होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक (Homi Bhabha: A Prophetic Guide)
त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला!
काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी जहांगीर भाभा हे एक असे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास संपादन केल्याने दोन द्रष्टया व्यक्तींची परस्परपूरक शक्ती निर्माण झाली. या एका बाबीचा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे!
डॉ. भाभा अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात असताना, तेथील संशोधनासाठी पोषक असलेल्या वातावरणाने प्रभावित झाले. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे याची नेमकी कल्पना, त्यांना वयाच्या विशीच्या आतच आली. त्यांनी त्यांच्या वडिलांना 8 ऑगस्ट 1928 रोजी लिहिलेल्या प्रसिध्द पत्रात ते म्हणतात, ''एखादा व्यवसाय करणे अथवा अभियंता म्हणून नोकरी करणे हे माझ्या स्वभावात बसत नाही, ते माझ्या वृत्तीच्या व मतांच्या थेट विरुध्द आहे. भौतिकशास्त्र हे माझे क्षेत्र आहे व त्यात काम करण्याची माझी ज्वलंत इच्छा आहे. एखाद्या संस्थेचा प्रमुख किंवा 'यशस्वी' माणूस होण्याची माझी इच्छा नाही. ते करण्यासाठी अनेक हुशार व्यक्ती आहेत. मला भौतिकशास्त्रामध्ये काम करू देण्याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.''
बजरंगदास लोहिया - अभियांत्रिकीतील अभिनव वाट!
उद्योग, व्यवसाय हे चरितर्थाचं साधन असलं तरी ते केवळ नफा मिळवणं, पैसा कमावणं आणि आपलं-आपल्या कुटुंब-कबिल्याचं ऐहिक आयुष्य सुखी करणं; एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या सगळ्याबरोबर आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून देशहित व समाजहिता यांसाठी हातभार लावून समाजाचा एक घटक, नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याचं पालन करता येतं. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगातही असा आदर्श घालून देणारे उद्योजक आहेत.
‘‘कॉम्पॅक्स इंजिनीयरिंग वर्क्स’’चे संचालक बजरंगदास लोहिया हे त्यांपैकी एक. कर्तृत्वशाली पण प्रसिद्धिपराङमुख उद्योजक! अंबेजोगाईसारख्या छोट्या शहरात जन्मलेल्या लोहिया यांच्या बुद्धीची चमक विद्यार्थिदशेपासून ठळकपणे दिसून आली. ते दहावीच्या परीक्षेत राज्याच्या गुणवत्तायादीत सातव्या क्रमांकावर चमकले. त्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी वरंगळ येथे अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आणि लोहियांच्या वडलांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाच्या कर्तेपणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी अभियंता म्हणून नोकरी पत्करली.
एक झंझावती व्यक्तिमत्त्व - मेधा पाटकर
अन्यायाविरुध्द लढणारे अनेक, पण न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याचा होम करणारे थोडे. अशांमध्ये मेधा पाटकर यांना अग्रक्रम द्यावा लागेल. आजच्या जमान्यात 'माणुसकी' नि 'सहानुभूती' हे शब्द पुस्तकातदेखील सापडणे महाग. अशा काळात हदयात अपार सहानुभूती घेऊन माणुसकीच्या मूल्यांसाठी संग्राम करणारी, आयुष्य केवळ एका ध्येयासाठी समर्पित केलेली ही एक महाराष्ट्रीय तेजस्वी स्त्री. स्त्री कसली वीजच ती जंगल-द-यांतून, नदी-नाल्यांतून, रात्री-अपरात्री, उपाशी-तापाशी, घरीदारी एकच ध्यास घेतलेली.
भ्रष्टाचार, स्वार्थी वृत्ती, बोकाळलेला वास्तुवाद आणि ढासळणारी जीवनमूल्ये यांमध्ये अंधारमय निराशा सर्वत्र पसरतअसताना, काही दैदीप्यमान माणसे हातात आशेचे दीप घेऊन आजही कार्यरत आहेत. अशाच एक मेधा पाटकर.
मेधा पाटकरांचा जन्म १ डिसेंबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील वसंत खानोलकर हे स्वातंत्र्य चळवळीतले अग्रगण्य लढवय्ये सैनिक आणि अनुभवी, प्रसिध्द कामगार संघटक (ट्रेड युनिअनिस्ट). त्यांनी पुढे 'प्रजा समाजवादी पक्ष' कार्यरत केला. मेधाताईंच्या आई इंदू खानोलकर हे एक प्रसन्न व्यक्तिमत्व. त्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रत्येक प्रसंगात न चुकता येतात.
'मेधा पाटकर म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन' असे समीकरणच आहे. शिवाय, त्या मुंबईत 'स्वाधार' नावाची महिलांची संघटनाही चालवतात.
माधुरी दीक्षित - नेने (Madhuri Dikshit - Nene)
खळखळत्या हसण्यातून 'मधुबाला'ची आठवण देणारी, पडद्यावर 'एक-दोन-तीन ' गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, 'हम आपके है कोन' मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे 'आजोबा' पिढीलाही आवडणारी. धक् धक् करूनही 'धसका' न बसलेली, वयाची उत्सुकता कायम टिकवलेली, सिनेमा पार्ट्यात 'न' मिसळणारी, राजकीय लोकांत उठबस 'न' करणारी, कुठल्याही वलयांकित - गॉसिप प्रकरणात न अडकलेली,'प्रहार'सारख्या नाना पाटेकरांच्या सिनेमात 'मेकअप' न करण्याचा 'प्रयोग' करण्याचा आत्मविश्वास असलेली आणि 'चोली के पिछे क्या' चे चित्रण करतानाही ओंगळ न वाटणारी; उलट तरीही तद्दन फिल्मी रसिकांच्या मनात रेंगाळलेली आणि लग्नोत्तर दोन मुलांची आई होऊनही, पडद्यावरच्या पुनरागमनाची उत्सुकता टिकवलेली, रजतपटलावरचे सौंदर्यसम्राज्ञीपद टिकवलेली माधुरी दीक्षित.
एक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले आहेत, म्हणूनच अंधश्रध्देबाबत कोणतीही घटना महाराष्ट्रात घडली, की 'आता कुठे आहेत तुमचे दाभोळकर?' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे?' असा प्रश्न लोकांना विचारायचा असतो. लोकांनी अशा प्रकारे दाभोळकरांचे नाव अंधश्रध्दा निर्मूलनाशी जोडणे, ही त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची पावती नव्हे का?
दाभोळकरांचा मूळ पिंड हा अस्सल कार्यकर्त्यांचा. ते तरूण वयापासून सामाजिक कार्याकडे ओढले गेले आहेत. राष्ट्र सेवा दलात काम करत असताना त्यांच्या सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली. समाजातील विवेकाचा वाढता -हास आणि कालबाह्य रुढी-परंपरा व अंधश्रध्दा यांचा वाढता घोर यांनी त्यांना त्याच काळात अस्वस्थ केले. म्हणूनच त्यांना एम.बी.बी.एस. झाल्यावर सुस्थापित, चांगले आयुष्य जगण्याची संधी त्यांना नाकारावीशी वाटली. 1977 साली सरकारी नोकरांचा संप घडला. राजपत्रित अधिकारी असूनही दणाणून भाषण केल्याने दाभोळकरांची नोकरी गेली. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या पहिल्या चार महिन्यांतच सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन करून चौकाचौकात सभा घेतल्या. जयप्रकाश नारायण यांच्या 'कुछ बनो' या शब्दांनी जागा झालेला हा तरुण अंधश्रध्दा निर्मूलनाच्या व्यापक आणि आव्हानात्मक कार्यात गुंतत गेला.
डॉ. विजय भटकर
न्यूयार्क येथील वॉल स्ट्रीट जर्नलच्या पहिल्या पानावर 24 मार्च 1993 रोजी 'इंडिया डीड इट' या शीर्षकाखाली एक बातमी आली होती. त्या बातमीच्या केंद्रस्थानी होते डॉ. विजय भटकर. राजीव गांधी पंतप्रधान असताना भारताने अमेरिकेकडे क्रे नावाच्या महासंगणकाची मागणी केली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनॉल्ड रीगन यांनी हा महासंगणक भारताला अंतराळ, आण्विक, संरक्षण आणि इतर कोणत्याही प्रगत संशोधनासाठी वापरता येणार नाही या अटीवर देऊ केला होता.
भारताने ह्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. भटकर हे तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेण्ट सेण्टर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला कार्यरत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात 2 जून 1988 रोजी केली. डॉ.विजय भटकरांनी परम-800 हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. त्याला उद्देशून ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ ही बातमी दिली होती.