लाखेचा चुडा


लाख मोलाचा लाखेचा चुडा
मोत्यांची नथणी, भरजरी पैठणी
लाखेचा चुडा, कुंकवाचा करंडा
चांदीची पैंजण, सोन्याचं डोरलं
केसाचा अंबाडा, मोगऱ्याचा गजरा

भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज-शृंगाराला असे महत्त्व आहे. पण त्यापेक्षाही सौभाग्यवती स्त्रीच्या लेखी लेण्यांना महत्त्व जास्त आहे. म्हणजे कपाळाचे कुंकू, मंगळसूत्र व लाखेचा चुडा!

यम धर्माचा दूत कुणीही खुशाल राहो खडा,
धन्य हा सावित्रीचा चुडा!
भरदरबारी पांचालीचे, सत्त्व लुटावे चारित्र्याचे,
सखा श्रीहरी आभरणांचा अखंड घाली सडा,
धन्य हा सावित्रीचा चुडा!!

भारतीय स्त्रियांमध्ये मकर संक्रातीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी लाखेचे चुडे घालण्याची प्रथा होती. वेगवेगळ्या प्रदेशांत चुड्याचा रंग बदलतो. महाराष्ट्रात हिरवा चुडा, लाखेचा लाल चुडा, उत्तरेत पांढरा-लाल चुडा, तर बंगालमध्ये हस्तिदंताच्या बांगड्या असतात. महाराष्ट्रात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, लाखेचा चुडा घालणे शुभ मानले जाते.

सौभाग्यवती स्त्रिया पंढरपुरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावर लाखेचा चुडा घालतात. त्यामुळे पंढरपुरात संतपेठेत तो मोठा व्यवसाय काही कुटुंबाचा झाला आहे.

रुखमादेवी म्हणे देई चूडेदान!
संरक्षी रे प्राण भरताराचा!

तुगा तुमचे माझ्यावर किती उपकार झाले म्हणून तुम्ही मला चूडेदान दिले!

महाराष्‍ट्राचे महावस्‍त्र - पैठणी


महाराष्ट्राची शान ‘पैठणी’
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करून
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

 

कवयित्री शांता शेळके यांनी पैठणीचे स्त्रीजनात असलेले हळवे स्थान मोजक्या शब्दांत किती सुंदरपणे गुंफले आहे! पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील भरजरी पारंपरिक वस्त्रप्रकार. गर्भरेशमी, संपूर्ण जरीचा पदर आणि रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ... पैठणीची ही प्राथमिक ओळख, तर संपूर्ण काठावर दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी दिसणे हे तिचे खास वै‌शिष्ट्य.

कपाट ढीगभर साड्यांनी भरलेले का असेना, विशेष प्रसंगी ठेवणीतील पैठणीच हवी, असा तमाम महिलावर्गाचा हट्ट असतो. त्यात ‘गृहमंत्री’ ठरवण्यासाठीच्या टीव्हीवरील ‘शो’ने पैठणी जिंकण्याच्या स्पर्धेला जन्म देऊन पैठणीप्रेमात भर घातली आहे. 

नऊवारी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हे तिचे महावस्त्र! मराठा काळात पैठणची पैठणी महिलांमध्ये लोकप्रिय होती. पैठणीची रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर व पदरावर केले जाणारे जरीकाम तिला मौलिक ठेव्याचे वजन प्राप्त करून देत. मराठे स

 
रदारांपासून ब्राह्मण-वाण्यापर्यंत सर्व घरांतील महिलावर्ग सणा-समारंभांना पैठणी नेसत. पेशव्यांना पैठणच्या या कलेचे आकर्षण होते. त्यामुळे पेशव्यांच्या बायकांसाठी पैठणहून पैठण्या मागवल्या जात. पेशवे स्वतःसाठीसुद्धा पैठणीसारखी वरून पारंपरिक नक्षी असलेले दुपट्टे, उपरणी अशी वस्त्रे मागवत. थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना त्यांच्या धोतरावर ज्या पद्धतीची नक्षी हवी ती काढून पैठणला पाठवल्याचा उल्लेख १७६६ मध्ये सापडतो.

प्रतीकदर्शन - कमळ


कमळज्याची नाळ जलात असून खूप खोलवर पसरलेली आहे, ज्याचा सुवास कित्येक कोस पसरला आहे, ज्याचा देठ टणक असून मुख अतिशय कोमल आहे, जो मित्ररूपी आश्रय देतो, ज्याच्याकडे गुणसंग्रह आहे आणि जो दोषांचा धिक्कार करतो अशा रक्तवर्णी, सुंदर कोमल, पाण्यात जन्मलेल्या कमलपुष्पात श्रीलक्ष्मीचा वास असतो – अशा आशयाचा संस्कृत श्लोक आहे.

नालस्य प्रसरो जलेष्वपि कृतावासस्य कोशेरुचिर्दण्डे

कर्कशता मुखे ऽ तिमृदुता मित्रे महान्प्रश्रय:!

आमूलं गुणसंग्रह व्यसनिता द्वेषश्च दोषाकरे

यस्यैषा स्थितीरम्बयुजस्य वसतियुक्तैवत्तत्र श्रिय:

भारतीय संस्कृतीतील विभिन्न प्रतीकांमध्ये कमळाला अग्रस्थान आहे आणि म्हणूनच कमळाला भारताचे ‘राष्ट्रीय फूल’ अशी मान्यता मिळाली आहे. कमळाला पद्म, नलिन, सारस, पुष्कर, तामरस, अरविंद, शतपत्र, राजीव अशी अनेक नावे आहेत.

ऋग्वेदात कमळाच्या पुंडरीक (श्वेतकमळ) आणि पुष्कर (नीलकमळ) अशा दोन जातींचा उल्लेख आढळतो. त्याशिवाय ज्या कमळाचा वर्ण तांबडा आहे त्याला ‘कोकनदं’ असे नाव आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात कमलमालेचा उल्लेख आहे तर पंचविंश ब्राह्मणात कमळाची उत्पत्ती नक्षत्रांच्या सामुहिक तेजातून झाली आणि कमळ हे सर्व देवतांचे आवडते पुष्प असल्याचे म्हटले आहे. भगवान श्रीकृष्णानी कमळाला जीवनाचा आदर्श मानून भगवद्गीतेत कमळाविषयी म्हटले आहे -

जो आसक्तीरहित ब्रह्मार्पण वृत्तीने कर्मे करतो तो चिखल आणि पाणी यांत असूनही त्यांपासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे पापकर्मांपासून अलिप्त राहतो.

‘ब्रह्मण्याध्याय कर्मणि सज्जं त्यक्त्वा करोतिय: !

लिप्यते न स पापे! पद्मपत्रमिवाम्भसा !!’

सावरकर अभिवादन यात्रा


स्‍वातंत्र्यवीर सावरकरतो २०१० सालचा फेब्रुवारी महिना होता. शंकर अभ्यंकर यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यानमाला ठाण्यात सुरू होती. व्याख्यानात त्यांनी सांगितले, की सावरकरांच्या प्रसिद्ध उडीला शंभर वर्षे झाली, म्हणून आदित्य प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र यांच्यातर्फे ६ जुलै २०१० रोजी मार्सेलिस येथे जाऊन, त्यांना आदरांजली वाहण्याची योजना तयार केली आहे. ‘सावरकर अभिवादन यात्रा’ असे त्या योजनेचे नाव आणि नियोजनाची जबाबदारी राजा-राणी ट्रॅव्हल्स यांनी घेतली आहे. सावरकरांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आदर! त्यामुळे त्या अभिवादन यात्रेला जायचे मनात होतेच. शिवाय, इतिहास हा माझ्या आवडीचा विषय. त्यातही आधुनिक युरोपचा इतिहास हा विशेष आवडीचा. आधुनिक युरोपच्या इतिहासाची सुरुवातच ज्या देशातील राज्यक्रांतीने झाली तो देश पाहायला मिळणार हाही आकर्षणाचा भाग होता. माझ्या चौदा वर्षांच्या मुलीला तिच्या देशाच्या इतिहासासंबंधीचे बाहेरदेशी जाऊन काहीतरी ‘सेलिब्रेट’ करायचे, हा ‘मेगा इव्हेंट’ वाटला! त्यामुळे तिलाही योजनेत सामील करून घेण्याचे ठरवले.

आम्ही पॅरिसकडे ५ जुलैच्या पहाटे प्रस्थान केले. साधारण चार वाजता पॅरिसच्या ‘चार्ल्स-द-गॉल’ विमानतळावर उतरलो. तेथूनच थेट आयफेल टॉवरवर गेलो. मुंबईच्या वाहतुकीवर मात करेल अशा गर्दीच्या वाहतुकीतून, अरुंद रस्त्यांवरून आमचा बसचालक, अजिबात हॉर्न न वाजवता बस चालवत होता. फ्रेंचांची शिल्पकला चौकाचौकात, मोठमोठ्या इमारतींवर बहरलेली दिसली. म्युझियम, आर्ट गॅलरी अशा इमारती तर पुतळे आणि मूर्ती यांनी नटलेल्याच!

मागोवा हेंद्रे आडनावाचा


डॉ. रतिकांत हेंद्रेमीना प्रभू यांच्या ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील ‘पप्पा गेले’ या लेखात ‘घरातील एक मूल्यवान दागिना सापडत नव्हता. माझ्याच हेंद्रेपणाने तो खालवर गेला होता’ असे वाक्य आहे. माझे आडनाव ‘हेंद्रे’ आहे. ‘हेंद्रे’ या शब्दामुळे माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यापूर्वी हेंद्रे हा शब्द कुठल्याही लिखाणात वाचण्यात आला नव्हता.

मी साठ वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होतो. त्या वेळीचे उपप्राचार्य प्रा. श्री. रा. पारसनीस मला म्हणाले, की हेंद्रे आडनाव अपरिचित आहे. या आडनावाचा अर्थ माहीत आहे का? आणि हा शब्द कुठून आला असावा? मला ते काहीच माहीत नसल्यामुळे मी गप्प बसलो.

ज्ञानेश्वरीचे वाचन करताना अध्याय ९, ओवी क्रमांक ३८० मध्ये एक संदर्भ सापडला.

तैसे लक्ष्मियेचे थोरपण न सरे |
जेथ शंभूचेही तप न पुरे|
तेथ येर प्राकृत हेंदरे |
केवि जाणो लाहे ||

‘सार्थ ज्ञानेश्वरी’ ग्रंथात मामासाहेब दांडेकरांनी हेंदरे या शब्दाचा अर्थ अजागळ असा दिला आहे. लिखित स्वरूपातील हेंदरे या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे. त्याचा अर्थ हेंदरे हा शब्द ज्ञानेश्वरांच्या अगोदरच्या काळापासून प्रचलित असावा. काळाच्या ओघात हेंदरे या शब्दाचे हेंद्रे असे रूपांतर झाले असे म्हणता येईल.

भटक्या जमातीतील कुडमुडे जोशी (ज्योतिषी) या ज्ञातीमध्ये हेंद्रे आडनाव अल्प प्रमाणात आढळून येते. नामदेव शिंपी ज्ञातीमध्ये मात्र हेंद्रे आडनाव मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. सासवडपासून फलटणपर्यंतच्या परिसरात अनेक हेंद्रे कुटुंबांचे वास्तव्य आहे. इंग्लंडमधील खानेसुमारीनुसार त्या देशात नऊ कुटुंबांचे आडनाव हेंद्रे आहे.

अंगणी माझ्या मनाच्‍या...

अज्ञात 12/04/2014

''किती छान अंगणासारखी मोकळी जागा आहे हो तुमच्या इथं. बच्चे कंपनीही मस्त मातीत खेळण्यात रमलीय. खूप दिवसांनी असं चित्र बघायला मिळतंय.'' आमच्या घरी येणा-या जवळपास प्रत्येकाची ही प्रतिक्रिया असते. अशी चित्राची चौकट रेखाटली गेल्यावर मला त्यात आठवणींचे रंग भरण्याचा मोह आवरता येईना!

भूतकाळाची दारं उघडत अर्धशतकाचा उंबरठा ओलांडल्यावर बैठ्या चाळ संस्कृतीने डोकं वर काढलं. चाळी त्यांच्या पुढ्यात अंगण घेऊन दारं सताड उघडी टाकत नांदत होत्या. अंगण हे सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. दिवसभर ते लाड-कौतुकात न्हाऊन निघायचं. तांबडं फुटण्याच्या आधीच अंगण डोळे चोळत जागं व्हायचं ते सडासंमार्जनानं. शुभ्र रांगोळीच्या रेघेनं ते सडे सजवले जायचे आणि न्हाऊमाखू घालून तीट-काजळ लावलेल्या तान्ह्या बाळाप्रमाणे अंगण गोजिरवाणं वाटू लागायचं. मृद् गंधानं लपेटलं जायचं आणि मांगल्यानं सजायचं. सूर्यदेव डोंगरांमधून वर यायचे आणि कोवळ्या सोनसळी रंगानं अंगण चमकू लागायचं. घरात काम सुचू न देणारी बालगोपाळ मंडळी आजी-आजोबांचं बोट धरून किंवा हट्टानं कडेवर बसून अंगणात पाऊल टाकायची. दिवस जसजसा वर येऊ लागायचा, तसतसं अंगण त्या शैशवाला अंगाखांद्यावर खेळवण्यात मग्न होऊन जायचं, चैतन्यानं भरून जायचं. रुसवेफुगवे, रडणं-भांडणं-चिडवाचिडवी-मारामारी अशी छोटी छोटी अस्त्रं बाहेर यायची. 'आवाज की दुनिया' तिथं रंगायची. सूर्य डोक्यावर आला की चटके बसल्यामुळे सगळी पावलं घरात वळायची.

शबनम

अज्ञात 05/12/2013

शबनम पिशवीसांगलीहून मिरजेला जाताना उजव्या आणि डाव्या बाजूंना कुष्ठरोगातून मुक्त झालेल्यांसाठी काही पुनर्वसन केंद्रे आहेत. त्या केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून शबनम बॅगा तयार केल्या जातात. त्या बॅगा सातासमुद्रापार प्रसिद्ध झाल्या आहेत. मिरजेची बॅग म्हणजे सुंदर, दणकट. रंग पक्का आणि कुणाच्याही गळ्यात शोभून दिसणारी. शे-दीडशे बॅगा त्या केंद्रांमध्ये रोज तयार व्हायच्या. प्रत्येक कर्मचा-याला पन्नास ते शंभर रुपये रोजगार मिळायचा. कर्मचा-याला तयार कच्चा माल देऊन बॅगा बनवल्या जायच्या. मीही अनेकदा त्या केंद्रांतील बॅगा घेऊन मिरवल्या होत्या. आपल्याला चांगली बॅग मिळते आणि अप्रत्यक्षपणे का होईना एका सामाजिक कार्यात सहभागी होता येते, असा दुहेरी आनंद त्यामागे असायचा.

शबनम बॅग ही मोठी आनंददायी गोष्ट होती. ती अगोदर बॅग होती. नंतर शबनम बॅग झाली. ‘शबनम' नावाचा चित्रपट आला. त्या चित्रपटावरून बॅग झाली शबनम, असा संदर्भ नरहर कुरुंदकर यांच्या ग्रंथात असल्याचे मला डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अरविंद शिरसाट म्हणाले होते. ‘शबनम' या नावाने दोन चित्रपट आले होते. पहिला ‘शबनम' १९४९ चा, दिलीपकुमार आणि कामिनी कौशल यांचा आणि दुसरा १९६४ चा,  मेहमूद व विजयालक्ष्मी यांचा. पहिल्या ‘शबनम' चित्रपटात निर्वासिताची भूमिका करणारा दिलीपकुमार अशी बॅग वापरत होता... तिथून गळ्यात लटकणारी ही  बॅग शबनम झाली. त्याच चित्रपटात श्रीमंत तरुणीची भूमिका करणारी कामिनी जॅकेटवर शबनम बॅग वापरायची.

नशा ढोल आणि ताशाची


शिवदूर्ग प्रतिष्ठानचे ढोलपथकमिरवणूक म्हटली की ‘डीजे’चे प्रस्थ... मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ‘ढिंचॅक’चे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी... गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा उच्छाद वाटू लागतो. त्यामध्ये मराठी मावळ वाद्य पुढे आणावे हा विचार घेऊन कल्याणच्या काही तरुणांनी ‘शिवदुर्ग प्रतिष्ठान’ नावाचे ढोल-पथक तयार केले आहे आणि कल्याणात; गणपती असो किंवा आणखी कुठला सण, ‘शिवदुर्ग’ला मागणी जोरदार आहे. प्रतिष्ठानचा अध्यक्ष सुशांत दीक्षित हा स्वत: वयाच्या बाराव्या वर्षापासून मावळबरोबर ढोल वाजवतो. ढोलताशाचा आवाज तरुण-तरुणींना आकर्षित करील असा असतो. सुशांत तसाच त्याकडे ओढला गेला. गणपतीत मिरवणुकीसाठी मावळ यायचे त्यांच्याबरोबर तो वाजवायला जात असे. त्यानंतर त्याने स्वत:ची व त्याच्या सहकाऱ्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांच्या पाठिंब्यावर पथक सुरू करण्याचे ठरवले. ढोल-ताशाच का? सुशांतचे उत्तर: मुळात ढोल-ताशा-ध्वज हे आपल्या संस्कृतीतच आहे. शंभर ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज हा ‘डीजे’च्या डेसिबलपर्यंत पोचतो. तेव्हा ध्वनिप्रदूषण किती प्रमाणात होते ते पाहा! आमच्या पथकाच्या  आवाजाचा नाद हा समाधान देणारा आहे. तो विशिष्ट तालात वाजवला नाहीतर एकसुरी, कर्कश्श वाटणार. त्यामुळे आमच्या पथकाचा त्रास आजारी माणसांनाही होत नाही व ध्वनिप्रदूषणही होत नाही.

स्वस्तिक - भारतीय संस्कृतीचे मंगल प्रतीक


स्वस्तिक हा शब्द सु+अस धातूपासून बनला आहे. सु=शुभ, मंगल व कल्याणप्रद आणि अस=सत्ता, अस्तित्व. म्हणून स्वस्ति= कल्याणाची सत्ता. कल्याण असो किंवा आहेच ही भावना. स्वस्तिक हे प्रसन्नतेचेही द्योतक आहे आणि म्हणूनच प्राचीन काळापासून भारतीयांनी सर्वश्रेष्ठ प्रतीक मानून त्याचा जीवनाच्या विविध अंगांत प्रयोग केला आहे.

स्वस्तिक हे भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थाचेही सूचक मानले आहे. चारही युगांत स्वस्तिक चिन्ह अक्षुण्ण राहते अशी भारतीयांची श्रद्धा आहे.

स्वस्तिकाचा प्रचार भारतातच नव्हे, तर जगभरच्या बहुतेक देशांत आढळतो. सर्वांत प्राचीन अशा पाषाणयुगापासून स्वस्तिकाचा प्रयोग दृष्टीस पडतो. विदेशांत उत्खननांतून बाहेर काढलेल्या कित्येक वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले आहे.

स्वस्तिक हे मानवाने निर्माण केलेले सर्वांत पहिले धर्मप्रतीक मानतात. पाऊस पाडणारा इंद्र, मेघांचे संचालन करणारा वायू, प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, मानवाच्या भल्याबु-या वर्तनावर आणि शुभाशुभ कर्मांवर नजर ठेवणारा वरुण अथवा तत्सम दुसरा कोणी तरी देव, ही भूतदात्री वसुंधरा, अशा अनेक देवतांचा स्वस्तिकात एकत्र समावेश झालेला आहे. ते प्रतीक देवतांची शक्ती आणि मानवाची शुभकामना या दोहोंच्या एकत्र सामर्थ्याचे आहे.

एक उभी रेषा आणि तिच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा, अशी याची मुळातली आकृती आहे. उभी रेषा ही ज्योतिर्लिंगाची प्रतिनिधी आहे. ज्योतिर्लिंग हे विश्वोत्पत्तीचे मूळ कारण होय. आडवी रेषा ही सृष्टीचा विस्तार दर्शवते.

मृदंग


मृदंगवाद्याच्या चामड्याच्या आवरणावर बोटाने, छडीने, काठीने किंवा हाताने आघात करून वाजवतात तेव्हा ते वाद्य 'आनध्द' ह्या प्रकारात मोडते. वेदकाळात आनक, आलंबर, आलिंग्य, कुंभचेलिका, घटदद्दर, डिंडिम, ढक्का, तोमर, दुर्दर, दुंदभी, नंदी, नंदीमुख वगैरे वाद्ये होती. त्यामानाने मृदंग हे बरेच आधुनिक वाद्य म्हणावे लागेल.

मृदंग हा शब्‍द संस्‍कृतमधील मृदा (माती अथवा पृथ्‍वी) आणि अंग (शरीर) या शब्‍दांपासून तयार झालेला आहे. शंकर तांडवनृत्‍य करत असताना नंदीने हे वाद्य वाजवल्‍याचा पुराणात उल्‍लेख आढळतो. पुराणाप्रमाणेच हिंदू शिल्‍पकला आणि चित्रकलेत मृदंगाचे स्‍थान आढळते.

मृदंग हे पखवाज म्हणून ओळखले जाते. त्याखेरीज त्याला माची, मादुला, मुरजा, पणवातक अशीही नावे आहेत. मृदंगाचे जड व हलका मृदंग असे दोन भाग आहेत. भजन-कीर्तनासाठी खैर व सिसम ह्यांचे जड मृदंग वापरतात; तर दिंडीसाठी जांभुळ, शिवण, बाभळ व बिबला ह्यांच्या लाकडापासून बनवलेला हलका मृदंग वापरतात.

मृदंगाचे दोन भाग चामड्याने मढवलेले असतात. त्यांना पुड्या म्हणतात. डावी बाजू म्हणजे मोठी पुडी. तिला धीम, धुमा म्हणतात. तिला कणीक लावतात. उजवी लहान बाजू शायपूड म्हणून ओळखली जाते. तिला तबल्याची शाई लावतात.

पखवाजाच्या सांगाड्यास नाल म्हणतात. ओंडका पोखरलेला मृदंगाचा भाग म्हणजे खोड किंवा डेरा. तसेच पखवाजाच्या शाईच्या पुडीबाहेरचा भाग म्हणजे चाट किंवा टाकणी होय.

सुरेश पांडुरंग वाघे
(०२२) २८७५ २६७५