अविनाश बर्वे यांचा मैत्रभाव
अविनाश बर्वेसरांना प्रवास हा तर आवडीचा. तोही फक्त रेल्वे किंवा लाल बसगाडी (एसटी) यांचा. कारण आता तर त्याला निम्मे तिकिट पडते, त्यांनी वयाचा अमृतमहोत्सव नुकता साजरा केला. शाळेतील त्यांच्या अनेक मित्रांचा ग्रूप दरवर्षी सहलीस जात असे. आता, तो ग्रूप फक्त दोघांचा राहिला आहे - अविनाश बर्वेसर व सुबोध देशपांडेसर. बर्वेसर शहात्तर वर्षांचे, तर सुबोधसर ब्याऐंशी वर्षांचे! दोघेच दरवर्षी, कधी कधी वर्षातून दोन वेळाही प्रवासास जात असतात. त्या दोघांचा भारतातील सर्वांत लांबचा रेल्वे प्रवास पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर आणि विविध दिशांनी सुरू असतो. जास्तीत जास्त काळ रेल्वेत बसायचे – खिडकीतून बाहेरील दृश्ये, निसर्ग, नवनवीन गावे-खेडी-नगरे - तेथील माणसे, त्यांच्या वेशभूषा आदी गोष्टी न कंटाळता पाहत राहायचे आणि गीतरामायण मोबाइलवर ऐकायचे, तेवढाच त्या काळातील त्या दोघांचा छंद! बाकी प्रसिद्ध ठिकाणे पाहणे वगैरे सहज जमले तर – त्याचा आग्रह नाही. रेल्वेने सर्वदूर जाणे आणि परत येणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट. स्टेशनवर जे मिळेल ते खाद्य आणि मिळेल ते पाणी अजूनही चालते त्यांना!