सोलापूरचा आजोबा गणपती


बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक मंडळाचा हा गणपती खऱ्या अर्थाने आजोबा गणपती आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आधीपासूनच आजोबा गणपती सार्वजनिक स्वरुपात साजरा होतो आहे.

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली की एक उत्साहाची अनुभूती मिळते. गणेशोत्सव हा अधिकाधिक ‘कमर्शियल’ होत चालल्याचा व उत्सवापेक्षा ‘फेस्टिव्हल’च्या स्वरूपात दिसत असल्याचा टीकात्मक सूर ऐकायला मिळत आहे. हे काही प्रमाणात खरे असेलही, पण त्याचे लोण सोलापूपर्यंत पोहोचले हे मात्र नक्की; परंतु त्याला बरीच मंडळे अपवाद आहेत. सोलापूरच्या गणेशोत्सवात आजही उत्साहाबरोबर भक्ती आणि सेवा पाहावयास मिळते. त्याचे उत्कट उदाहरण म्हणजे येथील आजोबा गणपती. तब्बल १२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा आजोबा गणपती सोलापूरच्या धार्मिक, आध्यात्मिक तथा सांस्कृतिक पातळीवरचा मानबिंदू ठरला आहे. लोकमान्य टिळकांनी सन १८९३ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली खरी; परंतु त्याअगोदरपासून सोलापूरच्या आजोबा गणपतीचा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची परंपरा होती आणि ती आजही सुरू आहे. किंबहुना लोकमान्य टिळकांना सोलापूरच्या या आजोबा गणपतीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना सुचली असावी. लोकमान्यांचे सोलापूरकरांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अधूनमधून सोलापूरला येत असत. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू करण्यापूर्वी लोकमान्यांची स्वारी सोलापूरला आली होती. इतिहासात त्याचा संदर्भ सापडतो. असो, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याअगोदरपासून सोलापुरात आजोबा गणपतीच्या रूपाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा उज्ज्वल असूनदेखील त्याची दखल इतिहासकार घेत नाहीत, हे दुर्दैव आहे.

मुणगे गावचा आध्यात्मिक वारसा!


मुणगे हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवरील गाव. ते मोडते देवगड तालुक्यात. गावाच्या एका बाजूस अथांग अरबी समुद्र असून सागरी महामार्गावरून आचरे ते कुणकेश्वर असा प्रवास करताना भाविक, पर्यटक मुणगे गावात क्षणभर थांबतात आणि ग्रामदैवत भगवतीदेवीचे दर्शन घेतात. भगवती मंदिर अगदी मार्गालगत आहे.

मुणगे गाव आडबंदरवाडी, देऊळवाडी, बांबरवाडी, सावंतवाडी, बौद्धवाडी, सडेवाडी, भंडारवाडी, लब्देवाडी, आडवळवाडी, आपईवाडी, कारिवणेवाडी, वाघोळीवाडी अशा वाड्यांनी बनलेले आहे. ते आंबा बागांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व खासदार भालचंद्र मुणगेकर यांची ती जन्मभूमी.

गावात मुणगे व आडबंदर ही दोन महसुली गावे आहेत. ग्रामपंचायतीची स्थापना १२ एप्रिल १९४१ रोजी झाली आहे. गावाची लोकसंख्या २६०७ असून त्यामध्ये पुरुष १२५२ व स्त्रिया १३५५ आहेत. मतदान करणारे एकूण मतदार १६२६. त्यामध्ये पुरुष ७५० तर स्त्रिया ८७६ . गावाचे क्षेत्रफळ दोन हजार हेक्टर आहे. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक पाच तर खासगी पंचाहत्तर विहिरी आहेत. तसेच, दोन नळपाणी योजना आहेत. सौर पथदीप सदुसष्ट आहेत. अडतीस ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आले आहेत. तर दहा ठिकाणी गांडूळखत प्रकल्प आहेत. गावाला समुद्रकिनारा लाभल्याने त्या ठिकाणी मच्छीमारीसुद्धा हंगामानुसार चालते. तेथे रापण संघाद्वारे मच्छिमारी केली जाते. सहा अंगणवाड्या, आठ प्राथमिक शाळा, पाचवी ते दहावीसाठी श्रीदेवी भगवती हायस्कूल; तसेच, तांत्रिक शिक्षण देणारे ज्युनियर कॉलेज आहे. एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, रेशन दुकान, तलाठी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायटी, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक वाचनालय आहे.

नंदीबैल - दान देवाच्या नावानं


नंदीबैलाला कोकणात पांगुळबैल म्हणतात. त्याला रंगवून, सजवून गावागावातील घरांच्या अंगणासमोर आणला जातो. त्याच्यासोबत असतो लयदार आवाजातील संबळीचा सूर. संबळाऐवजी कधी पिपाणी, तुणतुणे किंवा ढोलके वाजवले जाते आणि ‘बुगूबुगूऽऽऽ..’ अशा वाद्याच्या आवाजाची किनार वातावरणात आणखी रंग भरते. पांगुळबैलांचे दर्शन दुर्मीळ होत चालले आहे.

दान देवाच्या नावानं
आपल्या देवाच्या नावानं
भोळ्या भगतानं केलं दान
दस बोटानं कमावून
पाच बोटानं केलं दान
रवळनाथ देवाच्या नावानं
असा पैसा दिला दान
तुझा पैसा कुठं गेला
रवळनाथ देवाच्या पायाला
तुझा दान पावन झाला...

ठाकर समाजातील कलावंत त्यांची पारंपरिक लोकगीते गुणगुणत पांगुळबैलासह घराघरात पोचतात. दिवाळी संपल्यानंतर माघ महिन्यापर्यंत त्यांची सफर गावागावात सुरू असते. पांगुळबैल फिरवणारे कमी झाले; पांगुळबैलाला प्रशिक्षण देणेही दिवसेंदिवस अवघड होऊन बसले आहे. पांगुळबैल उपलब्ध नसल्यास कधी हातात केवळ तुणतुणे घेऊन, ते ही परंपरा जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत.

ढोलकीच्या तालावर घुंगराचा झंकार करत, नंदीबैल दारोदारी हजेरी लावतो. तो अंगणात आल्या आल्या स्वत:भोवती प्रदक्षिणा घालतो. अंगणात तुळस असेल तर त्याच वेळी त्याची तुळशीभोवतीची प्रदक्षिणाही सुरू होते. पांगुळ कलाकारासोबत दुसरा कलाकार असतो, तो ढोलकीचा बुगूबुगूऽऽऽ..’ आवाज काढतो आणि बतावणी सुरू होते. सपादणी (गाण्यातून एकमेकांना दिली जाणारी साथ)चे सूर उमटू लागतात.

हे महादेवाचा नंदी आला
सौभाग्याच्या दारात..
आला बरा मागायला
मग दुसरा ठाकर सपादणी करू लागतो.
येरे येरे ढवळया माझ्या
पुण्यवंतांच्या दारात
यांच्या घराच्या दारासमोर..
पुण्यवंतांना बरा मागा
बाबा बांधवांच्या जोड्या राख जन्मावर
जनसंपत्तीचा वाटा माझा महादेव देईल
खोटानाटाकरणी करतूत पायतळी घालशील
सगळा किलेस पायातळी घालीन...

गुढीपाडवा - हिंदू नववर्षाचा आरंभ

अज्ञात 21/03/2015

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा, हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.

पाडवा हा सण का साजरा केला जातो याबाबतच्या वेगवेगळ्या उपपत्तीत आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले आणि कालगणना सुरू झाली असे ब्रम्हपुराणात म्हटले आहे. ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. अशा तऱ्हेने पाडवा हा जगाच्या उत्पत्तीचा दिवस ठरतो. त्या दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी अयोध्यावासीयांनी घरांना तोरणे लावून, विजयपताका अर्थात गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून भारतीय लोक त्यांच्या निवासस्थानी गुढ्या उभारून त्या दिवसाचे व नववर्षाचे स्वागत करतात.

आणखी एक कथा अशी आहे, की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीच्या सहा हजार सैनिकांचे पुतळे तयार केले. त्यांमध्य प्राण फुंकून त्यांच्या साह्याने शकांचा पराभव केला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. शालिवाहनाने मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड, पराक्रमहीन, दुर्बल, निर्जीव झालेल्या समाजामध्ये चैतन्य, स्वाभिमान आणि अस्मिता जागृत केली - शालिवाहनाच्या चमत्काराचा असा तर्कसुसंगत अर्थ काढता येतो. त्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना ‘शालिवाहन शक’ अशी सुरू करण्यात आली. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिप्रदा! ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते ‘शक’ अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. अजूनही शालिवाहन शकानुसार भारतीय कालगणना होते. त्यानुसार हिंदू पंचांगे तयार केली जातात. भारतातील काही प्रांतांत कार्तिक प्रतिपदेला, तर काही ठिकाणी मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानले जात असले तरी ‘शालिवाहन शक’ मात्र सर्वदूर रूढ आहे.

होलार समाजाचे वाजप


सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील शब्द वाजप असा आहे. अलगूज, सनई, सूर, सुंद्री आणि डफ ही त्यांची पारंपरिक वाद्ये तर झांज, ताशा, ढोल बॅण्ड, बँजो हे वाजपाचे आधुनिक साहित्य होय. सनई, सूर वाजवणाऱ्या पार्ट्या तालुक्यात तीसपेक्षा अधिक आहेत.

अलगूज म्हणजे पावा, मुरली अथवा बासरी. होलार समाजातील काही कलाकार चाळीस वर्षांपूर्वी बासरीवादन करत होते. बासरीचे मंजुळ ध्वनी वातावरणात चैतन्य पसरवतात; त्यातून गंभीर स्वरही काढले जातात. बासरीवादन कलेस म्हणावी तेवढी मागणी नसल्यामुळे ते वादन काळाच्या ओघात मागे पडले. तालुक्यात अलगूजवादन तर फारच दुर्मीळ दिसून येते.

सांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्‍या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्‍या गाई आणि म्‍हशी विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. त्याचबरोबर तेथे शेळी-मेंढी बाजारही भरतो. त्‍यास पुरक म्‍हणून शेळी आणि मेंढी यांच्‍या कातडीचा बाजार चालतो. सांगोल्‍याच्‍या बाजारात दर आठवड्याला लाखो-कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते.

सांगोल्‍याचा गुरांचा बाजार दर रविवारी भरतो. तो बाजार पिढ्यानपिढ्या सुरू असल्‍याचे लोकांकडून सांगितले जाते. सांगोल्‍यातील 'कृषी उत्‍पन्‍न समिती'च्‍या मोठ्या मैदानातवर हा बाजार भरतो. त्‍याकरता राज्याच्या अनेक भागांतून आणि राज्‍याबाहेरूनही त्या बाजारात खरेदीदार, विक्रीदार आणि दलाल येतात. तो बाजार शनिवारी दुपारपासूनच गजबजण्‍यास सुरूवात होते. विविध ठिकाणचे गुरांचे मालक स्‍वतः किंवा एखाद्या विश्‍वासू माणसाकरवी गुरे बाजाराच्‍या मैदानावर आणून ठेवतात. त्‍यांचा दुस-या दिवशी, अर्थात रविवारी दुपारपर्यंत तेथे तळ असतो. रात्रीपर्यंत ते मैदान जनावरांनी फुलून जाते. सांगोला परिसरात धनगरांचे प्रमाण मोठे आहे. ते शेतीला पूरक म्हंणून शेळी आणि मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. त्या अनुषंगाने त्‍या बाजारात शेळ्या आणि मेंढ्या विकण्‍यासाठी आणल्‍या जातात. शेळ्या आणि मेंढ्या सांगोला परिसरातूनच आणल्‍या जात असल्‍याने त्‍या रविवारी पहाटे मैदानावर दाखल होतात. मैदानावर जमलेल्‍या बैलांचा, गाईंचा, म्‍हशींचा, शेळ्या-मेंढ्यांचा आणि त्‍यांच्‍या कातडीचा असे वेगवेगळे बाजार एकाच ठिकाणी भरतात. ज्‍यांना ग्राहक मिळते ते काही जनावरांची विक्री शनिवारीच करतात. मात्र विक्रीचा खरा दिवस हा रविवारचा!

कुंकवाची गोष्ट


सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात केम नावाचे गाव आहे. रेल्वे स्टेशन असले तरी ते गाव तसे आडवळणाचे. अरुंद रस्ते आणि राज्य परिवहन मंडळाची बस दिवसातून तीन वेळा गावात येते. बाकी केमबाहेर जायचे तर खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. साधारण पंधरा हजार लोकसंख्या. गावात सतरा सदस्यांची ग्रामपंचायत आहे.

गावात कुंकू बनवण्याचा खूप जुना उद्योग आहे. केमचे कुंकू बैलगाडीतून पंढरपूरच्या बाजारात नेले जाई. स्वातंत्र्यानंतर काही काळ भारतीय रेल्वेच्या वॅगन केमला उभ्या राहत आणि साऱ्या देशभर केमचे कुंकू पोचवत असत. केम गावात लहानमोठे पंचवीस कारखाने आहेत. काही ठिकाणी ‘आगे दुकान पिछे मकान’ अशी अवस्था आहे.  दीडशे-दोनशे वर्षांची परंपरा असणारे काही कुंकू उत्पादक केममध्ये आहेत. केमचे कुंकू म्हणजे हळदीपासून तयार केलेले कुंकू अशी ग्राहकांची खात्री होती.

राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर दूर... सोलापुरात काही घडले आहे!


राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा... तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. वेगवेगळ्या क्षेत्रांत असाधारण काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तालुक्या तालुक्याच्या आणि त्याहूनही छोट्या गावी कार्यरत आहेत. त्यांची पोच सरकारदरबारी तर वगळाच पण मान्यताप्राप्त सामाजिक-सांस्कृतिक शहरी संस्थांकडे, एवढेच काय अनिल अवचटांसारख्या लेखकांपर्यंतदेखील नाही! ती माणसे तुळशीदास गव्हाणे यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीत अभिनव प्रयोग करतात, रिधोरे गावच्या सयाजीराव गायकवाडांप्रमाणे शेतकऱ्यांची प्रयोगशाळा चालवतात, नाशिकच्या चिवड्याला थप्पड मारील असा लांबोटी चिवड्याचा ब्रँड मोहोळमध्ये तयार करतात, प्राध्यापकी ऐट न मिरवता अथवा समीक्षकी भाषेचा आग्रह न धरता करमाळ्याच्या प्रदीप मोहिते यांच्याप्रमाणे समाजजागराची पथनाट्ये सादर करत दिवाळीच्या सुट्टीत गावोगाव फिरतात... अशी कित्येक नावे! प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आणि त्याचा ध्यासही आगळा!

केवळ अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्ये अथवा थ्रीजीसारख्या घोटाळ्यात ऐकलेले प्रचंड आकडे मी मंगळवेढ्याच्या वैभव मोडकच्या तोंडी एक लक्ष सव्वीस हजार कोटी रुपयांच्या रूपाने ऐकले तेव्हा दामाजीपंतांचे कोठारच खुले होत असल्याचा भास मला झाला. वैभव मोडक यांची शेती आहे, ते बारावी शिकलेले आहेत. त्यांनी कृषी-उपयोगी यंत्रे बनवली आहेत. त्यांना त्या ‘इनोव्हेशन’बद्दल सरकारचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या यंत्रांचा उपयोग झाला तर सरकारी खर्चातील बचत अशा कोटीच्या कोटी आकड्यांत होईल अशी मोडक यांची मांडणी आहे. अमेरिकेमधूनही त्याबद्दल विचारणा झाल्या आहेत. त्यांचे कोरडवाहू शेतीतील प्रयोग अनुकरणीय आहेत.

मोहोळमधील अरुण देशपांडे हे त्यांच्या विविध प्रयोगांनी व सोलारशाळेमुळे ‘इन्स्टिट्यूशन’ बनून गेले व सर्वप्रसिद्धही आहेत. त्यांना जरी अभय बंग, प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ व डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारखे ‘सेलिब्रिटी स्टेटस’ लाभले नसले तरी  बऱ्यापैकी मान्यता मिळालेली आहे. त्यांची ‘ग्रीन व्हिलेज’ची संकल्पना आता विद्यापीठ अभ्यासक्रमात शिरली असून त्यासाठी पाठ बनवण्याची जबाबदारी देशपांडे यांच्यावर आली आहे.

कनाशी - शाकाहार जपणारे गाव

अज्ञात 13/01/2015

चकधर स्‍वामींनी कनाशी गावाला भेट दिल्‍यापासून गेली सातशे वर्षे गावाने शाकाहाराची परंपरा पाळली आहे.कनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित बंदी आहे! भिन्न विचार अन् भिन्न रुची अशी माणसे एका गावात नांदत असतानाही त्यांचे शाकाहारावर मात्र एकमत आहे.

खानदेशात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. रूढी, परंपरा आणि त्यांचा इतिहास यांमुळे त्या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. तेथील कृषिसंस्कृती, खाद्यसंस्कृती वेगळी आहे. तेथील बोलीभाषा, अहिराणीचा गोडवा वेगळाच आहे. तेथील धार्मिक स्थळेही जगप्रसिद्ध आहेत. पाटणादेवी, उपनदेव, शहादा-प्रकाशा, ऋषिपांथा, कनाशी, म्हसदी, शेगाव आदी ठिकाणांना पर्यटक सतत भेटी देत असतात.

कनाशी हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गाव आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची परंपरा त्या गावाला आहे. देशात कनाशी नावाची पाच ते सहा गावे असतील; परंतु जळगावातील कनाशीने त्या गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तेथे येणारा भाविक सहसा रिकाम्या हाताने जात नाही असे म्हटले जाते. येणारा प्रत्येक कष्टी असो वा आनंदी भाविक असो त्याने जाताना त्या गावातील शिकवण आणि तेथील आदरातिथ्यांचे कौतुक केले नाही तरच नवल! बाराव्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.

केल्याने तीर्थाटन...


केल्‍याने तीर्थाटन...‘तरति पापादिंकं यस्मात’ - ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय!

‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ - ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत घडलेल्या पापकर्मांचा क्षय होतो ते तीर्थक्षेत्र होय! - स्कंदपुराणात तीर्थक्षेत्राची व्याख्या अशी केली आहे.

तीर्थ या शब्‍दाचा शब्‍दशः अर्थ - पवित्र अशा सागरसरितांचे जल. तशा सागरसरितांच्या किनारी वसलेले स्थान म्हणजे ते तीर्थस्थानच होय.

प्राचीन काळी देवदेवतांनी, ऋषिमुनींनी जलाशयाजवळची, समुद्र-नदीतटावरची शांत, निसर्गरम्य अशी स्थळे ईश्वरी तपश्चर्येसाठी, साधनेसाठी निवडली आणि तेथे राहून कठोर उपासना केली. देवदेवतांनी काही पुण्यवंतांना त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन साक्षात दर्शनही दिले. परमेश्वरी अस्तित्व तेथे जागृत झाले आणि ते स्थान पावन होऊन तीर्थक्षेत्र बनले. त्या साधनेची पवित्र स्पंदने, लहरी तेथील परिसरात आणि तेथील वातावरणात भरून राहिली. हा भावनेचा भाग आहे. म्हणून माणूस जेव्हा तीर्थस्थानी जातो, परमेश्वराला अनन्यभावे शरण जातो तेव्हा त्याला तेथील जागृत परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती येते. त्याच्या मनातील षड्रिपूंचा नाश होतो आणि चांगल्या भावनांचे, विचारांचे तरंग त्याच्या मनात उमटतात. त्याचे मन आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होते. त्याच्या मनाने त्याच्याशीच साधलेला तो आत्मसंवाद, चुकांची प्रांजळपणाने दिलेली कबुली आणि सदाचाराने वागण्याचा केलेला निर्धार होय. म्हणजेच त्याने मन, देह, विचार आणि कृती शुद्ध करणे होय. माणूस तेथील पवित्र जलात जेव्हा स्नान करतो तेव्हा त्याचे मन हलके होते, मनावरचे दडपण कमी होते आणि चित्त शांत होते, कारण त्या स्थानाचा महिमा आणि तेथील वातावरणाचा प्रभाव त्याच्या मनावर घडतो.