महाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश - डॉ. दाऊद दळवी


'माधवबाग कृतार्थ मुलाखमालेत' दाऊद दळवी“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक परंपरा लाभली.” अशा शब्दांत इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी यांनी महाराष्ट्राच्या संपन्नतेविषयीच्या सर्वसाधारण समजुतीला छेद दिला. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, ‘सानेकेअर ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथाली’ यांच्या  विद्यमाने आयोजित ‘माधवबाग कृतार्थ मुलाखतमाले’च्या दुस-या पर्वात दादर - माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात डॉ. दळवी यांची मुलाखत झाली. दाऊद दळवी यांनी राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काही महाविद्यालयांतून काम केले. ते ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांची मुलाखत कॉर्पोरेट अधिकारी व तंत्रसल्लागार चंद्रशेखर नेने यांनी घेतली. दळवी यांनी मुख्यत: महाराष्ट्रामधील लेण्यांच्या रूपातील समृद्ध इतिहास उपस्थितांसमोर उलगडून मांडला.

ते म्हणाले, की “महाराष्ट्राच्या इतिहासाला सर्वसाधारणपणे छत्रपतींच्या काळापासून सुरुवात केली जाते. त्यामुळे त्याआधीच्या महाराष्ट्रात काहीच नव्हते, तो वैराण प्रदेश होता, अशी समजूत रूढ झाली आहे. पण या भूमीचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी इसवी सनाच्याही काही दशके मागे जावे लागेल. सातवाहन हा वंश जवळजवळ साडेचारशे वर्षे अव्याहतपणे महाराष्ट्रात राज्य करत होता. सातवाहन राजांनी समृद्ध राज्यकारभार केला. त्यावेळी महाराष्ट्राचा व्यापार युरोपात रोमपर्यंत चाले. ग्रीक व रोमन संस्कृतीच तेथे प्रबळ होत्या.” दळवी म्हणाले की, “देशातील एकूण बाराशे लेण्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. येथे मिळणारा बेसाल्ट हा अग्निजन्य दगड हे त्याचे एक कारण आहे. त्या दगडात कोरलेली लेणी ही शाश्वत स्वरूपाची आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक सुबत्ता. ती असल्याशिवाय लेणी तयार केली गेली नसती.”

मासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक

अज्ञात 01/11/2013

तत्कालीन सामाजिक बदलांचे दर्शन घडवणारे मासिक मनोरंजन अंकाचे मुखपृष्ठ  ‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला अंक १८८५ च्या जानेवारीत प्रसिद्ध झाला. १९३५ च्या फेब्रुवारीमध्ये आपला शेवटचा अंक एकाएकी प्रसिद्ध करून ‘मनोरंजन’ने आपल्या अंगीकृत कार्याची धुरा आपल्या पडत्या काळात जन्मास आलेल्या ‘रत्नाकर’, ‘यशवन्त’ यांसारख्या नव्या जोमाच्या मासिकांवर टाकून हजारो मराठी वाचकांचा अचानकपणे निरोप घेतला. त्या सर्व वाचकांनी ‘मनोरंजन’वर जिवापलीकडे प्रेम केले होते. त्यामुळे ‘मनोरंजन’च्या निधनाने सगळ्यांनाच हळहळ वाटली. ‘मनोरंजन’ चाळीस वर्षे जगले; ‘मनोरंजन’चे मालक आणि संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र ह्यांनी ‘मनोरंजन’ला अक्षरश: लहानाचे मोठे केले. ‘मनोरंजन’चा पहिला अंक हा फक्त बारा पानांचा होता. पुढे, तेच ‘मनोरंजन’ शंभर पानी झाले. पहिल्या अंकाच्या छोट्या संपादकीयात मित्रांनी म्हटले होते, की “आम्ही कशाकरता अवतार धारण केला आहे व पुढे काय काय कामे करणार आहोत, हे स्वमुखाने बरळण्यापेक्षा आमचे उद्देश आमच्या सर्वांगाचे परिशीलन केल्याने हळुहळू आमच्या प्रेमळ आश्रयदात्यांच्या लक्षात येतील, असे आम्हास वाटते. आम्ही आम्हास जे करायचे आहे ते सवडीसवडीप्रमाणे करून दाखवू एवढेच या ठिकाणी सांगण्याची परवानगी घेतो.” मित्रांनी विनयपूर्वक दिलेले हे अभिवचन ‘मनोरंजन’ने फारच थोड्या कालावधीत अक्षरश: पुरे करून दाखवले.

लंडनचा गणेशोत्सव


महाराष्ट्र मंडळ लंडनचा गणेशोत्सव “मला गणपती बसवण्याची अनुमती द्या. पुढचे सोपस्कार माझ्यावर सोपवा.” सुधाकर खुर्जेकर यांचे हे उद्गार.

लंडनच्या ‘महाराष्ट्र मंडळा’ची जानेवारी १९८९ मध्ये स्वत:ची वास्तू झाल्यानंतर गणेशोत्सव सुरू करावा असे सर्वांना वाटे, परंतु गणेशोत्सवाचा विषय निघाला, की अनामिक भीती सर्वांना सतावायची, की आपल्याला हे कार्य निभावता आले नाही तर! उत्सवात खंड पडून भलतेच आरिष्ट ओढवण्यापेक्षा ते साहसच करू नये, हे मंडळाचे भय.

पण खुर्जेकर १९९१ मध्ये अध्यक्ष झाले आणि त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. खुर्जेकर ठाम होते. त्यांनी कार्यकारी मंडळाला आश्वासन दिले, की निर्धास्त राहा. ते म्हणाले, “गणेशोत्सवाची प्रथा काही कारणाने बंद पडण्याची वेळ आली तर त्या वर्षापासून उत्सव माझ्या घरी सुरू होईल!” त्यांच्या उद्गारांनी चिंता मिटली. गणेशोत्सवाला मुळी विरोध नव्हताच. जी भीती वाटत होती ती खुर्जेकरांनी दूर केली. अशा त-हेने १९९१ पासून ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ ह्यांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.

सुरुवातीपासून, मंडळाचा प्रयत्न लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचा आहे. समाजप्रबोधन तसेच बौद्धिक कार्यक्रमांना अग्रक्रम दिला जातो. ह्या वर्षी डॉ. वासुदेव गोडबोले ह्यांची ‘सावरकरांचा बुद्धिवाद’ आणि ‘श्री गणेशाची पूजा का करावी?’ अशी दोन व्याख्याने झाली.

इंद्रवज्र


पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! हा अत्यंत दुर्मीळ योग हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता. संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे आणि इतर दुर्गयात्री निसर्गाचा हा अनुपम सोहळा 'याची देही याची डोळा' पाहून पुरते हरखून गेले! हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर पुन्हा एकदा दिसले होते अत्यंत देखणे आणि दुर्मीळ 'इंद्रवज्र'!

हरिश्‍चंद्र गडावर टिपलेले इंद्रवज्रचे छायाचित्रइंद्रवज्र दिसल्याची सह्याद्री परिसरात पहिल्यांदा अधिकृत नोंद केली ती कर्नल साईक्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने, तीदेखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर! १८३५ साली! त्यावेळी घोड्यावरून रपेट मारत सकाळच्या वेळेला कोकणकड्यावर गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले. मध्यभागी साईक्स आणि त्याचा घोडा, सोबतची माणसे यांच्या प्रतिमाच त्याला समोरच्या गोलाकार ढगांमध्ये उमटलेल्या दिसल्या! सृष्टीची ही नवलाई पाहून सारेजण चकित झाले, बुचकळ्यातही पडले.

नगर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये ८९८व्या पानावर त्याची नोंद आढळून येते. गॅझेटकारांनी नोंदवले आहे, की Accompanying the brilliant rainbow circle was the usual outer bow in fainter colors. The foking or Glory of Buddha as seen from mount O in West Chain tallies more exactly with the phenomenon than Colonel Sykes, description would seem to show. या वर्तुळाची त्रिज्या पन्नास ते साठ फुट होती. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्य पाहतो; तो स्वत:लाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. मध्यात अत्यंत कलरफुल आणि तेजस्वी दिसणारे हे वर्तुळाकार इंद्रधनुष्याचे तेजोवलय कडेला मात्र फिकट होत जाते.

फिलाडेल्फियातील गणेशोत्सव - 'या सम हा'


लहानपणापासून आपण जे जे चांगले अनुभवले ते ते आपल्या मुलांना अनुभवायला मिळावे, ही आंतरिक इच्छा कमीअधिक प्रमाणात सर्व पालकांमध्ये दिसून येते. शिवाय, पुन:प्रत्ययाचा आनंद कोणास नको असतो? म्हणून वेळ मिळताच, आपण आपले व मुला-नातवंडांचे फोटोआल्बम काढून बघतो आणि गतकाळातील आठवणींत रमून जातो. गणपतीचे आणि शिवाजी महाराजांचे केवळ नाव घेताच उत्साहाचे भरते येणारी मराठी माणसे, निव्वळ व्हिडिओ किंवा फोटोंमध्ये गुंतून न राहता, त्यांची भावसृष्टी नाटके व उत्सव यांच्या माध्यमातून सातत्याने पुनश्च उभी करतात.

अमेरिकेतदेखील हे वेड कमी नाही. तीनशे वर्षांपूर्वी युरोपातून आलेल्या स्थलांतरित मंडळींनी येथे जागोजागी छोटी इटाली, छोटे आयर्लंड, नवे इंग्लंड स्थापन करून, येथील गावांना युरोपातील गावांची नावे देऊन गतकाळाशी धागा जोडला आहे. केवळ इतके करून थांबतील तर ते पक्के अमेरिकन कसले? अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील व अंतर्गत युद्धातील निवडक लढायांच्या जागी जंगलात जाऊन त्या लुटूपुटूच्या स्वरूपात का होईना, पुन्हा लढण्याचा व  अनुभवण्याचा छंदही हौशी मंडळी गेली कित्येक दशके जोपासत आहेत. अशा हौशी लोकांच्या सहवासात राहून, जात्याच उत्साही असलेल्या मराठी माणसांचे गुण द्विगुणित होणे हे ओघाने आलेच!

परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव

अज्ञात 09/09/2013

रॅले येथे साजरा करण्‍यात येणारा गणेशोत्‍सवगणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. विघ्नविनाशक, सिद्धिविनायक म्हणून त्याला मराठी मनात एक विशेष स्थान आहे. अमेरिकेत ‘एशियन एक्सक्लूजन अॅक्ट’ नावाचा कायदा १९२४ पर्यंत होता. त्यानुसार एशियन लोकांस अमेरिकेत वसण्याची मनाई होती.  त्यानंतर ते चित्र बदलले व १९५० च्या दशकाच्या अखेरीस तुरळक भारतीय अमेरिकेत स्थायिक होऊ लागले. त्यावेळी बहुतेकजण एक पेटी नि आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले. त्यात मराठी, संख्येने अत्यंत थोडे पण त्यांनी निदान गणपतीचे चित्र बरोबर आणलेले असे. मग ते टेपने भिंतीवर चिटकवायचे नि मनोमन त्याची प्रार्थना करायची. काही वर्षे गेली. शिक्षण-नोकरी यांत स्थैर्य आले. घरात मुलांचे आगमन झाले नि आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती द्यायला हवी, सभोवताली संस्कारशील अनुकूल वातावरण नाही; तेव्हा आपणच मुलांना ते शिकवायला हवे याची जाणीव प्रबळ होऊ लागली. मराठी माणसांची संख्या हळुहळू वाढत होती. गावोगावी असतील तेवढी मराठी मंडळी कुणाच्या तरी घरी एकत्र जमत. त्या काळात तेथे मिळत असलेले सामान घेऊन जमेल तेवढे भारतात गणपतीच्या दिवसांत बनवतात तसे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत. सर्वजण एकत्र टाळ्यांच्या गजरात ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ आरती म्हणत. कुणीतरी पेटी हाती घेई, कुणी गाणी म्हणत नि शनिवार-रविवारचा दिवस पाहून केलेला गणेशोत्सव असा साजरा होई. आपल्या मुलांना निदान गणपती म्हणजे काय ते दाखवल्याचे समाधान होई. आपली मुले गणेशास अमेरिकनांसारखे ‘एलिफंट गॉड’ न म्हणता गणपती म्हणताहेत, गणपतीच्या रूपामागील प्रतीकात्मकता त्यांना कळू लागली आहे एवढे समाधान पालकांना असे.

धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची


श्री लक्ष्‍मीपल्लिनाथ देवस्‍थानभर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं देखील घामाघूम व्हायला होते. पण तरीही उन्हाळ्यामध्ये आमची कोकणात वारी ठरलेली असते. मला जायला नाही मिळाले, तरी आमच्या घरची मंडळी हमखास कोकण गाठतात. निमित्त असते, हनुमान जयंतीला होणाऱ्या आमच्या गावच्या उत्सवाचे! म्हणजेच पालीच्या लक्ष्मी पल्लीनाथाच्या उत्सवाचे.

लक्ष्मी पल्लीनाथ हे रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावचे दैवत. मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूरकडे जाणारा फाटा जिथे फुटतो, तिथे पाली हे गाव आहे. पुण्यापासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीपासून बावीस किलोमीटरवर. दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत ‘श्री लक्ष्मी पल्लीनाथा’चा उत्सव मोठ्या उत्साहात पण साधेपणाने साजरा होतो. भपका कमी असल्यामुळेच तो अधिक भावतो!

चूल – ग्रामसंस्कृतीचा स्पर्श


‘चूल’ ग्रामसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. चुलीला प्राचीन इतिहास आहे; मानवाला अन्न‍ शिजवून खाण्याची सवय लागली ती चुलीमुळे तीन दगडाची, मातीची, सिमेंटची, पत्र्याची, विद्युत अशा प्रकारे चुलीच्या; रचनेत व आकारात काळानुरूप बदल होत गेला, पण ग्रामसंस्कृतीत मातीच्या चुलीचे महत्त्व कायम  दिसते.

चुलीस खानदेशात ‘चुल्हा’ असे म्हणतात. चूल हे चुलीसाठीचे स्त्रीलिंगी संबोधन असून ‘चुल्हा’ हे पुरूषवाचक संबोधन आहे. चुलीला हिंदीत ‘चुला’ आणि गुजरातीत ‘चुल्हो’ असे म्हटले जाते. चुलीचे खानदेशात ‘उलचूलचा चुल्हा’, ‘सडा चुल्हा ’ किंवा ‘एकोरा चुल्हा’ हे दोन प्रमुख प्रकार असून त्याशिवाय चुलीच्या रचनेनुसार मानण्यात येणारे ‘भोंग्याचा चुल्हा’, ‘पाटीचा चुल्हा’, ‘विटांचा चुल्हा’, ‘दोतोंडी चुल्हा‘, ‘उभा चुल्हा’, ‘डाखोरा चुल्हा,’ व ‘जेवणा चुल्हा’ हे उपप्रकार आहेत.

‘उल्हा’ किंवा ‘उल’ म्हणजे उपचूल. चुलीतून जिच्या आत ज्वाला जातात व ज्यावर दुसरे भांडे ठेवून अन्न पदार्थ शिजवणे शक्य होते अशी उपचूल म्हणजे ‘उलचूल’. अहिराणी भाषेत त्यास ‘उलचुनना चुल्हा’ असे म्हणतात. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार घरात विविध आकारांच्या चुलींची स्थापना होते. मोठ्या कुटुंबात शक्यतो मोठी चूल म्हणजेच ‘उलचूल’ दिसून येते. छोट्या कुटुंबात ‘सडा’ किंवा ‘एकोरा’ चुल्हा दिसतो. काही ठिकाणी दोन ‘सडे’ चुल्हे एका ठिकाणी स्थापून मोठी चूल बनलेली असते. त्यास ‘दातोंडी चुल्हा’ म्हणतात.

चुलीवर तवा तसेच इतर भांडी व्यवस्थित बसावीत व ज्वालांची आच नीट लागावी म्हणून चूल व उलचुलीवर मातीचे उंचवटे बनवले जातात. त्यांना ‘टोने’, ‘बाहुले’ किंवा ‘थानं’ म्हणतात. उंचवटे मुख्य चुलीवरच्या‍ काकणीवर तीन व उल्ह्यावर चार अशा संख्येने असतात. ते स्तनांच्या आकाराचे असल्याने त्यांना ‘चुल्याचे थाने’ असे म्हणतात. चुलीसमोर विस्तव ओढून भाकरी शेकण्यासाठी जो छोटा पसरट ओटा असतो त्याला ‘वटली’, ‘परोटी’, ‘भानस’ किंवा ‘भानसी’ असे म्ह्टले जाते.

ब्लॅक ब्युटी – घोड्याच्या नजरेतून


‘ब्लॅक ब्युटी’ माझ्या वाचनातून अनेक पुस्तके गेली आहेत. कधी कादंबरी, कधी कथासंग्रह, कधी प्रवासवर्णन तर कधी आत्मचरित्र! पण ती सारी पुस्तके आहेत ती तुमच्या-माझ्यासारख्या माणसांवरची,  तशी माणसांशी संबंधित. माणसाने माणसाच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेली. पण मग माणसाप्रमाणे प्राण्यांच्या नजरेतूनही काही कथा असू शकतातच की! प्राण्यांना माणसांप्रमाणे जरी बोलता येत नसले तरी त्यांना मन असतेच ना! आणि मन म्हटले, की भावभावना ह्या आल्या. ते कधी दु:ख असेल तर कधी आनंद, कधी राग असेल तर कधी नैराश्यही! माणसाळलेला असाच एक प्राणी म्हणजे घोडा. घोडा! आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग. घोड्याने जशी अनेक युद्धे पाहिली तसाच तो अनेक शर्यतींत चौफेर उधळलाही आहे. कधी तो श्रीमंतांचा थाट बनून राहिला तर कधी तो गरिबांची निकड बनला. बुद्धीने तल्लख असलेला तो प्राणी कुत्र्याप्रमाणेच माणसाचा लाडका ठरला. परंतु त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या मनाचा ठाव कधी कुणाला लागला का? त्या मुक्या जनावराच्या भावना कधी कुणापर्यंत पोचल्या का? त्याच्या वेदना जाणून घ्यायच्या असतील तर अ‍ॅना सेवेल यांनी लिहिलेल्या ‘ब्लॅक ब्युटी’च्या वाचनाशिवाय पर्याय नाही. एका घोड्याचे आत्मवृत्त हळुवारपणे मांडणारी कादंबरी म्हणूनच जागतिक साहित्यात ‘ब्लॅक ब्युटी’अजरामर ठरली आणि ती सर्वकाल रोचकतेने वाचली जाते.
 

ब्लॅक ब्युटी नावाचा घोडा आहे. जसे माणसाला स्वत:चे स्वातंत्र्य प्रिय असते तसेच ते मुक्या जनावरालाही तितकेच आवडते. म्हणूनच केवळ त्याला काबूत आणण्यासाठी त्याला लगाम घालण्याचा, फॅशनसाठी त्याचा लगाम अधिकाधिक आवळण्याचा, त्याची शेपूट कापून टाकण्याचा माणसाचा खटाटोप हा त्या मुक्या जनावरासाठी किती क्लेशदायक असू शकतो त्याचे चित्रण ‘ब्लॅक ब्युटी’मध्ये करण्यात आले आहे. ते थेट मनाला भिडते.
 

हौसेनं केलेलं काम हा विरंगुळाच असतो - अचला जोशी


अचला जोशी      ‘‘पूर्वीच्‍या एकत्रपणे नांदत्‍या घरांप्रमाणे आपलं आजचंही आयुष्‍य नांदतं असायला हवं. त्‍यामध्‍ये मित्रपरिवार, दूर-जवळचे नातेवाईक, प्रतिभावंत, व्‍यावसायिक अशांची सतत ये-जा असली म्‍हणजे आपल्‍याला संपन्‍नता जाणवते. विकेंद्रित कुटुंबपद्धतीवर आपल्‍या आवडीची माणसं जोडत राहणं हा इलाज असू शकतो,’’ अशा आशयाचे उद्गार लेखिका-समीक्षक आणि प्रख्‍यात ‘वाइन लेडी’ अचला जोशी यांनी ‘कृतार्थ मुलाखतमाले’त काढले. संवादकाच्‍या भूमिकेत असलेल्‍या पत्रकार शुभदा पटवर्धन यांनी उपस्थितांसमोर अचला जोशी यांचे विविधांगी व्‍यक्तिमत्‍त्व ‍उलगडून दाखवले. मुलाखतीचा कार्यक्रम मंगळवार २६ फेब्रुवारी २०१३ रोजी दादर-माटुंगा कल्‍चरल सेंटर येथे पार पडला.

अचला जोशींची मुलाखत घेताना शुभदा पटवर्धन     अचला जोशी यांनी भरपूर वाचन, लेखन, सातही खंडात प्रवास केला आहे. वाईन-क्विल्‍ट-च्‍यवननप्राश यांच्‍या निर्मितीचा उद्योग करत असतानाच त्‍यांनी औद्योगिक, शैक्षणिक, आणि बाल व स्‍त्री कल्‍याण या क्षेत्रांत भरीव समाजसेवा असे विविधांगी पैलू जोपासले. ‘वयाच्‍या अमृतमहोत्सवातही ही सर्व कामे जोमाने सुरू आहेत. ती ऊर्जा तुम्‍ही कुठून आणता?’ असे शुभदा पटवर्धन यांनी विचारले, तेव्‍हा अचला जोशींनी त्‍याचे श्रेय त्‍यांच्‍या आई आणि वडिलांच्‍या सतत काम करत राहण्‍याच्‍या वृत्‍तीला दिले. ‘‘आवडीचं काम असलं म्‍हणजे त्‍याचा थकवा जाणवत नाही. हा मंत्र मी अंगीकारला आहे.’’ असे त्‍या म्‍हणाल्‍या.

     ‘गजबजलेल्‍या माहेरच्‍या घरातनं आता या उतारवयात तुम्‍ही एकट्या राहता त्‍याचा जाच कधी जाणवतो का?’ त्‍या प्रश्‍नावर अचला जोशी म्‍हणाल्‍या, की ‘माझे छंद-अभ्‍यास-व्‍यवसाय सतत चालू असतात. मी एकटी राहते हे खरं आहे पण माझ्या घरात सतत कामाच्‍या निमित्‍ताने ये-जा असते. त्‍यामुळे मला एकटेपणा जाणवण्‍याचा प्रश्‍नच आला नाही. त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, की एकटेपणा ही वृत्‍ती असते. ती माझी नाही.’