दादा बोडके - पपई बागेचा प्रणेता!


दादा बोडके

दादा बोडके हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील असामान्य शेतकरी आहेत. दादांनी उपेक्षित ‘पपई’ या फळपिकाला राजमान्यता मिळवून दिली! पपई अन् दादा यांचे संघटन लोकांच्या मनी घट्ट आहे. दादा एकदा कुटुंबाला घेऊन बार्शी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या धामणगावला बैलगाडीतून चालले होते. त्यांना एका शेतात पिकलेल्या पपईचे झाड दिसले. ते पपईच्या मोहात पडले. त्यांनी पळत जाऊन पपई तोडून आणली. त्याच क्षणी पपईचा आणि त्यांचा सबंध जुळला!

दादांनी गावरान पपई १९८३-८४ मध्ये लावली. त्यावेळी पपईची करंडी तीस-चाळीस रुपयांना विकली जायची. ती वॉशिंग्टन व कोईमतूर जातीची होती. त्यांची टिकवणक्षमता कमी होती. त्याचवेळी वळसंग (तालुका - दक्षिण सोलापूर) येथील एका शेतकऱ्याने तैवान डिस्को जातीची पपई लावली. ती बारकी असल्याने तिला डिस्को म्हटले जाई. दादांनी त्याचेही बी आणले. नंतर त्यांना कळले, की ते बी तैवान देशातून येते! विशेष म्हणजे त्या बिया भारतात आणण्यास बंदी होती. दादांकडे त्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांना तैवान पपईची लागवड करता आली नाही. त्यावेळी ते खरबुजावर काम करत होते. त्‍या फळाच्‍या उत्‍पन्‍नात बोडके यांना यश मिळाले. मुंबईच्या वाशी मार्केटला दादा बोडके यांचे खरबुज प्रसिद्ध होते. बोडके यांची खरबुजे आजही तेथे येतात.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील निकुंबे गावचे गुलाबसिंग झिंगागिराशे यांना मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये दादा बोडके यांचे नाव कळले व ते दादांचा शोध घेत अनगर (तालुका मोहोळ) येथे पोचले. त्यांच्याकडे शंभर एकर शेती होती. मात्र त्यांनी त्यांना अठरा लाख रुपये कर्ज झाल्यामुळे त्यांतील चाळीस एकर जमीन विक्रीसाठी काढली होती. दादांनी त्यांना इंडो अमेरिकन कंपनीचे सोना जातीचे खरबूज पाच एकरांमध्ये लावण्याचा सल्ला दिला. तेवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष लागवडीवेळी, दादा त्यांच्या गावी गेले. दादांच्या लक्षात आले, की तेथील हवामानाला खरबूज चांगले येणार नाही. त्यामुळे दादांनी त्यांना तैवान पपई लावण्याचा सल्ला दिला आणि बियाणे मिळत असलेल्या मुंबईतील कंपनीचा पत्ता दिला. ते बी सोळाशे रुपये तोळा होते! एका पाकिटात दहा ग्रॅम बी असायचे.

मेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खके


पोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग

 

मनोहर खकेमेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.

विदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक समस्या असल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

मेळघाट
 
विदर्भात सातपुड्याच्या पर्वतरांगांतील विविध घाटांचा मेळ! धारणी, हातरू, बैरागड, हिराबंबई, रुई पठार इत्यादी भाग मेळघाटात येतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेले चिखलदरा हे देखील मेळघाटातच आहे. घनदाट जंगलांनी वेढलेला तो परिसर व्याघ्रप्रकल्पांतर्गत अभयारण्य म्हणून घोषित झालेला आहे. ‘कोरकू’ ही तेथील वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जमात व भाषासुद्धा. त्याशिवाय, गोंड, कोलाम यांसारख्या जमातीदेखील त्या भागात आहेत. सिपना व खंडू नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी लोक मुख्यत: शेती व जंगल संपत्तीवर गुजराण करतात. ते लोक त्यांची प्राचीन संस्कृती जपून आहेत.

अत्यंत विषम व तीव्र हवामान हे मेळघाटचे आणखी एक वैशिष्ट्य. थंडीत पाच अंश तर उन्हाळ्यात पंचेचाळीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान आणि पावसाळ्यात धुवांधार पर्जन्यवृष्टी व पूर असे टोकाचे निसर्गाविष्कार मेळघाटवासीयांना नित्याचे. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या जोडीला दळणवळण व संपर्क साधनांचा अभाव, शैक्षणिक व आरोग्य सुविधांची कमतरता, दूर दूर अंतरावरील आदिवासी गाव/पाडे, अंधश्रद्धा व शासकीय पातळीवरील अनास्था यांमुळे मेळघाट वर्षानुवर्षे कुपोषणाच्या समस्येने ग्रस्त आहे.

माझा हळद कोपरा

अज्ञात 26/04/2014

विद्या घाणेकरमी लग्न होऊन, कासेगाव या घाटावरच्या गावातून कोकणात कणकवलीला आले. चार गुंठे जमिनीतील घर आणि बाजूची मोकळी जागा. सासुबाई (शकुंतला घाणेकर) त्यांच्या माहेरच्या (पाभरे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) गोष्टी सांगत. मलाही आमच्या छोट्याशा बागेत काही लावावे, ते वाढताना पाहण्यातला आनंद घ्यावा असे वाटत असे. माझ्या मिस्टरांचे निसर्गप्रेम अगदी पुस्तकी. त्यांचे साहित्यातील निसर्गवर्णने, बागांची वर्णने असले वाचून भागत असे. ते स्वत: मातीत हात घालायला तयार नसत. माझ्या मामेसासऱ्यांना (माधव सावरकर, पाभर) आपल्या भाच्याचा हा स्वभाव पूर्ण माहितीचा. ते माझा आणि आईंचा (सासुबाईंचा) उत्साह बघून मला म्हणाले, “विद्या, मी तुला हळद, कणगरे यांचे बी आणून देतो. पहिल्यांदा लावूनपण देतो. मग तू कर काय ती तुझी शेती.”

आणि खरोखरच, माधवमामा पाभऱ्याहून हळदीचे, कणगरांचे कंद घेऊन आले. आम्ही आमच्या जागेतील एक कोपरा हळद लागवडीसाठी निवडला. दहा बाय दहा फुटांचे क्षेत्र आणि आम्ही पाभऱ्यातील हळदीचे कंद त्या जागी एका मे महिन्याच्या शेवटी लावले. मामा मला म्हणाले होते, “निसर्ग त्याचे काम बरोबर करत असतो. तू काही काळजी करू नको. मी पुढच्या वर्षी तुझ्या घरची हळद बघायला येतो” मी स्वत: लावलेली हळद, कणगरे प्रत्यक्ष पीक येण्याच्या आधीच मला दिसू लागली!

बळीराजाचा जागल्या

अज्ञात 29/06/2011

 कोल्हापूर  जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोट्या खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषिमासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला, त्यालाही सहा वर्षे झाली. त्यांचे ‘शेतीप्रगती’ हे मासिक नावारूपाला आले आहे. त्यांनी शेती विषयातील अनेक तज्ज्ञांना लिहिते केले आहे. मासिक स्वरूपातील ज्ञानाचा उपयोग शेतकर्‍यांना सतत व केव्हाही व्हावा यासाठी त्यांनी त्या मजकुराची पुस्तके प्रसिध्द केली आहेत. त्यांनी कोल्हापूर शहरातील ट्रेड सेंटर इमारतीत कृषिविषयक पुस्तकांचे दालनही सुरू केले आहे. त्यांनी तिथे स्वत:ची तसेच अन्य प्रकाशनांची पुस्तकेदेखील उपलब्ध करून ठेवली आहेत. या तीन उपक्रमांद्वारे ते शेतकर्‍यांना शेतीबाबत व शेतीशी संबधित अनेक प्रश्नांबाबत सतत जागते ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रावसाहेब पुजारी  शेतीच्या अभ्यासातून त्यांच्या असे लक्षात आले, की शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते आपल्या शेतकर्‍यांनी आत्मसात केले पाहिजे. शेतकरी शेतीबाबत खर्‍या अर्थाने शिक्षित झाल्याशिवाय शेतीची व त्याची स्थिती सुधारणार नाही. नव्या तंत्राशिवाय शेती फायदेशीर होणे शक्यच नाही. त्यांनी शेतकर्‍यांमध्ये जागृती व जे शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत त्या नामवंत शेतकर्‍यांचे अनुभव सांगून त्यांना प्रोत्साहन असे दोन प्रकारचे काम सुरू केले. त्यातून त्यांच्या ‘समृध्द शेतीच्या पायवाटा’, ‘कायापालट क्षारपड जमिनीचा’ आणि ‘शेतकर्‍यांचे सोबती’ या तीन पुस्तकांचा जन्म झाला. त्यांनी जानेवारी 2005पासून शेतीला वाहिलेले ‘शेतीप्रगती’ हे मासिक सुरू केले.

संजय गुरव - कात्रणांच्‍या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास


संजय मारुती गुरव हे ‘सिक्युरिटी’ (वॉचमन) म्हणून काम करत. मात्र त्यांचा ओढा सेंद्रीय (शेती) उत्पादने याकडे होता. त्यांना १९९४ पासून वृत्तपत्रे, साप्‍ताहिके, मासिके यांमधून त्‍या विषयावरील माहिती जमा करण्यासाठी कात्रणे काढण्याचा छंद लागला. कात्रणे जमा करताना त्यांनी त्‍या माहितीच्‍या आधारे शेती करण्‍याचा ध्‍यास मनी जपला. त्‍यांच्‍या त्या छंदाबद्दल 2010 साली 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर लेख प्रसिद्ध झाला. तो लेख वाचून 2012 साली काही व्‍यक्‍ती गुरव यांच्‍या संपर्कात आल्‍या आणि एका व्‍यक्‍तीने त्‍यांना त्‍यांची अठ्ठावीस एकर जमिन कसण्‍यासाठी दिली. आज गुरव त्‍या जमिनीवर शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गुरव यांचा ध्‍यास प्रत्‍यक्षात उतरवण्‍यासाठी 'थिंक महाराष्‍ट्र' वेबपोर्टल सहाय्यभूत ठरले हे या घटनेचे विशेष!

गुरव गेल्या दोन दशकांहून अधिक काळ छंदापायी विविध प्रकारची वृत्तपत्रे, साप्‍ताहिके, मासिके, पुस्तके जमा करत आहेत. ते कोणाकडून शेतीबद्दल माहिती मिळताच किंवा त्यांच्या नजरेस शेती विषयावरील लेख अथवा पुस्तक दिसताच ते प्राप्‍त करण्यासाठी धडपड करू लागतात. ते एकोणपन्‍नास वर्षांचे आहेत. त्यांनी शालेय परीक्षा (दहावी) तांत्रिक विषयासह उत्तीर्ण केलेली आहे.