राम सुतार – शिल्पकलेतील भारतीयत्व (Ram Sutar)
राम सुतार हे स्वातंत्र्योत्तर भारतीय स्मारकशिल्पांच्या इतिहासातील एक मानकरी. त्यांना गुरुस्थानी मानणारे मोठे शिल्पकार होऊन गेले. त्यामध्ये मुंबईचे विनय वाघ, विजयवाड्याचे बीएसव्ही प्रसाद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. शिल्पकलेला 1960 नंतर नवनवे फाटे फुटत गेले. त्यातील एक शाखा म्हणजे स्मारक-शिल्पे. ती शाखा मुख्यत: भावनेशी निगडित असल्याने त्या प्रकारच्या कलेस राजाश्रय व लोकाश्रय अधिक मिळाला. प्रचंड आकाराची शिल्पे हे राम सुतार यांचे वैशिष्ट्य. राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडून ‘रवीन्द्रनाथ टागोर संस्कृती पुरस्कार’ (2016) मिळाला, त्यावेळी त्यांचे वय ब्याण्णव होते! राम सुतार यांनी, स्टुडिओ 1960 साली थाटला. म्हणजे कामगिरी औपचारिकपणे सुरू केल्यावर छपन्न वर्षांनी. त्यांनी घडवलेले पुतळे - संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (18 फूट), इंदिरा गांधी (17 फूट), राजीव गांधी (12 फूट), गोविंदवल्लभ पंत (10 फूट) आणि जगजीवनराम (9 फूट).