आजी-आजोबांचे पाळणाघर
‘रेनबो’ या संस्थेने वृद्धाश्रम व घर यांचा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. ती संस्था ऑक्टोबर 2015 मध्ये सुरू झाली. ती एका संघटनेच्या अंतर्गत चालवली जाते. त्या संघटनेचे नाव आहे Center for Action Research & Education (CARE). ‘रेनबो’ संस्थेत विविध वयोगटांतील आजी-आजोबा येतात. वय वर्षें बासष्टपासून ते वय वर्षें अठ्ठ्याऐंशीपर्यंतचे आजी-आजोबा सध्या तेथे येतात. त्या वयातील लोकांशी बोलणे जास्त गरजेचे असते, त्यांना सहवासही हवासा असतो. त्यांना त्या दोन्ही गोष्टी तेथे मिळतात. काही आजी-आजोबा आठवड्यातून एकदा येतात, तर काही आठवड्यातून दोनदा येतात. काहीजण रोज येतात. रेनबो म्हणजे सात रंगांनी मिळून तयार झालेले ‘इंद्रधनुष्य’. त्या इंद्रधनुष्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रांतांतील, जाती-धर्मांतील लोक एकत्र गुण्यागोविंदाने एकमेकांची सुखदुःखे वाटून दिवसभरातील वेळ आनंदाने घालवतात आणि संस्थेचे नाव सार्थ ठरवतात.
लहान मुलांचे जसे पाळणाघर असते तसेच मोठ्यांचे म्हणजे आजी-आजोबांचेही पाळणाघर काढावे ही कल्पना अनुराधा करकरे यांना सुचली आणि त्यांनी ती अंमलात आणली. त्यांना त्यांच्यासारख्याच अवलियांची त्या कामात साथ लाभली आहे. आजी-आजोबांचा वेळ मजेत जावा, त्यांना त्यांच्या वयाचे साथीदार गप्पा मारण्यासाठी मिळावेत, त्यांचे ‘बोनस’ दिवस आनंदात जावेत आणि त्यांच्या मुलांनादेखील त्यांच्या ऑफिसमध्ये निश्चिंतपणे जाता यावे या उद्देशाने संस्था उभारली गेली. संस्थेचे कार्य गेली चार वर्षें चालू आहे.