ध्येयासक्त दांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते


समाजात काही व्यक्ती अशा असतात की त्या विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होतात आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहतात. समाज आणि देश अशाच काही मोजक्या व्यक्तींच्या आधारावर पुढे जातो. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे थत्ते दांपत्य – नंदिनी आणि सुधीर थत्ते.

सुधीरला ‘अंकीय प्रतिमा संस्करण’ म्हणजेच डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयात केलेल्या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातली पीएच. डी. मिळाली आहे. तो मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्रात बहुशाखीय प्रकल्पात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून संशोधन करत आहे. तर त्याची अर्धांगी नंदिनी कला शाखेची पदवीधर असून आवड म्हणून गृहिणीपद भूषवित आहे. समाजकार्याची ओढ असणारे हे दांपत्य असून समाजकार्यातून त्यांची ओळख झाली, त्यांतून प्रेमाचे बीज रोवले गेले आणि त्याचे रुपांतर लग्नगाठीत झाले. आपण ज्या समाजात वाढलो, ज्या मातीत खेळलो-बागडलो त्या मातीचे व समाजाचे ऋण फेडणे आपले परमकर्तव्य आहे याच भावनेतून त्यांचे सहजीवन सुरू झाले.

एखाद्या संशोधनाला जेव्हा नोबेल पारितोषिक देऊन गौरवले जाते तेव्हा त्या संशोधनाविषयीची बातमी लोक वर्तमानपत्रांतून वाचतात. हे संशोधन खूप महान असणार याची त्यांना खात्री असते, पण हे संशोधन नेमके काय आहे या विषयीची माहिती मिळवण्याची त्यांची उत्सुकता पुरी होऊ शकत नाही. नोबेल विजेते संशोधन हे खूपच प्रगत आणि प्रगल्भ असल्यामुळे त्रोटक बातमी वाचून त्यांचे समाधान होत नाही. हे संशोधन मुलांनादेखील कळू शकेल एवढे सोपे करून लिहिले तर नोबेल पारितोषिकाविषयीच्या सर्वसामान्यांच्या मनातली उत्सुकतेचा वापर त्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करता येईल, असे सुधीर आणि नंदिनीला वाटले. यातूनच  ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ या पुस्तकाची कल्पना निघाली. नवनव्या विज्ञानसंशोधनाबाबत सतत वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सुधीरची आवड आणि अवघड गोष्टीही अतिशय रंजकपणे सांगून मुलांनाही सहजपणे कळतील अशा रीतीने लिहिण्याची नंदिनीची शैली या दोहोंचा संगम ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’च्या निर्मितीत झाला. या कामासाठी हे दांपत्य म्हणजे जणू ‘मेड फॉर इच अदर’ होते. आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच सुरू झाला नोबेलनगरीतील नवलस्वप्नांचा प्रवास.

माधुरी दीक्षित - नेने


खळखळत्या हसण्यातून 'मधुबाला'ची आठवण देणारी, पडद्यावर 'एक-दोन-तीन ' गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, 'हम आपके है कोन' मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे 'आजोबा' पिढीलाही आवडणारी. धक् धक् करूनही 'धसका' न बसलेली, वयाची उत्सुकता कायम टिकवलेली, सिनेमा पार्ट्यात 'न' मिसळणारी, राजकीय लोकांत उठबस 'न' करणारी, कुठल्याही वलयांकित - गॉसिप प्रकरणात न अडकलेली,'प्रहार'सारख्या नाना पाटेकरांच्या सिनेमात 'मेकअप' न करण्याचा 'प्रयोग' करण्याचा आत्मविश्वास असलेली आणि 'चोली के पिछे क्या' चे चित्रण करतानाही ओंगळ न वाटणारी; उलट तरीही तद्दन फिल्मी रसिकांच्या मनात रेंगाळलेली आणि लग्नोत्तर दोन मुलांची आई होऊनही, पडद्यावरच्या पुनरागमनाची उत्सुकता टिकवलेली, रजतपटलावरचे सौंदर्यसम्राज्ञीपद टिकवलेली माधुरी दीक्षित.

डिवाईन वाईल्ड स्कूल या कॉन्व्हेंन्ट स्कूलमधे असल्यापासूनच नृत्याची लय सांभाळलेली, महाविद्यालयीन काळातच राजश्री प्रॉडक्शनच्या 'अबोध' सिनेमाद्वारे (दिग्दर्शक-रघुवीर कुल) पडद्यावर एण्ट्री घेतलेल्या, कथकच्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीमुळे आणि अजय जडेजाला हसण्यात 'बीट' करत, त्याच्यासह जाहिरातीत झळकून स्वत:विषयी उत्सुकता निर्माण केलेली, साध्या संगीतनृत्यप्रेमी उद्योजक घरातून येऊनही कुठल्याही गॉडफादरशिवाय या वलयाच्या जगात यशोशिखरावर पोचलेली, सर्वार्थाने नाव-यश-पैसा लोकप्रियता मिळाल्यावरही, आजोळयाच्या गावी, रत्नागिरीच्या बाजारात निवांतपणे कुळथाचे पीठ खरेदी करु शकणारी, संसाराच्या उंबरठयावर असताना नव्या 'देवदास'मध्ये ऐश्वर्याच्या तोडीस तोड पदन्यास करत नृत्यातून पेश होणारी, श्रीराम नेनेंच्या नॉन फिल्मी घरातल्या डॉक्टरांशी विवाहबध्द होऊन, आरीन आणि रायन या दोन सुंदर छोक-यांची आई झाल्यावरही, 'ग्लॅमर तूसभरही कमी न झालेली, रसिक प्रेक्षकांची सुदंर सखी....माधुरी.

नाट्यकलाकार - डॉ. शरद भुथाडिया


डॉ. शरद भुथाडिया गेली पंचवीस वर्षे कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञ म्हणून खाजगी प्रॅक्टिस व महानगरपालिकेत काम करत आहेत. बलसाड-गुजरातमधील गुजराथी शिंपी कुटुंबात जन्मलेले भुथाडिया इथे स्थलांतरित होऊन कायम वास्तव्यासाठी आले. त्यांचे शाळा-कॉलेजचे शिक्षण कोल्हापुरात झाले. ते मेडिकल कॉलेजात शिकत असताना त्यांनी सोलापुरातील हौशी नाट्यसंस्थेचे नाट्य आराधनाचे संस्थापक-दिग्दर्शक डॉ. वामन देगावकर यांच्या हाताखाली (1974-82) एकांकिका-नाटकांतून छोट्यामोठया भूमिका सादर केल्या. त्यामुळे त्यांना डॉ. देगावकर हे गुरुस्थानी आहेत. त्यांनी स्पर्धांमधून 'उध्वस्त धर्मशाळा' , 'महापूर', अशी  पाखरे येती' अशा नाटकांतून अभिनय केला.

कोल्हापुरात आल्यावर 1882  पासून कोल्हापुरातील 'प्रत्यय' या संस्थेमध्ये भूमिका व दिग्दर्शन. आणखी एक नाट्यसंस्था न काढता 'लृ' सारख्या सामाजिक-साहित्यिक चळवळीचा वारसा घेऊन जन्मलेली पुरोगामी विचारांची ही संघटना. आशयघन सामाजिक जाणिवांची  नाटके करणारी संस्था म्हणून तिची ओळख. तिने कोल्हापुरात वेगळ्या नाटकांचा प्रेक्षक घडवण्याचे मोलाचे काम केले.

एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू (दारिओ फो), घोडा (ज्युलिअस हे), राशोमन (आकिरा कुरुसावा), दुशिंगराव. आणि त्यांचा माणूस (बरल्टॉड ब्रेश्ट) अशा विदेशी नाटककारांची तसेच दि. धों. कुळकर्णी, दत्ता भगत, गो. पु. देशपांडे,  विंदा करंदीकर, रुद्रप्रसाद आणि लक्ष्मीनारायण लाल अशा भारतीय व मराठी नाटककारांची वेगळ्या जाणिवांची नाटके डॉ. भुथाडियांनी दिग्दर्शित केली व त्यांत अभिनयही केला. त्यांनी संस्थेतील नव्या कलाकार पिढीला दिशादर्शनाचे व मार्गदर्शनाचे कामही केले. त्यांच्या व 'प्रत्यय'च्या वेगळ्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत पारितोषिके मिळाली. त्यांना दिल्लीच्या संगीत नाटक महोत्सवात सहभागी होण्याचा मानदेखील अनेकदा मिळाला. 

व्हिजन महाराष्ट्र विषयी


व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन ही ना नफा तत्‍वावर सेक्‍शन 25 खाली स्‍थापन करण्‍यात आलेली कंपनी आहे. कंपनीकडून 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' हे वेबपोर्टल चालवले जाते.