‘दोस्ती का पैगाम’
माझा माणसाच्या उपजत चांगुलपणावर विश्वास आहे. प्रत्येक माणूस हा चांगला असतो किंवा चांगला असण्याचा प्रयत्न कायम करत असतो. अगदी लहान मुलेसुद्धा त्यांना ‘गुड बॉय’ म्हटले जावे म्हणून इंजेक्शन न रडता घेण्यासही तयार होतात; निदान तसा प्रयत्न करतात असा माझा बालरोगतज्ज्ञ म्हणून रोजच्या व्यवहारातील अनुभव आहे. मी आणि सविता (माझी पत्नी, जी सर्जन आहे) मुंबईजवळ बदलापूरला राहतो. तेथेच तीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतो. त्या तीस वर्षांत बदलापूर प्रचंड वाढले. आम्ही मुळात खेडेवजा त्या गावाचे शहरात रूपांतर होताना जवळून पाहिले. ते देशभरातील वेगवेगळ्या भागांतून पोटापाण्यासाठी स्थलांतरित होऊन आलेल्या माणसांच्या रेट्यामुळे घडले होते. ती वेगवेगळ्या मातृभाषा असलेली, वेगवेगळ्या जाती-धर्मांची माणसे एकत्र राहताना, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होताना, एकमेकांचे सण साजरे करताना; त्याच प्रमाणे एकमेकांना अवघड प्रसंगी मदत करतानाही पाहिली. काही जणांनी त्यांच्या भाषेच्या नव्हे तर जातीच्या; किंबहुना धर्माच्याही पलीकडील जोडीदार निवडून आनंदाने संसार केलेले पाहिले आहेत. ते सगळे पाहत असताना माणसाच्या अंगभूत चांगुलपणावरचा, माणुसकीवरचा विश्वास वाढत गेला.