कसबा संगमेश्वरचे चालुक्यकालिन श्रीकर्णेश्वर शिवमंदिर (Kasba - Karneshwar Shivmandir)
कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख राहिली आहे. त्या गावात एकेकाळी सुमारे चारशे देवळे होती असे लोक सांगतात. पण सध्या त्या परिसरात सत्तरच्या आसपास देवालये आहेत. त्यांपैकी कर्णेश्वर मंदिर वगळले, तर अन्य सगळी देवालये ही भग्नावस्थेत आहेत; अखेरची घटका मोजत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. कसबा हे गाव समुद्र किनाऱ्यालगत नाही, पण तेथील नव्वद ते पंच्याण्णव टक्के घरांमधील तरुण हे होड्या बांधणीचे काम करतात. कसब्याची ती एक महत्त्वपूर्ण ओळख आहे.