साहित्य अभिवाचन - नवे माध्यम


तळेगाव येथील कलापिनी संघ स्‍पर्धेत अभिवाचन करताना (व्यासपीठावर मध्यभागी) संघप्रमुख डॉ, सुहास कानिटकर  मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ऐरोली शाखेतर्फे १९७७-७८ व १९७८-७९ साली कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. कथास्पर्धेचा निकाल जाहीर करायची वेळ आली तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, की आपण निकाल जाहीर करण्याच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा - म्हणजे निकाल पेपरमध्ये जाहीर करणे किंवा फक्त विजयी स्पर्धकांना, म्हणजेच कथालेखकांना तो कळवणे ह्यापेक्षा वेगळ्या प्रकारे तो जाहीर करावा. मी पारितोषिक वितरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या कार्यक्रमात कथास्पर्धेच्या सर्व लेखक-स्पर्धकांना निमंत्रित केले. कार्यक्रमातच निकाल जाहीर होईल हे कळवले.

किशोर पेंढरकर कलाकारांशी संवाद साधताना  प्रत्यक्ष कार्यक्रमात तीन सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कथांचे कार्यक्रमास उपस्थित सहभागी लेखक, प्रेक्षक व विशेष अतिथींसमोर सर्वप्रथम अभिवाचन केले. अभिवाचनासाठी स्थानिक कलाकारांकडून पंधरा-वीस दिवस तालीम करवून घेऊन ते उत्तम रीतीने सादर होईल याची तयारी केली. त्यामुळेच कथांमधील भावार्थ, जो लेखकाला वाचकांपर्यंत पोचवायचा होता तो प्रेक्षकांपर्यंत यथार्थपणे पोचवण्यात यश आले. प्रेक्षकांना, सहभागी लेखकांना कथा भावल्या व त्यानंतर कुठल्या कथेला कोणत्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले हे जाहीर केले. त्यामुळे उपस्थित सहभागी लेखकांनाही आपल्या कथेत काय कमी पडले आणि पारितोषिक विजेत्या कथेत काय अधिक चांगले आहे ते स्पष्टपणे आपोआप कळून आले. उपस्थितांना कथा सादर करून नंतर पारितोषिक-वितरण हा विचार, ही पद्धत आणि कार्यक्रमाचे असे आयोजन फारच आवडले.

बुध्दिमती – सुलक्षणा महाजन


बुध्दिमती - सुलक्षणा महाजन सुलक्षणा अमेरिकेतील दोन टॉवर जाळले गेले तेव्हा त्या देशातील मिशिगन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिचा मुलगा, भाचा त्याच विद्यापीठात वेगवेगळे अभ्यासक्रम करत होते. ती सांगते, की “सकाळी ९ चा सुमार. ती घरून कॉलेजला गेली आणि मेल बघत असतानाच मुलाचा इ-मेल आला, की फार दूर कोठे जाऊ नको. आधी बातम्या पाहा.”
 

 सुलक्षणा टीव्ही पाहण्यास वरच्या मजल्यावर गेली तर तेथे ही गर्दी! कॉलेजच्या प्रत्येक वर्गात मोठ्या पडद्यावर विमानाच्या धडका बसून दोन टॉवरना आगी लागल्या आहेत, ते कोसळत आहेत हे (आता जगप्रसिध्द) दृश्य सारखे दिसत होते. लोक किंचाळत होते, रडत होते. एकमेकांना मिठ्या मारत होते. सारा समुदाय प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा, वेगवेगळ्या देशांतून आलेला, अनेक जातिधर्मांचा...सा-यांना एकच धसका, की हे अमानुष कृत्य घडले कसे?  प्रत्येक जण दुस-याचे सांत्वन करू पाहात होता आणि स्वत:च शोकविव्हल होत होता.
 

 सुलक्षणा सांगते, की ‘त्यानंतरचे काही दिवस फार भयंकर होते. मन सुन्नबधिर झाले होते’. तिलाच नाही तर सर्वांनाच एकाकी, असहाय वाटत होते. चर्चा अनेक होत, तर्क-वितर्क केले जात, परंतु डोक्यातील विचार त्याच जागी थिजल्यासारखे असत. अमेरिकी प्रशासनाचा, राजकारणाचा राग आला. तिला कोणी कुंकू लावायला सांगितले. का? तर अन्यथा ती मुसलमान वाटेल! सुलक्षणाला याप्रकारचा कोता विचार त्रस्त करत असे. तिला तिचे जीवन बंदिस्त वाटू लागले.
 

व्यंगचित्र आणि जाणत्यांतील 'व्यंग'


घटना समितीच्या कामकाजावर टिका करणारे १९४९ सालचे व्यंगचित्रहे व्‍यंगचित्र पाहा. यावर काही महिन्‍यांपूर्वी संसदेत व बाहेरही गदारोळ माजला. राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेच्‍या (NCERT) इयत्‍ता अकरावीच्‍या राज्‍यशास्‍त्र विषयाच्‍या पाठ्यपुस्‍तकातील या व्‍यंगचित्रामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होतो, असा आक्षेप घेण्‍यात आला. आधी संसदेच्‍या बाहेर काहींनी हा आक्षेप घेतला. नंतर संसदेत गदारोळ करुन जवळपास एकमुखाने या आक्षेपास पाठिंबा देत हे व्‍यंगचित्र हटविण्‍याची तसेच, ते पाठ्यपुस्‍तकात कसे घेण्‍यात आले याची चौकशी करुन कारवाई करण्‍याची मागणी करण्‍यात आली. मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्‍बल यांनी सरकारतर्फे हा आक्षेप स्‍वीकारुन माफी मागितली व हे व्‍यंगचित्र असलेली पाठ्यपुस्‍तके रद्द करण्‍यात येतील तसेच या व्‍यंगचित्राचा पाठ्यपुस्‍तकात समावेश कसा काय गेला याची चौकशी करण्‍यासाठी एका स्‍वतंत्र समितीची स्‍थापना करण्‍यात येईल, असे जाहीर केले. त्या पाठ्यपुस्‍तकाच्‍या रचनेशी सल्‍लागार म्‍हणून संबंधित असलेल्‍या योगेंद्र यादव व सुहास पळशीकर यांनी आपल्‍या सल्‍लागारपदांचा लगेचच राजीनामा दिला. त्‍यांनी लिहिलेल्‍या पत्रात संसदेच्‍या अधिकाराचा आदर राखून आम्‍ही आमचे मतस्‍वातंत्र्य बजावत आहोत, असे नमूद करुन संसदेतला गदारोळ लोकशाही प्रक्रियेशी अनुचित व पुरेशा माहितीवर आधारित नसल्‍याचे म्‍हटले. चौकशी समितीला तटस्‍थपणे चौकशी करणे सोयीचे जावे म्‍हणून आम्‍ही राजिनामे देत आहोत, असा खुलासा त्‍यांनी पत्रात केला. या खुलाश्‍यात हे व्‍यंगचित्र असलेले पाठ्यपुस्‍तक २००६ पासून अभ्‍यासक्रमात आहे, तसेच राज्‍यशास्‍त्राचे पुस्‍तक कोरडे न वाटता ते सुगम असावे यासाठी व्‍यंगचित्रांचा समावेश असलेल्‍या नव्‍या रचनापद्धतीनुसार ते तयार करण्‍यात आले असून तज्‍ज्ञांनी या पद्धतीचे कौतुक केले आहे, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले. इयत्‍ता नववीपासून घटना निर्मिती व त्‍यातील डॉ.

सामाजिक उद्योजक ज्योती म्हापसेकर


ज्योती म्हापसेकर – सामाजिक उद्योजिकाज्योती ही जगन्मैत्रीण आहे. इंटरनेट दोन दशकांपूर्वी नव्हते, तेव्हाही ज्योतीचा लोकसंग्रह प्रत्यक्ष भेटी आणि टेलिफोन ह्यांच्या द्वारे अफाट होता. तिच्या लोकसंग्रहाला तेव्हा भारताच्या सीमांची मर्यादा होती, तरी तिचे जागतिक नेटवर्क आकार घेऊ लागले होते! त्याचे मुख्य साधन तिनेच लिहिलेले व स्त्री मुक्ती संघटनेने सादर केलेले ‘मुलगी झाली हो’ हे नाटक होते. नाटकाचे स्वरूप पथनाट्यासारखे होते, पण ते रंगमंचावर होई. नाटकाने अल्पावधीत प्रेक्षकांवर मोहिनी घातली. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधूनच नव्हे तर नाटकाला भारताच्या अन्य राज्यांमधून निमंत्रणे येत. नाटकाचे भाषांतर काही भारतीय भाषांमध्ये झाले होते.

‘स्त्री मुक्ती संघटना’ नाटकाच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्याचे, संघटना बांधण्याचे काम करत होती. त्या माध्यमातून परदेशी स्त्रियाही ज्योतीशी सहजपणे जोडल्या जात होत्या. क्रिस्टीन गिलेस्पी ही ऑस्ट्रेलियाची. ती कोल्हापूरला ‘मुलगी झाली हो’ बघायला आली आणि थोड्याच काळात ज्योतीची व ‘स्त्रीमुक्ती संघटने’ची मैत्रीण झाली. ज्योतीला ‘मुलगी झाली हो’ नाटकाची लेखिका म्हणून जागतिक नाट्यलेखिकांच्या परिषदेसाठी आमंत्रण आले तेव्हा अकरा जणींची ऑस्ट्रेलियातील राहण्या-जेवण्याची, लोकांना भेटण्याची, ऑस्ट्रेलिया बघण्याची सर्व व्यवस्था क्रिस्टीनने केली! तिने तेथील ‘स्त्री अभ्यास केंद्रा’मध्ये आणि विद्यापीठांमध्ये नाटकाचे प्रयोग घडवून आणले, स्त्री-प्रश्नांवर चर्चा आयोजित केल्या. परिषदेनंतर ज्योती जागतिक नाट्यलेखिका संस्थेच्या कार्यकारिणीची सभासद झाली. ज्योती जागतिक स्तरावर जाऊन पोचली. तीही अशी कर्तबगार, की तिने आंतरराष्ट्रीय नाट्य-लेखिकांचा एका आठवड्याचा मेळावा मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या मदतीने 2010 साली मुंबईत भरवला व यशस्वी केला.

डॉ. प्रेमानंद रामाणी - चैतन्य पेरणारा सर्जन


डॉ. रामाणी तबलावादनाचा आनंद घेतानाडॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा अमृत महोत्सव साजरा केला, तथापि त्यांच्या जीवनातील नियमितता व शिस्तशीरपणा जराही कमी झालेला नाही. किंबहुना त्यामधील काटेकोरपणा वाढत चालला आहे. ते वडाळ्याहून माहीमला राहायला आले त्यास काही वर्षे झाली. ते सातव्या मजल्यावर राहतात. तेथून नऊ वाजता ‘लीलावती’मध्ये ऑपरेशन्सची वेळ पोचायचे, तर त्यांना साडेआठ वाजता निघावे लागते. ‘ब्रेकफास्ट’ आटोपताच खाली ड्रायव्हरला इशारा केला जातो, की गाडी पोर्चात आणणे. डॉक्टर खाली उतरतात, गाडीत बसतात. बाजूचा ‘टाइम्स’ उघडतात व वाचन सुरू करतात.

 

मी त्यांची नियमितता निरखण्यासाठी ज्या दिवशी सकाळीच त्यांच्याकडे पोचलो व त्यांच्याबरोबर गाडीत बसलो तेव्हा ते म्हणाले, की “ड्रायव्हरला वेळीच निरोप गेल्यामुळे माझे तीस सेकंद वाचतात. तेवढा जास्त वेळ मी नातीचा निरोप घेण्यात देऊ शकतो.” त्यांच्या नातीची शाळेला जाण्याची तीच वेळ असते. त्यांची ‘आर्ट डायरेक्टर’ मुलगी वरच्या मजल्यावर राहते. ती आजी-आजोबांचा निरोप घेऊन रोज शाळेला जाते. 

 

जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन


नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा प्राध्यापक आहे किंवा सरकारी नोकरी करतो वगैरे... मग जोशी विचारत, की ही झाली उपजीविका. मग तुमची जीविका काय? तो माणूस चक्रावत असे. जोशींना सुचवायचे एवढेच असायचे, की माणूस जगतो तो काही उद्देशाने. ते त्याचे स्वप्न असते, ध्येय असते, उद्दिष्ट असते किंवा आणखी काही. त्यासाठी तो चरितार्थाची साधने जमवून जीवन सुकर करत असतो. या लेखमालिकेत जीवनाची साधने उत्तम रीत्या उभी केलेल्या, परंतु त्याचबरोबर अधिक व्यापक जीवनोद्दिष्टाचा पाठपुरावा करणा-या व्यक्तींचा जीवनक्रम आणि त्यांचे विचार सादर करण्यात येतात.

जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन 

शशिकांत सावंत - आजचा ऋषिमुनीच तो!


शशिकांत सावंतशशिकांत सावंत ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथविक्रेता आहे. त्याहून अधिक, तो स्वत: विविध वाचणारा आहे, व्यासंगीही आहे. तेवढाच तो लहरी व त-हेवाईक आहे. त्याच्याबद्दल अशा ब-याच गोष्टी ऐकल्या होत्या. मात्र त्याच्या अन् माझ्या तारा जुळल्या नव्हत्या, कारण त्याच्यावर विश्वासून राहावे असा मला त्याचा अनुभव नव्हता. पत्रकार म्हणून, तेही वर्तमानपत्र-मासिकांचे संपादन करत असताना डेडलाईन सर्वात महत्त्वाच्या. त्यामुळे लेखकांनी वेळा पाळणे फार गरजेचे असते. संपादक आणि लेखक यांच्यातील तो भरवसा शशिकांतकडून पाळला जातोच अशी त्याची ख्याती नव्हती. त्यामुळे बहुधा, मी वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी संपादनकार्य करत असताना त्याच्यापासून दूर राहिलो होतो. मात्र मित्रांकडून त्याच्या ग्रंथप्रेमाच्या आणि संदर्भचातुर्याच्या इतक्या गोष्टी, इतक्या वारंवार ऐकल्या होत्या, की त्याला त्याच्या अड्ड्यात जाऊन भेटणे क्रमप्राप्त होते. तो योग या लेखाच्या निमित्ताने जुळवला आणि नव्या मुंबईतील वाशीमधील त्याच्या दुकानी व घरी गेलो.
 

त्याने सेक्टर दहामधील दुकान साताठ महिन्यांपूर्वीच सुरू केले आहे. त्यापूर्वी तो घरून ‘ऑपरेट’ होत असे. त्याचा व्यवसाय म्हणजे पुस्तकविक्रीचे सर्वसाधारण दुकान असा नाही. तो गि-हाईके हेरतो आणि त्यांना हवी ती पुस्तके पुरवतो. तो असा व्यवहार करत असताना स्वाभाविकच त्याचा गि-हाईकाबरोबर मोठा व सतत संवाद चालू असतो. त्यामुळे त्याला स्वत:ला वाचनवेड्या, ज्ञानोत्सुक गि-हाईकापेक्षा अधिक सजग राहवे लागते. शशिकांत तेवढा संदर्भ संपन्न असतोच!
 

नाट्यसंगीताचा वारसा जपणारी तरुण पिढी


अंधेरीच्या ‘भवन्स कल्चरल सेंटर’तर्फे मराठी नाट्यमहोस्तव आयोजित केला गेला होता. मी त्यात ‘संगीत, कोणे एके काळी’ हे नाटक पाहिले, ऐकले. ते अप्रतिम वाटले.

‘मिथक’ संस्थेतर्फे नाटक सादर केले गेले. मी त्यांच्यामधील आशुतोष गोखले याच्याशी गप्पा मारल्या.

रुपारेल कॉलेजमधून पदवीशिक्षण पूर्ण करून, बाहेर पडलेली दहा-बारा मुले. त्यांना नाटकाविषयी आवड, आस्था आहे. त्यांनी २००६ साली ‘मिथक’ची स्थापना केली. ‘स्वत:ला पटेल व आवडेल असे नाटक करणे’ हा त्यांचा उद्देश. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये बर्याीच वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांनी २०११ साली, आतंरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत, प्रथमच संगीत एकांकिका सादर केली- ‘संगीत, कोणे एके काळी’. त्यात त्यांना दुसरा क्रमांक मिळाला.

‘चतुरंग’ची सवाई एकांकिका स्पर्धा असते. त्यात संपूर्ण वर्षभरात पहिला क्रमांक मिळवणा-या एकांकिकांना प्रवेश मिळतो. दुसरा क्रमांकप्राप्त ‘संगीत, कोणे एके काळी’ला अर्थातच त्यात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘मिथक’ची मुले-मुली नाराज होती. त्यावर त्यांनी, विशेषत: अद्वैत दादरकरने असा विचार केला, की आपण एकांकिकेतून बाहेर पडून, प्रायोगिक रंगभूमीवर संगीत नाटक सादर करुया! मग मंडळी उत्साहाने कामाला लागली.
एकांकिका द.मा. मिरासदारांच्या कथेवर आधारित आहे. त्याचे दोन अंकी नाटकात रूपांतर करून २९ नोव्हेंबर २०११ ला संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला.

‘मिथक’ हे नाव का व कसे ठेवले? असे विचारले असता आशुतोष म्हणाला, की mythology, myth या शब्दांवरून ‘मिथक’ हे नाव ठेवले. Myth म्हणजे पौराणिक कथा, त्या काल्पनिक, काही वेळेस अतिरंजित असतात, पण त्या स्वत:चे विश्व निर्माण करतात. आम्हालाही ‘आमचे विश्व’ निर्माण करायचे आहे, म्हणून ‘मिथक’!

आशुतोष म्हणाला, सुरुवातीला आम्ही जरी दहा-बारा जण होतो तरी अनेक समविचारी मुले-मुली, ‘मिथक’ला जोडली गेली. ‘मिथक’ हा चाळीस जणांचा ग्रूप आहे. त्यांतील जास्त मुले ‘रुपारेल’मधे शिकणारी आहेत.

थिंक महाराष्‍ट्रः प्रगतीची पावले


- दिनकर गांगल

‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप, मग प्रतिसाद उबदार व धो-धो का येत नाही? कारणे दोन आहेत: एक तर ज्या पिढीला फुरसत आहे व जी पिढी सुखस्वस्थ आहे तिला संगणक, महाजाल या गोष्टी दूरच्या वाटतात, आपल्या जमान्याच्या वाटत नाहीत. उलट, जी पिढी या माध्यमाजवळ आहे ती जीवनसंघर्षात, करिअरच्या प्रगतीत गुंतली आहे. तिला ‘फेसबूक’,ट्विटर्’ ही दैनंदिन गप्पाष्टकांची सदरे फार प्रिय असतात. थोडे वेगळे आणि अधिक ओळखीचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन. हे अत्यंत उपयुक्त साधन, परंतु त्यावरील सत्तर ते ऐंशी टक्के संभाषण ही निव्वळ बडबड असते. पण विचार असा करू या, की एरवी घरात तरी असाच वायफळपणा चालू असतो ना? (असायचा ना?) घराघरातली माणसे कमी झाली म्हणून ती गरज मोबाईल फोनमधून जनात भागवली जाते. टेलिव्हिजनवरच्या ‘सोप’ दैनंदिन मालिकांची महती तीच सांगतात. राहण्याची घरे, जागा आणि माणसे या दोन्ही गोष्टींनी लहान झाल्यावर मोठ्या कुटुंबाची गरज सासू-सून-दीर-भावजया अशा, मालिकांतील नाट्यातून, एकत्रितपणातून भागवली जाते. असो.
 

‘थिंक महाराष्ट्र’ची संकल्पना Think Maharashtra Link Maharashtra अशी माणसांना जोडण्याची असल्याने ती लोकांना पसंत पडते. आतापर्यंत आपण परभणी, नांदेड, अंबाजोगाई, लातूर, धुळे, अमरावती, येथे बैठका घेऊन, तेथे मोठ्या पडद्यावर ‘थिंक महाराष्ट्र’चे पोर्टल दाखवून अनेक माणसांना या जाळ्यात आणले आहे.
 

तिंतल तिंतल लितिल ताल !


 नर्सरीतल्या बाळानंतिंतल तिंतल लितिल ताल...’ असं म्हटलं, की आर्इचे हात ‘स्काय’मधल्या ‘स्टार्स’ना टेकतात! या बालगीताचं काय नशीब खुललं ते पाहा! गीत जेन आणि अॅन टेलर या ब्रिटिश बहिणींनी १८०६ मधे लिहिलं. ‘चिवचिव चिमणी रबराची, कशी ओरडे गमतीची’ हेही जुनं बालगीत. या मराठी बालगीतात ‘र’ येतो. तो बालकाला म्हणता येत नाही. त्याची मजा और असते पण त्या गीताचे सोने झाले नाही. ‘ट्विंकल ट्विंकल’ म्हणणार्‍या आयांनी सप्तर्षी, ध्रुवतारा, वसिष्ठ, अरूंधती हे आकाशातील तारे-तारका पाहिले असतील की नाही, याची शंका वाटते. मात्र मराठी गीतातील जिवंत चिमणी परिचयाची होती आणि एकेकाळी, रबराची चिमणी कवितेत होती तशी घराघरात होती. पण इंग्रजांचं बालगीत जगभर घराघरात किलबिललं!

 ‘व्टिंकल व्टिंकल लिटिल स्टार’ हे गीत गाण्याचे दिवस उलटले, की मूल वरच्या वर्गात जातं. शाळेत अॅटलासविषयी माहिती होते. भारतात डेहराडूनचं ‘सर्व्‍हे ऑफ इंडिया’ स्कूल अॅटलास छापतं. प्रत्येक मुलाकडे तो असण्याची शक्यता आहे. त्यात पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धांची चित्रं असतात. शाळाशिक्षक ती चित्रं समजावणं शक्य नसतं. ती घरच्यांना शिकवावी लागतात आणि नेमकं तेच होईनासं झालंय. म्हणजे पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात राहतं!

 हल्ली मुलं इंटरनॅशनल किंवा पब्लिक स्कूलमधे जातात. त्यांना गॄहपाठ दिला तर सगळं सोपं असतं. पक्षी, वाहनं यांची रंगीत गुळगुळीत चित्रं बाजारात मिळतात. मुलांच्या आया ऑफिसातून आल्यावर ती कापून वहीत चिकटवतात. त्यांना छान मार्क मिळतात. आर्इवडिलांना आनंद होतो. चित्रातला पोपट आणि चित्रातली चिमणी प्रत्यक्षात कधी पाहण्यात येत नाही.

 सध्या वय वाढतं तशी धबधब्याखाली आंघोळ केल्यासारखी माहिती मुलांच्या अंगावर कोसळत आहे. पण एक म्हण आहे, ‘अतिशिक्षण आणि भिकेचं लक्षण’. अतिमाहिती मिळवता मिळवता मुलाचं मुद्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे का? त्यांचं निसर्गाशी नातं तुटत आहे का?