नईमभाई पठाण - पुरातन वस्तूंचे संग्राहक


नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे. ते त्या बाबतीत त्यांच्या बाबांच्या म्हणजे शब्बीर खान पठाण यांच्या तालमीत तयार झाले आहेत.  नईमभाई वागायला नम्र व गोड आहेत; समोरच्याला आपलेसे करणारे आहेत. त्यांचे सर्व कुटुंबच अगत्यशील व आतिथ्यशील आहे.

कॅमे-याचे संग्रहालय


पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्र

हाजी फरीद शेख स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून जपलेली स्वतःची अशी खास आवड म्हणजे छंद. छंदांचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. काहींचे छंद स्वतःपुरते मर्यादित असतात. तर काहींच्या छंदांना संग्रहालयाचे स्वरूप प्राप्त होते. असेच छंदातून निर्माण झालेले हाजी फरीद शेख आमीर यांचे फरीदस् कॅमेरा म्युझियम हे आग्नेय आशियामधील पहिले कॅमेरा संग्रहालय आहे. पहिल्या कार्डबोर्ड बॉक्स कॅमे-यापासून आजच्या कॉम्प्युटराईज्ड कॅमे-यापर्यंतचे सात हजार प्रकारचे कॅमेरे त्यांच्या संग्रहालयात आहेत.

फरीद म्हणाले, की फोटोग्राफी हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय. आमचा ‘न्यू रॉयल फोटो स्टुडिओ’ खडकीत १९२० पासून आहे. माझे वडील हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे व लष्कराच्या सदर्न कमांडचे अधिकृत फोटोग्राफर होते. त्यांच्या मृत्यूनंतर मी ते काम पाहू लागलो. आता, माझी मुले ते काम पाहतात.

माझे बालपण हे कॅमे-यांच्या सहवासात गेले. शाळेतून आल्यावर, माझे वडील मला दुकानात थोडा वेळ बसवत. त्यावेळी माझ्या मनात कुतूहल निर्माण होत असे, की पूर्वीचे कॅमेरे कसे होते? कॅमे-यांचा वापर केव्हा सुरू झाला? आणि त्यातूनच, मी दुकानात दुरुस्तीसाठी येणारे कॅमेरे वडिलांना सांगून विकत घेऊ लागलो. माझे वडीलसुद्धा त्यासाठी मला पैसे देत. अर्थात त्या काळात किमतीसुद्धा कमी होत्या. एखाद्या व्यक्तीकडे जुना कॅमेरा आहे असे कळले तर मी तेथे जाऊन कॅमेरा पाहत असे. ती व्यक्ती तो कॅमेरा विकणार असेल तर तो विकत घ्यायचा; अन्यथा तो कुठे मिळेल याची चौकशी करून तो त्या ठिकाणाहून मिळवायचा अशी सवय मला लागली. काही वेळेला प्रयत्न करूनही जुने कॅमेरे मला विकत मिळत नसत, पण पुढे कधी तरी ते मला सहज गवसत.