आखाजी - शेतक-याचा सण

प्रतिनिधी 06/02/2014

शेतक-यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा सण आहे, तो म्हणजे आखाजी. भारतीय परंपरेमध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा समजला जातो, तरी खेड्यांमध्ये तो प्रामुख्याने व्यापा-यांचा आहे. त्यांचे दिवाळीला होणारे वहीपूजन, नवीन खतावण्या वापरात आणणे, गि-हाईकांना दिवाळीबाकी देऊन टाकण्याविषयी विनंती-पत्रे लिहिणे... हे काय दर्शवते?  ‘सासरी गेलेल्या मुली’ दिवाळीला माहेरी येतात हे खरे, पण शेतक-याला त्यावेळी फुरसत असते कुठे? त्याच्या घरात आणि शेतात पसाराच पसारा पडलेला असतो. सामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलीना तर दिवाळीला शेतात काम करूनच साडीसाठी पैसा उभा करायचा असतो. कारण ती मुलगी सासरी गेल्यावर तिला विचारणा होणार, ‘तूना बाप’ नी तुले दिवाईले काय लिनं?