्रथा आहे. मंदिरात आणि समाधीस्थळी अहर्निश सतत दिवा तेवत ठेवला जातो.

संत कुर्मदास यांच्याबाबत सांगितली जाणारी आख्यायिका अशी, की कुर्मदासांनी त्यांना पंढरपूरला पोचणे शक्य नसल्याचे समजल्यानंतर एका वारक-याच्या हाती विठ्ठलासाठी पत्र दिले. कुर्मदासाचे पत्र विठ्ठलाच्या चरणी पडताच विठाबो उठून कुर्मदासाच्या भेटीसाठी निघाला.

संत कुर्मदास यांच्यासंबंधी माहिती ‘भक्तिविजय’ सोळाव्या अध्यायात मिळते.

मंदिराच्या बाजूला पाठीमागे बांधलेली विहीर असून कितीही दुष्काळ पडला तरी आषाढी वारीच्या वेळी ती विहीर पाण्याने भरलेली असते, असे सांगितले जाते. पंढरीची चंद्रभागा तेथे अवतरते असे समजले जाते.

लऊळ गाव कुर्डूवाडी-पंढरपूर रस्‍त्‍यावर आहे. तेथपर्यंत एस.टी.ने पोचता येते. स्वत:चे वाहन असल्यास कुर्डुवाडीपासून लऊळला जाण्‍यासाठी साधारण एक तास वेळ लागतो.

(माहिती स्रोत - गरूड महाराज - 9960059331)

- रविप्रकाश कुलकर्णी आणि गणेश पोळ

नीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान


श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्‍या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा या नद्यांचा संगम होतो. पश्चिमेकडून वाहत येऊन पंढरपूरच्‍या दिशेने कूच करणारी भीमा पश्चिमेकडून वाहत येऊन पूर्वेला जाणा-या नीरा नदीला आलिंगन देते. संगम झाल्यानंतर भीमा-निरा नदीचे रूपांतर चंद्रभागा नदीत होते. ती चंद्रभागा पुढे पंढरपूरच्या दिशेने वाहते. त्‍या संगमक्षेत्री असलेल्या नीरा नृसिंहपूर या गावात श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान आहे.

देवस्‍थानातील श्री लक्ष्मी नृसिंहाचे मुख्य मंदिर चिरेबंदी असून त्‍याचा आकार षटकोनी आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तेहतीस उंच चिरेबंदी पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांना लागूनच उजवीकडे नीरा नदीवरील ऐसपैस लक्ष्मीघाट आहे. घाटाच्या मध्यभागी लांबरुंद चौथरा व पायथ्याशी नदीपात्रात बुरुज आहे.

मंदिराच्या पश्चिमाभिमुखी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस सोंड वर करून उभे असलेले दोन दगडी हत्ती, गजांत लक्ष्मीची ग्वाही देतात. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या-उजव्या बाजूंना घडीव दगडाच्या ओवऱ्या आहेत.

श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आग्नेय टोकावर तर माळशिरस तालुक्‍याच्‍या उत्‍तरेकडे वसलेले आहे. नदीच्या पलीकडे सोलापूर जिल्हा सुरू होतो. ते इंदापूर शहरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी- अकलूज मार्गापासून संगम स्थानक दहा किलोमीटर असून तेथून रिक्षा वा अन्य वाहनाने दीड किलोमीटर अंतरावरील त्या गावात जाता येते.

म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर


सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील म्‍हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे पूर्ण अंधार आहे - टॉर्च घेतल्याशिवाय जाता येत नाही, गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे.

मंदिराची देखभाल, पूजा ‘वास्ते’ या परिवारातील लोक करतात. मंदिराशेजारी असलेल्या एका घरात वास्ते परिवारातील लोक राहतात. त्यास मठ असे म्हणतात, सध्या तेथे सुशिला मच्छिंद्र वास्ते या एकट्याच राहतात (सिनियर सिटिझन). त्यांची ही तेविसावी पिढी आहे.

हा मल्लिकार्जुन मठ आहे. तेथेही मल्लिकार्जुन यांचा पितळी मुखवटा, एका गाभाऱ्याप्रमाणेच जागेत ठेवलेला आहे. गाभाऱ्याबाहेर/ खोलीबाहेर कुंड आहे. त्या कुंडात दर पौर्णिमेला होम करतात.

मल्लिकार्जुन मुखवट्याची पालखी वर्षातून तीन वेळा निघते. एक महाशिवरात्रीला, दुसरी कार्तिकी द्वादशीला व तिसरी दसऱ्याला.

त्याच मठात आत्मचैतन्य महाराजांचा फोटो आहे. त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आत्मचैतन्य महाराज असताना, सुशिलाबाईंच्या नातवाला त्या गादीवर बसवले गेले. तेव्हा तो दोन वर्षांचा होता. त्याचे नाव ह.भ.प. श्रावणमहाराज असे आहे. तो सहावीत शिकत आहे. आळंदी येथे आत्मचैतन्य महाराजांचा म्हणून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस त्यानिमित्ताने कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम असतात. त्यासाठी मठाबाहेरील मोकळ्या जागेत मंडप घातला जातो.