ओवळेकरांची फुलपाखरांची बाग!

अज्ञात 20/09/2011

फुलपाखरांची बाग! सुंदर टोलेगंज इमारती, मोठेमोठे मॉल व राहत्या घरांचे कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणी मुद्दाम तयार केलेली लॅण्डस्केप गार्डन्स दिसतात. छान, आकर्षंक अशा या बागा हिरव्यागार रंगाचा आविष्कार दाखवत असल्या तरीही नैसर्गिकपणे भिरभिरणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांसारख्या जिवंत कीटक-पक्षी-प्राणीसृष्टीच्या अभावी त्यात जिवंतपणा दिसत नाही. यामुळे की काय फुलपाखरांच्या बागेसारख्या विशेष उद्यानांची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पण आपली समजूत अशी, की हे वैभव असते ते परदेशांत; म्हणजे असे की ‘फुलपाखरांची बाग’ आपण ऐकून असतो, पण एकाच ठिकाणी भिरभिरणारी असंख्य व नानाविध रंगांची फुलपाखरे पाहण्यासाठी आपल्‍याला थेट सिंगापूर, मलेशिया किंवा मादागास्कर येथे जावे लागेल असा आपला समज असतो. इतका लांब व खर्चिक प्रवास कसा काय करता येईल असेही मनात येते. मग चला तर ठाण्याला! अहो, ठाण्याला म्हणजे त्या प्रसिद्ध इस्पितळात नाही हो, खरोखरच्या फुलपाखरांच्या बागेत! तेथे बागेत नानाविध रंगांची, त-हेत-हेची असंख्य फुलपाखरे फुलांवर, झाडांभोवती सतत भिरभिरत असतात. ही बाग आहे ओवळेकरांची.