अच्युत पालव - सुलेखनाची पालखी


अच्युत पालव याने भारतात सर्वत्र आणि इतर अनेक देशांत देवनागरी सुलेखनाची पालखी नेऊन पोचवली आहे. अच्युतचा ध्यास भारतीय अक्षरलेखन कला भौगोलिक सीमा ओलांडून विश्वव्यापी व्हावी हा आहे. तो केवळ दौरे करून थांबत नाही; तो आपल्या कलेच्या विकासासाठी सर्वकाळ गर्क असतो. त्याचे कलेतील प्रयोग सतत चालू असतात.

अच्युतच्या कलाकारकिर्दीला पंचवीस वर्षे झाली तेव्हा त्याने भारतभर ‘कॅलिग्राफी रोडवेज’ हा उपक्रम राबवला. तो यशस्वी झाला. त्याचे वेगवेगळ्या राज्यांतील कलाकारांशी वैचारिक आदानप्रदान झाले. तो अनुभवसमृध्द झाला. त्याच्या कलेची व्याप्ती वाढली. त्याच्या ह्या भ्रमंतीमध्ये, काही राज्यांत सुलेखनकलेविषयी बिलकुल ज्ञान नाही ही बाब उघडकीस आली. अच्युतमुळे तिथे जागृती निर्माण झाली. त्यामुळेच सुलेखनाबद्दल जागृती हा अच्युतचा ध्यास बनला.

अच्युतला ‘पेंण्टिमेंट इंटरनॅशनल अॅकॅडमी फॉर आर्ट अॅण्ड डिझाइन’ ह्या हॅम्बुर्ग (जर्मनी) येथील संस्थेने प्रथम 1991मध्ये निमंत्रित केले. त्यांनतर त्याची जर्मनीला फेरी जवळजवळ प्रत्येक वर्षी असते. सुलेखनाविषयी कार्यशाळा हा प्रमुख उद्देश. तेथील उपक्रमात ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी होतात. त्याच्या 1991मधील पहिल्या दौर्‍यात त्र्याहत्तर वर्षांची महिला देवनागरी हस्ताक्षरकला शिकायला येत होती! असा उत्साह!

जर्मनीतील सुलेखनकार वर्नर स्नायडर आणि अच्युत ह्यांनी इंग्लंड आणि हॉलंडमध्ये प्रदर्शने मांडली आहेत. रशियासारख्या प्रगत देशात सुलेखनकलेची अधोगती होते ह्याची जाणीव तेथील कलाकारांना आणि संस्थांना होऊ लागली. नॅशनल युनियन ऑफ कॅलिग्राफर्स आणि एम.व्ही.के. एक्झिबिशन कंपनी ह्या तेथील दोन संस्थांनी पुढाकार घेऊन प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. त्यासाठी एकवीस देशांतील कलाकारांना आमंत्रित केले होते. भारतातून अच्युतचा समावेश झाला होता. त्याने तेथे ‘सुलेखनाचे सौंदर्यशास्त्र’ ह्या विषयावर सादरीकरण केले. त्याने हे सादरीकरण मराठीतून केले!

मेंढालेखातील खुशी


गडचिरोली  जिल्ह्यातील मेंढालेखा गावचे गावकरी सध्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या मालकीच्या जंगलातील बांबू विकून त्यांच्या ग्रामसभेने यंदा बारा लाख रुपये मिळवले. पुढील वर्षी ही रक्कम कोटी रुपयांत असेल! त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभा हे ‘त्या गावाचे सरकारच होय’! हे जे मेंढालेखा गावचे विचारसूत्र आहे त्याला यामुळे मान्यता मिळत आहे. मेंढालेखा ग्रामसभा नावाचे पॅनकार्ड त्यांना देण्यात आले आहे आणि आता आयकर खात्याने मागणी केल्यास तो करही भरण्याची तयारी ग्रामसभेने चालवली आहे.

हा राजकीय चमत्कार आहे! स्टेट विदिन स्टेट. एरवी ही संकल्पना सहन न होऊन हाणून पाडली गेली असती. त्याविरुध्द पोलिस कारवाई झाली असती, परंतु येथे केंद्रीय मंत्री जयराम रमेश व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्रिल महिन्यात मेंढालेखा गावात येऊन सर्व कागदपत्रे ग्रामसभेला मिळतील अशी व्यवस्था केली. येथे मंत्री खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधी झाला आणि त्याने लोकांच्या हक्कांचे संरक्षण केले!

मेंढालेखा गाव नक्षलवादी टापूत मोडते. त्या ठिकाणी लोकशाही विकेंद्रीकरणाचा हा लढा यशस्वी झाला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले गेले पाहिजे.

मेंढालेखा गावचा हा लढा पंधरा-वीस वर्षे चालू आहे. ‘दिल्ली-मुंबईत आमचे सरकार आमच्या गावांत आम्हीच सरकार’ ही त्यांची साधी घोषणा कुठच्या कुठे जाऊन पोचली आहे! या गावच्या लोकांची मागणी होती, की गावासभोवतालचे अठराशे हेक्टर जंगलक्षेत्र हे गावाच्या व्यवस्थापनाखाली हवे. कारण ब्रिटिश जमान्यापासून जंगलपट्ट्यात आदिवासी व अन्य वननिवासी यांचे परंपरागत वनहक्क नाकारून ऐतिहासिक अन्याय करण्यात आला. जंगलावर वनखात्याची हुकूमत बसवण्यात आली आणि सरकारी अधिकारी तेथील राजे झाले!. तर्‍हेतर्‍हेचे भ्रष्ट व्यवहार, वनोत्पादनाची परस्पर विक्री अशा कारवायांमधून गावच्या मालकीचा महसूल सरकारजमा होऊ लागला आणि गावकरी अधिकाधिक गरीब होत गेले.

साधना व्हिलेज


मतिमंद प्रौढांना कौटुंबिक जिव्हाळ्याचे आणि हक्काचे घर' म्हणजे कोळवण खोर्‍यात वसलेले साधना व्हिलेज . मतिमंद मुलांना वाढवणे ही आईवडिलांना तारेवरची कसरत असते. अशा प्रौढांसाठी म्हणून 1993 मध्ये ‘साधना व्हिलेज’ची निर्मिती झाली. ‘साधना व्हिलेज’ सुरू करण्यामागे प्रौढ मतिमंदांना दुसरे घर मिळवून देणे, त्यांना अर्थपूर्ण आणि सन्मानाचे आयुष्य जगण्याचा हक्क मिळवून देणे हे उद्देश होतेच, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासारख्या असलेल्या व्यक्तींबरोबर समानतेचे, मैत्रीचे आणि आनंदाचे जीवन जगण्याची संधी मिळावी हाही विचार होता.

चार घरे, त्यात राहणारे आमचे एकोणतीस ‘विशेष मित्र ’, त्या घरांच्या गृहमाता, सोबत राहणारे देशीविदेशी स्वयंसेवक, आजुबाजूच्या गावांतून दररोज कामाला येणार्‍या पंधरा-वीस मावश्या-काका, संस्थेचे इतर कार्यकर्ते असा ‘साधना व्हिलेज’ परिवार आहे. विशेष मित्रांची एकूण चार घरांतून, प्रत्येक खोलीत दोन अशी राहण्याची सोय आहे. प्रशस्त घर, व्हरांडे, स्वच्छ संडास-बाथरूम, हवेशीर खोल्या दिलेल्या आहेत. प्रत्येक घराला एक गृहिणी गृहप्रमुख असून, तिच्याकडे त्या त्या घरातील मुलांचे पालकत्व असते.

सर्वांची दिनचर्या ठरवून दिली गेलेली आहे. चहा, नाश्ता, जेवण यांच्या वेळा, व्यायाम, खेळाच्या वेळा ठरवून दिल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या कार्यशाळांतून त्या त्या व्यक्तीच्या कलाप्रमाणे त्यांना कौशल्य शिकवले जाते, काम दिले जाते. मेणबत्त्या करणे, कागदाच्या पिशव्या बनवणे, विणकाम-भरतकाम, टोपल्या बनवणे, बागकाम करणे यांचे तंत्र शिकवले जाते. त्यातून विक्रीयोग्य वस्तू बनवणे हा मुख्य उद्देश न ठेवता या मुलांसाठी ‘थेरपी’ म्हणून या कामांचा उपयोग जास्त होतो. इथल्या ‘विशेष मित्रां’नी फुलझाड, भाजीपाल्याचे मळे शास्त्रशुद्ध पद्धतीने लावलेले आहेत.