चौथे साहित्य संमेलन - 1906
न्यायमूर्ती गोविंद वासुदेव कानिटकर हे चौथ्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन पुणे येथेच 1906 साली भरले. गोविंद वासुदेव कानिटकर यांचा नावलौकिक साहित्य, संगीत आणि विद्या या तिन्ही क्षेत्रांत होता. ते चित्रकलेचे चाहते होते. त्यांचा अभ्यास वेदांताचा व इंग्रजी वाङ्मयाचा होता. ते साक्षेपी विद्वान म्हणून ख्यातकीर्त होते, त्यांनी मासिक ‘मनोरंजन’ हे सुरेख मासिक1886 च्या दरम्यान सुरू केले. आधुनिक मराठी कथेचे जनक हरिभाऊ आपटे यांनी कानिटकर यांच्या ‘करमणूक’मधूनच कथालेखन सुरू केले. कानिटकरांच्या पत्नी काशीताई कानिटकर ह्यासुद्धा कथालेखिका होत्या. काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत असत. काशीबाई कानिटकर यांनी पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचे चरित्र लिहिले. मराठी कथेची जडणघडण ज्या ‘करमणूक’मधून झाली. ते ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष झाले हा उत्तम योग होता. बहुभाषी जाणकार, अफाट वाचन, सतार उत्तम वाजवणारे असा त्यांचा लौकीक होता. ते न्यायमूर्ती रानडे यांचे जवळचे स्नेही होते. ते कविता उत्तम लिहीत. कविता व विद्वत्ता असे परस्परविरोधी भासणारे गुण त्यांच्या ठायी होते.