सोमवंशी क्षत्रिय समाज – संस्कार शिबिरे


‘सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ’ ही नुकतीच पन्नास वर्षें पूर्ण झालेली सामाजिक संस्था. समाजातील सर्व वयोगटांतील लोकांसाठी तेथे वर्षभर उपक्रम राबवले जातात. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, ज्येष्ठ समाजसेवक व स्वातंत्र्यसैनिक उद्धवजी घरत यांच्या नावाने व्याख्यानमाला, मुला-मुलींसाठी संस्कार शिबिरे हे त्यांतील महत्त्वाचे. समाजातील १४ नोव्हेंबर हा बालदिन वैशिष्ट्यपूर्ण रीतीने साजरा होतो. त्या दिवशी मुलांची महामंडळाशी प्रथमच ओळख होते. बालक कौतुक सोहळ्यात आठ महिने ते इयत्ता दहावीपर्यंतच्या सर्वांसाठी तो दिवस साजरा होत असतो.

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वयोगटातील मुलांसाठी ‘किलबिल’ हे शिबिर आयोजित केले जाते. ते दरवर्षी वेगवेगळ्या गावात जाऊन गावकऱ्यांसोबत पार पाडले जाते. त्यामुळे गावकरी महामंडळाशी जोडले जातात. मुलांना त्या शिबिरात साहसी खेळ, कला यासोबत बैलगाडी सफर, गोळेवाला, कुंभारदादा आणि समाजातील अशा अनेक गोष्टींशी भेट घडवली जाते. भारतीय सणांचे महत्त्व व उद्देश मुलांना समजावेत म्हणून सण साजरे केले जातात. कधी गणेशोत्सव, कधी दिवाळी, गुढी पाडवा, कधी होळी, कधी सांताक्लॉज सोबत ख्रिसमस आणि बाहुला-बाहुलीचे लग्नसुद्धा साग्रसंगीत पार पाडले जाते. मंगलाष्टके, होम, अंतरपाट असे सर्व. गावातून मिरवणूक वाजतगाजत फिरते.

हेमा हिरवे - माणसं घडवण्‍यासाठी कार्यरत


विद्यार्थ्यांना शिकवताना हेमा हिरवेहेमा हिरवे गेली दहा वर्षे गोसावी वस्तीतल्या मुलांसाठी विनामूल्य खेळघर चालवतात. ते केवळ विरंगुळ्याचे ठिकाण राहिलेले नाही तर मुलांवर संस्कार करणारे केंद्र झाले आहे. हेमा हिरवे, त्यांचे कुटुंब; एवढेच नव्हे तर त्यांच्या परिसरातील पंधरा-वीस कार्यकर्ते त्यांच्या या उपक्रमात सहभागी होऊन गेले आहेत. हेमा यांना वारसाहक्काने समाजसेवेचे व्रत मिळाले आहे. त्यांचे वडील श्रीनिवास धोंगडे हे औरंगाबादला शिक्षणाधिकारी होते. ते त्यांच्या नोकरीच्या दिनक्रमातून सुद्धा प्रौढ साक्षरता वर्ग चालवत. ते गरजू विद्यार्थ्यांना शिकवायचे. ते परगावी कामानिमित्त कधी गेले तर हेमा आणि तिची भावंडे मुलांना आणि प्रौढांनाही शिकवण्याचे काम करत. त्यांनी मुलांना जवळजवळ दहा वर्षे श्लोक, गाणी, खेळ इत्यादी गोष्टीदेखील शिकवल्या. त्यांमधूनच त्‍यांच्‍या खेळघर या उपक्रमाचा उदय झाला.