वृक्षमित्र शेखर गायकवाड


शेखर गायकवाड यांनी सामुहिक वृक्षारोपणाची संकल्पना नाशिकमध्ये रूजवली. तो अवलिया माणूस व्यवसायाने साधा वेल्डर आहे. शेखर वेल्डिंग केलेल्या साहित्याची हातगाडीवर डिलिव्हरी करत असत. त्याच वेळी, ते झाडे लावत आणि झाडांना पाणीदेखील घालत. त्यांनी एकट्याने शहराच्या छोट्याशा कोपऱ्यात झाडे लावण्याचे काम 1994 पासून चालू केले होते. गायकवाड यांनी झाडे लावण्यासोबत जखमी पक्ष्यांना वाचवणे आणि पक्ष्यांसाठी घरटी वाटणे ही कामे गायकवाड यांनी केली आहेत. त्यांनी पक्ष्यांसाठी तेरा हजार घरटी वाटली आहेत. ती घरटी प्लायवुडपासून बनवली जातात. त्याशिवाय, शहरात कोठे जखमी पक्षी आढळला, की त्याची सुटका करून त्यावर उपचार करण्यातदेखील गायकवाड आघाडीवर असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे एक हजार पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे. उपचारासाठी येणाऱ्या पक्ष्यांमध्ये पतंगांच्या मांज्यामध्ये अडकून जखमी होणाऱ्या पक्ष्यांची संख्या जास्त असते असे त्यांचे निरीक्षण आहे.

शेखर गायकवाड स्वतःच्या कामाबद्दल म्हणतात, “सुसाट शहरीकरणामुळे माझा निसर्ग, माझी झाडे, माझे पक्षी-लता-वेली ओरबाडून काढली जात आहेत. निसर्गाची लूट करता करता माणूस त्याच्याच शेवटच्या घटकेकडे निघाल्याचे मला सतत जाणवते. म्हणून मी म्हणतो, की आता नागरिकांनी निसर्गाकडून घेणं थांबवावं आणि देणं सुरू करावं. म्हणून मी हे काम सुरू केलंय!”

गायकवाड यांचे पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल चिंतन सुरू असते. ते म्हंणतात, “पैसा हा जीवनाचे ध्येय कधीच नसावे. आनंदी जीवन हेच मानवी ध्येय आहे आणि तो आनंद केवळ निसर्गात आहे. त्यामुळेच, मी सामान्य रिक्षाचालकापासून ते उद्योजकालादेखील पर्यावरणाचं महत्व कळावं म्हणून नाशकात दहा हजार नागरिकांकडून दहा हजार झाडं लावण्याची संकल्पना मांडली आणि ती यशस्वीदेखील झाली!”

स्मृती जपणारे सोलापूरचे उद्यान!


प्रसन्न वातावरण... चारही बाजूंनी हिरवळ... तीनशेवीसहून अधिक प्रजातींच्या वनस्पती... सत्तराहून अधिक प्रकारचे पक्षी... सचित्र माहिती देण्यासाठी निसर्ग परिचय केंद्र... पक्षी निरीक्षणासाठी लपणगृह आणि टॉवर... अभ्यासासाठी तारांगण आणि दिशादर्शक यंत्रही... हे सगळे एकाच ठिकाणी... असा परिसर सोलापुरात आहे. ते स्मृती उद्यान. कुटुंबीय आणि मित्र यांच्यासमवेत छानशी सहल करण्यासाठी जैवविविधतेने नटलेले स्मृती उद्यान! तेथे बाराशेहून अधिक वृक्षप्रेमींनी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय यांची स्मृती जपण्यासाठी झाडे लावली आहेत.

सोलापुरात अशा प्रकारचा वेगळा उपक्रम शासनाच्या मदतीने 1996 साली सुरू झाला. विजापूर रस्त्यावर असलेल्या संभाजी तलावाच्या शेजारी वन जमिनीवर स्मृती उद्यानाची स्थापना करण्यात आली. पर्यावरणप्रेमी बी. एस. कुलकर्णी, वासुदेव रायते, निनाद शहा, भरत छेडा यांच्या पाठपुराव्यातून स्मृती उद्यान फुलले. स्मृती उद्यानाच्या विकासासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. शासनानेच तशा प्रकारचा वेगळा उपक्रम हाती घेतल्याने सर्व स्तरांतून सहकार्य मिळत गेले. वन जमिनीवर हिरवळ दिसू लागली. एक ना अनेक प्रकारची झाडी तेथे लावण्यात आली. लोक कोणाची कोणाची स्मृती जपण्यासाठी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करू लागले. अनेकांनी त्यांची ओळख म्हणून स्मृती जपण्यासाठी लावण्यात येणाऱ्या झाडाजवळ त्यांच्या नावाचे फलकही लावले आहेत. सोलापूरकरांमध्ये देणगी शुल्क भरून त्या ठिकाणी झाड लावून कोणाची स्मृती जपू शकतो ही भावना रुजवण्याचे काम पर्यावरणप्रेमी आणि माध्यमे यांनी केले. सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी झाडांची देखभाल करतात. झाडे मोठी झाली असून, झाडांच्या रूपाने जपलेल्या स्मृती पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात.

देवरायांनी झपाटलेला संशोधक – उमेश मुंडल्ये


देवरायांचे अभ्यासक उमेश मुंडल्येवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये विज्ञान विभागात एम.एससी. करणा-या एका विद्यार्थ्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेतला होता. त्‍या स्पर्धेत त्याच्या वाट्याला अभ्यास व सादरीकरण यासाठी ‘देवराई’ हा विषय आला होता. कोकणात गाव असलेल्या त्या तरूणाला देवराई (कोकणातील लोकांसाठी रहाटी किंवा देवरहाटी) हा विषय अनोळखी नव्हता. पण स्पर्धेच्या निमित्ताने त्याचे त्‍या विषयाकडे नव्याने लक्ष वेधले गेले. विषयाची तयारी करताना त्याला अंदाजही नव्हता, की हा देवराईचा विषय पुढे त्याच्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि व्यवसायाचाही महत्त्वाचा भाग होणार आहे. त्‍याच विषयावर केलेल्या संशोधनाबद्दल त्याला डॉक्टरेट मिळणार आहे. त्या तरुणाचे नाव होते उमेश मुंडल्‍ये. त्यांनी ‘भारतीय परंपरागत ज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रातील देवरायांचे संवर्धन’ या विषयावर पी.एचडी. केली आहे.