सिंधुताई सपकाळ – श्रीकृष्ण राऊत यांची जिव्हारी लागलेली गझल
माझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली भासते- तो जीवघेणा शेर आहे श्रीकृष्ण राऊत यांचा –
सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता!
मी आईला खूप वेळा विचारले, की ते कोण आहेत? कोठे असतात? तू त्यांना कधी भेटली आहेस का? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळूनही माझी मात्र त्या नावाविषयीची उत्सुकता कमी होण्यास तयार नव्हती आणि अचानक, ‘फेसबूक’च्या माध्यमातून आमची ओळख झाली! पण एकदा ओळख झाल्यावर मी राऊतसरांशी इतकी वर्षें साठून राहिलेले किती आणि काय काय बोलले ते मला आठवतदेखील नाही.
गझलेचा परिचय मला मी डोळ्यांनी वाचलेल्या अक्षरांपेक्षा आईच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांमधून आधी झाला. तिचे संपूर्ण आयुष्य किती खडतर आणि किती संकटांतून गेले! त्या प्रत्येक क्षणी तिला गझलेच्या शब्दांनीच बळ दिले. जणू तिचे स्वत:चे प्रतिबिंब समोर दिसावे आणि अचानक तिच्या एकटेपणात कोणीतरी भागीदार म्हणून यावे, तसे काहीतरी घडले असावे गझलेमुळे तिच्या बाबतीत.