मंगळवेढ्यात प्लॅटिनम पिकते!


श्री संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा यासारख्या संतांनी पावन झालेली मंगळवेढ्याची भूमी महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. तीच भूमी सोने आणि प्‍लॅटिनम धातूंचे कोठार म्‍हणून प्रसिद्धीस येण्‍याची शक्‍यता आहे. डॉ. सुभाष ज्ञानदेव चव्हाण यांनी मंगळवेढ्याच्‍या मातीतून शंभर ग्रॅम खनिजाची निर्मिती केली आहे. हे समृद्ध खनिज सोने आणि प्लॅटिनम युक्त आहे.

क्षात्रैक्य परिषद : पुरोगामी विचारांची सामाजिक चळवळ


महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक छोटीशी तरीही समाजैतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी घटना ४ सप्टेंबर १९४९ या दिवशी घडली. सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही उत्साही आणि चळवळ्या कार्यकर्त्यांनी भेदरहित भारतीय समाजाच्या निर्मितीसाठी कृती करण्याचा ध्यास घेऊन ‘क्षात्रैक्य परिषद’ नावाच्या चळवळीला आरंभ करून दिला. भारताच्या नवनिर्माणाचे स्वप्न त्यांच्या उराशी होते.

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान

अज्ञात 22/06/2015

मन, मनगट, मेंदू - तीन मकारांचा 'उत्कर्ष'!

'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सातत्याने दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात महिलांनी उभी केलेली समाज परिवर्तनाची चळवळ. या महिलांजवळ आहे अंत:प्रेरणा, तळमळ आणि जिद्द. शिक्षण, आरोग्य, अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष, आर्थिक स्वावलंबन आणि पर्यावरण साक्षरता या पंचसूत्रीच्या साहाय्याने ग्रामीण समाजाच्या विकासासाठी संस्थेचे कार्य 1979 पासून सुरू आहे.

राईट टू पी : आम्ही हार मानलेली नाही! - सुप्रिया सोनार


सुप्रिया सोनार मूळ गोव्याची. सुस्थित घरातील. तिने पदवीचे व पदव्युत्तर कायद्याचे शिक्षण गोव्यातच घेतले. ती लग्नानंतर मुंबईत आली. तिने वकिली करण्याचे ठरवले, पण तसा सराव करताना तिच्या लक्षात आले, की व्यवसायात तिला तिची तत्त्वे बाजूला ठेवून काम करावे लागते. तत्त्वांना मुरड घालून काम करणे तिला पसंत नव्हते. तिने ती नोकरी सोडली.

दरम्यानच्या काळात तिच्या मैत्रिणीने तिला गोवंडीच्या डम्पिंग ग्राऊंडवरील झोपडपट्टीत लैंगिक शोषणासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. मैत्रीण 'कोरो' या समाजसेवी संस्थेसाठी काम करते. ते सेशन व्यवस्थित पार पडले, पण तिच्या डोळ्यांसमोर सारखे तेथील दृश्य एखाद्या चलचित्रपटासारखे सुरू राही. तेथील झोपड्या... नागडीउघडी फिरणारी पोरे... तोंडावर भस्सकन येणाऱ्या, तोंडासमोर घोंघावणाऱ्या माशा... तेथे होणारी स्त्रिया-पोरींची छेडखानी, लैंगिक शोषण... आणि एके दिवशी, तिच्या मनाने पक्के केले, की ती त्यांच्यासाठीच काम करील!

गोवंडीचे सेशन तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. ती तेथील लोकांसाठी काम करणाऱ्या 'कोरो'शी जोडली गेली. ती कोणते, कशा प्रकारचे काम करू शकते हे लक्षात आल्यानंतर तिला लिगल ऑर्गनायझरची पोस्ट दिली गेली. तिचे मन त्या कामात रमले. 'कोरो'चे पाठ्यवृत्तीधारक आणि त्यांचे मेंटॉर यांची बैठक 2011 साली राळेगणसिद्धीमध्ये होती. त्यात तिची मैत्रीण मुमताज शेख मेंटॉर म्हणून सहभागी झाली. त्या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक उपस्थित होते. सहभागी झालेल्यांसाठी त्यांच्या त्यांच्या ठिकाणचे प्रश्न कसे सोडवावेत, त्यावर कसे काम करावे, त्या प्रश्नांना जनाधार कसा मिळवून द्यावा. याबाबत तेथे प्रशिक्षण झाले. त्यावेळी मुमताजने सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्न मांडला. पुढे सुप्रियाही त्या प्रश्नाशी जोडली गेली.

सांगोल्याच्या साहित्यात परिवर्तनाच्या खुणा


सांगोला तालुक्यातील कवी, कथाकार, साहित्यिक यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याकरता मंच उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांना आरंभ झाला. त्यातून नवे साहित्यिक, कवी, अभिनेते व दिग्दर्शक निर्माण झाले. सुनील जवंजाळ, अॅड. महादेव कांबळे, देवदत्त धांडोरे, प्रेमकुमार वाघमारे, संतोष होवाळ, गिरीधर इंगवले, नागेश भोसले, प्रा. डॉ. विधीन कांबळे यांची नावे काव्य संमेलनांत सन्मानाने घेतली जातात. देवदत्त धांडोरे यांच्या 'पहाटवारा' व 'गंध प्रीतीचा', महादेव कांबळे यांच्या 'भाकरी की चंद्र' आणि विधीन कांबळे यांच्या 'गोधडी' या काव्यसंग्रहांचे प्रकाशनही झाले आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत जितेश कोळी. त्यांनी त्यांच्या 'हास्यतुषार' कार्यक्रमातून सांगोल्याचे नाव महाराष्ट्रभर पोचवले आहे.

परिषदेच्या कलाकारांनी 'एड्सने ठोठावले स्वर्गाचे दार' हे प्रबोधनपर नाटक आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर 'वादळ क्रांतीचे' हे महानाट्य महाराष्ट्रभर सादर केले. दादा सावंत यांनी 'शेतक-यांच्या आत्महत्या', सायली कांबळे या बालकलाकाराने 'आई मला उमलू दे', तर जितेश कोळी यांनी 'पुन्हा एकदा राजे उमाजी', 'समतेचे पाणी', 'रामजी आंबेडकर- माझ्या भीमरायाचा पिता', आदी एकपात्री प्रयोगांतून राज्यभर जाणीव जागृतीचे लोण पोचवले. राजकुमार काटे यांनी त्यांचा ठसा कथाकथनाच्या क्षेत्रात उमटवला आहे. साहित्यक्षेत्रात काम करत असतानाच परिषदेने सुनील कांबळे, जितेश कोळी, विधीन कांबळे, दादा सावंत, प्रेमकुमार वाघमारे, दिगंबर नागणे आदी कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. सागर भजनावळे यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

रिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर


सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रिधोरे गावात आधुनिक आगळे-वेगळे मंदिर आहे. ते 'शेतकरी ज्ञानमंदिर' या नावाने ओळखले जाते! आधुनिक मानवी शक्तीची देवता म्हणून शेतकरी मंदिर. अतिशय वेगळी कल्पना! 'सिनामाई कृषिविज्ञान मंडळा'तर्फे ते बांधण्यात आले आहे. मंदिराचा मुख्य हेतू शेतक-यांचे शेतीविषयक प्रश्न  सोडवणे हा आहे. सर्व शेतक-यांनी एकत्र येऊन त्यांच्या समस्या सांगून त्यावर उपाय शोधणे या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले आहे. म्हणून त्या मंदिरात पुजापाठ करणे किंवा देवतांचे इतर विधी या गोष्टींना स्थान नाही. मंदिरात फक्त शेतीविषयक तत्वज्ञान व माहिती दिली जाते.

देशात सर्व बाबतीत आधुनिकीकरण आले, नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले. शेतक-यांमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्याची इच्छा बळावू लागली, पण सर्वच शेतक-यांना तशी माहिती उपलब्ध नसते. शेती महाविद्यालये विद्यापीठे दूर असतात. म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी ‘शेतकरी ज्ञानमंदिर’ हा पहिला प्रकल्प 2 ऑक्टोबर 2004 रोजी स्थापन केला. त्यामुळे शेतक-यांना घर, शेतीजवळ आधुनिक शेतीविषयक माहिती मिळवून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे.     

तालवेड्यांचे ‘रिधम इव्होल्युशन’: ढोलाची नवी ओळख


ढोल-ताश्यांची पारंपरिक ओळख बदलून त्याला वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पुण्यातील पंधरा तालवेडे ‘रिधम इव्होल्युशन’ या प्लॅटफॉर्मवर एकत्र आले आहेत. ढोल-ताश्यांच्या सर्व भागांचा पुरेपूर वापर करत ते इतर चर्मवाद्यांतील नाद आणि ठेके ढोल-ताश्यांवर वाजवून पाहत आहेत. त्यांना त्यांच्या या प्रयोगशीलतेतून आणि नावीन्याच्या ध्यासातून संगीतातील नवे दालन खुले होण्याची शक्यता वाटते.

सुजित सोमण, ऋषीकेश आपटे, सचिन खेडकर, अमित वाघ, हर्षवर्धन रानडे, अनिश प्रभुणे, वरुण मुळे, गिरीश गोखले, रोहित कुलकर्णी यांनी मिळून ‘रिधम इव्होल्युशन’ची सुरुवात 2012 साली केली. ते आहेत वेगवेगळ्या शाळांतील, पण ते ढोलवादनासाठी रमणबागेच्या पथकात एकत्र आले होते. त्यांची वाढ पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात झाल्याने सगळयांना लहानपणापासून ढोल-ताश्यांबद्दल आकर्षण होते. त्यांनी रमणबागेच्या पथकात एकवीस ठेक्यांचा नैवेद्य म्हणून वेगळे ठेके ढोलांवर बसवले होते. त्या यशस्वी प्रयोगानंतर ‘रिधम इव्होल्युशन’ने आकार घेतला. ढोलांवर आणखी काही ताल आणून ढोलाची वेगवेगळी ओळख निर्माण करता येईल का असा त्यांचा विचार होता. ओंकार दीक्षित, हर्षद कुरुडकर, प्रथमेश हेंद्रे, अमेय बागडे. अद्वैत काणे, राहुल जंगम हे प्रथम त्या ग्रूपमध्ये एकत्र आले.

सुमित सांगतो, “रिधम म्हणजे ताल. ढोलाच्या आवाजात ‘धम’ असा ध्वनी आहे. आम्ही रिधममध्ये हा ‘धम’ आणला. आम्ही इतर वाद्ये ‘सपोर्ट’ला ठेवून प्रामुख्याने ढोल-ताश्ये वापरतो. आम्ही इतर चर्मवाद्यांवर वाजणारे ताल ढोलांवर वाजवण्याचा प्रयत्न करतो. ते तालांमधील इव्होल्युशनच होय! त्यामुळे ‘रिधम इव्होल्युशन’ हे नाव आम्हाला योग्य वाटले.”

समाजसेवेची भिशी


स्त्रियांचा वावर शिक्षण, नोकरी यांमुळे बाहेर वाढला. त्यांच्या ज्ञानाची, सामाजिक जाणिवेची क्षेत्रे विस्तारली. त्यांच्यात सकारात्मक बदल होत चालला आणि त्याचे प्रतिबिंब भिशीमंडळ, वाचनमंडळ, पुस्तकभिशी यांतून दिसू लागले. त्या सामाजिक जबाबदा-या  उचलू लागल्या. ‘पुणे रोटरी क्लब साऊथ भिशी मंडळ’ हे त्यांपैकी एक. पंचवीस-तीस महिलांनी एकत्रित येऊन मंडळ १९८४ साली डिसेंबर महिन्यात सुरू केले. गरजू संस्थांना आर्थिक साहाय्य पुरवणे हे मंडळाचे उद्दिष्ट.

मंडळाविषयी माहिती देताना अनुराधा सुपणेकर म्हणाल्या, “आम्ही ज्येष्ठ नागरिक महिला यामध्ये आहोत. काही जणींची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे. आम्ही सुरुवातीला दरमहा वीस रुपये जमा करत होतो, सध्या पन्नास रुपये जमवतो; वाढदिवस-मुलांची लग्नकार्ये अशा आनंददायी प्रसंगांच्या वेळी थोडी जादा रक्कमही जमा करतो. वर्षाला अंदाजे वीस हजार रुपये जमतात. त्याचा हिशोब मंडळातील मैत्रिणी ठेवतात.”

दुस-या सभासद मीना बापट म्हणाल्या, “माझ्या मैत्रिणी जयश्री बेंद्रे, स्मिता भोळे, संचिता चवताई, स्वाती ओक, पुष्पा भडकमकर, वसुधा गोडबोले, उमा सावंत, सुमन राजहंस, उषा जोशी, चारुशीला पटवर्धन ..... परांजपे या आणि अशा अनेकजणी आहेत, की आम्हाला समाजासाठी काही करायची इच्छा आहे. हे या प्रयत्नामागचे प्रमुख कारण आहे. घरातूनही पाठिंबा आहे. शिवाय, आम्ही आमच्या या कृतीतून आमच्या मुलांच्या समोरही आदर्श ठेवू शकतो. ज्या संस्थांना सरकारी मदत नाही, ज्यांची उद्दिष्टे मोठी आहेत अशा संस्थांना त्यांची गरज लक्षात घेऊन वस्तुरूपात मदत करतो. वैयक्तिक पातळीवर मदत करत नाही. संस्थेला मदत करण्यापूर्वी, आमच्यातील तीन-चार जणी त्या संस्थेला अचानक भेट देतात, त्यांची कार्यपद्धत व विश्वासार्हता यांची खात्री करून घेतात आणि खात्री पटली, की आम्ही जेव्हा प्रत्येक महिन्याच्या दुस-या  बुधवारी भेटतो तेव्हा त्यावर चर्चा होते व मग त्यांना मदत देण्यावर शिक्कामोर्तब केले जाते. काही वेळेला एखाद्या संस्थेला दोनदा मदत केलेली आहे.”

अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण


‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर, अंटार्टिका संशोधक सुहास काणे, अपरान्ताचा खराखुरा प्रवासी, नऊ ताम्रपटांचा शोध लावणारे कोकणातील नामवंत संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी चिपळूणमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनात या केंद्राचा संकल्प सोडला होता. अरविंद तथा अप्पा जाधव यांनी ‘अपरान्त संशोधन केंद्रा’च्या उभारणीची घोषणा केली. संशोधन केंद्र ‘लोकमान्य टिळक वाचन मंदिरा’च्या पुढाकाराने सुरू होणार आहे.

विविध विषयांवरील सुमारे पासष्ट हजार पुस्तके, दुर्मीळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह वाचन मंदिरात आहे. ‘अपरान्त संशोधन केंद्रा’मध्ये कोकणातील ऐतिहासिक दस्तऐवजांची जपणूक होणार आहे. तसेच विविध लोककला, लोकवाङ.मय, पुरातन दस्तऐवज, शिल्प, हस्तलिखिते आदी वस्तूंचा संग्रह केला जाणार आहे अशी माहिती वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.

चिपळूण हे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर असल्याचा पुरावा सांगणारी ‘कोलेखाजन लेणी’ शहरालगत गुहागर बायपास मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे ‘गजान्तलक्ष्मी शिल्प’, ‘विजयस्तंभ’, भोगाळेतील ‘घोडेबाव’ हेदेखील शहराच्या प्राचीनतेचे पुरावे आहेत. चिपळुणात एक पुरातन वस्तुसंग्रहालय उभे राहणार आहे. कोकण भूमी प्राचीन आहे. ते काही संशोधनाने सिद्धही झालेले आहे. त्या संशोधनाला मध्यवर्ती ठिकाणी स्थान मिळाल्याने कोकणातील अभ्यासकांची जबाबदारी वाढणार आहे.

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.


सोलापूर जिल्ह्यात बत्तीस साखर कारखाने आहेत. त्यांतील पाच कारखाने माळशिरस तालुक्यात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नगर जिल्ह्याच्या सासवड, कोपरगाव, श्रीरामपूर या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता; पण शेतमालाच्या अनिश्चित भावामुळे, मुंबई राज्य पाटबंधारे खात्याने केलेल्या शिफारशीनुसार कालव्याच्या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन 17 नोव्हेंबर 1932 रोजी ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि., माळीनगर’ या कंपनीची स्थापना केली.

शेतक-यांनी सुरुवातीला अडीचशे मेट्रिक टन गाळप क्षमतेची मशिनरी इंग्लंडहून आयात केली. कारखान्याने शेतीसाठी आवश्यक जमीन त्यांच्या सभासदांना मूळ शेतकऱ्यांकडून विकत वा खंडाने घेऊन दिली. त्यांना त्यांच्या ऊसासाठी आवश्यक पाणी सरकारकडून विकत घेऊन पुरवले. तीच योजना सरकार ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’द्वारे (सेझ) पुरस्कृत करते. तसेच, कंपनी ऊस उत्पादकांच्या उन्नतीसाठी बेणे, नांगरट वा तत्सम इतर सोयी पुरवते. कंपनीने ऊसगाळप क्षमता 1991 नंतर वाढवली. कंपनी प्रतिदिन तीन हजार ते बत्तीसशे मेट्रिक टन ऊसगाळप करते. कंपनीने शेतकऱ्यांना ऊसाचा कमाल दर मिळावा व इतर कारखान्यांच्या स्पर्धेत समर्थपणे टिकावे यासाठी ‘उपपदार्थ’ निर्मिती सुरू केली. त्यासाठी कंपनीने जून 2006 मध्ये तीस हजार एलपीडी रेक्टिफाइड स्पिरिट उत्पादन क्षमतेची अद्ययावत डिस्टिलरी सुरू केली. तेथे सरासरी एकशेअडतीस टक्के उत्पादन होते. नंतर मार्च 2008 मध्ये एलपीडी तीस हजार क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरू केला. मार्च 2010 पासून तीस हजार लिटर क्षमतेचा धान्याधारित डिस्टिलरी प्रकल्प चालू केला आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून पन्नास मेट्रिक टन टाकाऊ पदार्थांपासून गुरांचे चांगल्या प्रतीचे खाद्य, कोंबड्यांचे व माशांचे खाद्य तयार करण्याचा प्लाण्ट उभारला जाणार आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होईल व शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होईल. बगॅसपासून 14.8 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. पुणे येथे हॉटेल सेंट्रल पार्कच्या जागेमध्ये मोठा प्रकल्प होणार आहे.