चोर बाजार - मुंबापुरीची खासियत


बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.

‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या मिळत.

‘अंग्रेजी बाजार’ फोर्टच्या मेडोज स्ट्रीटवर होता.

‘सट्टा बाजार’ मुंबादेवी तलावाच्या मागे एका मोठ्या इमारतीच्या आगाशीवर (गच्चीवर) भरत असे. मारवाडी लोक तेथे पावसावर सट्टा खेळत. पाऊस कोणत्या दिवशी व किती पडणार यावर सट्टेबाज भाव देत असत. पोलिसांनी त्या सट्ट्यावर कालांतराने बंदी घातली.

त्याशिवाय मुंबईत भाजी बाजार (भायखळा मंडई), कांदेबटाटे बाजार (डंकन रोड), फूल बाजार (भुलेश्वर), तांबाकाटा किंवा तांबट आळी (तांब्या-पितळेची भांडी), लोहार आळी-चाळ (हार्डवेअर), चिऱ्याचा बाजार (धोबी तलाव), कापड बाजार (मंगलदास व मुळजी जेठा मार्केट), पान बाजार (खेतवाडी), बांगडी बाजार, खांड बाजार, बोरा बाजार, क्वाटल बाजार (दावण किंवा दोरखंड), कुंभार तुकडा, गोणपाट बाजार, कॉटन बाजार (कॉटन ग्रीन), क्रॉफर्ड मार्केट तसेच नळ बाजार असे विविध प्रकारचे बाजार १८६५ ते १८७० या काळात बांधले गेले. नळबाजाराशेजारी भिकार बाजारही होता. लोक दारावर भिक्षा मागण्यास आलेल्या भिकाऱ्यांच्या (यामध्ये साधू-बैरागी वगैरे सर्व प्रकार येत) झोळीमध्ये मूठभर धान्य घालत. ते भिकारी गहू, तांदूळ व ज्वारी यांसाठी वेगवेगळ्या झोळ्या ठेवत. दिवसभर जमा झालेले धान्य दिवस मावळताना भिकार बाजारात नेऊन विकत. शहरातील गरीब लोक भिकाऱ्यांनी, साधू-बैराग्यांनी जमा करून आणलेले ते धान्य भिकार बाजारातून स्वस्त दरात खरेदी करत.

काळाच्या ओघात तेथील काही बाजार बंद पडले, तर काही स्थालांतरित झाले.

मुरबाडची म्हसेची जत्रा


महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार

मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या सर्वांत मोठ्या बाजारासाठी. मुरबाड-म्हसे मार्गावर म्हसे गावाच्या पुढे, पडीक जमिनीवर बैलांचा तो बाजार भरतो. जत्रा पौष पौर्णिमेला सुरू होते. ती तीन-चार दिवस चालते. जत्रेत दहा हजारांपेक्षा जास्त बैलांची खरेदीविक्री होते. जत्रेच्या निमित्तातने म्हसे गावाचे ग्रामदैवत आणि अठरापगड जातींचा देव असलेल्या म्हसोबाच्या दर्शनासाठी लोक दूर दूरून येतात. ठाणे-कल्याण-कर्जत-नाशिकपासून ते अगदी डहाणूपर्यंत असा तो दूरचा टापू सांगता येईल. गावकऱ्यांच्यात सांगण्या नुसार जत्रेत येणाऱ्या लोकांचा आकडा दहा लाखांपेक्षा जास्त असतो.

कल्याणपासून अहमदनगरमार्गावर तेहतीस किलोमीटरवर मुरबाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. मुरबाड एसटी स्टँडच्या जरा पुढे उजवीकडे फाटा फुटतो. तेथून अकरा किलोमीटरवर म्हसे गाव आहे. रस्ता पुढे पुन्हा नगर मार्गाला मिळतो. त्या मार्गावरून गोरखगड,मच्छिंद्रगड, सिद्धगडचा ट्रेक करता येतो. स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या भाई कोतवाल ह्याचे स्मारक बघता येते. म्हसेगावातून एक रस्ता जातो तो थेट कर्जतला. कर्जत साधारण बेचाळीस किलोमीटरवर आहे.

व्यक्ती् जत्रा-उत्सवांमध्ये  देवदर्शनासाठी जात असत. लोकांना बाजारातील खरेदी-विक्रीत जास्त रस असतो. जत्रा-उत्सवाचे मूळ विस्मृतीत चालले आहे!

सांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्‍या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्‍या गाई आणि म्‍हशी विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. त्याचबरोबर तेथे शेळी-मेंढी बाजारही भरतो. त्‍यास पुरक म्‍हणून शेळी आणि मेंढी यांच्‍या कातडीचा बाजार चालतो. सांगोल्‍याच्‍या बाजारात दर आठवड्याला लाखो-कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.

सांगोल्‍याचा गुरांचा बाजार दर रविवारी भरतो. तो बाजार पिढ्यानपिढ्या सुरू असल्‍याचे लोकांकडून सांगितले जाते. सांगोल्‍यातील 'कृषी उत्‍पन्‍न समिती'च्‍या मोठ्या मैदानातवर हा बाजार भरतो. त्‍याकरता राज्याच्या अनेक भागांतून आणि राज्‍याबाहेरूनही त्या बाजारात खरेदीदार, विक्रीदार आणि दलाल येतात. तो बाजार शनिवारी दुपारपासूनच गजबजण्‍यास सुरूवात होते. विविध ठिकाणचे गुरांचे मालक स्‍वतः किंवा एखाद्या विश्‍वासू माणसाकरवी गुरे बाजाराच्‍या मैदानावर आणून ठेवतात. त्‍यांचा दुस-या दिवशी, अर्थात रविवारी दुपारपर्यंत तेथे तळ असतो. रात्रीपर्यंत ते मैदान जनावरांनी फुलून जाते. सांगोला परिसरात धनगरांचे प्रमाण मोठे आहे. ते शेतीला पूरक म्हंणून शेळी आणि मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्या अनुषंगाने त्‍या बाजारात शेळ्या आणि मेंढ्या विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. शेळ्या आणि मेंढ्या सांगोला परिसरातूनच आणल्‍या जात असल्‍याने त्‍या रविवारी पहाटे मैदानावर दाखल होतात. मैदानावर जमलेल्‍या बैलांचा, गाईंचा, म्‍हशींचा, शेळ्या-मेंढ्यांचा आणि त्‍यांच्‍या कातडीचा असे वेगवेगळे बाजार एकाच ठिकाणी भरतात. ज्‍यांना ग्राहक मिळते ते काही जनावरांची विक्री शनिवारीच करतात. मात्र विक्रीचा खरा दिवस हा रविवारचा!

पुण्याची मंडई!

अज्ञात 16/12/2012

पुण्याच्या मंडईचे १९७२ सालचे चित्र ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. 5 ऑक्‍टोबर 2011 रोजी मंडई सव्वाशे वर्षांची झाली! मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे.

मंडई नव्हती तेव्हा तिच्या जागी खाजगीवाले यांची चारएक एकर जागा मोकळी पडून होती. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने 1882 साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर , आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी ‘भव्य’ कामे त्याआधी केलेली होती. कानिटकर कॉंण्ट्रॅक्ट मिळताच कामाला लागले. ते त्यांनी अडीच-तीन वर्षांत पूर्ण केले. उंच टॉवर असणारी अष्टकोनी मंडई उभारण्यास तीन लाख रुपये खर्च झाला.

 मंडईचे काम पूर्ण होताच तिचे उदघाटन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 1886 रोजी थाटामाटात झाले. तेव्हा साहजिकच मंडईला ‘रे मार्केट’ असे नाव देण्यात आले. पण पुढे काळ बदलला, तशी 1940 साली आचार्य अत्रे यांनी ठराव मांडून लॉर्ड रे यांच्या ऐवजी ‘महात्मा फुले मंडई’ असे उचित नाव ठेवायला लावले. आचार्य अत्रे त्यावेळी नगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मंडईच्या वरच्या बाजूला ‘लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम’ होते. नगरपालिकेची कार्यालयेही तिथेच होती. तत्पूर्वी नगरपालिका रास्ता पेठेत एका जुन्या वाड्यात दोन खोल्यामध्‍ये होती!

सांगलीची हळद बाजारपेठ


सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे.सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा हळद वायदेबाजार, बँकांकडून हळदीचे पॉलिश अन् पावडर यांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य, त्‍या परिसरात उभारलेल्या हळद पावडर आणि पॉलिश मिल्स-वेअरहाऊस-गोडाऊन्स, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था इत्यादी घटक सांगली हे देशभरातले हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले. व्यापा-यांनी व्यवहारात ठेवलेली सचोटी आणि सत्वर पेमेंटची व्यवस्थाही हळद व्यापार-वृध्दीस लाभदायक ठरली.
 

हळद ही मुळात बहूपयोगी आहे. हळद हा मसाल्याच्या पदार्थांतील प्रमुख घटक म्हणून मानला जातो. देशातील सर्व राज्यांत हळदीचे पीक घेतले जाते. हळदीचे पीक महाराष्ट्रातील सांगली, कराड, वाई, तुळजापूर, बार्शी, नांदेड ; आंध्र प्रदेशात कडाप्पा, दुग्गीराळा, निझामाबाद, मेट्टापल्ली, राजमहेंद्री, कोडू, राजमपेठ आणि नंद्याळ; तामिळनाडूत इरोडे, सालेम आणि कन्नूर; बिहारात बेटीया, दलसिंगराणी; ओरिसात ब्रह्मपूर या प्रदेशात सर्वाधिक घेतले जाते.
 

हळद व्यापा-यांच्या गोदामांसमोर हळद निवडत असलेल्या महिला कामगार भारतात हळदीचे उत्पादन व्यापारी अंदाजानुसार १९४० साली आठ लाख पोती, १९५० ते ६० या दशकात प्रतिवर्षी दहा ते बारा लाख पोती, १९६० ते ७० या दशकात प्रतिवर्षी चौदा ते सोळा लाख पोती, १९७० ते ८० या दशकात प्रतिवर्षी वीस लाख पोती, १९८० ते ९० या दशकात तीस ते बत्तीस लाख पोती आणि २००१ ते २००८ या काळात प्रतिवर्षी चाळीस लाख पोती झाले. हळदीचे उत्पादन २००९ साली साठ लाख पोती झाले होते. त्यांतील आठ ते दहा लाख पोत्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सांगली बाजारपेठेतून झाल्याचा अंदाज आहे.
 

मंडई विद्यापीठ!

अज्ञात 04/10/2011

कोणत्याही वास्तूकडे आणि वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वपूर्ण असते. महात्मा फुले मंडईच्या बाबतीतही हेच लागू पडते. मंडई परिसराची सध्याची अवस्था पाहिली तर अतिक्रमणांचा चक्रव्यूह, वाहतुकीचा धुरळा आणि स्थानिक रहिवाशांना साता जन्मीचे पाप असेच वाटण्याची शक्यता आहे! वरकरणी, हे सत्य आहे असे वाटले तरी आम्ही आयुष्याची पन्नास वर्षे, त्याच मंडईच्या परिसरात, अंगण समजून वावरलो आहोत, वाढलो आहेत. वर्तमान अनुभवताना आमच्या मनात इतिहासाच्या अनेक सुखद स्मृती आहेत. माझ्या पिढीने अनुभवलेला काळ, त्यापूर्वीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भविष्यकाळ यांचा फुले मंडईच्या बाबतीत विचार केला तर वास्तूचा दिमाख तोच आहे, काळ सव्वाशे वर्षे पुढे सरकला आहे, तरीही व्यापाराचे हे केंद्र, आपला ‘मंडई विद्यापीठ’ हा लौकिक राखून आहे.
 

सहजपणे, मी माझ्या मुलाला ‘गुगल ’वर फुले मंडई सर्च करण्यास सांगितले. त्याने काही सेकंदांत ‘बर्डस आय व्ह्यु’ ने आठ पाकळ्यांच्या मंडईचे दर्शन घडवले. एरवी, रस्त्यावरून दिसणारी मंडई आणि वरून दिसणारे त्या वास्तूचे रूप किती वेगवेगळे वाटले! आजुबाजूच्या इमारती तर अगदी छोट्या, चौकोनी ठिपक्यांसारख्या दिसत होत्या. मी तो सर्व परिसर पूर्वी कसा दिसत असेल, त्यामधे भविष्यात आणखी काय बदल होतील याचाच विचार करू लागलो.
 

मानवी संस्कृतीचा विकास हा नद्यांच्या आश्रयाने झाला. पुण्यनगरीसुध्दा मुळा-मुठेकाठी बहरली. गावाचा, शहराचा परीघ जसा विस्तारत गेला तशी पूर्वी, कसब्यात असलेली छोटी मंडई, शनिवारवाड्याच्या पटांगणात, नंतर फुले मंडई आणि काही वर्षांपूर्वी मार्केट यार्ड येथे स्थलांतरित होत गेली. फुले मंडई ही पूर्वी रे मार्केट नावाने परिचित होती. त्या वास्तूच्या आधी, तो परिसर शेत-जमिनीचा आणि काळे वावर म्हणून परिचित होता. त्या वावरामधे चार मोठ्या विहिरी होत्या. सध्या महिलांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेजवळ स्मशानभूमी असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. आंबील ओढा त्याच परिसरातून पुढे जाऊन नदीला जोडला गेला होता. तांबडी जोगेश्वरी ही गावाच्या वेशीबाहेरची देवता होती.