नशा ढोल आणि ताशाची


शिवदूर्ग प्रतिष्ठानचे ढोलपथकमिरवणूक म्हटली की ‘डीजे’चे प्रस्थ... मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ‘ढिंचॅक’चे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी... गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा उच्छाद वाटू लागतो. त्यामध्ये मराठी मावळ वाद्य पुढे आणावे हा विचार घेऊन कल्याणच्या काही तरुणांनी ‘शिवदुर्ग प्रतिष्ठान’ नावाचे ढोल-पथक तयार केले आहे आणि कल्याणात; गणपती असो किंवा आणखी कुठला सण, ‘शिवदुर्ग’ला मागणी जोरदार आहे. प्रतिष्ठानचा अध्यक्ष सुशांत दीक्षित हा स्वत: वयाच्या बाराव्या वर्षापासून मावळबरोबर ढोल वाजवतो. ढोलताशाचा आवाज तरुण-तरुणींना आकर्षित करील असा असतो. सुशांत तसाच त्याकडे ओढला गेला. गणपतीत मिरवणुकीसाठी मावळ यायचे त्यांच्याबरोबर तो वाजवायला जात असे. त्यानंतर त्याने स्वत:ची व त्याच्या सहकाऱ्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांच्या पाठिंब्यावर पथक सुरू करण्याचे ठरवले. ढोल-ताशाच का? सुशांतचे उत्तर: मुळात ढोल-ताशा-ध्वज हे आपल्या संस्कृतीतच आहे. शंभर ढोल-ताशे यांचा एकत्रित आवाज हा ‘डीजे’च्या डेसिबलपर्यंत पोचतो. तेव्हा ध्वनिप्रदूषण किती प्रमाणात होते ते पाहा! आमच्या पथकाच्या  आवाजाचा नाद हा समाधान देणारा आहे. तो विशिष्ट तालात वाजवला नाहीतर एकसुरी, कर्कश्श वाटणार. त्यामुळे आमच्या पथकाचा त्रास आजारी माणसांनाही होत नाही व ध्वनिप्रदूषणही होत नाही.

मतिमंदांचे घरकूल


घरकूल     मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील अमेय पालक संघटना. त्यांचे तेथे ‘घरकुल' या नावाने वसतिगृह आहे. मतिमंदांसाठी आणखीदेखील वसतिगृहे चालवली जातात, परंतु ‘घरकुल’ एकमेव आहे याचा प्रत्यय तेथे गेल्यावर येतो. तेथील जिव्हाळा, स्नेहार्द्रता अन्यत्र, कोठे आढळणार नाही आणि त्यामागील प्रेरणास्रोत अविनाश बर्वे आहेत.
     काही पालक मंडळी स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी एकत्र आली. त्या सर्वांनी अमुक एका रकमेचे बंधन न घालता, सुरुवातीस दर महिन्याला जितकी जमेल तितकी रक्कम शिल्लक टाकण्याचे सुरू केले आणि 'अमेय पालक संघटना' १९९१ मध्ये स्थापन झाली. 'घरकुल'ची इमारत १९९५ मध्ये नांदती झाली. 'घरकुल'च्या नवीन छान वास्तूचे उद्धाटन २०१० सालच्या आरंभी झाले.
     'घरकुल'चा पाया रचला गेला तो मूळ डोंबिवलीतील 'अस्तित्व' या संस्थेमधून आणि प्रामुख्याने सुधा काळे व त्यांचे पती कै. मेजर ग.कृ. काळे या सेवाभावी दांपत्याकडून. बापू शेणोलीकर आणि 'घरकुला'त बारा वर्षे कार्यरत राहिलेल्या  कै. उषा जोशी यांचा सहभागदेखील महत्त्वाचा. त्यामुळे संस्थेचा पाया पक्का झाला, संस्कारांची, शिस्तीची दिशा ठरून गेली.
     नंतर त्या कार्यात पुढाकार घेतला तो शिक्षक दांपत्य असलेल्या नंदिनी व अविनाश बर्वे यांनी. त्यांच्या कौस्तुभ या मतिमंद मुलामुळे त्यांचा कार्याशी परिचय झाला. कौस्तुभचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. बर्वे यांनी 'घरकुल'ची जबाबदारी अनेक वर्षे निष्ठेने व सेवातत्परतेने पार पाडली व त्यांनी वर्षापूर्वी ती डोंबिवलीमधील डॉक्टर सुनील शहाणे यांच्या शिरावर २०१२ सालापासून सोपवली आहे.

सहेली : वेश्यांसाठी ‘मै हूं ना!’


सहेलीवेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या, मात्र त्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि त्यांतील वय झालेल्या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी मदत करणारी संस्था ! सहेली! ...

‘सहेली’ १९९८ पासून कार्यरत आहे. संघटनेचे वैशिष्‍ट्य म्हणजे ‘त्याच’ व्यवसायातील दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. कोणीही वेश्या व्यवसायात खुशीने येत नाही. स्त्रिया फसवणूक, गरिबी, निरक्षरता या कारणांनी आमिषाला बळी पडून वेश्या व्यवसायात आलेल्या दिसतात. तिथे आल्यावर त्यांना ‘आपले कोणीच नाही - यातून सुटकेचा मार्ग नाही’ ही भावना ग्रासते. ‘सहेली’ने त्यांच्यातील त्या भावनेला खो देऊन ‘मै हूँ ना!’ हा आधार दिला आहे.

‘सहेली’ने ते काम नेटाने चालू ठेवले आहे. त्यांचे बोर्ड नऊ जणींचे आहे. ‘झिगझणी शिवम्’ या अध्यक्ष आहेत. बोर्ड ‘सहेली’चे धोरणात्मक निर्णय घेते. आठशे महिला ‘सहेली’च्या सभासद आहेत. ज्या महिला केवळ फसवणुकीतून इकडे आल्या आहेत, ज्यांना हा व्यवसाय करायचा नाही आणि ज्यांची शारीरिक क्षमता राहिलेली नाही, अशा महिला ‘सहेली’मध्ये येतात. त्यांच्या हाताला काम दिले जाते. कामाचा मोबदलाही दिला जातो. पोलिस, सामाजिक संस्था या व्यवसायातून स्त्रियांची सुटका करतात, पण त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न योग्य रीतीने सोडवला जात नाही. त्यांचे घर, पालक, समाज त्यांना त्यांच्यात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे सामावून घेत नाहीत. ‘सहेली’द्वारा कम्युनिटी किचन चालवले जाते. संस्थेच्या किचनमध्ये ‘त्या’ महिला स्वयंपाक करतात. तेथे जेवण कमी दरात मिळते. परिसरातील दुकानदार, फिरते विक्रेते, रेडलाइट एरियातील महिला ते अन्न घेऊन जातात. त्यासाठी लागणारा कच्चा माल, भाजीपाला हे सर्व त्याच खरेदी करतात. उपक्रमाला प्रतिसाद चांगला आहे, मोबदलाही चांगला मिळतो. त्या खेरीज संस्था महिलांना मंगल कार्यालये, हॉटेले, वसतिगृह, दवाखाने अशा ठिकाणी काम मिळवून देते. त्यातून त्यांना चांगला पैसा मिळतो. मग साताठ जणी मिळून खोली घेऊन राहतात, स्वत:चा खर्च स्वत: करतात, आर्थिकदृष्‍ट्या स्वावलंबी होतात.

साऊण्ड ऑफ सायलेन्स


ध्रुव लाक्रा ‘मिरॅकल कुरियर्स’ या नावातच जादू आहे! प्रचीती घ्यायची असेल तर सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास के.सी. कॉलेजच्या परिसरात चक्कर टाका. तुम्हाला काळी कॉलर आणि गर्द नारिंगी रंगाचा टी शर्ट घातलेली, खांद्यावर मोठाल्या काळ्या बॅगा घेऊन रस्त्याच्या कडेने जाणारी काही तरुण मुले दिसतील. ती आहेत ‘मिरॅकल कुरियर्स’ . विशिष्ट नारिंगी टी शर्टस् मुळे ती पटकन नजरेत येतात. ती खास त्यांच्यासाठी जन्माला आलेली कुरियर कंपनी आहे. मिरॅकल कुरियर्स – फक्त कर्णबधिरांना नोकरी देणारी कंपनी. अशा पद्धतीची भारतातील ती एकमेव कंपनी आहे.

 ‘मिरॅकल कुरियर्स’चे काम चर्चगेटच्या इंडस्ट्री हाऊसमधल्या जागेत सकाळी नऊच्या दरम्यान सुरू होते. काम रोजच्या डिस्पॅचची विभागणी करणे, पत्रे वाटून घेणे, एरिया ठरवणे आणि नोंदी करणे इत्यादी. ऑफिसमध्ये कुणी बोलत नाही; कमालीची शांतता असते. आवाज असतो तो फक्त कागद, गठ्ठे आणि पाकिटे इथुन तिथे सरकावल्याचा. मुली आलेली पत्रे निवडायची कामे करतात तर मुलगे ती पोचवण्याचे काम करतात. सारे खाणाखुणांच्या भाषेत (साईन लॅंग्वेज) शिस्तीत चाललेले असते. पन्नास कर्णबधिर मुले गोदरेज, महिंद्र अॅण्ड महिंद्र, आदित्य बिर्ला ग्रूप अशा मोठाल्या कंपन्यांसाठी सर्व्हिस देत आहेत. त्यांच्या कामात नेमकेपणा, अचूकपणा आणि वक्तशीरपणा असतो.

हिरवा दूत


विक्रम यंदे सुंदरलाल बहुगुणा किंवा अफ्रिकेच्‍या मथाईबाईंची आठवण यावी, असे काम करत आहे. ठाणे शहरातला तरुण- विक्रम यंदे! झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण, भौतिक सुखाची असीम लालसा ह्या गोष्‍टींमुळे झाडांची संख्‍या सर्वत्र झपाट्याने कमी होताना दिसते. एकीकडे ‘ग्‍लोबल वॉर्मिंग’, ‘ग्‍लोबल वॉर्मिंग’ म्‍हणून कंठशोष करणारे शहरवासीय दुसरीकडे झाडांच्‍या मुळावर उठले आहे. अशा वेळी, विक्रम यंदे झाडांची मुळे जपण्‍याचे हिरवे काम करत आहे. विक्रमला झाडापानांची आवड उपजत आहे. तो ठाण्‍याचा. पूर्वी ठाणे हे घनगर्द झाडांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. ठाण्‍याने विकासाच्‍या बाबतीत मुंबईसारखीच गती घेतली आणि तिथल्‍या वृक्षवल्‍लींचा नायनाट होऊ लागला. रस्‍त्‍यांचा विस्‍तार होऊ लागला आणि विस्‍तारलेली झाडे सपासप कापली जाऊ लागली. मोठ्या झाडांचे पुनर्रोपण झाले खरे, पण त्‍यात माया नव्‍हती. होता तो सरकारी उपचार! विकासाच्‍या ओघात ठाण्‍यातले वृक्षवैभव हरवत गेले.

कळवा येथील नर्सरीत वाढणारी विविध झाडांची रोपे

शब्दांकित


मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग  ‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच! 

 चौघींचे एका मुद्यावर एकमत होते - आमच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत चांगल्या साहित्याच्या वाचनाचा वाटा मोठा आहे. चांगले विचार, सुसंस्कार, शुद्ध आचरण या गोष्टी काही केवळ घरातल्या वळणाने आपल्यात आले नाहीत तर आपण चांगल्या साहित्यातूनही खूप काही शिकलो असे आम्हाला वाटत होते. आम्ही मग असा विचार निश्चित केला, की आपण मुलांसमोर व जमल्यास मोठ्यांसमोरही चांगले साहित्य नेण्याचे काम करावे. विचारमंथनानंतर, ‘अभिवाचन’ हा सादरीकरणाचा प्रकार, आमची वये व कुवत लक्षात घेता आम्हांला जमेल असे वाटले. शब्द हेच आमचे माध्यम राहणार होते, म्हणून आम्ही गटाचे नाव हे ‘शब्दांकित’ असे ठेवले.

मेळघाटातील खोज आणि बंड्या साने!


बंड्याभाऊ उर्फ बंड्या सानेमनगटात जाड पितळी कडं. खादीच्या सदर्‍याच्या सरसावलेल्या बाह्या. डोक्याला बांधलेला गमछा. राठ काळी-पांढरी दाढी. आणि हिंदी-मराठी मिश्र बोली. मेळघाट नामक दुर्गम आदिवासी भागात प्रश्न सोडवण्यासाठी उलाढाल्या करणारं व्यक्तिमत्त्व. नाव-बंड्या साने. काम-कार्यकर्ता. तो गेली पंधरा-वीस वर्षे मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. ‘खोज’ ही त्याची संस्था.

बंड्या साने, पौर्णिमा, अरुणा आणि मनोज हे मित्र मेळघाटकडे १९९४-९५च्या दरम्यान आकर्षित झाले. कुपोषण आणि बालमृत्यू यांबाबतच्या बातम्यांमुळे मेळघाट चर्चेचा विषय बनला होता. त्या भागाची समस्या तरी काय? या कुतूहलापोटी समविचारी-धडपड्या अशा या मित्रांनी मेळघाटचे दौरे केले. त्या भटकंतीत त्यांना काय आढळलं? व्याघ्रप्रकल्पामुळे बावीस खेडी समस्यांच्या चिमटीत सापडली आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार हालचाली करत नव्हतं. व्याघ्रप्रकल्प वाघांच्या संरक्षणासाठी असला तरी त्यात पर्यटन व्यवसायाला खूप महत्त्व असतं. म्हणजे सरकार पर्यटकांच्या सोयींचा विचार करत होतं, पण विस्थापित होणारे आदिवासी मात्र उपेक्षित होते! सरकार पुनर्वसनाची धड हमी देत नव्हतं. दुसरीकडे वाघ वाचवायचे म्हणून तिथल्या नागरिकांना किमान सुविधाही सरकार देत नाही. रस्ते केले तर वाघांच्या पंजांचा माग काढता येणार नाही, म्हणून अनेक खेडी पक्क्या रस्त्यांना मुकली. अनेक गावांत वीजच नाही. अशा भागात आरोग्य सेवा पोचणंही दुष्कर.

वीणा गोखले - देणे समाजाचे


वीणा गोखलेआयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना, त्यावर मार्ग शोधत असताना, उपाय करत असताना, अगदी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते! पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे? तिच्यावर काय उपचार करायचे? कसे करायचे? कुठे करायचे? यासाठी वीणा व तिचे यजमान दिलीप हे वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणा-या संस्थांमध्ये जाऊन येत असत. पुण्यातील, पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील ठिकाणी जात असत. संस्था पाहून आल्यावर, त्यांविषयी आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्यांच्या कार्याविषयी सांगत असत. त्यावेळी वीणा व दिलीप यांच्या असे लक्षात आले, की आपल्या मित्रमैत्रिणींना चांगले सामाजिक काम करणा-या अशा संस्थांविषयी काहीच माहीत नाही!
 

वीणा व दिलीप या दोघांनाही असे वाटले, की चांगले सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांची माहिती लोकांना द्यायला हवी. त्यांचे चांगले काम लोकांपर्यंत पोचवायला हवे. या दांपत्‍याच्‍या मनात, काय केले की आपला हा हेतू साध्य होईल याविषयी विचार चालू असे. अशातच, ते दोघे एक प्रदर्शन पाहायला गेले. प्रदर्शनात अनेक स्टॉल्स असतात. तिथे विविध प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. खरेदी केल्या जातात. आणि अचानक दिलीपना असे वाटले, की प्रदर्शन हे माध्यम चांगले आहे. मग तो विचार पक्का झाला. ही घटना आहे २००५ सालची. सर्व सामाजिक संस्थांचे चांगले काम एका प्रदर्शनातून लोकांच्या समोर मांडावे. अशा प्रदर्शनाचे नाव ‘देणे समाजाचे’ असे असावे.
 

दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी!


डॉ. संजीवनी केळकरसांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह मोहिते, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार अशा तीन गटांच्या गटबाजीमुळे तालुक्याच्या विकासाचे तीन तेरा वाजले! गटबाजीचा फायदा घेत शेकापचे गणपतराव देशमुख दीर्घकाळ त्या भागाचे आमदार राहिले. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, पंचायत समिती, नगरपालिका अशी तालुक्यातील सत्ताकेंद्रे शेकापच्या ताब्यात आहेत, परंतु त्यांना सांगोला तालुक्याची श्रीमंती टिकवता आलेली नाही. अशा या उपेक्षित भागात पुण्यासारख्या, संधींची उपलब्धता असलेल्या शहरातून कोणी जाणार नाही, असे असूनही एम.बी.बी.एस.ला ‘सर्जरी’मध्ये चौथा क्रमांक पटकावणा-या संजीवनी गोडबोले यांनी स्वत:हून सांगोल्यातील ‘स्थळा’ला पसंती दिली. त्या सांगोल्यातील डॉ. सतीश केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांचा प्रेमविवाह नव्हता. वडिलांच्या ओळखीतील दाताच्या एका डॉक्टरांनी स्थळ सुचवले आणि संजीवनी सांगोल्याच्या झाल्या. नात्यातला महिलांनी संजीवनी यांच्या मातोश्रींना त्यावेळी म्हटले, हा काय वेडेपणा चाललाय या मुलीचा! दुष्काळी गावातील असुविधा तुमच्या (संपन्न) घरातील मुलीला सहन होणार आहेत का? पण पुण्यातल्या संपन्न कुटुंबातून १९७० च्या दशकात सांगोल्याला समजून उमजून स्थायिक झालेल्या संजीवनी यांनी अथक परिश्रमातून तेथे आदर्श सामाजिक कार्य उभे केले आहे. महिलांचे आरोग्य, बालकांचा विकास, अनौपचारिक शिक्षण, अन्यायाविरुद्ध संघर्ष, ग्रामीण आरोग्य, पर्यावरण साक्षरता, पारंपरिक लोकर उद्योगाचा विकास, महिलांचे बचतगट आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन अशी डॉ. संजीवनी केळकर यांच्या रचनात्मक कामांची साखळी आहे.

वाचनालयाचे स्वप्न!


वाचनालयाचे स्वप्न!गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते. माझी आई मला शनिवारी देवाला कापूर-अगरबत्ती घेऊन देवळात पाठवून द्यायची. ‘देवाला गेल्याने तुझे चांगले होते’ असे म्हणायची. जेव्हा-केव्हा तिथे जायचो तेव्हा देवळाच्या दुसर्‍या बाजूला, व्हरांड्याच्या समोर प्लायवूडसारख्या दिसणार्‍या तट्ट्या आणि त्याच्या आत साधारण १० फूट X १० फूटची खोली दिसायची. त्यात लाकडी दोन कपाटे व टेबलखुर्ची टाकून बसलेली व्यक्ती असायची, तट्ट्याला देवळीसारखी झडप होती. गावातील काही ज्येष्ठ, तरुण व्यक्ती झडपेतून आत डोकावून काहीतरी मागत असायची. ती डोकी बाहेर काढत तेव्हा त्यांच्या हाती पुस्तक असे. व्हरांड्यात लाकडी बाकडे टाकलेले होते. ती मंडळी त्यावर बसून पुस्तके चाळत असायची. त्यांपैकी ज्याला कोणाला पुस्तक आवडेल तो पुन्हा तट्ट्यातून आत डोकावून पुस्तकातील कार्ड सही करून द्यायचा.
 

मी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान कुतूहलाने ते सर्व पाहात असायचो. असे बरेच दिवस चालले होते. एक दिवस, माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले पुस्तके नेण्यासाठी आली होती. मी त्यांपैकी एकाच्या हातातील जाड पुठ्ठा घातलेले, जुने-मळकट असलेले ‘चतुर बिरबल’ हे पुस्तक पाहिले व ते बघण्यासाठी त्याच्याकडून माझ्या हातात घेतले. मुले बोलत-गप्पा मारत असताना, मी त्यातील एक-दोन गोष्टी वाचूनदेखील काढल्या. मला आनंद झाला. मीही त्या वाचनालयाचा सभासद झालो. चार-पाच महिन्यांत पंधरा-वीस पुस्तके वाचून काढली. मला खूप आनंद झाला. माहिती, ज्ञान, करमणूक यांमुळे मला शाळेत बोलायला यायला लागले. मग शिक्षक मलाच शाळेत बातम्यांचे मोठ्याने वाचन करण्यासाठी पुढे करत.