मासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक
‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला अंक १८८५ च्या जानेवारीत प्रसिद्ध झाला. १९३५ च्या फेब्रुवारीमध्ये आपला शेवटचा अंक एकाएकी प्रसिद्ध करून ‘मनोरंजन’ने आपल्या अंगीकृत कार्याची धुरा आपल्या पडत्या काळात जन्मास आलेल्या ‘रत्नाकर’, ‘यशवन्त’ यांसारख्या नव्या जोमाच्या मासिकांवर टाकून हजारो मराठी वाचकांचा अचानकपणे निरोप घेतला. त्या सर्व वाचकांनी ‘मनोरंजन’वर जिवापलीकडे प्रेम केले होते. त्यामुळे ‘मनोरंजन’च्या निधनाने सगळ्यांनाच हळहळ वाटली. ‘मनोरंजन’ चाळीस वर्षे जगले; ‘मनोरंजन’चे मालक आणि संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र ह्यांनी ‘मनोरंजन’ला अक्षरश: लहानाचे मोठे केले. ‘मनोरंजन’चा पहिला अंक हा फक्त बारा पानांचा होता. पुढे, तेच ‘मनोरंजन’ शंभर पानी झाले. पहिल्या अंकाच्या छोट्या संपादकीयात मित्रांनी म्हटले होते, की “आम्ही कशाकरता अवतार धारण केला आहे व पुढे काय काय कामे करणार आहोत, हे स्वमुखाने बरळण्यापेक्षा आमचे उद्देश आमच्या सर्वांगाचे परिशीलन केल्याने हळुहळू आमच्या प्रेमळ आश्रयदात्यांच्या लक्षात येतील, असे आम्हास वाटते.