नाझरे – संतांचं गाव


नाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक ‘श्रीधरस्वामींचं नाझरं’ असेच म्हणतात. गावाला वळसा घालून वाहणारी माणनदी. तिला वरच्या अंगाला गोंदिरा ओढा मिळतो आणि खालच्या अंगाला बोलवण नदी. अशा दोन दोन संगमांवर विराजमान झालेले गाव - नाझरे! ते सोलापूर जिल्ह्याच्या सांगोले तालुक्याच्या काठावर आहे. गावाची हद्द संपते तेथे ग.दि.माडगुळकरांच्या गावाची सीमा सुरू होते. मात्र ते आहे सांगली जिल्ह्यात. नाझरे गावापासून खाली पंधरा–सोळा कोसांवर विठ्ठलाची पंढरी तर बाराएक कोसांवर दामाजीपंतांचे मंगळवेढे.

बाजीरावाच्या समाधीवर

अज्ञात 05/05/2014

थोरले बाजीराव पेशवे यांची मध्‍यप्रदेशातील रावर-खेड गावी असलेली समाधीजेव्हापासून मी थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी इतिहासातून वाचत गेलो, तेव्हापासून त्या मर्द पेशव्याविषयीचा माझा आदर, प्रेम वाढतच गेले आहे. त्याने जन्मभरात एकूण त्रेचाळीस लढाया केल्या आणि त्या सर्व जिंकल्या! यशस्वी सेनापती म्हणून त्याच्या युद्धकौशल्याचा खास अभ्यासही केला जात असतो. तोच महापराक्रमी पेशवा मस्तानीचा बाजीराव म्हणूनही ओळखला जातो. तो वीर ऐन तारुण्यात, कोणतेही भयानक आजारपण न येता वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी मध्यप्रदेशात नर्मदाकाठच्या रावेर-खेडी या गावी सोमवार २८ एप्रिल १७४० रोजी अचानक मृत्यू पावला.

रावेर-खेडी गावाच्या नर्मदातीरावर त्याची असलेली समाधी, तेथे लौकरच होणार असलेल्या धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यात कायमची बुडणार आहे असे वाचनात आले होते. त्या स्थानाला प्रत्यक्ष भेट द्यायची माझी इच्छा अधिकच तीव्र झाली अन् मी संधी शोधू लागलो. माझ्या जळगावच्या मुक्कामात तशी संधी आली आणि पुण्याच्या डॉ. नातू या रसिक सहकाऱ्याची साथ मिळताच आम्ही दोघे मोटारीने त्या मोहिमेवर निघालो. राजू माळी हा आमचा फोटोग्राफर मित्रही साथीला आला.