मुंबईतील चायना टेम्पल - चिनी परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिक सविता अमर 03/03/2016

मुंबई ज्या सात बेटांनी बनली आहे, त्यापैकी माझगाव हे एक बेट. मोठमोठी जहाजे, प्रशस्त बंदर आणि कायम व्यापारी हालचालींनी गजबजलेल्या माझगाव डॉकजवळच्या लाकडी इमारतीत चायना टेम्पल (चिनी मंदिर) आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकापासून किंवा हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड स्थानकावर उतरुन काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नवाब टँक मार्गावरील त्‍या चिनी बौद्ध मंदिरापर्यंत पोचता येते. त्या मंदिरात 'क्वॉन-टाइ-कोन' नावाचा चिनी देव विराजमान आहे. मात्र बहुतांश मुंबईकरांना ते मंदिर अस्तित्वात असल्याचे ठाऊक नाही. भारतात कलकत्ता आणि मुंबई या दोनच ठिकाणी चिनी मंदिरे आहेत. माझगावचे ते चिनी मंदिर सुमारे दीडशे वर्षें जुने असून ते मुंबईतील चिनी परंपरा आणि चिनी संस्कृती यांचे प्रतीक बनले आहे.