ध्येयासक्तदांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते


समाजात काही व्यक्ति अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहातात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींवर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते. सुधीर हा विज्ञानातील पदण्युत्तर शिक्षण घेतलेला त्यांत उच्च पदवी म्हणजे पीएच.डी घेतलेला एक वरिष्ठ वैज्ञानिक असून, मुंबईतल्या प्रसिद्ध भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात कार्यरत आहे तर त्याची धर्मपत्नी-अर्धांगी नंदिनी, पदवी प्राप्त गृहिणी आहे. समाज कार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून याच समाज कार्यातून त्यांची ओळख-देख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्न गाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचं (एकत्र) सहजीवन सुरु झाले ते आजतागायत अहर्निश सुरु आहे. हे दांपत्य म्हणजे (Made for each other)  मेड फॉर इच अदर या तत्वाने बांधले गेले आणि हेत तत्व त्यांनी ‘नोबेल नगरीतील नवल स्वप्ने.’ ही पुस्तक मालिका लिहीतांना स्वीकारले, ते आजतागायत हे पुस्तक कथेच्या रूपातून नोबेल पारितोषिक प्राप्त संशोधन आणि त्या संशोधनाचे मानकरी म्हणजेच संशोधक यांची ओळख सामान्य वाचकांना करुन देणारे गोष्टीरुप पुस्तक म्हणजेच “ नोबेल नगरीतील नवल स्वप्ने ” या कथा केवळ वाचकांनाच भावल्या किंवा विद्यार्थांना आवडल्या असे नव्हे तर प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ ज्यांच्या संशोधनावर व ज्यांच्यावर या कथेचे कथा बीज अवलंबून आहे खुद्द त्या संशोधकांनाही भावाल्या यांतच या पुस्तकाचे यश दडले आहे.

ध्येयासक्त दांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते


समाजात काही व्यक्ती अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहतात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींच्या आधारावर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते.

सुधीरला ‘अंकीय प्रतिमा संस्करण’ म्हणजेच डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयात केलेल्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातली पीएच. डी. मिळाली आहे. तो मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून संशोधन करत आहे. तर त्याची अर्धांगी नंदिनी कला शाखेची पदवीधर असून आवड म्हणून गृहिणीपद भूषवित आहे. समाजकार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून समाजकार्यातून त्यांची ओळख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्नगाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचे सहजीवन सुरू झाले.

एखाद्या संशोधनाला जेव्हा नोबेल पारितोषिक देऊन गौरवले जाते तेव्हा त्या संशोधनाविषयीची बातमी लोक वर्तमानपत्रांतून वाचतात. हे संशोधन खूप महान असणार याची त्यांना खात्री असते, पण हे संशोधन नेमके काय आहे या विषयीची माहिती मिळवण्याची त्यांची उत्सुकता पुरी होऊ शकत नाही. नोबेल विजेते संशोधन हे खूपच प्रगत आणि प्रगल्भ असल्यामुळे त्रोटक बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. हे संशोधन मुलांनादेखील कळू शकेल एवढे सोपे करून लिहिले तर नोबेल पारितोषिकाविषयीच्या सर्वसामान्यांच्या मनातली उत्सुकतेचा वापर त्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करता येईल, असे सुधीर आणि नंदिनीला वाटले. यातूनच  ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या पुस्तकाची कल्पना निघाली. नवनव्या विज्ञानसंशोधनाबाबत सतत वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सुधीरची आवड आणि अवघड गोष्टीही अतिशय रंजकपणे सांगून मुलांनाही सहजपणे कळतील अशा रीतीने लिहिण्याची नंदिनीची शैली या दोहोंचा संगम ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’च्या निर्मितीत झाला. या कामासाठी हे दांपत्य म्हणजे जणू ‘मेड फॉर इच अदर’ होते. आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच सुरू झाला नोबेलनगरीतील नवलस्वप्नांचा प्रवास.

माधुरी दीक्षित - नेने (Madhuri Dikshit - Nene)


खळखळत्या हसण्यातून 'मधुबाला'ची आठवण देणारी, पडद्यावर 'एक-दोन-तीन ' गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, 'हम आपके है कोन' मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे 'आजोबा' पिढीलाही आवडणारी. धक् धक् करूनही 'धसका' न बसलेली, वयाची उत्सुकता कायम टिकवलेली, सिनेमा पार्ट्यात 'न' मिसळणारी, राजकीय लोकांत उठबस 'न' करणारी, कुठल्याही वलयांकित - गॉसिप प्रकरणात न अडकलेली,'प्रहार'सारख्या नाना पाटेकरांच्या सिनेमात 'मेकअप' न करण्याचा 'प्रयोग' करण्याचा आत्मविश्वास असलेली आणि 'चोली के पिछे क्या' चे चित्रण करतानाही ओंगळ न वाटणारी; उलट तरीही तद्दन फिल्मी रसिकांच्या मनात रेंगाळलेली आणि लग्नोत्तर दोन मुलांची आई होऊनही, पडद्यावरच्या पुनरागमनाची उत्सुकता टिकवलेली, रजतपटलावरचे सौंदर्यसम्राज्ञीपद टिकवलेली माधुरी दीक्षित.

नाट्यकलाकार - डॉ. शरद भुथाडिया


डॉ. शरद भुथाडिया गेली पंचवीस वर्षे कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञ म्हणून खाजगी प्रॅक्टिस व महानगरपालिकेत काम करत आहेत. बलसाड-गुजरातमधील गुजराथी शिंपी कुटुंबात जन्मलेले भुथाडिया इथे स्थलांतरित होऊन कायम वास्तव्यासाठी आले. त्यांचे शाळा-कॉलेजचे शिक्षण कोल्हापुरात झाले. ते मेडिकल कॉलेजात शिकत असताना त्यांनी सोलापुरातील हौशी नाट्यसंस्थेचे नाट्य आराधनाचे संस्थापक-दिग्दर्शक डॉ. वामन देगावकर यांच्या हाताखाली (1974-82) एकांकिका-नाटकांतून छोट्यामोठया भूमिका सादर केल्या. त्यामुळे त्यांना
डॉ. देगावकर हे गुरुस्थानी आहेत. त्यांनी स्पर्धांमधून 'उध्वस्त धर्मशाळा' , 'महापूर', अशी  पाखरे येती' अशा नाटकांतून अभिनय केला.

कोल्हापुरात आल्यावर 1882  पासून कोल्हापुरातील 'प्रत्यय' या संस्थेमध्ये भूमिका व दिग्दर्शन. आणखी एक नाट्यसंस्था न काढता 'लृ' सारख्या सामाजिक-साहित्यिक चळवळीचा वारसा घेऊन जन्मलेली पुरोगामी विचारांची ही संघटना. आशयघन सामाजिक जाणिवांची  नाटके करणारी संस्था म्हणून तिची ओळख. तिने कोल्हापुरात वेगळ्या नाटकांचा प्रेक्षक घडवण्याचे मोलाचे काम केले.

एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू (दारिओ फो), घोडा (ज्युलिअस हे), राशोमन (आकिरा कुरुसावा), दुशिंगराव. आणि त्यांचा माणूस (बरल्टॉड ब्रेश्ट) अशा विदेशी नाटककारांची तसेच दि. धों. कुळकर्णी, दत्ता भगत, गो. पु. देशपांडे,  विंदा करंदीकर, रुद्रप्रसाद आणि लक्ष्मीनारायण लाल अशा भारतीय व मराठी नाटककारांची वेगळ्या जाणिवांची नाटके डॉ. भुथाडियांनी दिग्दर्शित केली व त्यांत अभिनयही केला. त्यांनी संस्थेतील नव्या कलाकार पिढीला दिशादर्शनाचे व मार्गदर्शनाचे कामही केले. त्यांच्या व 'प्रत्यय'च्या वेगळ्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत पारितोषिके मिळाली. त्यांना दिल्लीच्या संगीत नाटक महोत्सवात सहभागी होण्याचा मानदेखील अनेकदा मिळाला. 

तरीही डॉ. शरद भुथाडिया म्हटल, की त्यांनी समर्थपणे सादर केलेला किंग लिअर डोळयांसमोर येतो. पूर्वीच्या पिढीतील नानासाहेब फाटक, गणपतराव जोशी अशा मान्यवरांच्या पंक्तीत उल्लेख करावा असे अभिनयकौशल्य भुथाडियांनी ती भूमिका साकार करताना दाखवले. राज्य नाट्य स्पर्धेतील त्या नाटकाचे पुढे कोलकात्याच्या नांदीकार महोत्सवात, दिल्लीतील महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये आणि 2001 साली केरळमध्ये भरलेल्या राष्ट्रीय शेक्सपीयर फेस्टिवलमध्येही प्रयोग झाले. नाट्यपरिषद, नाट्यदर्पण, नाट्यगौरव पुणे, फाय फौंडेशन (इचलकरंजी) अशा नामांकित पुरस्कारांचा लाभ नाटकाला झाला. ज्येष्ठ व श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकरांनी 'रामप्रहर' या आपल्या लोकप्रिय सदरात त्यांचा उचित शब्दात गौरव केला - ''शेक्सपीयरचे एक अति बिकट नाटक 'किंग लिअर'  मराठी रंगमंचावर त्या संध्याकाळी आम्ही स-मूर्त आणि साक्षात पाहिले! ते हौशी मंडळींनी उत्साहाने उभे केलेले मूळ 'लियर'चे छायारूप नव्हते. ते अव्वल 'किंग लिअर'च होते. त्याच्या सा-या रौद्र-भीषण व करुण जोशासकट. एक मोठा नट - एक मोठी भूमिका जगवताना पाहिला. मराठी रंगभूमीला मिळालेल्या या नव्या नटश्रेष्ठाचे नाव डॉ. शरद भुथाडिया. मी फार खूष आहे माझ्या मनात नायगराचा धबधबा अजून कोसळतच आहे! 'लिअर' नावाचा उधाणलेला समुद्र आपल्या अक्राळविक्राळ लाटांचे तांडव नाचत माझे सारे अस्तित्व अजून क्षणोक्षणी नव्याने हादरवत आहे. 'लिअर'च्या प्रतिभावंत भाषांतरकाराला आणि हे सगळे वैभव माझ्यापुढे साक्षात मांडणा-या डॉ. शरद भुथाडिया नावाच्या नटश्रेष्ठाला मी सलाम करत आहे''

व्यावसायिक नाटके

भुथाडीया यांनी 1993 ते 95 या कालावधीत ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (ले. अभिराम भडकमकर, दि - चंद्रकांत कुळकर्णी) व ‘राहिले घर दूर माझे’ (ले. शफाअतखान, दि - वामन केंद्रे) भूमिका केल्या. त्याही अनेकांना आवडल्या. त्या दरम्यान ते काही काळ मुंबईत 'पूर्णवेळ कालाकार'  म्हणून राहिले होते. परंतु पुढे, ते वैद्यकीय व्यवसाय व ‘प्रत्यय’ संस्थेच्या कार्यासाठी कोल्हापुरात परत गेले. ते 'प्रत्यय' मध्ये  नवनवे उपक्रम करत असतात. कै. प्रकाश संत ह्यांच्या 'ओझं' कथेवरील एकांकिकेत सहभाग व त्याचे अनेक ठिकाणी स्पर्धांत प्रयोग झाले, बक्षिसेही मिळाली.

डॉ. भुथाडिया 'अवंतिका' सारख्या मालिकांतून तसेच मोजक्या मराठी चित्रपटांतूनही दिसले.

आगामी.

राष्ट्रीय नाटयशाळेच्या एका प्रकल्पांतर्गत भीष्म सहानीलिखित 'कबीरा खडे बजार मे' या नाटकाची निर्मिती 'प्रत्यय' तर्फे केली जात आहे. त्याचे दिग्दर्शन अनिरुध्द सुरवट करताहेत तसेच आईनस्टाईन वर्ष असल्याने एकपात्री नाट्यप्रयोग करण्याचा डॉ. भुथाडियांचा विचार आहे.

- राजीव जोशी

व्हिजन महाराष्ट्र विषयी


व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन ही ना नफा तत्‍वावर सेक्‍शन 25 खाली स्‍थापन करण्‍यात आलेली कंपनी आहे. कंपनीकडून 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' हे वेबपोर्टल चालवले जाते.