दारफळची धान्याची बँक


जेथे पैशाचे सर्व व्यवहार होतात, ती बँक असे प्रत्येकाच्या मनात असते. पण सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ या गावी ‘धान्याची बँक’ आहे.

दारफळ हे गाव माढ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. ‘राष्ट्र सेवा दला’च्या संस्कारात वाढलेले व साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित झालेले असे ते गाव. उमराव सय्यद या मुस्लिम तरुणाने दारफळ गावात ‘राष्ट्र सेवा दला’ची मुहूर्तमेढ 1940 मध्ये रोवली. जयप्रकाश नारायण, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे असे मातब्बर 1956 मध्ये दारफळ येथे झालेल्या शिबिरात उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना मांडली आणि त्यातून ग्रामविकास करण्याचा मार्ग सांगितला. गावकऱ्यांनीही उत्साहाने, गावात ‘ग्रामविकास मंडळा’ची स्थापना केली. दारफळचा, पुढे ‘खादी ग्रामोद्योग सधन क्षेत्र योजने’मध्ये समावेश करण्यात आला. त्या योजनेचे त्यावेळचे अधिकारी विठ्ठलराव पटवर्धन यांनी ‘धान्य बँके’ची संकल्पना दारफळकरांसमोर मांडली. गावचे त्या वेळचे तरुण सरपंच तुकाराम निवृत्ती शिंदे यांनी ती कल्पना उचलून धरली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 1 मार्च 1960 मध्ये ‘ग्रामविकास मंडळा’तर्फे ‘धान्य बँके’ची स्थापना केली. त्यामागे कोणते कारण होते?

हळदुगे येथील फुलपाखरांची शाळा


मुले ही फुलपाखरे, निरनिराळ्या विषयांचे वर्ग म्हणजे ही फुले, त्या वर्गात उपस्थित असणारे शिक्षक हे ज्ञानरूपी मकरंदाचे साठे आणि त्यांच्याकडील मकरंद म्हणजे ज्ञानरस. तो मुलांनी ग्रहण करायचा. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात बागडणारे तसे बाल्य पाहायचे असेल तर हळदुगे गावात ‘अॅड. दिलीपराव सोपल माध्यमिक शाळे’त चला. ते गाव सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात आहे.

ह्या छान कल्पनेला प्रत्यक्षात आणणारे शिक्षक आहेत प्रणित साहेबराव देशमुख. ते सोलापूर जिल्ह्यातील सर्वांत तरुण मुख्याध्यापक आहेत. त्यांनी वयाच्या पस्तिशीतच शाळेला प्रगतिपथावर नेले आहे. ते ‘यशदा’ पुणे ह्या संस्थेच्या ‘मुख्याध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमा’चे तज्ज्ञ मार्गदर्शकही आहेत.

त्यांनी अंमलात आणलेला हा ‘बटरफ्लाय पॅटर्न ऑफ लर्निंग’ त्यांना कसा सुचला? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “विज्ञान विषय शिकवताना वर्गात प्रयोग दाखवणे शक्य नसे. प्रयोग वाचून दाखवावे लागत. सर्व प्रयोग प्रयोगशाळेत जाऊन करणेही शक्य नसे. त्यावर उपाय म्हणून ठरवले, की प्रयोगशाळेचाच वर्ग करायचा.”

ती कल्पना प्रत्यक्षात कशी आली ते खूप मनोरंजक आणि उद्बोधकही आहे. हळदुगे हे हजार-दीड हजार वस्तीचे छोटेसे गाव आहे. तेथे ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. तो पॅटर्न माध्यमिक वर्गांसाठी म्हणजे पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी राबवला जातो. शाळेच्या इमारतीत चौदा खोल्या आहेत, पण पाचवी ते दहावीच्या सहा वर्गांना सहाच खोल्या पुरेशा होतात. प्रत्येक वर्गात साधारण तीस विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी सहा वर्गांत, सहा विषयांच्या तासांना, त्या त्या विषयाच्या वर्गात उपस्थित असलेल्या सहा शिक्षिकांकडे शिस्तीत स्थलांतर करतात. प्रत्येक तासिका चाळीस मिनिटांची असते, पण येथे ह्या वर्गातून त्या वर्गात स्थलांतर होताना मुलांना तीन मिनिटेच लागतात. शिस्तीत होणाऱ्या त्या स्थलांतराने मुले प्रफुल्लित होतात.

वेंगुर्ले नगर वाचनालय - १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान

अज्ञात 25/03/2015

वेंगुर्ले नगर वाचनालय ही संस्था 142 वर्षे ज्ञानदानाच्या तसेच, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य करत आहे. वाचनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला विवेकानंद, सावरकर, तुकडोजी महाराज, सानेगुरुजी, राजेंद्रप्रसाद, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, मामा वरेरकर यांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी भेटी देऊन प्रशंसोद्गार काढले आहेत.

वेंगुर्ले नगर वाचनालयाची स्थापना 1871 मध्ये ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी, वेंगुर्ले’ या नावाने झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1930 च्या सुमारास वेंगुर्ले वाचनालयाला भेट दिली. त्यांनी ‘धी नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या परकीय नावाबद्दल नापसंती व्यक्त केली आणि संस्थेस ‘नगर ग्रंथालय’ किंवा जे युक्त असेल ते स्वदेशी नाव द्यावे असे सुचवले. त्यानुसार संस्थेचे नाव 1934 मध्ये बदलून त्याऐवजी त्याचे ‘नगर वाचनालय, वेंगुर्ले’ असे नामकरण करण्यात आले. संस्थेला 1970-71साली राज्य सरकारकडून ‘अ’ वर्ग तालुका ग्रंथालयाचा दर्जा प्राप्त झाला.

ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाकडून वार्षिक परीक्षण अनुदान म्हणून 384000 रुपये मिळतात. संस्थेला शंभर वर्षे झाली तेव्हा, 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाच लाख रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. त्याशिवाय कोलकात्याच्या ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’कडून ग्रंथ, कपाटे, तसेच झेरॉक्स मशीन असे साहित्य प्राप्त झाले आहे. संस्थेत वीस दैनिके आणि सुमारे सत्तर साप्ताहिके, पाक्षिके व मासिके नियमित येत असतात. ग्रंथसंख्या चाळीस हजारांच्या वर असून त्यामध्ये दुर्मीळ ग्रंथ दोनशेसहासष्ट आहेत. संस्थेचा संदर्भ विभाग आणि स्पर्धा परीक्षा दालन तसेच बाल आणि महिला विभाग स्वतंत्र आहेत. त्यांचा लाभ अनेक वाचक घेतात.

पाबळ विज्ञान आश्रम - काम करत शिकण्याची गोष्ट

अज्ञात 15/01/2015

शिक्षण अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले पाहिजे. प्रत्यक्ष काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तीन दशकांपूर्वी पाबळ येथे सुरू झालेले ‘विज्ञान आश्रम’ देशभर पोचले आहे.

ती एका गावाची गोष्ट नाही. तशी त्याची सुरुवात एका गावात तीस-एक वर्षांत झाली; परंतु ती देशातील एकशेबावीस गावांची गोष्ट बनली आहे. गोष्ट केवळ गावापुरती मर्यादित नाही. त्याची व्याप्ती त्याहून अधिक आहे. ती जगण्याशी संबंधित आहे. शिकण्याशी संबंधित आहे. खरे तर जगता-जगता शिकण्याची, शिकता-शिकता जगण्याची आणि ग्रामीण विकासाच्या वेगळ्या प्रारूपाची ती गोष्ट आहे. शिक्षणाद्वारे जीवनावश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना देऊन त्याद्वारे ग्रामीण विकास घडवून आणण्याच्या संकल्पनेतून तीन दशकांपूर्वी डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाबळ येथे ‘विज्ञान आश्रम’ सुरू केला. त्या संकल्पनेचे मूर्त स्वरूपात रूपांतर झाले असून, अरुणाचल प्रदेशापासून केरळपर्यंत त्याचा लौकीक गेला आहे.

ज्या पाबळमध्ये हा आश्रम आहे, तेथील उत्पादकता वाढल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. एका अर्थाने ‘विज्ञान आश्रमा’चे गृहितक प्रत्यक्षात आले आहे. ‘ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर उत्पादकता वाढवावी लागेल आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे’ असे विज्ञान आश्रम मानतो. मात्र, केवळ तंत्रज्ञान विकसित करून उपयोगाचे नाही, तर ते लोकांपर्यंत जायला हवे आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा देणारे उद्योजक निर्माण व्हायला हवेत. असे उद्योजक घडवण्याचा प्रयत्न ‘विज्ञान आश्रम’ करत आहे.

बसोली आणि चंद्रकांत चन्‍ने


चंद्रकांत चन्‍नेमुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स! मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे.

चंद्रकांत चन्ने बसोली या चळवळीच्‍या माध्यमातून गेल्या छत्तीस वर्षांपासून लहान मुलांच्‍या कलागुणांना हळुवार फुंकर घालत त्या कळ्या उमलवण्‍यात रममाण झाले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या हृदयातील अढळ स्थान आणि सोबतच पालक- पाल्यांना मान्य असलेले श्रेय ही तिन्ही घटकांच्या मर्मबंधातील अबाधित ठेव आहे. बसोली ह्या चन्ने यांच्या चळवळीच्या काहीशा अपरिचित नावामागे एक प्रेरणा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या त्या नावाच्या दुर्गम गावाने कलासंस्कृतीतील भारतीयत्व एकलव्याच्या निष्ठेने अंगिकारले आणि जोपासले आहे. बसोली ही तेथील लघु चित्रशैली. मोगलांनी राजपुतांचा पराभव केल्यानंतर परागंदांना ज्या गावांनी आश्रय दिला त्यांपैकी बसोली हे एक. त्या पराभूतांनी ती चित्रदुनिया साकारली आणि त्यांचा स्‍वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवला.

चन्ने यांनी नागपुरात बसोली ‘वसवून’ त्याच चिकाटीने त्यांच्या बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली.

लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे;
काढू फांद्या जमिनिलागून, आकाशाला मुळे,
आम्ही बसोलीची मुले.

दुर्गसखा - गडभेटीचे अर्धशतक


टिम दुर्गसखासुधागड येथे पहिले दुर्गभ्रमण जुलै २००९ मध्ये आयोजित करणाऱ्या ‘दुर्गसखा’ने त्यांच्या गडभेटींचे अर्धशतक पूर्ण केले आहे!

दुर्गप्रेमी तरुणांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोटांच्या प्रेमापोटी स्थापन केलेली संस्था म्हणजे दुर्गसखा. ती मित्रमंडळी सह्याद्रीत अनेक वर्षे भटकत. पायवाटा, कडेकपाऱ्या ‘एकमेकां सहाय्य करून’ पायाखालून घालत. परंतु त्यांनी साहस म्हणून सुरू केलेली भटकंती हळुहळू डोळसपणे घडू लागली.

‘दुर्गसखा’ दोन उपक्रमांमधून काम करू लागले : पर्यटनातून प्रबोधन आणि ‘एक पाऊल मानवतेकडे’

पर्यटनातून प्रबोधन हा ‘दुर्गसखा’च्या स्थापनेमागील मूळ हेतू. गडकोट आणि शिवराय हा त्या सर्वांना जोडणारा जिव्हाळ्याचा धागा. सुमारे साडेतीनशे धाग्यांनी विणलेले गडकोटांचे राज्य अक्षम्य अनास्थेपायी जीर्ण होत चालले आहे. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात जमीनदोस्त झालेले किल्ले जसे होते तसे पुन्हा बांधून काढले. पण ‘इये महाराष्ट्र देशी’ मात्र बेफिकिरी आणि हेळसांड यांसारखे छुपे शत्रू ‘विशेषांचे अवशेष’ करून टाकत आहेत. त्यावर तोडगा म्हणून ‘दुर्गसखा’मार्फत ज्या विविध मार्गांनी दुर्गांची सेवा केली जाते, त्यांपैकी एक म्हणजे दुर्गस्वच्छता. ‘दुर्गसखा’च्या सभासदांनी विविध दुर्गांवरून सुमारे पन्नास पोती कचऱ्याचे निर्मूलन केले आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण, पाण्याच्या टाक्यांची सफाई, गडाची माहिती देणारे फलक असेही छोटे छोटे उपक्रम राबवले आहेत.

माहुली गडावरील स्वच्छता मोहीम


टिम दुर्गसखा‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी ती स्वत:ची जागा सोडून, सावलीचा वर्षाव करत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला एकाच जागी स्थिरावण्याचा शाप असतो.’

तसेच काहीसे सह्याद्रीतील गडकोटांचे आहे, डोंगरांचे आहे, घाटमाथ्यांचे आहे, शिखरांचे आहे.

तरी त्यांच्यात आणि झाडांत एक साम्य दिसून येतेच… ते दोन्ही स्वत:ची जागा न सोडतासुद्धा दुसऱ्यांना स्वत:ची ओढ लावून आपल्याजवळ करतात.

मी डिसेंबरअखेरीला एक छायाचित्र फेसबूकवर पाहिले: ‘किल्ले माहुली’ची पुन्हा कचराकुंडी झाली आहे! अन् बाबासाहेबांचे बोल कानात घुमू लागले. “बाळ, तुला दाढी येते तेव्हा तू काय करतोस? ती तू भुईसपाट करून टाकतोस; पण दाढी परत उगवतेच. तो शरीरक्रम आयुष्यभर चालतो. तसंच या कचऱ्याचं आहे. तो परत परत येत राहतो.”

ठाण्यातील ‘दुर्गसखा’ने माहुलीवरील कचरा साफ करण्याची मोहीम अशा परिस्थितीत हाती घेतली!

आम्ही गड्यांनी ठरवले, “२८ फेब्रुवारी रातच्याला निघून १ मार्चला पहाटेच्या पारीला गडावर जायचं अन् गड स्वच्छ करायचा. गडाला गडाचंच रूप पुन्हांदा द्यायचं.”

‘आम्ही’ म्हणजे मी, सुबोध पठारे, नंदन सावंत, अजय दळवी, केतन अलोणी आणि सर्व तरुणांना लाजवतील असे आमचे नवतरुण साथीदार सुभाष कुलकर्णीकाका असे सहा जण मोहिमेस तयार झालो. मी, सुबोध, अजय, सुभाषकाका आणि नंदनदादा, आम्ही सर्वांनी त्या आधी ‘माहुली’ केला होता, पण केतनसाठी तो गड नवा होता. म्हणाला कसे, “घरात बसून ढुंगणावर फोड आणण्यापेक्षा गडावर येऊन काम करणं, हे साऱ्याच दुर्गप्रेमींना आवडत असतं!”

समतोल फाउंडेशन - 'परतुनी जा पाखरांनो'


मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करतानादोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा, मनात काहूर, कितीतरी दिवसांनी होणारी भेट... कदाचित परतभेटीची शक्यता मावळलेली असताना! मायलेकरांच्या त्या भेटीने उपस्थितांचे डोळेही पाणावले. ही मायलेकरे होती बिहारची आणि त्यांची भेट घडवून आणणारी व्यक्ती होती मुंबईची; ‘समतोल’ ह्या संस्थेसाठी काम करणारा कार्यकर्ता होता तो!

‘स’ म्हणजे समता, ‘म’ म्हणजे ममता, ‘तो’ म्हणजे तोहफा आणि ‘ल’ म्हणजे लक्ष्य. घरदार सोडून मुंबईच्या महासागरात आपणहून दाखल व्हायला आलेल्या बालकांना त्यांच्या माता-पित्यांकडे परत नेऊन सोडणे हे ‘समतोल फाउंडेशन’चे लक्ष्य आहे.

आपण कल्पनाही करू शकणार नाही असे उपक्रम समाजात कुणीकुणी अपार कष्ट घेऊन सद्भावनेने राबवत असतात! ‘समतोल’ हा असाच एक आगळावेगळा प्रयत्न. २००६ आणि २००८ या दरम्यान घेण्यात आलेल्या पाहणीनुसार मुंबईच्या फक्त सी.एस.टी.रेल्वे स्टेशनात रोज दहा ते पंधरा घर सोडून आलेली मुले येतात. सी.एस.टी., कल्याण, कुर्ला आणि दादर ह्या स्टेशनांवर मिळून रोज शंभर ते दीडशे मुले मुंबईत दाखल होतात. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर अशी एक लाख ‘बेपत्ता’ मुले वर्षाला सापडतात. भारतात दहा लाख तरी ती असावीत.

आजची मुले भारताची भावी पिढी, भावी नागरिक आहेत ह्या गोंडस वाक्यातल्या भावी पिढीत मोठ्या प्रमाणात उद्याची गुन्हेगार (संभाव्य) पिढीही अंतर्भूत आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे!

विजय जाधवसमाजाचा तोल बिघडलेला, बिघडत चाललेला आहे आणि वेळीच सावध व्हावे म्हणून विजय जाधव आपल्या परीने एकटेच ह्या समस्येवर काम करू लागले. विजय जाधव आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करून ‘गोदरेज’मध्ये काम करत होते. पण नंतर त्यांनी एम.एस.डब्ल्यू.पर्यंतचे शिक्षण घेऊन पूर्णवेळ ‘सामाजिक कार्यकर्ता’ बनण्याचे ठरवले.

स्यमंतक - भिंतींपलीकडील शाळा!


---

रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली ती ब्रिटिशांनी रुजवलेली शिक्षणपद्धत. मात्र काहीजण त्या परिस्थितीतही शिक्षणव्यवस्थेच्या वेगळ्या वाटेवरून चालण्याचे धाडस करत असतात.

स्‍यमंतकतशीच ‘स्यमंतक’ ही ‘शाळा’ आहे! तो अभिनव प्रयत्न कुडाळ-मालवण रस्त्यावर चालू आहे. त्यात क्रांतीचे सुप्त बीज आहे...  तेथे वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, फळ्यावर काही लिहून माथी मारण्याचा प्रयत्न नाही. परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; तज्ज्ञांची पुस्तके प्रमाण मानून विद्यार्थ्यांची बुद्धी घडवण्याचे काम तेथे होत नाही!

कोकणी गावातील अँटिक वाटणा-या ‘स्यमंतक’ नावाच्या चिरेबंदी ‘घरा’त प्रवेश केला, की तेथील मुक्त वातावरण, मुलांचे चालणे-फिरणे, त्यांनी त्यांच्या आवडीच्या वेगवेगळ्या कामांत मग्न असणे… हे सर्व पाहिल्यावर वाटते की तो जणू एक आश्रमच आहे! तेथील कृषी-अभियांत्रिकीचे प्रयोग म्हणजे ते जणू एक वर्कशॉप आहे. ‘स्यमंतक’ची स्वयंपाक खोली म्हणजे ‘होम सायन्स’चा अभ्यासवर्ग वाटतो.

चाकोरीबद्ध शिक्षण कसे बदलता येईल, मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, ती स्पर्धेत उतरून एकटी बनू नयेत म्हणून त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल असे व तत्सम अनेक प्रयोग तेथे चालू आहेत.

सूर्यकुंभ


सूर्यकुंभ उपक्रमात मुलांसाठी ठेवण्‍यात आलेले सोलार कुकरसौर ऊर्जेचा वापर केवळ वीजनिर्मिती करण्यासाठी नसून, इतरही अनेक जीवनावश्यक गरजांसाठी करता येतो, या विचाराने प्रेरित होऊन एक अनोखा प्रयोग, मुंबईनजीकच्या भाईंदरजवळ उत्तन येथील ‘केशवसृष्टी’त ४ जानेवारी २०१४ या दिवशी पार पडला. ‘सूर्यकुंभ’ हे त्या प्रयोगाचे नाव.

सौर ऊर्जेचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे, सौर ऊर्जेचा वापर करून अन्न कसे शिजते हा प्रयोग त्यांनी स्वत: करावा या उद्देशाने या सूर्यकुंभ प्रयोगाची योजना आखली गेली. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने, केशवसृष्टीत ‘रज्जुभय्या एनर्जी पार्क’ची स्थापना केली गेली आहे. (त्याचे नाव आता ‘प्रो. राजेंद्रसिंग ऊर्जा अभियान’असे ठेवण्यात आले आहे.) ‘केशवसृष्टी’च्या कार्यालयातील उपकरणे त्या योजने अंतर्गत,सौर ऊर्जेवर चालवली जातात.

‘केशवसृष्टी’तील सूर्यकुंभ प्रयोगासाठी मुंबईतील चोपन्न शाळांशी संपर्क साधला गेला. त्या शाळांमधील चौथी ते नववी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली गेली. सूर्यकुंभ प्रयोगात तीन हजार चारशेचौऱ्याऐंशी विद्यार्थी व एकशेऐंशी ट्रेनर यांचा सहभाग घेतला गेला. अजून एका गोष्टीचा उल्लेख करणे गरजेचे आहे, की विद्यार्थ्यांमध्ये अनेक मूकबधिर मुलांचाही समावेश होता.

रज्जुभैया एनर्जी पार्क संबंधात काम करणारे ‘केशवसृष्टी’तील पदाधिकारी भारतभर फिरत असतात. त्या भ्रमंतीमध्ये त्यांची जालना येथील विवेक काबरा या तरुण (वय वर्षे एकोणतीस) इंजिनीयरची भेट झाली. विवेक काबरा सौर ऊर्जेसंबंधात गेल्या पाच-सहा वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी ‘सिंप्लिफाइड टेक्नॉलॉजीज फॉर लाइफ’ या कंपनीची स्थापना केली आहे. त्यामार्फत ते सोलर कुकर तयार करतात. त्याचा वापर करून, जालना येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र जमून अन्न शिजवले, ती घटना आहे १९ जानेवारी २०१३ची. विवेक काबरांनी भरवलेला ‘सूर्यकुंभ’चा तो पहिला प्रयोग. सोलर कुकिंगचा जगातील सर्वांत पहिला मोठा क्लास. त्यासाठी जालन्यातील व आजुबाजूच्या एकशेसात शाळांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी व दोनशेसहा ट्रेनर एकत्र आले होते.