हौसेनं केलेलं काम हा विरंगुळाच असतो - अचला जोशी


अचला जोशी      ‘‘पूर्वीच्‍या एकत्रपणे नांदत्‍या घरांप्रमाणे आपलं आजचंही आयुष्‍य नांदतं असायला हवं. त्‍यामध्‍ये मित्रपरिवार, दूर-जवळचे नातेवाईक, प्रतिभावंत, व्‍यावसायिक अशांची सतत ये-जा असली म्‍हणजे आपल्‍याला संपन्‍नता जाणवते. विकेंद्रित कुटुंबपद्धतीवर आपल्‍या आवडीची माणसं जोडत राहणं हा इलाज असू शकतो,’’ अशा आशयाचे उद्गार लेखिका-समीक्षक आणि प्रख्‍यात ‘वाइन लेडी’ अचला जोशी यांनी ‘कृतार्थ मुलाखतमाले’त काढले. संवादकाच्‍या भूमिकेत असलेल्‍या पत्रकार शुभदा पटवर्धन यांनी उपस्थितांसमोर अचला जोशी यांचे विविधांगी व्‍यक्तिमत्‍त्व ‍उलगडून दाखवले. मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवार २६ फेब्रुवारी २०१३ रोजी दादर-माटुंगा कल्‍चरल सेंटर येथे पार पडला.

अचला जोशींची मुलाखत घेताना शुभदा पटवर्धन     अचला जोशी यांनी भरपूर वाचन, लेखन, सातही खंडात प्रवास केला आहे. वाईन-क्विल्‍ट-च्‍यवननप्राश यांच्‍या निर्मितीचा उद्योग करत असतानाच त्‍यांनी औद्योगिक, शैक्षणिक, आणि बाल व स्‍त्री कल्‍याण या क्षेत्रांत भरीव समाजसेवा असे विविधांगी पैलू जोपासले. ‘वयाच्‍या अमृतमहोत्सवातही ही सर्व कामे जोमाने सुरू आहेत. ती ऊर्जा तुम्‍ही कुठून आणता?’ असे शुभदा पटवर्धन यांनी विचारले, तेव्‍हा अचला जोशींनी त्‍याचे श्रेय त्‍यांच्‍या आई आणि वडिलांच्‍या सतत काम करत राहण्‍याच्‍या वृत्‍तीला दिले. ‘‘आवडीचं काम असलं म्‍हणजे त्‍याचा थकवा जाणवत नाही. हा मंत्र मी अंगीकारला आहे.’’ असे त्‍या म्‍हणाल्‍या.

     ‘गजबजलेल्‍या माहेरच्‍या घरातनं आता या उतारवयात तुम्‍ही एकट्या राहता त्‍याचा जाच कधी जाणवतो का?’ त्‍या प्रश्‍नावर अचला जोशी म्‍हणाल्‍या, की ‘माझे छंद-अभ्‍यास-व्‍यवसाय सतत चालू असतात. मी एकटी राहते हे खरं आहे पण माझ्या घरात सतत कामाच्‍या निमित्‍ताने ये-जा असते. त्‍यामुळे मला एकटेपणा जाणवण्‍याचा प्रश्‍नच आला नाही. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, की एकटेपणा ही वृत्‍ती असते. ती माझी नाही.’

साऊण्ड ऑफ सायलेन्स


ध्रुव लाक्रा ‘मिरॅकल कुरियर्स’ या नावातच जादू आहे! प्रचीती घ्यायची असेल तर सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास के.सी. कॉलेजच्या परिसरात चक्कर टाका. तुम्हाला काळी कॉलर आणि गर्द नारिंगी रंगाचा टी शर्ट घातलेली, खांद्यावर मोठाल्या काळ्या बॅगा घेऊन रस्त्याच्या कडेने जाणारी काही तरुण मुले दिसतील. ती आहेत ‘मिरॅकल कुरियर्स’ . विशिष्ट नारिंगी टी शर्टस् मुळे ती पटकन नजरेत येतात. ती खास त्यांच्यासाठी जन्माला आलेली कुरियर कंपनी आहे. मिरॅकल कुरियर्स – फक्त कर्णबधिरांना नोकरी देणारी कंपनी. अशा पद्धतीची भारतातील ती एकमेव कंपनी आहे.

 ‘मिरॅकल कुरियर्स’चे काम चर्चगेटच्या इंडस्ट्री हाऊसमधल्या जागेत सकाळी नऊच्या दरम्यान सुरू होते. काम रोजच्या डिस्पॅचची विभागणी करणे, पत्रे वाटून घेणे, एरिया ठरवणे आणि नोंदी करणे इत्यादी. ऑफिसमध्ये कुणी बोलत नाही; कमालीची शांतता असते. आवाज असतो तो फक्त कागद, गठ्ठे आणि पाकिटे इथुन तिथे सरकावल्याचा. मुली आलेली पत्रे निवडायची कामे करतात तर मुलगे ती पोचवण्याचे काम करतात. सारे खाणाखुणांच्या भाषेत (साईन लॅंग्वेज) शिस्तीत चाललेले असते. पन्नास कर्णबधिर मुले गोदरेज, महिंद्र अॅण्ड महिंद्र, आदित्य बिर्ला ग्रूप अशा मोठाल्या कंपन्यांसाठी सर्व्हिस देत आहेत. त्यांच्या कामात नेमकेपणा, अचूकपणा आणि वक्तशीरपणा असतो.

श्यामवर आईने केलेले संस्कार

अज्ञात 13/02/2013

Sane Guruji.jpg     पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड येथे एकत्र कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांचे वडील खोत असूनही घराच्या विभक्तीकरणानंतर मात्र घरची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. गुरुजींचे स्वत:चे पूर्ण आयुष्य गरिबीत गेले. त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. त्यांचे लहानपणापासून, त्यांच्या आईवर फार प्रेम होते. त्यांनी आपल्या आईच्या सार्‍या आठवणी ‘श्यामची आई’मध्ये अत्यंत साध्या, सरळ व ह्दयस्पर्शी शब्दांत लिहिल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे संस्कार केले, त्यातूनच गुरुजींचा जीवनप्रवास घडला. त्यांच्या आईनेच त्यांना सर्वांभूती प्रेम करण्याचा धडा दिला.

माझ्या जीवनातली ‘श्यामची आई’

अज्ञात 12/02/2013

गीता हरवंदे     मी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने मला बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. इतरही खेळातील वगैरे मिळून आणखी चार-पाच पुस्तके त्यावेळी मला बक्षीस म्हणून मिळाली होती. पण, ती आता मला काही आठवत नाहीत. मला अप्रूप फक्त ‘श्यामची आई’ पुस्तकाचं होतं. साने गुरुजींचे पुस्तक मिळाल्याने मला खूप आनंद झाला. तोपर्यंत पुस्तकरूपातून साने गुरुजींचा आणि माझा परिचय झालेला नव्हता आजही पन्नास वर्षांनंतर ते पुस्तक माझ्याजवळ आहे. शिळ्या भाकरीसारखी त्याची पाने तुटू पाहताहेत पण मी ते जपून ठेवले आहे.

‘श्यामची आई’ पुस्तक      ‘श्यामची आई’ आणि श्याम मला अक्षररूपाने अगदी प्रौढपणी आकलन झाला. माझ्या आईपासूनची माझी सारी रक्ताची नाती मला गुरुजींमध्ये प्रतिबिंबित होत. माझी अवस्था ‘जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित’ अशी होती. मला अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. भावंडांमध्ये मी सर्वांत मोठी. त्यात मुलगी म्हणून जन्माला आलेली हा ही माझा गुन्हा होता. त्यामुळे घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटन-हातशिलाई करायची. शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. बालपणीच्या अशा चित्रात अक्षरांशी खेळायचे राहूनच गेले. अक्षरांच्या दालनात प्रवेश करायला प्रौढपण आले.

       प्रेमाचे अथांग सागर असलेल्या गुरुजींच्या त्या कारुण्यमूर्तीच्या चित्राने आणि ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या गाण्याने ज्या वात्सल्यपूर्ण प्रेमाला मी अगदी लहानपणापासून सतत आसुसलेली होते. ते प्रेम मला गुरुजींनी विद्यार्थिदशेत दिले. त्यावेळी मला तेवढेच पुरेसे वाटले. माझी गरज आणि बुद्धीचा आवाका खूप लहान होता. तोपर्यंत मी गुरुजींना पुस्तकातल्या मोरपिसासारखे जपले होते.

साने गुरुजी- मी पाहिलेले!

अज्ञात 11/02/2013

साने गुरुजी     आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाचे वेड होते. तेव्हा मुलांसाठी पुस्तके म्हणजे इसापच्या नीतिकथा, बालबोध मेवा जोडाक्षरविरहित (मी वाचायची जोडाक्षर विहिरीत) असायची. आमच्या समाजात दरवर्षी दसर्‍याला सोने लुटण्याबरोबर पुस्तके वाटायचाही समारंभ व्हायचा. म्हणजे जी मुले त्या वर्षी एखादी शालेय परीक्षा पास झाली असतील त्यांना अध्यक्षांच्या हस्ते छानपैकी गोष्टीचे पुस्तक बक्षीस मिळत असे. नुसते पास झाले की, पुरे! शाबासकी म्हणून आणि वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तक मिळे. किती टक्के? कितवा नंबर? असे प्रश्न कोणी विचारत नसे.

वसुमती धुरी यांना बक्षीस मिळालेल्या! ‘गोड गोष्टी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ     एका वर्षी, आम्हा लहान मुलांना वेगळीच नवीन पुस्तके मिळाली. साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी.’ नेहमीपेक्षा वेगळा आशय, छोटी छोटी सोपी वाक्ये, रंजक – अकृत्रिम शैली अशी ती पुस्तके आम्हाला (मी जेव्हा आम्ही म्हणते तेव्हा शरयू (ठाकूर) माझी बहीण मनात असते.) इतकी आवडली, की आपले पुस्तक संपवून दुसर्‍याचं घेऊन वाचू लागलो. साने गुरुजींची ती पहिली ओळख!

‘श्यामची आई’ पुस्‍तकाची जन्मकथा


‘श्‍यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता

 ‘श्‍यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात ओतलेला आहे. आईच्या प्रेमाचा सुगंध त्या कथेतून दरवळत आहे. श्यामला वाटत असलेली आईबद्दलची कृतज्ञता, तिच्या विषयी असलेली भक्ती 'श्यामची आई' पुस्तकात मांडलेली आहे. तीच भावना आपल्या मनाच्या कोपऱ्यात असलेल्या ‘आई’विषयीच्या भावनांना साद घालते. म्हणूनच हे पुस्तक आजही पहिली पसंती आहे. 

'श्‍यामची आई'  ‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर प्रसिद्धीची तारीख दासनवमी शके १८५७ अशी छापलेली असल्याने ती आवृत्ती १९३५ साली प्रकाशित झाली, असा अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीच्या प्रसिद्धीचे साल १९३५ असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे, की शके आणि इसवी सन या दोन कालगणनांमध्ये अठ्ठ्याहत्‍तर वर्षांचा फरक असतो. पण ‘शके’ ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे ‘शके’च्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी दासनवमी शके १८५७ चे इसवी सनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’च्या प्रसिद्धीची अचूक तारीख १६ फेब्रुवारी १९३६ आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे २०११ हे वर्ष ‘श्यामची आई’चे अमृतमहोत्सवी वर्ष होते.

बालमोहन शाळेच्या निमित्ताने - बदल काय होतोय?

Suhas Tapasvi 03/02/2013

सुहास गो. तपस्वीमाझ्या ‘बालमोहन’मधील शिक्षणाला १९४९च्या जूनमध्ये पाचव्या इयत्तेत सुरुवात झाली. ते आठवायचं कारण म्हणजे, बापूंचं आत्मचरित्र ‘आठवणीतील पाऊले’ अशातच वाचलं; बापू म्हणजे, बापुसाहेब रेगे, दादा रेगे यांचे मोठे चिरंजीव. ते आत्मचरित्र वाचताना १९५०च्या दशकातल्या शाळेतील आठवणी जागृत झाल्या. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वीचा, एसएससीपर्यंतचा सात वर्षांचा कालखंड चलतचित्रपटासारखा माझ्या डोळ्यांपुढून गेला.

पी.डी. पाटेकर नावाचे वडलांचे आतेभाऊ होते. ते गिरगावच्या राममोहन शाळेत शिकवायचे; त्यांचा शिक्षणक्षेत्रात दबदबा होता. ते आमच्या घराच्या जवळच, शिवाजीपार्कला राहायचे. मी चवथीपर्यंत म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलो. नंतर शाळा बदलून खाजगी शाळेत जायचं म्हणून वडलांनी मला नवीन शाळेच्या निवडीकरता पंडितकाकांकडे नेलं. दादर म्हणजे त्यावेळी दोनच शाळांची नावं नजरेसमोर येत; स्टेशनजवळची छबिलदास किंवा लांब चालण्याची तयारी असेल तर हिंदू कॉलनीतील ‘किंग जार्ज’. पण पंडितकाकांनी ‘बालमोहन’चं नाव सुचवलं; चर्चेला वावच ठेवला नाही, थोडाफार आग्रह धरला. झालं, ठरलं, ‘बालमोहन’ पक्कं झालं!

त्या काळची पहिली आठवण म्हणजे, चवथीतून पाचवीत आल्यावर खाजगी शाळेतील शिक्षणाला सुरुवात झाल्यावरची. मात्र खाजगी शाळेत आल्यामुळे फार फरक झाल्याचं जाणवलं नाही; तशीच मुलं, तसेच शिक्षक व शाळेचं वातावरणही साधारण तसं. सांगण्याचा उद्देश म्हणजे, मला अपेक्षित दृष्टिकोनातून विशेष बदल जाणवला नाही; ‘बालमोहन’ काही खास निराळी वाटली नाही. बहुतेक, त्यावेळी खाजगी व म्युनिसिपालिटीच्या शाळांत विशेष फरक नसावा; असंही असू शकेल, की मी जात होतो ती मोडक इंजिनीयर्सच्या बंगल्यातील म्युनिसिपालिटीची शाळा तशा इतर शाळांपेक्षा जास्त चांगली होती. मोडक शाळेतल्या पटांगणातील पारावर बसून जसा अधुनमधून मी डबा खायचो, त्याच मोकळ्या वातावरणात पिंपळाच्या पारावर बसून मी ‘बालमोहन’मध्येही डबा खायला लागलो.

आपणही हे करु शकतो


सौ.भावना अरविंद प्रधाननिसर्गाच्या कणाकणांत ईश्वर असतो असे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. तरीसुद्धा मी देव देव करत बसण्यापेक्षा मंदिरात फक्त पाच रुपये वाहावे व गरजूंना दर महिन्याला घरखर्चातील एक हजार रुपये द्यावे असे ठरवले. मी माझ्या तिन्ही मुलांची उच्च शिक्षणे पुरी झाली तेव्हापासून, गेली नऊ वर्षे हा नियम पाळत आहे.

मी स्वत: एम.ए. असून पत्रकारितेचा एक वर्षाचा डिप्लोमा केला आहे. पत्रकारितेच्या शिक्षणामुळे माझा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन रुंदावला. मी प्रथम वर्तमानपत्रे, टी.व्ही.कार्यक्रम, मासिके यांतून अनेक संस्थांचे पत्ते व फोन नंबर मिळवले. तेव्हा प्रत्येक संस्थेच्या गरजा वेगवेगळ्या असतात हे माझ्या लक्षात आले. मला समाजाचे अनेक थर, पैलू, आजची परिस्थिती व त्यातून निर्माण झालेल्या गरजा समजल्या. गरजू मुलांना व्यवहारी व बोधपूर्ण शिक्षण व संस्कार यांची गरज आहे हे जाणले. त्‍या सुमारास सुधा मूर्ती यांची पुस्‍तके वाचनात आली. त्‍यांनी कर्नाटकात अकरा हजार वाचनालये सुरू केली. मी मनाशी निश्चिय करून त्याप्रमाणे एक कार्यक्रमच तयार केला.

मी पंचतंत्र , इसापनीती , परीकथा ही पारंपरिक व देशभक्ती, संस्कार, शास्त्रीय माहिती, विज्ञानशास्त्र, शिवणकाम, बागकाम, पशुपालन, दुग्धव्यवसाय या विषयांची पुस्तके विकत घेतली. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावार ‘मुलांनो, पाणी गाळून व उकळून घ्या’, ‘शिळे व उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका’ ‘’रोज थोडा वेळ व्यायाम करा.’ ‘गुरुजनांचा मान राखा’. ‘निरक्षरांना पुस्तके वाचून दाखवा’ असे संदेश लिहिले. असे प्रत्येकी पंधरा पुस्तकांचे संच गावांना व संस्थांना दिले.

त्याखेरीज मी लिहिलेले लेख - ‘माझा हिंदुधर्म’, ‘छोटे उद्योग,’ ‘ग्रामीण भागात करण्याजोगे व्यवसाय’, ‘आदर्श गाव-आदर्श शाळा’, ‘साठीनंतर’ यांच्‍या झेरॉक्स करून त्याच्या प्रती वाटल्या.

शब्दांकित


मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग  ‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच! 

 चौघींचे एका मुद्यावर एकमत होते - आमच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत चांगल्या साहित्याच्या वाचनाचा वाटा मोठा आहे. चांगले विचार, सुसंस्कार, शुद्ध आचरण या गोष्टी काही केवळ घरातल्या वळणाने आपल्यात आले नाहीत तर आपण चांगल्या साहित्यातूनही खूप काही शिकलो असे आम्हाला वाटत होते. आम्ही मग असा विचार निश्चित केला, की आपण मुलांसमोर व जमल्यास मोठ्यांसमोरही चांगले साहित्य नेण्याचे काम करावे. विचारमंथनानंतर, ‘अभिवाचन’ हा सादरीकरणाचा प्रकार, आमची वये व कुवत लक्षात घेता आम्हांला जमेल असे वाटले. शब्द हेच आमचे माध्यम राहणार होते, म्हणून आम्ही गटाचे नाव हे ‘शब्दांकित’ असे ठेवले.

दिग्दर्शनाचा अभाव

Ashok Tamhankar 01/01/2013

को.म.सा.प. साहित्य अभिवाचन स्पर्धा २०१२ मध्ये साहित्य अभिवाचन करताना पालीचा संघ  ´मुन्नी, चमेली, जलेबी आणि कोंबडी पळाली´ च्या युगात, मराठी पुस्तक वाचनाच्या एका कार्यक्रमात, आख्खं सभागृह हुंदके देऊन रडलं, असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? अशक्यच वाटेल ते तुम्हाला. पण देवनारला झालेल्या ´साहित्य अभिवाचन´ स्पर्धेत ते घडलं! आणि ते घडवलं रायगड जिल्ह्यातील ´पाली´सारख्या छोट्या गावातून आलेल्या साध्यासुध्या दिसणार्‍या, कुठलाही अभिनिवेश न दाखवणार्‍या एका चमूनं, आपल्या  उत्तम साहित्य अभिवाचनानं.

 ‘कोमसाप’ च्या देवनार शाखेच्या वतीने गेली आठ वर्षे सुरू असलेल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेने साहित्यप्रेमींसाठी वेगळ्या प्रकारची मेजवानी निर्माण केली आहे. कुठलाही साहित्याचा प्रकार एका तासात प्रेक्षकांपर्यंत असा पोचवायचा की त्यांनी म्हटले पाहिजे, ´क्या बात है!´  
आणि भाग घेणार्‍या संघांना ते पोचवावे लागते, प्राथमिक मंचीय सुविधा देणार्‍या एका शाळेच्या सभागृहात. ध्वनिवर्धक जेमतेम चालतात. शेजारीच असणार्‍या रेल्वे मार्गावरून लोकल्स धडाडत जात असतात. शाळेच्या मैदानावर मुलांचा गोंगाट सुरू असतो. कधी कधी, मैदान वापरणारी मुले जवळपासच्या झोपडपट्ट्यांतली असतात. त्यांना वाचन-संस्कृतीचा गंध नसतो. ‘अभिवाचना’चा तर नसतोच नसतो! स्पर्धकांना या गोष्टी सांभाळून आपले  म्हणणे प्रेक्षकांपर्यंत पोचवावे लागते...आणि बहुतेक संघ त्यात यशस्वी होतात!

 स्पर्धेच्या बजेटातला मुख्य खर्च बक्षिसांचा असतो. तो ‘कोमसाप’च्या  देवनार शाखेचे सदस्य देणग्या मागून गोळा करतात. बाकी सगळी स्वयंसेवा . गोरगरीब मुलांच्या उत्थापनासाठी स्थापन झालेली कुमुद विद्यामंदिर ही शाळा स्वतः सभागृहाचा खर्च उचलते, साहित्यप्रेमापोटी आणि आपल्या शाळेत काहीतरी चांगले घडते म्हणून!