पेट्रा शेमाखा - फॉरिनची पाटलीण


गोऱ्या कांतीची, हिरवट डोळ्यांची, पिंगट केसांची पेट्रा... गावरान सौंदर्य लाभलेल्या लावण्यवतींच्या घोळक्यात वेगळी उठून दिसणारी ती फॉरिनची मेम. जर्मनीची पेट्रा शेमाखा. मराठी मातीतील ढोलकीफड ही अस्सल कला असते तरी कशी हे जाणून घेण्यासाठी जर्मनीची पेट्रा शेमाखा गेली काही वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून होती. लावणी कलावंतांसारखी नऊवारी नेसणे, मेक-अप करणे, पायात चाळ बांधणे असा कलावंतांच्या जगण्याचा अनुभव घेत असतानाच तमाशा फडाचा अभ्यास करणारी, तमाशावर बोलणारी पेट्रा...

ढोलकीफडाचा तमाशा आणि लावणी ही जगभर माहीत असलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख. जर्मनीच्या पेट्रा शेमाखा हिने पीएच.डी.साठी महाराष्ट्रातील ढोलकीफडाचे तमाशे हा विषय निवडला आहे. तिने संदेश भंडारे यांचे ‘लावणी’ या विषयावरील फोटोंचे प्रदर्शन पाहून लावणीविषयी अभ्यास करण्याचे ठरवले.

पेट्रा मराठीत फाड् फाड् बोलते. ती म्हणाली, “जुना तमाशा राहिला नाही अशी ओरड अनेक लेखकांनी, अभ्यासकांनी केलेली माझ्या वाचनात आली. कोणतीही कला जशीच्या तशी राहत नाही. काळानुरूप तीत बदल होतातच!”

पेट्राने दोन वर्षे पुण्यात राहून मराठी शिकून घेतले. जर्मन उच्चारांच्या प्रभावाचे मराठी बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचाल पाहताना, बोलण्यातील नेमके पुस्तकी शब्द ऐकताना मोठी मौज वाटते. पेट्रा म्हणते, “मला कळत नाही, की जेव्हा मराठी मुले जर्मनीला नोकरीसाठी किंवा अभ्यासासाठी जातात तेव्हा जर्मन भाषा शिकतातच, मग माझ्या मराठी शिकण्याचे एवढे कौतुक कशासाठी?”

शाहीर सुभाष गोरे


शाहीर सुभाष गोरे हे लोककलाकार. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी सोलापूरच्‍या सांगोला तालुक्‍यातील जवळा या गावी झाला. त्यांचे क्षेत्र लोककलालोकनृत्य (पोवाडे, गीते, लावणी, भारूड, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वासुदेव, तमाशा इत्यादी). सुभाष गोरे यांचे आजोबा कृष्णा ज्योती गोरे, वडील बाबुराव कृष्णा गोरे त्याच क्षेत्रात होते.

गोरे ‘जय भवानी कलापथक व सांस्कृतिक मंडळ, जवळा’ गेल्या पंचवीस वर्षांपासून चालवतात. ऐतिहासिक व समाजप्रबोधनपर पोवाडे ही त्यांची खासीयत. त्या जोडीला गीते, गोंधळ, भारूड, वाघ्या-मुरळी, वासुदेव, तमाशा, लावणी आदी लोककला व लोकनृत्ये ते सादर करतात. त्‍यांचे कार्यक्रम भारतभर झाले आहेत.

त्यांनी  शासनाच्या ‘व्यसनमुक्ती अभियान’ (1996-2000), ‘संपूर्ण साक्षरता अभियान’ (1996-99), ‘मुली वाचवा अभियान’, गाव हागणदारीमुक्त करा, स्वच्छतेचे महत्त्व (2011-12) आदी अभियानांत ठिकठिकाणी कार्यक्रम केले आहेत. त्यांना सर्व प्रकारची चामडी वाद्ये (चामड्यापासून बनवलेली) उत्कृष्ट रीत्या वाजवता येतात.

वीरगळ - इतिहासाचे अबोल साक्षीदार


ग्रामदेवतांच्या, शिवलिंगांच्या (शिवमंदिरांच्या) ठिकाणी मंदिराच्या मागील बाजूस, दीपमाळेजवळ शतकानुशतकांपासून ऊन-पाऊस-वारा सोसत, झिजत असलेले वीरगळ ही इतिहासाची मोठी साक्ष आहे. पण ते काय घटना सांगतात याचा अभ्यास होण्याऐवजी ती ‘पूजा स्थाने’ बनवली गेली आहेत. काही ठिकाणी, पूर्वजांच्या शिल्पकलेचा तो उत्कृष्ट नमुना आहे. त्या कलाप्रकाराला छत्राची, निवाऱ्याची गरज आहे. मात्र त्यांना ‘बारापाच’ (बारा जातींच्या बलुतेदारांनी एकत्र येऊन ग्रामदेवतेच्या मंदिरात पंचमहाभूतांची पूजाअर्चा करणे) म्हणून गंध, अक्षता व फुले वाहिली जातात! त्यात कोरलेल्या पूर्वजांच्या प्रतिमा आणि प्रतीके यांचा शोध घेतला जाणे हे ऐतिहासिक दस्तावेजांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एखाद्या शूरवीरास काही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याचे चित्रही त्या शिलेवर शिल्पांकित केले जाते. त्या शिलेस ‘वीरगळ’ असे म्हणतात. त्याला इंग्रजीत ‘हिरोस्टोन’ तर भारताच्या उत्तरेकडील भागात ‘वीरब्रह्म’, दक्षिणेकडील कर्नाटकात ‘कल्लू’ आणि केरळात ‘तर्रा’ असे म्हटले जाते.

प्रशांत यमपुरे - पोट्रेटमागचा रंगीत चेहरा!


चित्रकलेतील अवघड गोष्ट म्हणून पोट्रेट या माध्यमाकडे पाहिले जाते. मानवी चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, बारीकसारीक खुणा इत्यादी गोष्टी चित्रांमध्ये रेखाटणे हे आव्हानात्मक काम असते. ‘पोट्रेट’वरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोर उभे राहणे अपेक्षित असते. त्यामुळे कलाक्षेत्रात फार कमी कलाकार पोट्रेटच्या वाटेला जातात. म्हणूनच, तरुण वयात त्या कलाप्रकारात हातखंडा मिळवणाऱ्या प्रशांत यमपुरेचे कौतुक वाटते. प्रशांत पोट्रेट काढताना फक्त कलर पेन्सिल्सचा वापर करतो! त्याने काढलेली चित्रे पाहिली तर ती फक्त पेन्सिलने रेखाटली आहेत यावर विश्वास बसत नाही!

प्रशांत सोलापूरमध्ये लहानाचा मोठा झाला. त्याला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तो शाळेत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नेहमी बक्षिसे पटकावायचा. त्याची इतर भावंडे डॉक्टर-इंजिनीयर होण्याच्या मार्गावर असताना प्रशांतला ओढ लागली होती चित्रकार होऊन कलेत कारकीर्द करण्याची. प्रशांतला घरातून फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. त्यामुळे त्याने सोलापूरमधील दयानंद महाविद्यालयामध्ये बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. तेथे मात्र त्याच्या कलेला प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडत गेल्या. कॉलेजमध्ये एक विभाग होता. तेथे विद्यार्थी त्यांची चित्रे किंवा इतर कलाकृती मांडत. प्रशांत त्याची चित्रे तेथे लावू लागला आणि त्याच्या चित्रकलेला कॉलेजमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. विद्यार्थी त्याची चित्रे पाहण्यासाठी गर्दी करू लागले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये त्याचे कौतुक होऊ लागले. प्रशांतचे पुढील चित्र कोणते असणार याबद्दल कॉलेजमध्ये उत्सुकता जाणवू लागली. त्याच्या चित्रांवर चारोळ्या आणि कविताही रचल्या जाऊ लागल्या! कॉलेजमध्ये त्याचा एक फॅन क्लबच तयार झाला. त्याचबरोबर, चित्रकलेमुळे कॉलेजमधील अभ्यासातील त्याचे लक्ष मात्र कमी कमी होत गेले.

नगारा वाद्य


नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्‍द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्‍या काळचे युद्धवाद्य होते. एक मोठ्या अर्धगोलाकार धातूच्या (तांबे, पितळ वा लोखंड) भांड्यावर म्‍हशीचे कातडे ताणून चढवले जाते. तोच नगारा! त्‍याची दोन भांडी असतात. मोठ्या भांड्याला नर तर लहान भांड्याला जील असे म्‍हटले जाते. ती भांडी तांबे, पितळ अथवा लोखंड या धातूच्‍या पत्र्यांची असत. वर्तमानात तयार केल्‍या जाणा-या त्‍या वाद्यात स्‍टील धातूचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे नगा-याच्‍या तोंडाचा व्‍यास दोन ते तीन फूट असतो. मोठ्या आकाराच्‍या नगा-याचा व्‍यास पाच फूटांपर्यंतदेखील असतो.

नगारा दोन बाकदार काठ्यांच्‍या सहाय्याने वाजवतात. नगारा वाजवणा-या व्‍यक्‍तीला नगारची असे नाव आहे. घोड्यावर बांधून वाजवण्याच्या लहान नगाऱ्यासारख्या दोन वाद्यांच्या जोडवाद्याला ‘डंका’ म्हणतात.

नगारा वाद्य देवालयांत वा उत्सव प्रसंगी वाजवले जाण्‍याची पद्धत चालत आली आहे. दिवसाच्या ठराविक वेळेस काल दर्शवण्यासाठीही याचा उपयोग केला जाई. आजही धार्मिक कार्यांमध्‍ये नगा-याचा वापर केला जातो.

नगारा हे मुख्‍यतः रणवाद्य आहे. लढाईत नगारा वाजवण्याची प्रथा बहुतांश संस्‍कृतींमध्‍ये आढळून येते. सैनिकांना स्‍फूरण यावे किंवा लढाईत विजय मिळवल्यानंतर तयाचा आनंद साजरा करावा यासाठी नगारा वाजवण्‍यात येई. कौरव-पांडव यांच्‍या युद्धाच्‍या आरंभी अशी वाद्ये वाजवल्‍याचे उल्‍लेख महाभारतात आढळतात. प्राचीन काळी या वाद्यास दुदुंभी असे नाव होते. इतिहासकाळतही युद्धाच्‍या तयारीत नगारा वाद्य अग्रस्‍थानी असे. तो हत्‍ती अथवा उंट अशा प्राण्‍यांवर लादून वाजवला जाई. सेनापतीचे निरनिराळे हुकूम सैन्यास समजण्यासाठी निरनिराळे आवाज काढून नगारा वाजवला जाई. शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी, शत्रूवर हल्‍ला करायचा असल्‍यास किंवा शत्रूच्‍या दिशेने चालून जाण्‍यासाठी त्‍या-त्‍या संकेताप्रमाणे नगारा वाजवला जाई. युद्धप्रसंगी वाजवल्‍या जाणा-या तशा नगा-यास नौबत असे म्‍हणतात.

म्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे


कालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी म्हैसगावचा बँड होता आणि कालिदासचे वडील शिवाजी कांबळे हे त्या बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत. ते गावातील बँडव्यतिरिक्त कुर्डुवाडीजवळील आरपीएफ येथेही ट्रम्पेट वाजवायला जात. शिवाय, त्यांची घरची शेती होती. घरची शेती कालिदासच्या बालपणापासूनच, त्याच्या कानावर हे संगीत/वाद्यसंगीत पडत होते. म्हैसगावातील सूर्यभान खारे काका पेटी वाजवतात, ते पेटीवादनाच्या कार्यक्रमाला जाताना, लहान कालिदासला, त्यांच्या बरोबर नेऊ लागले. लहानग्या कालिदासची बोटे की बोर्डवर फिरू लागली. तो वडिलांकडून ट्रम्पेटही वाजवण्यास शिकला.

त्याने दहावी झाल्यानंतर वादक म्हणून व्यवसाय करण्याचे ठरवले. कालिदासने की बोर्ड, ट्रम्पेट यांच्या जोडीला ‘बाजा’ वाजवण्यास सरुवात केली. कालिदासची बँडमध्ये वाद्ये वाजवून कमाई होऊ लागली.

कालिदासला 2001 साली, पुण्याच्या इंडियन एअरफोर्स बँडमध्ये, की बोर्ड, ट्रम्पेट वादकाची नोकरी मिळाली. सकाळी परेड असायची तेव्हा या बँडपथकाला वादनाचे काम असे. त्यानंतर रात्री, मोठ्या अधिकाऱ्यांच्या डिनर पार्ट्या असायच्या, त्यावेळी बँडपथकात वादनाचे काम असे. ती नोकरी कालिदासने 2003 सालापर्यंत केली. ती नोकरी सोडून तो म्हैसगावला परत गेला. पुण्यातील तीन वर्षांच्या काळात, कालिदासने त्यावेळचे पोलिस सबइन्स्पेक्टर यासिन खान, जे. पठाण यांचे सॅक्सोयफोन वादन एकले होते. त्याला त्या वाद्याची ओढ तयार झाली. यासिन खान त्यावेळी बडोद्याला राहत होते – नोकरीनिमित्त. म्हणून 2004 साली कालिदास बडोद्याला गेला व यासिन खान यांच्याकडेच राहून – गुरुकुल पद्धतीने - सॅक्सोफोन वाजवण्यास शिकू लागला. तो दोन वर्षे बडोद्यात होता.

दीपमाळ - महाराष्ट्रीय शिल्पप्रकार


दीपमाळ हा महाराष्ट्रीय शिल्पप्रकार आहे. महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी जे दगडी स्तंभ उभारलेले असतात, त्यांना दीपमाळा असे म्हणतात. दीपमाळ दहा फुटांपेक्षा अधिक उंच असते. त्यांचा आकार गोल, षटकोनी किंवा अष्टकोनी असतो. तो वर निमुळता होत गेलेला असतो. दिवे लावण्यांसाठी त्यांना खालपासून वरपर्यंत क्रमाने लहान कोनाडे अथवा पायऱ्या केलेल्या असतात.

उत्सवप्रसंगी शहरात दीपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायणासारख्या ग्रंथात आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दीपलक्ष्मी व दिव्यांची झाडे असतात, तसेच देवालयांसमोर दीपदंड किंवा दीपस्तंभ असतात. पण दीपमाळ हे महाराष्ट्रीय मंदिरशिल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विटांचा वा दगडांचा वर निमुळता होत जाणारा स्तंभ उभारून त्याच्यात ओळीने हात (लहान कोनाडे अथवा पाय-या) बसवलेले असतात. त्या हातांवर व स्तंभाच्या माथ्यावर पणत्या ठेवण्यात येतात. उत्सवप्रसंगी, दिवाळीच्या वेळी, त्रिपुरी पौर्णिमेला दीपमाळा दिव्यांनी उजळण्यात येतात. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दीपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रूढ होती. विशेषतः जेजुरीला खंडोबाच्या मंदिराच्या टेकडीवर साडेतीनशे दीपमाळा त्यासाठी उभारलेल्या आहेत.

देवळासमोर सव्‍वीस हात उंचीचा दगडी स्तंभ उभारून त्यावर कापूर व ज्वालाग्राही पदार्थ जाळून आरास करावी असे पुराणात म्हटले आहे. असे स्तंभ प्राधान्याने शिवालयासमोर असत आणि ते शिवरूप समजले जात.

यादवकाळापर्यंतच्या मंदिरशिल्पात दीपमाळा आढळत नाहीत. इसवी सनाच्या तेराव्या  शतकानंतर मुसलमानांच्या मिनार – शिल्पाच्या अनुकरणातून प्राचीन दीपस्तंभांना व दीपवृक्षांना दीपमाळेचे स्वरूप लाभले असावे असा शिल्पकलेतील तज्ज्ञांचा कयास आहे.

पेशवेपूर्वकाळातील बहुतेक दीपमाळा दगडी आहेत. पेशवाईत दगडी दीपमाळांबरोबरच विटांच्या दीपमाळाही बांधल्या गेल्या. त्यांची रचना मिनारांसारखी आहे. म्हणजे त्या आतून पोकळ असून, त्या पोकळीत वर जाण्या‍साठी नागमोडी जिना असतो. अशा दोन दीपमाळा बीड येथे खंडोबाच्या मंदिरासमोर चांगल्या स्थितीत उभ्या आहेत.

बाळासाहेब माने यांची संगीतसाधना


बाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने शिकले. पण पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटले असते. पण मोलमजुरी करून त्यांनी शिक्षण साधले. त्यांना संगीताची आवड उपजत होती.

बाळासाहेबांनी चौथीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले. मोठे भाऊ लातूरला टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. त्यांनी सर्वांना लातूरला नेले. बाळासाहेब तेथे हॉटेलमध्ये काम करू लागले. पुढे, त्यांनी शिकण्यासाठी पंढरपूर गाठले. पंढरपूरचे नगराध्यक्ष कै. गणपतराव अभंगराव यांच्याशी एका सहकाऱ्याने ओळख करून दिली. अभंगराव यांचे पंढरपुरात लॉज होते. त्यांनी लॉजवर काम कर, तेथेच राहा आणि शाळापण कर अशी बाळासाहेबांची सोय करून दिली.

बाळासाहेब ‘कवठेकर हायस्कूल’मध्ये शिकू लागले. तेथे त्यांची मैत्री फिरोज बाह्याणे यांच्याशी झाली. त्याला संगीताची आवड होती. तो बाळासाहेबांना पंढरपुरात कार्यरत असलेल्या ‘रसिक मंडळा’त नेऊ लागला. तेथे पंडित भीमसेन जोशी, किराणा घराण्यातील गायिका प्रभा अत्रे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे कार्यक्रम होत. बाळासाहेबांची संगीतातील रूची त्या कार्यक्रमांमुळे वाढली.

होलार समाजाचे वाजप


सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील शब्द वाजप असा आहे. अलगूज, सनई, सूर, सुंद्री आणि डफ ही त्यांची पारंपरिक वाद्ये तर झांज, ताशा, ढोल बॅण्ड, बँजो हे वाजपाचे आधुनिक साहित्य होय. सनई, सूर वाजवणाऱ्या पार्ट्या तालुक्यात तीसपेक्षा अधिक आहेत.

अलगूज म्हणजे पावा, मुरली अथवा बासरी. होलार समाजातील काही कलाकार चाळीस वर्षांपूर्वी बासरीवादन करत होते. बासरीचे मंजुळ ध्वनी वातावरणात चैतन्य पसरवतात; त्यातून गंभीर स्वरही काढले जातात. बासरीवादन कलेस म्हणावी तेवढी मागणी नसल्यामुळे ते वादन काळाच्या ओघात मागे पडले. तालुक्यात अलगूजवादन तर फारच दुर्मीळ दिसून येते.

चंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव


भारतात चित्रपट क्षेत्रामधील कामगिरी बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी दाखवून दिले आहे. त्यांना ‘देल्ही बेल्ली’ चित्रपटासाठी ‘पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा फिल्मफेअर पुरस्कार 2013 साली मिळाला. ‘कलर्स’वरील ‘24’ ही मालिकादेखील त्याच्या कारकिर्दीमधील मैलाचा दगड ठरली आहे. त्याची स्वत:ची ओळख इंडस्ट्रीमध्ये ‘अॅड मॅन’ अशी आहे. काही सेकंदांसाठी पडद्यावर झळकून जाणारी जाहिरात बनवणे ही प्रक्रिया सृजनशीलतेला कस लावणारी असते, त्यामुळे निर्माता-दिग्दर्शक म्हणून अभिनयचा जाहिरात विश्वामध्ये दबदबा आहे. त्याने जवळजवळ चौदा वर्षे जाहिराती बनवल्या.

अभिनय म्हणाला, ‘माझे शिक्षण आणि माझा व्यवसाय परस्पर भिन्न! सृजनशीलता ही माझ्या रक्तात आहे. मला कलाक्षेत्राची आवड आहे. मी ‘आर्किटेक्चर’मधील पदवी मिळवल्यावर काही महिने ‘इक्बाल चैनी’मध्ये नोकरी केली. तेथे काम ‘क्रिएटिव्ह’ होते, तरी मला ‘स्टोरी टेलिंग’ म्हणजे गोष्ट खुलवून सांगणे या गोष्टीचे आकर्षण होते. मी आठवीत असताना नाटक लिहिले होते. त्या माझ्या पहिल्या-वहिल्या कलाकृतीचे कौतुकही झाले होते. त्यामुळे माझी ती आवड मनात खदखदत होती आणि शेवटी, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ते साल होते, 1993.’