शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न
पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे तो धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यात. त्यांनी अमरीश पटेल ह्यांच्या सुतगिरणीच्या आर्थिक साहाय्याने एकोणतीस खेडी जलसंपन्न केली आहेत. तेथे मे महिन्यात देखील शेतीला पाणी मिळते; नवी धान्य लागवडं केली जाते! इतरत्रही ठिकाणी असे प्रयोग होत आहेत, पण येथील प्रयोगांची व्याप्ती, त्यात ओतलेला जीव व त्याला असलेला शास्त्रीय आधार यामुळे शिरपूरसारख्या दुष्काळी तालुक्यातील गावेसुद्धा सुजलाम् बनली आहेत.