एशियाटिक लायब्ररीमध्ये मुंबई संशोधन केंद्र

अज्ञात 05/01/2010

एशियाटीक सोसायटीमुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे 'एशियाटीक सोसायटी'. २६ नोव्हेंबर १८०४ म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य न्यायमूर्ती) सर जेम्स मॅकिटोश (Sir Jems Mackintosh) यांनी मुंबई परिसराचा व शहराचा सखोल अभ्यास करण्याकरिता समविचारी मंडळींना एकत्र आणले. पुरातन वस्तूशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र यांच्या सखोल अभ्यास चितनातून मुंबईच्या आणि त्याच्या अनुषंगाने भारताच्या प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा शोध हा या सा-या ज्ञानपिपास लोकांच्या अभ्यासाचा गाभा होता. मिळतील त्या कागद पत्रांची अचूकतेने छाननी, विश्वासार्ह इतिहासाच्या नोंदी आणि त्या करतां निर्दोष कार्यपद्धतीची प्रणाली निर्माण करुन 'एशियाटिक'चा सहढ पाया घालण्याचे काम या ब्रिटीश विद्वानांनी केले.

एशियाटिकमध्ये एक लाखहून अधिक एवढी प्रचंड ग्रंथसंपदा आहे. पंधरा हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ, पोथ्या-हस्त लिखिते या खजिन्यात आहेत. तर तीन हजार संस्कृत, प्राकृत, पर्शियन प्राचीन हस्तलिखिते ही जतन केलेली आहेत.

चिकित्सक विद्वानांच्या जिद्धीमुळे व निरपेक्ष, निरलस सेवाभावामुळे हा ठेवा जीवंत राहू शकला आहे. मुंबईच्या या एशियाटिकमधील काही ग्रंथांची जरी नुसती ओझरती ओळख करुन घेतली तरी त्याचे मूल्य पैशांत न होण्याएवढे किती प्रचंड मोठे आहे हे उमजले.

बाराव्या शतकांतील जैन तीर्थंकरांच्या जीवनावरील संहिता, सोळाव्या शतकातील संस्कृत भाषेत लिहिलेली महाभारतातील अरण्यक पवनाची प्रत किंवा १०५३ मधील पर्शियन भाषेतील फिरदौसी यांचा शहानामा या दुर्मिळ ग्रंथांनी एशियाटिकची श्रीमंती वाढली आहे. जगप्रसिद्ध इटालीयन कवी दांते (DANTE) यांची 'डिव्हाइन कॉमेडी' ही एक अभूतपूर्व (CLASSIC) निर्मिती म्हणून जगभरच्या रसिक विद्वानांत मान्यता पावली आहे. पंधराव्या शतकातील या 'डिव्हाईन कॉमेडी'ची प्रत एशियाटिकच्या खजिन्यात रूजू झाली ती खुद मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माऊंस्टुअर्ट एलफिन्स्टन यांच्या औदार्यपूर्ण या ग्रंथरुपी देणगीमुळे!