मराठ्यांचे मोर्चे आणि मराठा समाज


मराठ्यांचे मोर्चे निघत आहेत. त्या निमित्ताने दीपक पवार यांचे व्यक्तिगत अनुभवाधारित व तेवढ्याच निष्कर्षांना बळ पुरवणारे मनोगत.

आपण दीपक (पवार)शहाण्णव कुळी मराठा आहोत असे मला लहानपणापासून सांगितले गेले. रेशनच्या दुकानात लहानपणीच गेलो तेव्हा गावाकडचा असलेला दुकानदार ‘पवार म्हणजे धारेचे, की डबक्याचे’ असे विचारत होता. मला माहीत नव्हते. मी वडलांना विचारले, तेव्हा ‘आपण धारेचे पवार’ असल्याचे कळले. नंतर पुस्तके वाचताना ‘पवार हेच मध्यप्रदेशातील धारचे’ हे कळले. मग मराठेशाहीचा इतिहास वाचताना परमार-पवार अशी एक व्युत्पत्ती कळली. पण आपले आडनाव इतरांसारखे आहे आणि नाव तर आता, अगदी सर्वसामान्य वाटावे असे आहे याची जाणीव होत गेली.

मला शाळेत ज्यांनी पहिल्यांदा निबंध लिहायला शिकवला ते गोसावी गुरूजी, दरवाज्यात बोट चेपल्यावर डब्यातली भेंडीची भाजी खायला घातली त्या बोडसबाई. (तेव्हा मला पहिल्यांदा जेवणाचे डबे इतके लहान असू शकतात आणि चपात्या -त्यांना पोळ्याही म्हणतात हे कळले- इतक्या कमी प्रमाणात असलेला डबा असतो हे दिसले. नंतर मोठा झाल्यावर ते कोकणस्थ ब्राह्मणांचे वैशिष्ट्य आहे हे लक्षात आले.