राजगुरू यांचे अकोल्यात वास्तव्य! (Rajguru)
अकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी निर्माण झाली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळे. क्रांतीचा ज्वालामुखी पेटवण्यासाठी राजगुरू यांचे अकोल्यातील वास्तव्य महत्त्वाचे ठरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक. त्यांपैकी राजगुरू यांच्या सहवासाचे अनेक क्षण अकोलानगराच्या आठवणीत घट्ट बसले आहेत. राजगुरू यांनी सँडर्स या इंग्रज अधिकार्याला यमसदनी धाडले. त्यानंतर राजगुरू यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. पोलिस राजगुरू यांच्या मागावर लाहोरपासून होते. मात्र, त्यांना राजगुरू यांचा थांगपत्ता बराच काळ लागला नाही. राजगुरू यांनी त्यांच्या काही काळाच्या वास्तव्यासाठी निवडले होते, अकोला हे सुरक्षित शहर!