संतोष हुलावणे आणि त्‍याचा ह्युमेनॉइड रोबोट


मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या व हार्डवेअर नेटवर्क इंजिनीयर असलेल्या संतोष हुलावले या पस्तीस वर्षांच्या तरुणाने भारतातील पहिला साडेसहा फुटी ह्युमेनॉइड रोबोट बनवण्याची किमया केली आहे! ‘इंड्रो’ची उंची साडेसहा फूट असून, तो पंचावन्न किलो वजनाचा आहे. त्याची वजन उचलण्याची क्षमता दीडशे किलोपर्यंत आहे. त्याला बनवण्यासाठी वीस लाख रुपयांचा खर्च आला. ‘इंड्रो’ची निर्मिती ही वर्कशॉप वा लॅबोरेटरी येथे झालेली नाही, तर अवघ्या शंभर फुटांच्या खोलीमध्ये ह्युमेनॉइड रोबोट साकार केला गेला. स्क्रू-ड्रायव्हर, सोल्डर मशीन, हॅण्ड कटर, हातोडी, वेगवेगळ्या पकडी अन चार-पाच पाने अशा प्राथमिक साधनांच्या सहाय्याने ‘इंड्रो’ सिद्ध केला गेला! एखादा सुतार घरात वापरेल अशी सर्वसामान्य साधने ती! संतोषने एकट्याने असे असामान्य ध्येय गाठले! नऊ वर्षांच्या ध्यासातून व चौदा महिन्यांच्या मेहनतीतून ती साकारली.

‘इंड्रो’ बनवण्यासाठी संतोषला कोणाकडूनही आर्थिक मदत झालेली नाही. त्याने सर्व पैसा त्याच्या कम्प्यूटर रिपेअरिंगच्या छोटेखानी व्यवसायातून उभारला. ‘इंड्रो’ला बनवण्यासाठी अॅल्युमिनियम, लाकूड, स्टील, विनायल, प्लास्टिक, कार्डबोर्ड व कपडे यांचा वापर करण्यात आला आहे. संतोषने त्यासाठीचे इलेक्ट्रिक मोटर व गिअर वगळले, तर इतर सर्व भाग स्वत: हाताने बनवले आहेत. त्यातही गिअर त्याने मॅन्युअली मॉडिफाइड करून वापरले आहेत.

‘इंड्रो’ स्वत:ची ओळख सांगतो. ऐकतो, बोलतो, बघतो, हालचाल करतो, त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याला दहा बोटे आहेत व त्याचा सेन्सर आहे. त्याद्वारे तो कोणतेही सामान सहज उचलतो. त्याच्या बोटांची हालचाल हुबेहूब माणसाच्या बोटांसारखी होते. सध्या ‘इंड्रो’ला कंट्रोल रूममधून ऑपरेट केले जाते; पण लवकरच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो त्याचे त्याला ‘सेल्फ ऑपरेट’ करू शकेल. त्यासाठी संतोषला एका वर्कशॉपची गरज असून सरकार व उद्योजक यांपैकी कोणाच्या मदतीची त्याला अपेक्षा आहे.

गिरीश अभ्यंकर - मजेत राहणारा माणूस!


गिरीश अभ्‍यंकरज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं आणि त्याच्या हजारोंनी प्रती बनवल्या अशी भानगड नाही. ज्याची त्याची (शारीरिक!) उंची, ज्याची त्याची जागा, ज्याची त्याची सर्व सोय बघून ज्याचं त्याला सर्व करता येईल अशी रचना हवी.

तशी चूल त्यांनी तयार केलेली आहे. ती त्यांच्या मित्राच्या वर्कशॉपमध्ये घडलेली आहे. ते म्‍हणतात, तशी चूल बघून माझ्याकडे येणारी माणसं विचारतात, की ती कुठे मिळते? कोण बनवून देतं? यावर मला उत्तर द्यावं लागतं, की ती चूल बनवण्याचा कारखाना नाही. उद्या जर मला आणखी एक चूल बनवावीशी वाटली तर ती माझी मलाच बनवता येणं अपेक्षित आहे. इंधन आणि जाळ यांचं तत्व समजलं, ज्याला त्याला उभं राहून काम करायचं आहे असं ठरलं, की मग पुढची गोष्ट ज्याची त्यानं करायची आहे.

अभ्‍यंकर पुढे सांगतात, की चूल हे काही एकमेव उदाहरण नाही. माझ्याकडे उभ्यानं दळण्याचं जातंदेखील आहे, खुंट्याऐवजी त्याला ड्रायव्हिंग व्हील बसवलेलं आहे. दोन्ही हातांनी जातं फिरवायचं. घरी लहान मुलं आली की त्यांचं पहिलं लक्ष त्या जात्याकडे जातं. ते चाक फिरवून बघण्याचा त्यांना कोण आनंद होतो! त्यातून पीठ पडताना बघून तर त्यांना जादूच वाटते. स्त्रिया आणि पुरुष, दोघांनाही जात्याचं ‘डिझाईन’ आकर्षून घेतं. जो तो करत असलेल्या गोष्टींना ज्याच्या त्याच्या लेखी प्रतिष्ठा पाहिजे, चाललंय कसंबसं-रडतखडत असं नाही. हा अभ्यंकरांचा दृष्टिकोन. ‘गोल्ड रश’ नावाच्या सिनेमात चार्ली चाप्लीनचा बूट शिजवून खाण्याचा प्रसंग आठवतो? तितकी वेळ ओढवलेली असतानासुद्धा बुटाचं जेवण चार्ली ज्या पद्धतीनं जेवतो ती ही गोष्ट आहे. सर्वसाधारण माणसावर तर अशी कोणतीही आणीबाणीची वेळ आलेली नाही आणि तरीही तो कसा राहतो, काय करतो याकडे फुरसतीनं पाहायची ज्याला त्याला संधीच नाही हे ठीक नाही.

जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन


नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा प्राध्यापक आहे किंवा सरकारी नोकरी करतो वगैरे... मग जोशी विचारत, की ही झाली उपजीविका. मग तुमची जीविका काय? तो माणूस चक्रावत असे. जोशींना सुचवायचे एवढेच असायचे, की माणूस जगतो तो काही उद्देशाने. ते त्याचे स्वप्न असते, ध्येय असते, उद्दिष्ट असते किंवा आणखी काही. त्यासाठी तो चरितार्थाची साधने जमवून जीवन सुकर करत असतो. या लेखमालिकेत जीवनाची साधने उत्तम रीत्या उभी केलेल्या, परंतु त्याचबरोबर अधिक व्यापक जीवनोद्दिष्टाचा पाठपुरावा करणा-या व्यक्तींचा जीवनक्रम आणि त्यांचे विचार सादर करण्यात येतात.

जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन 

वसुधा कामत - आधुनिक तंत्रज्ञानाचा पाठपुरावा


वसुधा कामत वसुधा कामत यांना भेटावे आणि त्यांच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचा एकच पैलू ध्यानी यावा असा अनुभव बर्‍याच जणांचा आहे. तो पैलू आहे त्यांच्या शिक्षणविषयक ध्यासाचा, विशेषत: शैक्षणिक तंत्रज्ञानावरील भरवशाचा. त्यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तर त्यांना देशातील शिक्षण तंत्रज्ञानाच्या बहुअंगांनी विकसित व्हावे असे वाटते व तेच सूत्र त्या आग्रहाने मांडतात.

निर्मिती आणि उपक्रमशीलता यांना प्रोत्साहन, अन्य विद्यापीठांशी- तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर परस्परसंबध स्थापून, ते वाढवून टिकवणे, संशोधनास चालना देणे आणि उद्योगविश्व व विद्यापीठ यांचा समन्वय साधणे ही चार सूत्रे वसुधा कामत यांनी आपली व्हिजन म्हणून मांडली आहेत. त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून मे 2011 मध्ये पदभार स्वीकारला.

वसुधा कामत यांचा जन्म मुंबई मध्ये झाला. त्यांचे मूळ घर सिंधुदुर्ग  जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यात आहे. त्यांचे वडील सरकारी वैद्यकीय अधिकारी होते. वडिलांच्या सतत होणार्‍या बदल्यांमुळे आणि ते ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे, वसुधा कामत यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात (तेव्हाचा कुलाबा) निरनिराळ्या गावांतल्या शाळांमध्ये झाले. शालेय जीवनात भेटलेल्या प्रामाणिक, निरलस वृत्तीच्या शिक्षकांचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला असे त्या म्हणतात. त्यांचे वडील एकही दिवस सुटी न घेता काम करत असत. ते फक्त रुग्णसेवा न करता, गोरगरिबांच्या गरजाही (अन्न, वस्त्र वगैरे) पुरवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांचे हे कृतिप्रवण संस्कार वसुधा कामत यांच्या मनात खोलवर रुजले. शिक्षकांनीही आपल्या चांगल्या वर्तनाने, आचाराने-विचाराने विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावेत, त्यांना चांगली जीवनमूल्ये जोपासायला शिकवावीत असे कामत यांना वाटते.