कवितेचं नामशेष होत जाणं


कवितेचं नामशेष होत जाणं - काही 'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्

 

 • ज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही.
 • त्यांचं एक विधान - 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून तो माणूस खरी कविता लिहू शकला की काय?' ह्यावरून सुचलेली गंमत - 'अरुण कोलटकरांना, मॉडर्निटीला दूर ठेवणारे 'मॉडर्न पोएट' म्हणायचं की काय?' - आणि आम्ही मॉडर्निटीला दूर ठेवलं असतं तर ज्ञानदांचं हे 'थिंकिंग' आमच्यापर्यंत 'पोचलं' असतं काय?
   
 • 'सरत्या दशका'चा विचार - त्याचं 'ऍनॅलिसिस' ठीकच आहे. पण गेल्या पन्नास वर्षांचा विचार केला तर काय दिसतं? जनमानसात कुठले कवी शिल्लक आहेत? काही नावं - बहिणाबाई चौधरी, ग. दि. माडगूळकर, सुरेश भट. ही यादी लांबवायची म्हटलं तर शांता शेळके, पाडगावकर, मोघे... इत्यादी. इथं 'जनमानस' महत्त्वाचं आहे. कवितेच्या 'अभ्यासकां'त म्हटलं तर, केशवसुत, मर्ढेकर, बालकवी, कुसुमाग्रज... इत्यादी नावं येतील.
   
 • आता गोची अशी, की ग.दि.मा., सुरेश भट इत्यादी मंडळींना 'कवी'च न समजण्याची आपली 'रीत' 'परंपरा' आहे! त्यामुळे ज्ञानदांचं हे थिंकिंग 'वेबसाइट रुदन' ठरण्याची शक्यता आहे!
   
 • जे कमी गायले गेल्यामुळे जनमानसात जिवंत राहिले, त्यावर ते 'माध्यमांतर' होतं (संगीत हे अतिरिक्त माध्यम) असा प्रतिज्ञााद केला जाईल (जातो) - पण मुळात त्यांच्या शब्दांत कवितेची ताकद होतीच! अन्यथा अनेक सुमार 'गीतकार' कधीच नामशेष झाले आहेत.
   
 • 'लाभले आम्हास भाग्य - बोलतो मराठी' ही सुरेश भटांची कविता, त्यांच्या पहिल्या 'रूपगंधा' संग्रहातली आहे. कौशल इनामदारांनी त्याचं 'स्वाभिमान गीत' केल्यावर ती पुढे अजून पन्नास वर्षं (कदाचित शंभरही!) जिवंत राहील व त्यामुळे सुरेश भटही राहतील असं वाटतं. (त्यात त्यांच्या शब्दांचा वाटा नाही काय?) - आणि हे 'विशफुल थिंकिंग' नाही, तर  आजवरचा इतिहास बघता केलेलं तर्काधारित विधान आहे!
   
 • 'लोकप्रिय होणं - म्हणजे 'कवींचा आणि कवितेचा मृत्यू' अशी भंपक विधानं केली गेली आहेत. पण 'जनाधार' लाभल्याशिवाय कुठल्याही कवीची 'चिरंतना'कडे वाटचाल होत नाही.  हे सत्य तथाकथित विद्वान मंडळी समजून घ्यायलाच तयार नाहीत!
   
 • कविताच काय कथा / कादंबरी / ललित... सारेच प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मराठी नाटकांची अवस्थाही घरघर लागण्यासारखी झाली आहे. त्याची कारणं, ज्ञानदांनी म्हटल्याप्रमाणे 'फ्रॅगमेंटेड' होण्यात आहेत, हे खरं आहे. अन्य काही कारणं अशी असू शकतात ः
   
 • इंग्रजी भाषेनं शालेय / महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रावर आक्रमण केलं आहे. (उध्दव ठाकरेंचे चिरंजीव इंग्रजी कविता / गाणी लिहितात - असं वाचल्याचं स्मरतं.) - आणि हा प्रश्न साऱ्या भारतीय भाषांना सतावत आहे.
   
 • 'डी.टी.पी.'ने छपाईतंत्रात क्रांती झाली. परिणामी आपला कवितासंग्रह दहा-पंधरा हजार रुपयांत कवीच काढू लागले. त्यामुळे 'सुमार' संग्रह 'बेसुमार' संख्येने आले... व वाचकांना कविताच नकोशी झाली.
 • समाजातला तरुण बुध्दिमान (स्कॉलर) वर्ग मोठया प्रमाणात तंत्रज्ञान / आय. टी. / मेडिकल इत्यादी 'नगदी पिकांकडे' वळला. जो पूर्वी लेखन / संपादन / तत्त्वज्ञान इत्यादींकडे लक्ष ठेवून असायचा. पैसा / श्रीमंती हीच महत्त्वाकांक्षा झाली.

      - सदानंद डबीर 

Updated on 4th april 2019

 

मी वृध्द नाही! - सेनापती बापट

प्रतिनिधी 17/06/2010

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य टिळकांच्या नंतर महाराष्ट्राला लाभलेले नेतृत्व म्हणजे शंकरराव देव, असे सगळे समजत होते पण शंकरराव देव जनतेचा तो विश्वास सार्थ ठरवू शकले नाहीत.

विधानसभेवर जनतेचा विराट मोर्चा जाणार हे समजताच, शंकरराव देवांनी हा मोर्चा नेऊ नका, संप करू नका, नाही तर 'आपल्या कार्याचा घात होईल' असे सांगायला सुरुवात केली. त्यांनी 'संपाचा विचार डाव्या पक्षांनी सोडला आहे' अशी लोणकढी थापही ठोकून दिली, पण तसे काही नव्हते. मुंबई ट्रेड युनियनच्या नेत्यांनी संपाचा निर्णय निश्चित केला होता. जनतेला शंकरराव देव एक समर्थ नेतृत्व देतील असा जो विश्वास वाटत होता तो फोल ठरला.

संयुक्त महाराष्ट्राचे सत्याग्रही 18 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता चर्चगेट स्टेशनसमोर जमा झाले. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. सत्याग्रहात सेनापतींसोबत आचार्य अत्रे, कॉ. मिरजकरही सामील झाले होते. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' अशी गर्जना करत पाच-सहाशे सत्याग्रहींचा मोर्चा विधानसभेच्या दिशेने जाऊ लागला.

मोर्चा जेमतेम फर्लांगभर अंतरावर गेला असेल-नसेल, मोर्चाभोवती शस्त्रधारी पोलिसांनी गराडा घातला. सगळ्यांना गिरफ्तार करून क्रॉस मैदानावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीत कोंबून तुरूंगाकडे रवाना केले.

पंढरीची वारी

प्रतिनिधी 17/06/2010

पंढरीची वारी निश्चित कधी सुरू झाली ते सांगणे कठीण आहे. ही वारी ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपुरास जातात. त्यात प्रामुख्याने श्रीज्ञानेश्वर महाराज (आळंदी), निवृत्तिनाथ (त्र्यंबकेश्वर), सोपानदेव (सासवड), मुक्ताबाई (एदलाबाद), विसोबा खेचर (औंढ्या नागनाथ), गोरा कुंभार (तेर), चांगदेव (पुणतांबे), जगन्मित्र नागा (परळी वैजनाथ), केशव चैतन्य (ओतूर), तुकाराम महाराज (देहू), बोधलेबुवा (धामगाव), मुकुंदराज (आंबेजोगाई), जोगा परमानंद (बार्शी), कान्होराज महाराज (केंदूर), संताजी जगनाडे (सुदुंबरे) ह्या पालख्यांचा समावेश होतो. ह्या सा-या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात.

हैबतबाबा आरफळकर ह्या सत्पुरुषांनी पालखीच्या सोहळ्याला नेटके रूप दिले. ते ज्या विशिष्ट क्रमाने अभंग म्हणत असत त्यातून आजची भजनमालिका सिध्द होत गेली. त्यांनी ज्ञानेश्वरमाऊलींच्या पादुका पालखीतून नेण्याची व्यवस्था केली. ते लष्करात होते; त्यामुळे त्यांनी वारीला शिस्त घालून दिली, ती आजही पाळली जाते. त्यामुळे लक्षावधी वारक-यांना शिस्त लावण्यासाठी फौजफाट्याची आवश्यकता भासत नाही.

महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत (Keshavsut)


'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा'

महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक

- सरोज जोशी

नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील कर्तृत्ववान लोकांच्या प्रेरणादायी आठवणी चिरकाल जतन केल्या जाव्यात अशा स्तुत्य हेतूने स्मारके उभारली जातात. कालांतराने, अनेक स्मारकांवर विस्मृतीची धूळ साचली जाते. परंतु मालगुंड येथील केशवसुत स्मारक ह्याला अपवाद आहे. या स्मारकातील कै. गंगाधर गाडगीळ स्मृती दालनासाठी त्यांच्या पत्नी वासंती गाडगीळ ह्यांनी तीन लाख रुपये देणगी दिली आणि राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री सुनील तटकरे ह्यांनी स्मारकाच्या विस्तारकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. 'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा' अशी अलौकिक प्रक्रिया ह्या वास्तूत सुरू झाली आहे.

मालगुंड केशवसुत स्मारक विस्तार भवनाचे भूमीपूजन..केशवसुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. आधुनिक मराठी कवितेचे जनक! कवी केशवसुत ह्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी मालगुंड ह्या गावी झाला. मालगुंड शिक्षण संस्थेने प्रसिध्द साहित्यिकांच्या उपस्थितीत १९६६ ला कविवर्यांची जन्मशताब्दी साजरी केली. तेव्हापासून त्यांचे स्मारक मालगुंडला व्हावे अशी संस्थेची, तसेच प्रत्येक साहित्यप्रेमीची इच्छा होती. मात्र त्यासाठी क्रियाशील प्रेरणा मिळत नव्हती.

रत्नागिरी येथे १९९० साली झालेल्या चौसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक ह्यांनी सदर संमेलनात कविवर्य केशवसुत स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला. त्यांनी मार्च १९९१ मध्ये स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फत स्मारकाची योजना तयार केली. त्यावेळचे साहित्यप्रेमी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व त्यानंतरचे मुख्यमंत्री शरद पवार ह्यांनी या प्रकल्पाला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले. ह्याशिवाय इतर साहित्यप्रेमी संस्था/व्यक्ती ह्यांच्याकडून निधी जमवण्यात आला. मालगुंड शिक्षण संस्थेने स्मारकासाठी एक एकर जागा विनामोबदला दिली. यातून केशवसुतांचे भव्य व देखणे स्मारक साकार झाले.

स्मारकाची संकल्पना मुंबईचे स्थापत्यकार अभय कुलकर्णी ह्यांची असून सल्लागार म्हणून अनुभवी स्थापत्यशास्त्रज्ञ फिरोझ रानडे ह्यांनी काम केले. या स्मारक भवनाचे भूमिपूजन मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या हस्ते २६ जानेवारी १९९२ रोजी झाले, तर पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३ मार्च १९९२ रोजी करण्यात आली. स्मारकाचे उद्धाटन कविवर्य कुसुमाग्रज ह्यांच्या हस्ते ८ मे १९९४ रोजी झाले. त्यांनी 'केशवसुत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे' असे म्हणून 'मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे' असे आपल्या भाषणात गौरवाने म्हटले.

गंगाधर गाडगीळ स्मृतिदानलचे उद्घाटन सुनिल तटकरेस्मारकात दोन मोठी दालने आहेत. त्यांपैकी एक दालन आधुनिक मराठी काव्यसंपदेचे असून त्यामध्ये सन १८८५ ते १९८५ या कालखंडातल्या ठळक, कर्तृत्ववान, नामवंत कवींची रेखाचित्रे, त्यांचा अल्प परिचय आणि त्यांची गाजलेली कविता प्रदर्शित करण्यात आली आहे. दालनाचे उद्धाटन २ जानेवारी १९९९ रोजी बाहत्तराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट ह्यांच्या हस्ते करण्यात आले. दुस-या दालनात कविवर्य केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आहे. ग्रामीण भागातील 'अ' दर्जा प्राप्त झालेले रत्नागिरी जिल्ह्यातले ते पहिले ग्रंथालय आहे.

स्मारक भवनाच्या पुढे एक छोटेसे केशवसुत स्मृती उद्यान आहे, तर स्मारक भवनाच्या मागील बाजूस खुला रंगमंच असून तेथे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रम  होत असतात. साहित्यिकांसाठी अतिथी निवास म्हणून दोन सुसज्ज खोल्या उपलब्ध आहेत.

स्मारक संकुलामध्ये केशवसुतांच्या जन्मघराचे जतन करण्यात आले आहे. या जन्मघराची दुरुस्ती करतानाही घराचा मुळचा कोकणी बाज प्रयत्नाने जपलेला आहे. सदर वास्तूमध्ये केशवसुतकालीन वस्तू संग्रहालय असून, त्यामध्ये लामणदिवा, घंगाळ, माचा, झोपाळा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

मालगुंड येथील केशवसुत स्मारकपर्यटन विकासांतार्गत उपलब्ध झालेल्या निधीतून, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्मारक परिसरात जन्मघराचे नूतनीकरण, प्रेक्षागृहाची सुधारणा, पाणीपुरवठा, पायवाट (पाखाडी), केशवसुत काव्यशिल्पे, कारंजे इत्यादी कामे झाली आहेत. तसेच दारासिंग (खासदार, राज्यसभा) ह्यांच्या खासदार निधीतून दहा लक्ष रुपये, रामनाथ मोते (आमदार, विधानपरिषद) ह्यांच्या आमदार निधीतून दहा लक्ष रुपये, तसेच 'क' वर्ग गाव पर्यटन विकासांर्तंगत महाराष्ट्र शासनाकडून १७.१ लक्ष रुपये इतका निधी प्राप्त झाला. त्यातून केशवसुत स्मारक विस्तार भवन (सांस्कृतिक व कम्युनिटी हॉल) बांधण्यात आले.

ग्रंथालयासह स्मारकाची व्यवस्था पाहण्यासाठी पाच कर्मचारी नेमलेले असून संपूर्ण स्मारक प्रकल्पासाठी अनुभवी, जाणकार व्यक्तींची स्थानिक व्यवस्थापन समिती आहे.

को.म.सा.प.सारखी वर्धिष्णू संस्था आणि सर्वांना प्रेमाच्या धाग्याने एकत्र आणणारे कुशल लोकसंग्राहक साहित्यप्रेमी मधू मंगेश कर्णिक ह्या स्मारकाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. केशवसुत स्मारकात को.म.सा.प.ची संमेलने भरतात. वार्षिक स्नेहमेळावा साजरा होतो. चर्चासत्रे आयोजित केली जातात. कविसंमेलने गाजतात. एकूण साहित्याचा जागर आणि अभिसरण, साहित्यिकांचा वावर या वास्तूत असतो. केशवसुतांचे हे स्मारक नुसते भव्य, देखणे नाही तर श्वेत पद्मासना शारदेचे हे लाडके वसतिस्थान आहे. गणपतीपुळ्याच्या श्री गणपती तीर्थाशेजारी केशवसुतांचे हे काव्यतीर्थ लेखकांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत असते, महाराष्ट्राची शान वाढवत असते.

- सरोज जोशी

भ्रमणध्वनी : 9833054157

महाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र !

प्रतिनिधी 11/06/2010

महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला. शंकरराव देव, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे, मामा देवगिरीकर ही नेतेमंडळी वाटाघाटींसाठी पुन्हा दिल्लीला गेली.

वाटाघाटी संपवून काँग्रेसची नेतेमंडळी मुंबईला परत आली. विमानतळावर वार्ताहरांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला एकाही नेत्याने उत्तर दिले नाही. तिथेच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन चिघळणार असल्याचे स्पष्ट जाणवले.

शंकरराव देव आणि आचार्य अत्रे यांची मुंबईच्या रस्त्यात गाठभेट झाली. अत्र्यांनी देवांना सांगितले, की ''शंकरराव, मुंबईवाचून मी पाच मिनिटे जिवंत राहणार नाही असे लाखो लोकांसमोर तुम्ही त्या दिवशी शिवाजी पार्कवर म्हणालात, पण आता तुम्ही सा-या भारताला तारस्वराने ओरडून सांगा, की मुंबईवाचून महाराष्ट्राचा स्वीकार आम्ही कालत्रयी करणार नाही.''

अत्र्यांच्या या विधानावर शंकरराव एकही शब्द बोलले नाहीत. इथेच महाराष्ट्र काँग्रेस संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर शेपूट घालणार हे निश्चित झाले. नेहरूंना ठणकावून सांगण्याइतपत स्वाभिमान आणि ताठ कणा महाराष्ट्र काँग्रेसच्या एकाही नेत्यामध्ये नव्हता.

महाराष्ट्रघातकी फाजलअली समिती!

प्रतिनिधी 04/06/2010

महाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा महाराष्ट्राचा मुद्दा काहीसा मागे पडला. तरीही दार समिती आणि जवाहर वल्लभ पट्टाभि समिती यांच्या द्वारे राज्य पुनर्रचना अहवाल तयार केले गेले. या दोन्ही अहवालांमध्ये महाराष्ट्रविरोधी सूर स्पष्टपणे जाणवत होता.

त्यानंतर राज्यपुनर्रचनेसाठी फाजलअली समितीची स्थापना झाली. या समितीने महाराष्ट्राचा घात करण्याचा जणू उच्चांक केला. त्यात महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा पद्धतशीर डाव होता. या समितीने विदर्भाचे खंडन, बेळगाव-कारवारचे विभाजन आणि मुंबईच्या उरावर गुजरातचा धोंडा सुचवले होते.

एकूणच, महाराष्ट्रावर असणारा उत्तर भारतीयांचा राग या अहवालातून प्रकट होत होता. त्यांचा महाराष्ट्रावर इतका राग का? व कशासाठी? याचा विचार करायचा झाला तर त्यासाठी इतिहासाची पाने चाळावी लागतील. महाराष्ट्राइतकी शौर्याची परंपरा भारतातल्या अन्य भागांत क्वचितच आढळते. महाराष्ट्र १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर होता. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे मराठी होते. स्वातंत्र्याची चळवळ १९२० पर्यंत महाराष्ट्रातून (पुणे शहरातून) चालवली जात होती. गांधीचा मारेकरी नथुराम गोडसे हा महाराष्ट्रातला होता. (महाराष्ट्रातही अजब वल्ली कमी नाहीत! महाराष्ट्र हिंदू सभेतर्फे त्याची जन्मशताब्दी साजरी होत आहे! – १९ मे) महाराष्ट्र प्रबळ राहिला तर आपल्या सत्तास्थानाला धोका पोचू शकतो याची तत्कालीन नेत्यांना भीती वाटत होती.

पारांच्या ओळींचे पारोळा


पोराळ्याचा भक्कम दगडाचा पार आणि चिमुकले मंदीर वडपिंपळाचा पार ही कल्पना पारंपरिक म्हणूनच तिचा समावेश आपल्या नगररचनेत होत आला आहे. आपण वृक्षांना देवासमान मानत असल्याने त्यांची स्थापना दगडाच्या पारावर करतो. तुळशीला वृंदावनात स्थापन करतो. नगररचनेत पार हा अविभाज्य भाग बनत असे. तसे पाश्चात्य संस्कृतीत नसल्याने आधुनिक नगररचना शास्त्रात त्याचा उल्लेख नसतो.

गेल्या साठ वर्षांत अनेक नगरांचे विकास नकाशे बनले, पण कोणीही पाराचा समावेश नगररचनेत केला नाही. मुंबई , कोलकाता, दिल्ली या, इंग्रजांनी रचलेल्या नगरांत पार नाही. अनेक गावांतले पार डोळ्यांत भरतात. वटपौर्णिमेला सजलेल्या सुवासिनी वडाभोवती जमतात आणि त्यावेळी पारावर इंद्रधनुष्य अवतरते!
 

माझ्या आठवणीतला पार कल्याणचा. मुंबई, बेळगाव, कारवार, डांग, दादरा, नगरहवेलीसह संयुक्त महाराष्ट्र मिळालाच पाहिजे ही चळवळ जोमात होती,  तेव्हा आचार्य अत्रे यांचा दैनिक ‘मराठा’ आग ओकत होता. तो वाचल्याशिवाय कल्याणकर जेवत नसत. तेव्हा दैनिक ‘मराठा’ कल्याणपर्यंत येण्याआधीच संपून जायचा. कोणीतरी रात्रपाळीवाला 'मराठा' घेऊन येई आणि त्याचे पारावर उभा राहून सार्वजनिक वाचन करे. ते ऐकायला गर्दी होत असे. तो पार कल्याणच्या जन्मापासून असावा. पाराचे नगराच्या भावनिक जीवनात महत्त्वाचे स्थान होते.
 

भारतीय चित्रपटांचा वारसा

प्रतिनिधी 20/05/2010

 

 

भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो...

'राजा हरिश्चंद्र'... चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू झालेलं पर्व चित्रपट रसिकांना सतत उत्तमोत्तम कलाकृती देत आलं आहे.

विविध भाषा, प्रांत आणि संस्कृतींमुळे समृध्द होत गेलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीला काळानुरूप मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तिची उंची वाढवणारी ठरली. महाकाव्यांपासून अभिजात साहित्यकृतींपर्यंत आणि भावनिक विषयांपासून नवीन तंत्रज्ञानाला गवसणी घालणारे चित्रपट हे या सृष्टीचं वैभव. भारतात आज तर, दरवर्षी सुमारे एक हजार चित्रपट तयार होतात!

देशात निर्माण होणारा चित्रपटांचा हा खजिना जतन करण्याचं महत्त्वाचं काम पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे केलं जातं. पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरात असलेल्या फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) अर्थात तेव्हाच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरात १९६४ साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची (नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया - एनएफएआय) स्थापना करण्यात आली. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा माध्यम विभाग असलेलं हे संग्रहालय भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. पुणे हे या कार्याचं मुख्यालय असून बंगळुरू, कोलकाता आणि तिरूवनंतपुरम् अशा तीन ठिकाणी एनएफएआयची विभागीय कार्यालयं आहेत. सुमारे सहा हजार चित्रपट, दोन लाख पोस्टर्स आणि फोटोग्राफ यांचं उत्तम कलेक्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आहे.

Where The Heritage of Indian Cinema Comes Alive... हे ब्रीद असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारतीय चित्रपटांचा इतिहास, त्यांची परंपरा, त्यांतील विविध पैलू, वैशिष्ट्ये आणि त्यातील कलेचे कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोचवणे हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. भारतीय चित्रपटांबरोबरच विदेशांतील, विविध भाषांमधील चित्रपट भारतीय अभ्यासकांना येथे उपलब्ध करून दिले जातात. केवळ चित्रपट नाही तर त्याच्याशी संबंधित साहित्य, फोटो, गाण्यांची बुकलेट्स आणि पोस्टर्स हे साहित्यदेखील भारतीय चित्रपटांच्या अभ्यासासाठी मोलाचं ठरत आहे. देशभरात चित्रपटविषयक संस्कृतीचा प्रसार आणि परदेशामध्ये भारतीय चित्रपटांचा प्रचार करण्याचं कार्य या विभागातर्फे केलं जातं. पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरील बॅरिस्टर जयकर बंगल्याच्या परिसरात एनएफएआयच्या कार्याचा विस्तार अधिक जोमानं झाला.

चित्रपटाशी संबंधित विषयांमध्ये संशोधन करणा-या व्यक्तींना केवळ प्रोत्साहन देण्याचं नाही तर त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम एनएफएआयतर्फे केलं जातं. चित्रपटांच्या विविध पैलूंवर आधारित उपक्रम इथं राबवले जातात. भारतीय चित्रपटांचा इतिहास हा पैलू तर अधिक प्रभावीपणे हाताळला जातो.

अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एक पॅनल : जब्बर पटेल, मोहन आगाशे सहभाग

चित्रपटांविषयीचा अभ्यास करणारे संशोधक आणि विद्यार्थी यांच्यासाठी संग्रहालयातील चित्रपट, व्हिडिओ कलेक्शन, डॉक्युमेंटेशन विभाग आणि ग्रंथालयांची कवाडं कायमच खुली असतात. एनएफएआयच्या सुसज्ज अशा ग्रंथालयात चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलांवर आधारित पुस्तकं आणि नियतकालिकं अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. अशा प्रकारची पुस्तकं आणि नियतकालिकं वाचकांना उपलब्ध करून देणारं देशातलं हे एकमेव ग्रंथालय आहे. इथं असलेली चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर जगभरातून प्रसिध्द झालेली सुमारे 25 हजार पुस्तकं म्हणजे अभ्यासक-वाचकांसाठीचा खजिनाच आहे. मुख्य म्हणजे अभ्यासकांच्या संदर्भासाठी बांधणी स्वरूपात करून ठेवण्यात आलेले 1920 पासूनचं सेन्सॉर रेकॉर्ड आणि 1930 पासूनचे भारतीय चित्रपटविषयक मासिकांचे बांधणी केलेले व्हॉल्युम्स, तसंच संदर्भ आणि अभ्यासासाठी महत्त्वाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे.

संयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध

प्रतिनिधी 14/05/2010

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अनंत विश्वनाथ गोलतकर ह्यांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. त्यांना काय झाले? मुलगा की मुलगी? त्या अपत्याला हे माहीत आहे का, की आपले वडील आपल्या जन्मवेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झाले आहेत?

आचार्य अत्रे यांच्या 'क-हेचे पाणी' या पुस्तकात अनंत गोलतकर यांचे हौतात्म्य, त्यांच्यावरील अन्याय ह्याबाबत सविस्तर आढावा आहे. परंतु त्यांच्या गरोदर पत्नीचे पुढे काय झाले याची हकिगत कळली नव्हती व ती चुटपुट लागून राहिली. ह्या अपत्याचा शोध कसा घ्यायचा? गोलतकर हे सावंतवाडी जवळच्या तोंडवली गावचे हा उल्लेख अत्र्यांचा पुस्तकात आहे. मी १५ एप्रिलला रत्नागिरीच्या बी.एस.एन.एल.मध्ये अधिकारी असलेल्या सौ. ज्योती दीक्षित या माझ्या मैत्रिणीला फोन केला. तिला गोलतकरांची कथा सांगितली आणि काही माहिती मिळते का? याचा तपास काढायला सांगितला.

सुलक्षणा गोतलकरमी १६ एप्रिलला इंटरनेटवरून बी.एस.एन.एल.ची डिरेक्टरी पाहिली, पण तोंडवली नावाचे पान उघडेना. मात्र मालवण तालुका नावाने पान उघडले. गोलतकर असे नाव दिल्यावर, जवळ जवळ पंधरा गोलतकर मिळाले. त्यात तोंडवलीतले एक नाव मिळाले आणि मला अतिशय आनंद झाला. मी तातडीने तेथे फोन लावला, पण तो फोन बंद होता. पुन्हा एकदा तो विषय तिथेच संपला.

सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा

प्रतिनिधी 30/04/2010

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, सांस्कृतिक जडणघडणीत अनेक स्थित्यंतरे आली. पहिल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्र समृध्द, संपन्न झाला. कला, संस्कृती बहरली. राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले. समाजकारणाची बैठक व्यापक झाली. विचारवंत, सुधारक आणि पत्रकार यांनी केलेल्या चळवळींनी महाराष्ट्र जागृत झाला, पेटून उठला, शिक्षणाचा प्रसार झाला. समाज सुशिक्षित झाला. महाराष्ट्राची धारणाशक्ती विस्तृत झाली. लेखक-साहित्यिकांनी महाराष्ट्रशारदेला अन् रसिकांना संपन्न केले. औद्योगिकीकरणाचा जोर वाढला. महाराष्ट्र प्रगतिपथावर होता.

परंतु पुढील पंचवीस वर्षे म्हणजे 1985 नंतरचा काळ महाराष्ट्रासाठी यशदायी ठरले नाही. 1985 नंतर बदलाचे वारे वाहू लागले आणि हे बदल इतके परिणामकारक होते, की त्यामुळे अवघा महाराष्ट्र पाश्चात्य संस्कृतीच्या स्वाधीन झाला. राजकारणात गटबाजी, भ्रष्टाचार बोकाळला. राजकारण्यांनी केलेल्या चळवळी या जनतेच्या भावनांचा, प्रादेशिक अस्मितेचा वापर करून भावनिक स्तरावर घडवून आणल्या. या चळवळींना व्यापक वैचारिक अधिष्ठान नव्हते. म्हणूनच त्यातून झालेले निर्णय हे अन्याय्य ठरले.) राजकारण्यांच्या दबावाखाली पत्रकार, विचारवंत दबले. वैचारिक चळवळी मंदावल्या. समाजाचा वैचारिकतेवरचा विश्वास उडाला. कृतिशून्य अन् उदासीन असा हा समाज भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अधीन झाला अन् परिणामी मूल्यांचा -हास सुरू झाला. नैतिकता ढासळली आणि या सा-याचा मोठा परिणाम म्हणजे व्यक्ती आत्मकेंद्री होऊन समाजापासून दूर गेली!