बहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट


अहमदनगरच्या श्रीगोंद्यापासून वीस कोसांवर भीमा नदीच्या काठावर बहादूरगड हा किल्ला उभा आहे. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार बहादुरखान याने १६७२ साली पावसाळ्यात भीमा नदीच्या काठावर पेडगाव येथे छावणी टाकली. बहादूरखान हा औरंगजेबाचा दूधभाऊ. औरंगजेबाने त्याला सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठवले. त्याला बहादूरखान कोकलताश अशी पदवी दिली होती. पेडगाव येथे वास्‍तव्‍यास असताना बहादुरखानाने तेथे भुईकोट किल्ला बांधून त्यास बहादुरगड असे नाव दिले. तो किल्ला चाळीसाहून अधिक वर्षांपर्यंत पुणे प्रांतातील मोगल सैन्याची युध्दसामुग्री साठवण्याचे मुख्य ठिकाण होते. बहादुरगड हे त्या किल्ल्याचे प्रचलित नाव. गॅझेटीअरमध्ये त्या किल्ल्याची नोंद 'पेडगावचा भुईकोट' अशी आहे.

बहादूरगडाबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादुरखानाच्या केलेल्या फजितीची कथा प्रसिद्ध आहे. बहादूरखानाने बहादूरगडामध्‍ये एक कोटीचा शाही खजिना आणि दोनशे उत्तम प्रकारचे अरबी घोडे औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी गोळा केले असल्याची माहिती महाराजांच्या गुप्तहेरांनी आणली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यासाठी अमाप खर्चही झाला होता. तो खर्च भरुन काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी बहादूरखानाची निवड केली.

शिवाजी महाराजांनी नऊ हजारांचे सैन्य बहादूरगडावरील खजिना लुटण्यासाठी पाठवले. त्या‍ सैन्याच्या दोन तुकड्या तयार करण्‍यात आल्या. एक दोन हजाराची तर दुसरी सात हजारांची. दोन हजारांच्या तुकडीने बहादूरगडावर जोरदार हल्ला केला. या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता. तो सफल झाला. बहादूरखान लढाईसाठी तयारी करुन मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेला. मराठ्यांच्या तुकडीने माघार घेवून पळायला सुरवात केली. बहादूरखानाला चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरु केला. मराठ्यांनी बहादूरखानाला हुलकावणी देत खूप लांबवर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांच्या उरलेल्या सात हजारांच्या सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला. गडामधे तुरळक सैन्य, नोकर-चाकर आणि बाजारबुणगेच उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेवून रायगडाकडे कूच केली.

बेस्ट बुकसेलरचा वाडा


पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्टासमोर दिमाखाने उभा असलेला तीन मजली गोडबोलेवाडा हा पुस्तकविक्रीचे मुख्य भांडार म्हणून प्रसिद्ध होता. तो वाडा म्हणजे ल.ना. गोडबोले यांनी १९११ साली विकत घेतलेली लाकडी वास्तू, अधिक त्याच घराला लागून असलेली नारळाच्या बागेची १९३० साली विकत घेतलेली दोन गुंठे जागा यांचा संगम. तो गर्डरवर उभा केला गेला आहे. रानडे इंजिनीयरनी ती भव्य इमारत उभी केली. लोखंडी गर्डर्स इमारतीत वापरण्यास पहिल्या महायुद्धानंतर सुरुवात झाली. गोडबोलेवाडा उभारताना त्याचा पाया बेसॉल्ट या दगडात बांधण्यात आला. शिसे ओतून पायाचे दगड पक्के केले गेले. गर्डर्सची फ्रेम तयार करून पायामध्ये प्लेट बसवण्यात आल्या. शिशाचा वापर मजबुतीसाठी केला गेला. गर्डर्स विलायतेतून (इंग्लंड) आयात केले गेले होते. ते घर जसेच्या तसे मजबूत आहे.

गच्ची आणि खिडक्या यांची रचना लक्षणीय आहे. गच्चीचे गज लोखंडी ओतकाम केलेल्या नक्षीचे आहेत. वाड्याच्या खिडक्या आणि चौकटी, दारे, तुळया ब्रह्मदेशाच्या सागवानी लाकडाच्या आहेत. चारही दिशांना चुनागच्ची बांधलेली दिसते. त्यावरील युरोपीयन कवड्यांचे नक्षीकाम मन वेधून घेते. तीन मजल्यांवरील स्नानगृहांची व संडासांची भांडी, टाइल्स चिनीमातीची असून त्याला साधा तडादेखील गेलेला नाही. चौथ्या मजल्यावर पाण्याच्या विशाल टाक्या बिडाच्या आहेत. वाड्यात असलेल्या चारशे वर्षांपूर्वीच्या दोन आडांचे पाणी वाड्यास पुरवले जाई. पाणी उपसण्यासाठी इंग्लिश बनावटीचा हातपंप बसवला होता. तो तसाच दिसतो.

तापोळा - महाराष्ट्राचे दल लेक


तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, वास्तवात ते श्रीनगरच्या 'दल लेक'च्या तोडीस तोड, डोळ्यांचे पारणे फिटवणारे आहे. तापोळा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. जलाशयाची महासागराएवढी व्याप्ती, निळे पाणी, प्रदुषणमुक्त वातावरण आणि काहीशी दमट तरीही आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचे वर्णन करता येईल.

महाबळेश्वरच्या बाजारपेठेतून पलीकडे जाणारा रस्ता पकडायचा. दिशादर्शक बोर्ड वगैरे बघण्याच्या भानगडीत पडायचे नाही, कारण दुकाने आणि माणसे यांच्या गर्दीत तो दिसत नाही! महाबळेश्वरपासून सत्तावीस किलोमीटरवर तापोळा हे ठिकाण आहे. स्वतःची गाडी, त्यात बाईक असेल तर उत्तम, नाहीतर एस.टी. महामंडळाची सेवा आहेच, कोठल्याही वाहनाने निघायचे. गजबजलेले महाबळेश्वर मागे सोडले की दाट झाडीतून जाणाऱ्या रस्त्याने किलोमीटरचा दगड बघत पुढे जात राहायचे.

गर्द झाडीमुळे महाबळेश्वरच्या उंचीपासून खाली उतरत असतानाही थंडी वाजत असते. साधारण सात किलोमीटरनंतर झाडी संपते आणि खोल दऱ्या-डोंगर ह्यांचे दर्शन होते. तेथे चहाची टपरी आहे. थंड वातावरणात चहा पिण्यासाठी थांबायचे, ते मात्र निमित्त. कारण तेथून दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या छटा ... अबब! फक्त महाबळेश्वर नाही तर आजुबाजूचा परिसर कसा हिरवागार आहे त्याचा प्रत्यय तेथे येतो. त्याच्या पुढे मात्र खाचखळग्यांमधून कसरत करत, मध्येच स्ट्रॉबेरीची शेते बघत पुढे जात असताना कोयनेचे बॅकवॉटर -शिवसागर जलाशय दिसायला लागतो. शिवसागर जलाशयाचे सुंदर दृश्य मनात साठवत पुढे जाताना वाटेत लागणारी छोटी गावे पार करत तापोळ्यात कधी पोचतो ते कळतही नाही!

कोयना धरणाच्या बांधकामाला सुरुवात 1956 मध्ये झाली. धरणात 1962 साली पाणी भरू लागले. त्यामुळे कोयना नदीच्या काठावरील काही गावे विस्थापित झाली. त्यांतील एक तापोळा गाव. इन-मीन पाच-पन्नास घरांचे ते गाव. जलाशयाच्या खाली असलेली गावे पाण्याचा फुगवठा बघून काठावर वसवण्यात आली. जलाशयाच्या काठावर गाव म्हणून गेल्या पंधरा वर्षांत तापोळा गाव पर्यटनासाठी विकसित होण्यास सुरुवात झाली.

माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर


मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्‍या काळात त्‍याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्‍या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. त्‍या ऐतिहासिक घटनेबद्दलच्‍या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्‍यानंतर नैवेद्याच्‍या ताटावरील कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसल्याचा उल्‍लेख आहे. मांसाचा नूर पालटला म्हणून ‘मासनूर’चे नंतर अपभ्रंशाने माचणूर झाले.

सासवडचा पुरंदरे वाडा


पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या दोनपैकी मुख्य वास्तू म्हणजे पुरंदरे यांचा भुईकोट! अंबारीसह हत्ती जाईल अशा सुमारे पंचवीस फूट उंचीच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर पुण्याच्या शनिवारवाड्याचा जणू जुळा भाऊ असा पुरंदऱ्यांचा वाडा दिसतो. दोहो बाजूंस अष्टकोनी बुरुजांची वास्तुरचना पाहून क्षणभर मती गुंग होते. दहा फूट उंचीची चौकट आणि तिला घट्टारलेली गजखिळ्यांनी युक्त दारे वाड्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत जणू! दरवाज्यावरील गणेशपट्टी आणि नक्षीकाम मनास सुखावते. दोहो बाजूंस तटबंदीच्या सुमारे पंचवीस फूट उंचीच्या रुंद भिंती, त्यास जोडणारे बुरुज आणि प्रत्येक कोपऱ्यावर व मध्यभागी पंचकोनी सज्जे हे तत्कालीन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य सांगून जातात. परंतु वाड्याचे विस्तीर्ण स्वरूप पाहिल्यावर आतील चारचौकी वाड्यांचे चार मजले पेलण्याचे सामर्थ्य असलेल्या जोत्यांवरून नजर फिरवल्यावरून त्याची त्या काळी असलेली ऐतिहासिक उभारणी लक्षात येते. मात्र वाड्यात एकही वास्तू शिल्लक दिसत नाही.

तटाच्या भिंतींना लागून गणेशमंदिराचे प्रवेशद्वार आहे. तसे मंदिर वाड्याच्या आत आहे. श्रीगणेशाचे दर्शन घेण्यास पाच-सहा पायऱ्या चढून वर जावे लागते. गणेशाचे वैशिष्ट्य असे, की तो द्विभुज आहे. मंदिराला जोडून उभी असलेली तटबंदीची चिरेबंदी भिंत, त्यावरील जंग्या आणि इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यांनी पडलेली थोडीफार भगदाडे पाहून तिच्या भक्क्मपणाची मातब्बरी पटते. तो वाडा अंबाजीपंत पुरंदऱ्यांचा! वाड्याच्या मागच्या बाजूस पाठभिंतीस जोडून अप्रतिम भैरवनाथ मंदिर आहे. त्यात एक पोर्तुगीज घंटा आहे.

सांगोला तालुक्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये


सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात तीन महत्त्वाची मंदिरे आहेत :

1. अंजनाळेचे महादेव मंदिर (हरि-हर मंदिर) - जुन्या काळात माण परगण्यात शैव व वैष्णव पंथीयांचा प्रभाव होता. त्यांनी हरि-हर नावाची मंदिरे निर्माण केली. त्यांतील महादेव मंदिर वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आहे. मंदिर अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावे. तो काळ चालुक्यांचा होता. तेथे कलाकुसरीच्या मूर्ती एकूण अकरा आहेत. त्या म्हणजे द्वारपाल, महिषासूरमर्दिनी, सप्तमातृका, चामुंडा देवी, सूर्यमूर्ती, शंकरपार्वती, गणेश मंदिराचे पाच सभामंडप - नंदीमंडप, मुखमंडप, अंतराळ, सभामंडप, गर्भगृह.

2. चिणके - महादेव मंदिर (त्रिकूट मंदिर). त्रिकूट मंदिर म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे मंदिर असावे. गजगौरीचे शिल्प आहे. मंदिरातील मूर्ती - महिषासूर मर्दिनी, शिवपार्वती, कोष्टकात (कोनाडे) शिल्पे ठेवलेली आहेत. गणेशशिल्प, चंद्रशिळा, दोन गर्भगृहे, महादेवाची वैशिष्ट्यपूर्ण पिंड.

3. जवळा - नारायण देव (हरि-हर) मंदिर - कोरडा नदीच्या उत्तर किना-यायावर तीस फूट उंचीच्या खडकावर चिरेबंदी मंदिर आहे. मंदिराजवळ भव्य उंच प्रवेशद्वार (वेस) उत्तराभिमुख आहे. मंदिरातील मुख्य मूर्ती विष्णूची (हरी) दगडी प्रभावळीत चार फूट उंचीची उभी आहे. ती मूर्ती चतुर्भूज आहे. पायाशी मानवी स्वरूपाचे दोन गरूड आहेत. ग्रेनाइटमधील उत्कृष्ट नक्षीदार मूर्ती आहे. मंदिर उत्तर चालुक्यकालीन असावे. वेळापूरच्या हरनारी मूर्तीशी साम्य आहे. जवळच दुसरे हर (शिव) मंदिर आहे. मंदिराचा काळ सहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतचा असावा.

शास्त्री हॉल नावाचे शंभर वर्षांचे कुटुंब


शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या विशाल निवासी समूहाला शास्त्री हॉल हे नाव पडले तोही इतिहासच आहे. ती वाडी पेशवाईतील सरदार शास्त्री-पटवर्धन यांच्या वंशजांची. बडोदे संस्थानचे दिवाण असलेल्या सरदार पटवर्धन यांनी निर्जन पडिक जमीन असलेला तो भूभाग दीडशे वर्षांपूर्वी खरेदी केला. मुंबई बेट आकार घेत असताना त्या जागेवर ख्रिश्चन स्मशानभूमी होती. तेथे पोर्तुगीजकालीन बंगलाही होता. त्या बंगल्यात लाकडी तक्तपोशीचा हॉल होता. पटवर्धनांनी त्याचे नामकरण गंगाधरशास्त्री हॉल असे केले. त्यांनी त्यानंतरच्या शतकात मुंबईत येणा-या पांढरपेशा मध्यमवर्गीर्यांसाठी एकेक करत आठ चाळी उठवल्या. हॉलच्या भोवतीच्या चाळी म्हणून त्या वस्तीला शास्त्री हॉल असे नाव पडले. तो ऐतिहासिक बंगला १९६८ पर्यंत उभा होता. तो रस्ता रुंद करताना जमीनदोस्त झाला. तेथे उंच इमारत झाली. हॉल गेला पण वाडीला पडलेल्या नावाने अमर झाला.

शास्त्री हॉल म्हणजे गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळी आणि गोरेगावकरांच्या चाळी यांची सुधारून वाढवलेली आवृत्ती. ती वसाहत म्हणजे 'ओव्हल' आकारात उभा असणारा आठ चाळींचा समूह आहे. मधोमध पाचशे चौरस यार्डांचे मोकळे मैदान. एकेकाळी तेथे वाडीतील मुले सर्व मैदानी खेळ खेळत. आता सर्व जागा पार्किंगने व्यापून टाकली आहे. तरी गिरगावातल्यासारखे दोन इमारतींमध्ये मुळीच अंतर न ठेवता बांधकाम झालेले नाही. मैदानात व्हॉलिबॉल कोर्ट, दोन बॅडमिंटन कोर्ट व टेनिस-क्रिकेटची खेळपट्टी होती. गॅलरीत उभे राहून तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा रहिवाशांचा विरंगुळा असायचा. वाडीच्या मध्यभागी व्यायामशाळा होती. त्यातील आखाड्यातील लाल मातीत शड्डू ठोकल्याचा आवाज आणि दंडबैठका मारल्याचे हुंकार आसमंतात घुमत.

सोलापूरातील बुद्धविहार


सोलापूरातील मिलिंदनगर येथे हा बुद्धविहार आहे. बुद्धविहाराने पूर्ण तळमजला व्यापला आहे. तेथे वॉलपेपरवर मोठा वृक्ष व त्याखाली बुद्ध बसलेले आहेत. बाजूला आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे व दोन्ही बाजूंस दोन बौद्ध भिक्षूक (कार्डबोर्डवर) आहेत. दर पौर्णिमेला तेथे विशेष पूजा करतात व प्रसाद म्हणून गव्हाची खीर वाटतात. तेथे रोज पूजाही होते. लोकांच्या वर्गणीतून नाश्ता दिला जातो. बुद्ध विहार बांधून दहा वर्षे झाली आहेत.

- प्रमोद शेंडे

कोकण्यांचा सखा, भाऊचा धक्का


भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प खर्चात पोचवत असे. त्याकाळी हातावर पोट भरणारा कोकणी मुंबईकर जसा केविलवाणा तसाच भाऊचा धक्काही आज बापुडवाणा भासतो. कारण कोकणच्या बोटींची जागा एस.टी.च्या रातराण्या, खासगी बस आणि कोकण रेल्वे यांनी त्याच क्रमाने घेतली. कोकणच्या बोटींना गि-हाईक राहिले नाही. भाऊच्या धक्क्यावरून भरतीओहोटीचे वेळापत्रक सांभाळत रेवसकडे लाँच सुटत असतात. त्यांनाही गेटवे-मांडवा या दिवसभर चालू असणा-या लाँचसेवेची स्पर्धा आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यकाळातील भाऊचा धक्का आणि त्याचा परिसर अजून डोळ्यांसमोर तरळला, की गरीब कोकणी माणसांच्या गोंधळाच्या प्रवासाच्या स्मृती जाग्या होतात. तेव्हा भाऊचा धक्का होता कर्नाटक बंदरच्या कडेला. चिंचोळा, प्रवाशांच्या सोयीसुविधांचा अभाव. मुंबईच्या पूर्व किना-याच्या टोकाला असल्यामुळे तेथे पोचण्यासाठी कोठलेही सार्वजनिक वाहन नसे.

आर्यन चित्रमंदिर - पुण्यातील पहिले चित्रपटगृह

अज्ञात 20/05/2015

'आर्यन चित्रमंदिर' हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते. महापालिकेने ते 22 सप्टेंबर 1983 रोजी पाडले व तेथे पार्किंग स्टँड उभारले. कारण ती जागा महापालिकेची होती. त्याचा शतकमहोत्सवी समारंभ बापुसाहेबांचे चिरंजीव आनंदराव पाठक यांनी पुण्यातील फिल्म अर्काईव्हजच्या दालनात साजरा केला. 'आर्यन' 1915 मध्ये सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणा-या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.

पुण्यात पहिले चित्रगृह उभारणा-या व पहिला मूकपट ‘डायमंड रिंग’, पहिला भारतीय बोलपट ‘आलम आरा’, पहिला मराठी बोलपट ‘संत तुकाराम अर्थात जय हरि विठ्ठल’. ‘संत तुकाराम’ आर्यनमध्ये दाखवणा-या गंगाधरपंतांचे स्मरणही केले जात नाही, त्याबद्दल आनंदरावांनी दु: ख व्यक्त केले. सिनेमा म्हणजे काय, अशी उत्सुकता असणा-या प्रोजेक्टरद्वारे चालतीबोलती चित्रे दाखवून ‘आर्यन‘ चित्रपटगृहाने लोकरंजनाचा इतिहास निर्माण केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारा 'आर्यन'मध्ये आपण स्वत: अनेक मूकपट व बोलपट पाहिले आहेत असे सांगितले.