पळून चाललेय गाव, आचरे त्याचे नाव! (Aachre)
गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत आहे. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण होत असते. गावपळणीची प्रथा मुणगे गावात मात्र काही समाजाचीच माणसे पाळतात.
आचऱ्याची रामनवमी, डाळपस्वारी, गणेशोत्सव आदी सण-उत्सवांना संस्थानी थाट असतो. ते आगळेवेगळेपण आचरे गावाच्या गावपळणीतही दिसून येते. चार वर्षें झाली, की गावपळणीचे वर्ष आले याची कुजबुज गावकऱ्यांत सुरू होते. शेतकरी त्यांची नाचणी, भुईमूग, भात यांची कापणी वेगाने करतात. ‘न जाणो म्हाताऱ्यान प्रसाद दिल्यान तर आमका गाव सोडूक व्हयो’ ही चर्चा शेतापासून घरापर्यंत चालू असते. श्रीदेव रामेश्वराला प्रेमाने, आपुलकीने आचरे गावात ‘म्हातारा’ म्हणण्याची प्रथा आहे.